Saturday, September 19, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ११,१२,१३ : डॉ. कल्पना कुलकर्णी


 

भाग ११ : संवाद

             मुलींच्या परीक्षा चालू होत्या. परीक्षेच्या अभ्यासात जास्त लक्ष न लागता सुटीतल्या कार्यक्रमांचे बेत करण्यातच मैत्रिणींचा जास्त वेळ जाऊ लागला. मी सईला वरवर दामटलं, पण मनातून मला खरं तर खूप छान वाटलं. चला, मुली मोठ्या व्हायला लागल्या. आपले “मैत्रिणी मैत्रिणींचे” कार्यक्रम ठरवायला लागल्या. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे सगळ्या सात-आठ जणी आमच्या घरी जमल्या. दिवसभरासाठीच राहायला आल्या. सुरुवातीचा काही वेळ “कित्ती मज्जा” असा आनंद व्यक्त करण्यात गेला. मग पुढे “खूप वेळ एकत्र खेळायचं, घरी खूप उशिरा जायचं”, हे ठरवण्यात अजून काही वेळ गेला. रोज शाळेत मधल्या सुटीत खेळत असतील ते खेळ खेळून झाले. शाळेच्या गप्पा मारून झाल्या. पुढे काय?

            “आई, आता काय करू?” माझ्या कानाशी भुंगा सुरू झाला. माझ्या लक्षात आलं. “शाळेत भेटणार्‍या मैत्रिणी” म्हणून त्या एरवी भेटत. आता मात्र पहिल्यांदाच “स्वत:” अशा भेटत होत्या. तशा त्या खर्‍या मैत्रिणी अजून झाल्याच नव्हत्या. वर्गमैत्रिणीच होत्या. मुली मोठ्या व्हायला लागल्यात पण इतक्या मोठ्या झाल्या नाहीत, की स्वत:चं हितगुज, संवाद साधतील. अजून काही दिवसांनी याच चिमण्या एकमेकींबरोबर अखंड चिवचिवत राहतील. माझी खात्री आहे, तेव्हा त्यांच्यात स्वत:चा म्हणून खूप सुरेख संवाद असेल  सगळ्याच महत्त्वाच्या आणि बिनमहत्त्वाच्याही गोष्टींबाबत! शाळेतील ते मोठे होण्याचे माझेही दिवस असेच होते. सतत मित्रमैत्रिणी आणि अखंड बडबड. पण वय वाढलं तसा मनाचा निबरपणा वाढीस लागून शब्दांची कोवळीक मिटू पाहते, असं वाटायला लागलंय.

            परवा माझा एक जुना मित्र खूप दिवसांनी आला. मुंबईत काही कामानिमित्त आलेला. तो वाट वाकडी करून मुद्दाम भेटायला आला. खूप वर्षांनी भेटलो. एकमेकांची, दुसर्‍या मित्रमैत्रिणींची खबरबात घेण्यात दिवस सरला. जुन्या आठवणी काढून झाल्या. त्यानंतर पुढे काही संभाषणच होईना. ज्याच्या आठवणींचे कढ मला सतत येतात, त्याच्याशी माझा संवादच साधेना. मनातलं मैत्र तसूभरही कमी झालेलं नाही. पण तरीही पूर्वी वर्षानुवर्ष सतत एकमेकांशी बोलत राहणारे आम्ही एक दिवसाच्या वर बोलू शकलो नाहीत. हे असं का झालं? वय वाढलं म्हणून ? वाढत्या वयाबरोबर संदर्भ बदलत जातात म्हणून ?

            माझे काही तरुण सहकारी मध्यंतरीच्या काळात काही कामानिमित्त दक्षिणेकडे गेले. “जाताच आहात, तर आजूबाजूला केरळ वगैरे फिरून या. मजा करून या.” आम्ही अनाहूत सल्ला दिला. दोन-तीन दिवसांचा प्रवास. पुढे काम, फिरणं सगळा आठ-दहा दिवसांचा कालावधी. हे सगळे आजचे मित्र निवांत दिसण्याऐवजी थोड्याफार प्रमाणात धास्तावलेलेच दिसत होते. न राहवून मी त्यातल्या एकाला कारण विचारलं. तो म्हणाला “मॅडम, खूपच दिवस जायचंय, बोअर होईल फार! काय बोलायचं एकमेकांशी सतत?” वर्षानुवर्ष एकमेकांबरोबर काम करणारे हे सारे “मित्र” कामाव्यतिरिक्तच्या वेळात एकमेकांबरोबर राहण्यासाठी “अनोळखी”च होते. ते सहकारी होते. त्यांच्यात संभाषण होतं; पण स्वत:चा संवाद नव्हता.

            असंच एका दिवशीच्या पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात मला प्रद्युम्न भेटला. प्रवासात अनोळखी सहप्रवाशांबरोबर गप्पा होतात तशा गप्पा सुरू झाल्या. हळूहळू त्या चांगल्याच रंगल्या, तो पुण्यात मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून मुंबईला परतत होता. लग्न, त्याच्या अपेक्षा, नुकतीच भेटलेली मुलगी याबाबत तो बरंच विस्तारानं बोलला. मला माझी मतं विचारून, त्यांची दखल घेऊन, त्यानं या विषयावर बरीच चर्चा केली. खरंतर मला खूप आश्‍चर्य वाटलं. ओळखदेख नसताना “स्वत:चं लग्न” या अतिशय खासगी विषयावर तो माझ्याशी तीन तास बोलला. आता मला वाटतंय, त्या क्षणी कोणाशी तरी बोलणं, ही त्याची गरज होती. माझ्यासारख्या अपरिचिताशी बोलणं त्याला निर्धोक वाटलं असेल. कारण माझं त्याच्याबद्दल काहीच मत तयार झालेलं नव्हतं. त्यामुळे माझ्याशी तो मोकळेपणानं संभाषण करू शकला. पण हे संभाषण आजचा “संवाद” होता का? की त्याच्या गरजेनुसारचं ते त्याचं स्वगत होतं. वर्षानुवर्ष सोबत काम करून संवाद साधला जात नाही, तो पाचदहा मिनिटांच्या संभाषणानंतर अभिव्यक्त होऊ शकतो?

            आमच्या गोल्डीशी (कुत्री) आम्ही सतत माणसांशी बोलतात तसं सगळं बोलत असतो. ते ऐकून तिला आता आम्ही बोललेलं बरंच कळतं, असं आम्हाला वाटतं. यावर माझ्या एक मॅडम मला म्हणाल्या की, “खरं तर बोलायची हौस भागावी म्हणूनच तू गोल्डी पाळलीयस.” जर हे खरं असेल, तर तिच्याशी बोलणं, हा मला संवाद का वाटतो? ती तिच्या कृतीमधून, अस्तित्वातून, आमच्याशी, आमच्या बोलण्याशी भावनिक जवळीक साधते म्हणून ?

            गोल्डी सजीव तरी आहे, जी सईला, तिच्या बरोबरीच्या आणि लहान मोठ्या वयाच्या मुलांना त्यांच्या खेळण्याशी (बाहुल्या, सॉफ्ट टॉइज, सुपरमॅन, ज्यांना त्यांची स्वत:शी नावंसुद्धा असतात.) एकतानतेनं गप्पा मारताना पाहिलंय आणि मला तो कायम त्यांच्यातला संवादच वाटलाय. तिनं सांगितल्यावर मला पण एक-दोनदा खात्रीनं वाटलंय, की तिचा “सोमू” (खेळण्यातलं माकड) हल्ली खूप त्रास देतो. “रिफ्का”ला (खेळण्यातली कुत्री) चिडवतो.

            हा सगळा संवादाचा व्याप आहे, तो बोलण्यातून जुळणार्‍या आणि फुलणार्‍या नात्यातला आहे. स्वत:चा  स्वत:शीच सुरेल संवाद साधला, तर स्वत:शीच एक सुरेख नातं जुळेल.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

 


भाग १२ : दिलासा

 संध्याकाळी नुकतीच घरी परतले होते. फोन खणाणला. माझे वडील होते फोनवर. “अगं, केतनचा काही निरोप आलाय का? तिकडे बडोद्याजवळ दंगल उसळली आहे.” मी सैरभैर. त्यानंतर टीव्हीच्या विविध बातमीसत्रांमधून एक-एक जीवघेण्या गोष्टी कळत होत्या. सईचा हवालदिल प्रश्‍न, “आई, काय झालंय? बाबा कुठाय? तो का फोन करणार नाही?” मी विवंचनेत. ई-मेलवरही काहीच निरोप नव्हता.

फोन या यंत्राबद्दल एवढी आपुलकी पूर्वी कधीच वाटली नव्हती. फोन वाजतच नव्हता. मी आपली पुन्हा पुन्हा काही न कळून तो न वाजणारा रिसिव्हर उचलून बघत होते. फोन बंद तर पडला नाही ना? मी अंथरुणावर पडले. चित्रविचित्र स्वप्नांची मालिका, धास्तावून उठणं, सगळीच अस्वस्थता. पहाटे पाच-साडेपाचला फोन वाजला. खूप वेगळ्या उच्चाराचं इंग्रजी होतं. मला काही कळतच नव्हतं. खूप वेळानं कळलं. ऑस्ट्रेलियातून इयान विचारत होता की केतन कसा आहे? बडोद्यात कुठेच फोन लागत नव्हता म्हणाला, अस्वस्थतेत अजूनच भर पडली. कसानुसा दिवस सुरू केला आणि पुन्हा फोन, पलीकडून हिंदी भाषा. “भाभीजी, मैं फरिदाबादसे बोल रहा हूँ। मेरे पिताजी केतन भाईसाब के साथ काम करते हैं। वे सब लोग वहाँ ठीक हैं। मुझे आपको बतानेको कहा गया है।” त्या कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या फरिदाबादच्या माणसाच्या फोननं माझ्यावर अनंत उपकार केले. माझ्या मनावर आत्तापर्यंत किती ताण होता हे मला आता जाणवलं.

दिवसभर वेगवेगळे फोन येत होते. राजकोट, जुनागड, मुंबई - ठिकाणं वेगवेगळी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी, वेगवेगळ्या भाषा कधी केतनची चौकशी तर कधी त्याची खुशाली; पण त्याचा फोन येत नव्हता. त्याचं ऑफिस बंद होतं. मी त्याला फोन करू शकत नव्हते. त्याच्या फोनची वाट पाहणं एवढंच...

आणि तिसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता त्याचा फोन आला. दोन तास संचारबंदी शिथिल केली होती. तेवढ्या वेळात त्यानं कसाबसा फोन केला होता. दोन दिवस ते सगळे लोक एकत्रित त्याच्या घरमालकाच्या हॉलमध्ये बसून होते. बर्‍याच फोन्सच्या लाईन्स मिळत नव्हत्या. जेवायला वगैरे बाहेर जाणं शक्यच नव्हतं. घरी चहा करावा म्हटलं तर दोन दिवसांपासून दूधसुद्धा आलेलं नव्हतं. त्याच्या घरमालकीणबाईच सगळ्यांच्या खाण्यापिण्याचं बघत होत्या. त्या संध्याकाळी तो पूर्वनियोजनानुसार पुण्याला यायला निघणार होता. तो आता अडकला होता.

            हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आल्या. तो पुण्याला एकदा येऊनही गेला. पण त्या दोन-तीन वाईट दिवसांनी आम्हाला आयुष्यभरासाठी खूप काही चांगलं दिलं.

आमच्यापासून दूर राहणारा केतन आमचा किती जवळचा आहे, ते प्रकर्षानं जाणवलं. एकमेकांबद्दलच्या सगळ्याच उत्कट भावना पुन्हा एकदा नव्यानं सामोर्‍या आल्या. फरिदाबादचे लाल, हालोलच्या पटेलबेन, ऑस्ट्रेलियाचा इयान यांसारख्या अनेकांचं अस्तित्व दिलासा देणारं ठरलं. या सगळ्यातूनच माझ्या इथल्या एकटेपणाला परत एकदा बळ आलं. मी आपली नव्यानं सिद्ध झाले; रोजचेच पाढे आणि परवचे म्हणायला!

ऑडिओ लिंक : 
 
(आवाज : डॉ. कल्पना कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग १३ : माझं विस्तारित कुटुंब

              म्हणायला माझं कुटुंब फार छोटं इन-मीन अडीच माणसांचं. पण स्वयंपाकपाणी आणि खाणंपिणं आवरताना मला रोज जाणवते ती आजच्या छोट्या कुटुंबाची व्याप्ती! तीन खोल्यांत, चार खिडक्यांत आणि समोरच्या वीतभर अंगणात माझं विस्तारित कुटुंब राहतं आणि सगळा गोतावळा धरून ते एक मोठ्ठं खटलं तयार होतं.

            साधारणत: सगळ्याच आईबाबांना कुठलाही प्राणी घरात नको असतो. या घरातले आईबाबा एवढ्या टोकाचे नाहीत. काही सर्वमान्य(?) प्राणी त्यांना चालतात. काही त्यांना चालवून घ्यावे लागतात. या आईबाबांच्या एकुलत्या एका लेकीला कुठलाही प्राणी पाहिला की तो घरी पाळावासा वाटतो. “आई, आपण कोंबडी पाळू या का?” असा प्रश्‍न चौथ्या मजल्यावर बिनाबाल्कनीच्या घरात राहणारी ही मुलगी खर्‍याखुर्‍या उत्साहाने विचारते. “नाही जमणार आपल्याला” या उत्तरावर हिरमुसते. काही दिवस शांततेत जातात. सार्वजनिक बागांपाशी लहान मुलांना उंटावरफेरी मारणारे तिच्या डोक्यात घट्ट बसलेले असतात. “तो उंट, त्याचा स्वत:चा असतो ना गं?” असा प्रश्‍न विचारल्यावर आता ही मुलगी उंट पाळायचा म्हणते की काय, या विचारानं मला वाळवंटात पळून जावंसं वाटतं.

            बरं या समस्त प्राणिजगताबद्दल चर्चा होते तेव्हा घरात बर्‍याच जणांनी आणि जणींनी ठाण मांडलेले असतं. म्हणजे या घरातच लहानाची मोठी झालेली मांजरी आता बाळंतपणाला टेकलेली असते. ही माझी मांजरी फार लाडावलेली. सकाळी पोळी होताच “तव्यावरची पानात” या चवीने खाते. ही अशी एकमेव सदस्य आहे जी मी सोडून दुसर्‍यांनी केलेला स्वयंपाक खात नाही. (बहुतेक या तिच्या “जाज्वल्य” स्वाभिमानामुळेच ती इतकी लाडकी) माझ्या हातच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त तिची ती शिकार करून खाते. तिच्या शिकारीचा घरातल्या सर्वांनीच खूप धसका घेतलेला आहे. ती जन्मत:च शिकारी वृत्तीची. तिच्या भक्षी पडलेले प्राणी हा कुतूहलाचा विषय. बरं ती इतकी स्वामीभक्त की प्रत्येक शिकार तोंडात धरून मला दाखविण्यासाठी चौथ्या मजल्यावर घेऊन येते. माझ्याकडून जणू शाबासकी हवी असते. मग माझ्या वीतभर अंगणात अक्षरश: रणकंदन! कारण शिकार खेळवत खेळवत मारायची हा तिचा स्वभावधर्म. तिनं आणलेल्या शिकारींमध्ये मी उंदीर सोडून सगळे प्राणी पाहिलेत. कबूतर, कोंबडी, वटवाघूळ, पाली, साप, त्यातले कबूतर आणि पाल सोडले, तर बाकी सगळे तिला कुठे सापडतात हे मला आजतागायत कळलेलं नाहीये. तिच्या शिकारीच्या खेळानंतर अंगण साफ करणं हा एक स्वतंत्र व्याप होतो.

            ही माझी लाडकी माऊ जेव्हा पिलांना जन्म देते तेव्हा काम वाढतं. बाळंतिणीचा खुराक म्हणून अंड वाढतं. नुसतं दूध माऊला आवडत नाही. (कशाला मांजर म्हणायचं मग?) म्हणून माझी मुलगी “कॉम्प्लान, चहा-दूध दे”, असंच सांगते. पाच-सहा दिवस माऊ पिलांपासून हालत नाही. नंतर भटका स्वभाव उफाळून येतो. आपली मालकीण पिलांकडे लक्ष देईलच हे ठाऊक असल्यासारखी “मी आत्ता जाऊन येते” असं अगदी टेचात सांगते आणि निघून जाते. मी आपली पिलांची चादर स्वच्छ आहे ना, त्यांना भूक लागायच्या आत ही बया येईल ना, बाहेरचा दुसरा बोका येणार नाही ना, अशा काळज्या करत पिलांवर लक्ष ठेवते. कालांतराने पिलं मोठी होतात. हळूहळू दूध, पोळी, भात खायला शिकतात. शेवटी घरातल्या मनुष्य प्राण्यांसाठीच्या पोेळ्या आणि मांजर कुळासाठीच्या पोळ्या यांची संख्या सारखीच होते.

            हे मांजर खानदान घरातील प्रत्येक वस्तूवर हक्क सांगतं. त्याशिवाय आजूबाजूचे डोकावणारे आहेतच. समोरची जुई (पांढरी पामेरियन) एक दिवस बिचकत बिचकत आली. दारातच घुटमळली. माझ्या मांजरीनं वंशपरंपरागत असलेलं वैर आठवून, मिशा फिस्कारून तिला काहीतरी विचारलं. तिनंही शेपटी हलवून काहीबाही सांगितलं आणि नंतर दोघी सख्ख्या शेजारणीसारखं नाकाला नाक लावून बरंच कुजबुजल्या. या नव्या शेजारणीची भीड चेपली. मांजरीशी गप्पा मारून झाल्यावर ती स्वयंपाकघरापर्यंत पोचली. पाहुणचार म्हणून मी तिला ग्लुकोजची दोन बिस्किटं दिली ती क्षणात दिसेनाशी झाली. सध्या ग्लुकोज बिस्किट “वसुली” चा रोजचा परिपाठ आहे. घराचा जिना चढत असताना माझी चाहूल लागून जुई तिचा उंबरठा आता ओलांडते. त्यामुळे आमच्या घरात हल्ली ग्लुकोज बिस्किटांना सगळे “जुईची बिस्किटं” म्हणतात.

            घराच्या चार खिडक्यांचं दोन दोनमध्ये विभाजन झालेलं आहे. दक्षिणेच्या दोन कबुतरांसाठी राखीव आहेत. तर पश्‍चिमेच्या खिडक्यांलगतच्या निलगिरीच्या झाडावर वास्तव्य असलेल्या काही सदस्यांसाठी या दोन खिडक्या म्हणजे “फास्ट फूडस्टॉल” आहे, ते सदस्य म्हणजे एक कावळा आणि एक खार. कावळा रोज दुपारी एक-दीडच्या दरम्यान येऊन पोळी मागतो. “हाच तो रोजचाच असं तू कसं ओळखतेस” या घरच्यांच्या कुत्सित प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून मी त्याला त्याचा पोळीचा घास देते. तो ती पोळी खातो, पण पोळीपेक्षा त्याला भजी जास्त आवडतात हे मला आता अनुभवानं ठाऊक झालंय.

            दुसरी ती छोटी खारोटी! तिनं घरात यावं अशी माझी खूप इच्छा आहे. पण बहुतेक माझ्या परोक्ष माझ्या मांजरी तिला धमकावत असाव्यात. ती आपली खिडकीत बाहेरूनच दाणे-डाळ्या असा चटकमटक खाऊ गोळा करून धूम ठोकते.

            कबुतरांच्या पिढ्यान् पिढ्या माझ्या सरकारी निवासस्थानात वाढतात. माझ्या दारासमोर बिल्डिंगचे पिलर पोचतात. त्यांच्यावरचे अर्धा फूट रूंदीचे दोन बार म्हणजे कबुतरांचं मान्यताप्राप्त प्रसुतीगृह! काही अंडी पडतात, फुटतात. काही पिलं जन्मतात. काही माझ्या मांजरीच्या तोंडी पडतात. पण काही पिलं वाढतात. आया-आज्यांबरोबर दाणे टिपायला बसतात. त्यांना काहीही टाकलं तरी “अन्न हे परब्रह्म” या भावनेनं ते स्वाहा करतात. तरीही साबुदाण्याची खिचडी हा कबुतरांचा आवडता पदार्थ आहे, असं माझं निरीक्षण आहे. एखादं दुसरं पिलू खिडकीतून घरात येऊ पाहतं तेव्हा त्याच्या आया-आज्या त्याला माऊची भीती घालून दामटत असतील, अशी माझी खात्री आहे.

            या सगळ्या गोतावळ्याला खाऊ घालणं हे माझं रोजचं काम आणि आवडही. माझ्या मुलीला कधी कधी माझ्याबद्दल खूप कणव वाटते. मासे पाळले तर त्यांना खाऊ घालायच्या अळ्या किंवा त्यांचं खाद्य “तयार” मिळतं, अशी अमूल्य माहिती तिला समजलीय. “आई, माशांसाठी तुला काहीच करावं लागणार नाही.” ती मला चुचकारते.

            सध्या मी मत्स्य संगोपन केंद्रात रीतसर शिक्षणासाठी नाव नोंदवण्याच्या बेतात आहे. आमच्या खटल्याच्या घरासाठी एवढं करायलाच पाहिजे.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

4 comments:

  1. हे लिखाण वाचल्यावर व श्रवण केल्यावर अनंत काणेकरांनी लिलया हाताळलेल्या लघुनिबंध या प्रकाराची प्रकर्षानें आठवण आली.

    ReplyDelete