Monday, September 7, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ५,६,७ : डॉ. कल्पना कुलकर्णी

भाग ५: माझे स्वातंत्र्य

गेल्या महिन्यातला तो गुरुवार माझ्यासाठी अविस्मरणीय होता. साडेआठ वर्षांचं माझं पार्सल स्वत:ची स्वत:च बॅग भरून माझ्या भाच्याबरोबर मावशीकडे गावाला रवाना झालं होतं. मला सोडून ती गावाला असं पहिल्यांदाच घडत होतं. मी आपली प्रापंचिक काळजीनं सांगत होते, “एसटीत भय्याला त्रास देऊ नकोस, गावाला मावशीचं सगळं ऐक. वेणी घालून घे...” इत्यादी. गाडी हलली. हात हलवून टाटा करताना सईबाई म्हणाल्या, “आई तू मजा कर हं इथे!”

सई सांगूनच गेल्यामुळे त्या संध्याकाळपासूनच मी मजा करायला सुरुवात केली. मी ठरवूनच घेतलं. नवरा नाही, मुलगी नाही, म्हणून स्वयंपाकही नाही. “चूल बंद” उपक्रम सुरू केला. फक्त चहा-कॉफी करायची. अगदी हॉस्टेलसारखं राहून बघायचं. सगळ्याच स्नेह्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचा चंग बांधला. पुढच्या तीन दिवसांतल्या सकाळ-संध्याकाळच्या जेवणाची आमंत्रणं मिळाली.

त्या संध्याकाळी लक्ष्मी रोडवर गेले. रमतगमत कपड्यांपासून भांड्यांपर्यंतची विविध दुकानं फिरले. “आई, लवकर चल ना घरी, मला कंटाळा आलाय,” हा रोजचा भुंगा नसल्यामुळे तीन तास निवांत घालवले. चार-पाच हजारांचा कपडालत्ता मनसोक्त पाहून, चार ठिकाणी घासाघीस करून तीनशे रुपयांचा ड्रेस खरेदीचा आनंद मिळविला.

घरी जाताजाताच अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं पुस्तक घेऊन गेले. घरी पोहोचल्यावर पुस्तक वाचायला घेतलं. मध्ये वीज गेली तर मेणबत्ती लावून वाचत राहिले. एका दमात पुस्तक वाचून ते संपवूनच झोपायला गेले. हा दुर्मिळ भाग्यक्षण अनुभवून मी माझं लुटुपुटुचं स्वातंत्र्य अभियान सुरू केलं.

“सईशिवाय रात्री झोप येईल ना?” नवरा फोनवर विचारत होता. अगदी डोळे मिटू लागले की, “आई गं, तेव्हा तुला तान्याची आई काय विचारीत होती?” असं गदागदा हलवून “तेव्हा” चा तातडीचा प्रश्‍न विचारून झोप उडवणं नाही. रात्रभर अंगावर कुठूनही हात, पाय, डोकं आदळणं नाही. थोडक्यात, एकदा पाठ टेकली की सकाळ झाल्यावरच डोळे उघडायचे. असं किती दिवसांचं स्वप्न, पण ते अपूर्णच राहिलं. सतत शहरी प्रदूषणात श्‍वास घेणार्‍या आमच्या फुप्फुसांना गावाकडच्या मोकळ्या हवेत जसं गुदमरेल ना तशी मी त्या रात्रीच्या शांततेनं अशांत होऊन गेले.

“काय करणार आज?” शेजारच्या आजींनी दुसर्‍या दिवशी कुतूहलानं विचारलं, “बघूयात”. माझं मोघम उत्तर. स्वत:चे वेगळे कार्यक्रम ठरवण्याची माझी सवयच मोडलेली. मुलीनं मज्जा करायला सांगितली आहे, हे आठवून नवरा जसा एका पाठोपाठ एक चॅनेल्स बदलून टीव्ही बघतो तसा बघून झाला. जांभया आवरेनात. “अजून काय बरं मजा करावी?” विचार मनात आला. न राहवून कपाटं आवरायला घेतली. घरातली सगळी कपाटं, माळे, रद्दी आवरून झाली. शेवटी मी कंटाळून माझं स्वातंत्र्य अभियान आवरतं घेतलं. बहिणीला फोन केला आणि सांगितलं, “माझं पारतंत्र्य लवकर पाठवून दे गं!” 

ऑडिओ लिंक:

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ६: देवाण-घेवाण

 

आमच्या घरातील कामाच्या बाई अशिक्षित आहेत. मी त्यांचा पगार त्यांच्या हातात देत नाही; बँकेत भरते. त्यांना पैसे हवे असल्यास त्या माझ्याबरोबर बँकेत येतात आणि माझ्या ओळखीवर “अंगठा” करून पैसे घेतात.

रोज सई शाळेतून घरी आल्यावर बाईच तिच्यापाशी तासभर असतात. त्या दोघींचं खूप जमतं. मी घरी येते, तेव्हा दोघीही गप्पांत रंगून गेलेल्या असतात. अलीकडेच सईला कळलं की बाईंना लिहिता येत नाही. पहिलीपासून गेली दोन वर्षे हिंदी शिकत असल्याने तिला आता देवनागरी चांगलीच लिहिता-वाचता येते. कामाच्या वेळेत त्या एका तासात सईनं त्यांना लिहायला शिकवण्याचा सपाटा लावलाय. परंपरागत पद्धतीनं आपण “क ख ग घ ङ” शिकतो, तसं ते नसावं. माझ्या मते सई फळ्यावर लिहून देते आणि त्यांना गिरवायला सांगते. “ब” लिहिताना आधी वाटी की रेघ, हेही त्यात महत्त्वाचं नसावं; पण आता त्या “बेबी” हा शब्द,- त्यांचं नाव पूर्ण आणि आडनाव अर्धं एवढं लिहू शकतात. बहुतेक आमच्या बँकेतील पुढच्या खेपेस बाई अंगठ्याऐवजी नाव लिहितील, म्हणजेच सही करतील.

परवा माझी कुत्री “गोल्डी” मला काही तरी चघळताना दिसली. काय आहे म्हणून बघितलं, तर तो होता एक सागरगोटा! आजच्या “व्हिडीओ गेम” च्या जमान्यात सागरगोटा घरात पाहून मी चक्रावलेच. सईला विचारलं, “तुला माहितीये का हे गोल्डीनं दगडासारखं तोंडात काय धरलंय? ते कुठून आणलंय?” ती म्हणाली, “अगं आई, त्याला सागरगोटे म्हणतात, आपल्या बाई मला शिकवतात रोज. मला आता पाचखईपर्यंत येतंय, म्हणजे एकाचवेळी पाच सागरगोटे उचलायचे.” मला त्यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण खूपच पसंत पडली.

ऑडिओ लिंक::

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

भाग ७: एप्रन हवाच!

कडक उन्हाळ्याचे दिवस आणि ससूनच्या ओपीडीतला तो अलोट गर्दीचा भाग. तेथे मला माझी मैत्रीण पूर्ण बाह्यांच्या, जाड कापडाच्या एप्रनमध्ये भेटली. न राहवून मी म्हणाले, “एवढ्या उन्हाळ्यात काढून का ठेवत नाहीस एप्रन?” तिचं उत्तर अवाक करणारं होतं. ती म्हणाली, “एवढ्या गर्दीतही पेशंट आपल्याला डॉक्टर मानायला तयार नसतात. त्यांना आपण मुली म्हणजे नर्सच वाटतो; डॉक्टर नाहीच. एप्रनमुळे निदान पाच-दहा लोकांना तरी कळतं की या डॉक्टर आहेत.”

माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर म्हणून मिरवावं, यातली ती नाही. तरीही...

एकदा माझा एक पेशंट अर्जंट रिपोर्ट हवाय म्हणून आला होता. खोलीच्या बाहेर रेसिडेंट डॉक्टरांना भेटला. त्यांनी त्या पेशंटला थांबवलं. मला स्लाईड दाखवून रिपोर्ट विचारून लिहून माझी सही घेतली. मी अगदी कळवळ्यानं पेशंटला आत बोलावून रिपोर्टमध्ये काळजी करण्यासारखं, कॅन्सर वगैरे काही नाही असा दिलासा दिला. तो खोलीच्या बाहेर पडला. बाहेरच्या माझ्या रेसिडेंट डॉक्टरकडे जाऊन म्हणाला, “डॉक्टर, हा रिपोर्ट बरोबर आहे ना? खोलीतल्या त्या सिस्टरनी दिलाय” मला माझ्या मैत्रिणीचं उकाड्यातसुद्धा एप्रन घालण्याचं दु:ख थोडंफार कळलं.

निदान ससूनचे बहुसंख्य पेशंट्स अडाणी तरी असतात. त्यांना एखादी पोरसवदा स्त्री “वरच्या डॉक्टर” हे कळत नसेल; पण माझी एक इंजिनिअर मैत्रीण एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करीत होती. तिची ए.सी. केबिन प्रवेशद्वाराच्या जवळ होती. खोलीच्या दारावर नाव, हुद्दा, व्यवस्थित पाटी होती. तरी ती सांगायची दिवसाकाठी दहा जण तरी तिला रिसेप्शनिस्ट समजून चौकशी करायचे.

ऑडिओ लिंक:


(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )
 


2 comments: