Tuesday, September 1, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २,३,४ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 बाई..... “माणूस” म्हणून !


विविध भूमिका बजावताना पोळपाट-लाटण्यापासून मायक्रोस्कोप (जो माझ्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे.) पर्यंत वेगवेगळी आयुधं परजवत, घर-संसार, मुलं, नोकरी ही सगळी व्यवधानं लीलया सांभाळली जातात. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडलं, असं नाही. बहुतेक जणींच्या बाबतीत हे असंच घडतं. या सगळ्या घडण्यात काही क्षणच केवळ बाई म्हणून, केवळ आई म्हणून अनुभवले जातात. बाकी सगळे एकत्रच माणूस म्हणून गाठीस जमतात. अर्थात “आई-बाई”  हे विश्‍लेषण त्या अनुभवांनंतरचं असतं. त्यात काही गोड सापडतं, तर काही कडू. असेच हे काही क्षण-काही बाई म्हणून- काही माणूस म्हणून!



भाग २: सांग दर्पणा 

माझ्या मुलीचा जन्म रात्री पावणेआठला झाला. “सई” म्हणायचं हे ठरलेलंच होतं. (मुलगा झाला असता तर नावं शोधावी लागली असती) सीझर झालेलं म्हणून मी आपली विविध इंजेक्शन्स घेऊन झोपी गेलेली. सईचं गाठोडं खाली नर्सबाईंच्या ताब्यात. मला नीट जागं होऊन ते पार्सल कायमसाठी माझ्या खोलीत हलवायला दुसर्‍या दिवशीची दुपार उजाडली. पाळण्यात ते पिटुकलं एका कुशीवर झोपलेलं (की नर्सबाईंनी झोपविलेलं?) माझा नवरा तिला अगदी निरखून पाहत होता. बहुतेक बाळांची अदलाबदल झालेली नाही याची खात्री करून घेत होता. मी आपली अर्धी जागी, अर्धी पेंगलेली आणि त्यानं मला हलवून जागं केलं. मुलगी बदलली नाहीय, याची त्याला बहुधा खात्री झालेली असावी. “अगं, कल्पे, बघ कशी तुझ्यासारखीच कानाखाली हात घेऊन झोपलीये कुशीवर!” त्यावेळी खोलीतल्या उपस्थित आजी-आजोबांना, काका-मावश्यांना हे इतकं पटलं की रात्री उशिरापर्यंत यावर अनुमोदन नोंदविण्यात येत होतं. दुसर्‍या दिवसापासून सई कशी दिसते यापेक्षा कुणासारखी दिसते यावर खूप चर्चा! माझा मात्र असहभाग; मोठी माणसं ओळखण्यातही माझा आनंद तर मग ती नुकतीच जन्मलेली सगळी तान्हुली मला सारखीच दिसतात. सई तीन-चार वर्षांची होईपर्यंत तिला पहिल्यांदा पाहणारा आणि माझ्या नवर्‍याला ओळखणारा प्रत्येकजण ठामपणे सांगायचा, “अगदी केतनची कार्बनकॉपी हं!” मी “हो” म्हणायची. मनातल्या मनात केतनच्या मिशा, चष्मा बाजूला करायचा प्रयत्न करून दर वेळी दोघांमधलं साम्य शोधायची. सहा-सात वर्षांची होता होता सईला केस वाढविण्याची हुक्की आली. आता तिचे केस पाठीवर बरेच वाढलेत. (त्याचबरोबर न्हाऊ घालणे, गुंता काढणे, पेडांच्या वेण्या घालणे असे अनेक समरप्रसंगही वाढलेत.) तेव्हापासून आजतागायत किमान डझनवारी लोक तरी म्हणालेत, “किती मातृमुखी आहे सई!” मी आपली गोंधळलेली. बहुतेक मी आणि नवरा आम्ही दोघे सारखेच दिसत असू; पण ती शक्यताही धूसर. माझा उजळ नीटनेटका नवरा आणि मी...? या सगळ्या गोंधळात अजूनच भर पडली आहे. सई हल्ली वारंवार आरशात बघते आणि विचारते, “आई मी कशी दिसते?” पुढचे दात पसार झालेल्या त्या ध्यानाकडे बघून मी म्हणते, “छान दिसतेस की तू! तुला काय धाड भरलीय?” या दिसण्या-बिसण्याच्या भानगडीत मला गदिमांचं गाणं नेहमी आठवतं, “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...” सर्वांहून वेगळा दिसणारा तो देखणा राजहंस बदकांमध्ये कुरूप ठरला. 

ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी ) 



भाग 3: कलेकलेनं कला 

मी शाळेत शिकताना मला जेवढी ज्ञानप्राप्ती झाली, त्याच्या कितीतरी पट ज्ञान मला लेकीच्या शाळा शिकण्यानं होते आहे. याच ज्ञानसाधनेत माझ्या कधीतरी लक्षात आलं की पूर्वी स्त्रियांना चौसष्ट कला अवगत असत. माझ्याशी कायमच फटकून असणार्‍या “जिज्ञासा” आणि “महत्त्वाकांक्षा” या अवघड भावना कधी नव्हे त्या माझ्या मनात जागृत झाल्या. चौसष्ट नाही तरी किमान पाच-सहा कला तरी आपल्याला याव्यात; अशी माफक अपेक्षा मी बाळगली. चौसष्ट कलांची अधिकृत यादी काही मिळेना. (ती शोधणं ही सुद्धा एक कलाच असावी.) मग मी माझीच एक यादी तयार करू लागले. जन्मजात “बाई”पणामुळे स्वयंपाकात आपण प्रवीण होऊ, अशी दिवास्वप्नं पाहायला लागले; पण भात-आमटीच्या पुढे काही माझी मजल जाईना आणि तेवढ्याच पुण्याईवर मला कलाकाराचा दर्जा मिळेना. मुलीला वेगवेगळ्या क्लासेसना नेता-आणता आपल्यालाही नाचायला, अभिनय करायला जमू शकेल, असा मला साक्षात्कार झाला. तिचा कपडेपट आणि रंगपट सांभाळताना मन अनावर झालं. एक-दोनदा हातपाय हलवून पाहिले तर, आई, अशी काय करत्येय, असा विस्मयाचा भाव चेहर्‍यावर एकवटून मुलगी आणि कुत्री दोघी समोर उभ्या ठाकल्या. माझ्या हाता-पायातलं त्राणच गेलं. एकदा नाटकातले संवाद आरशापुढे उभं राहून वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणून पाहू लागले तर “स्वत:शीच काय बडबडतेस” असं नवरा डाफरला. कॅसेट ऐकून गाणी पाठ करूया म्हटलं. दरवेळी कुठलीही कॅसेट सुरू केली की “काही तरी भुक्कड ऐकतेस तू” हा एकच उद्गार वेगवेगळ्या मुखांतून बाहेर पडला. नशिबानं कॅसेटमधूनही तेच नाही ऐकवलं गेलं! वाचनात आपण चांगली प्रगती करू, असं वाटत होतं; पण दिवसागणिक वेळापत्रक इतकं दगा देऊ लागलं की “सकाळ” वर्तमानपत्र वाचायला संध्याकाळ उजाडू लागली. डॉ.सलीम अली आणि डॉ.सतीश पांडे या डॉक्टरद्वयीनं मला मध्यंतरी खूपच प्रभावित केलं. मी माझे डोळे वेळ मिळेल तेव्हा तेव्हा झाडांच्या शेंड्यावर, फांद्यावर, खिळवून ठेवू लागले. मात्र काही वेगळे, स्थलांतरित, स्थानिक असे पक्षी दिसेचनात. नेहमीचेच चिमण्या, कावळे, साळुंख्या, कबुतरं...नाही म्हणायला पोपटांचा एक थवा आणि एक भारद्वाज पक्षी दिसला. कौतुकानं सगळ्यांना सांगायला गेले तर “एकच कशाला, चांगली जोडी आहे आपल्या कॅम्पसमध्ये भारद्वाजांची” प्रत्येकानं मला ऐकवलं. सध्या मी माझ्या कलाभ्यासातून जरा विश्रांती घेतली आहे. कुठली कला मी खरंच कलेकलेनं वाढवू शकेन, यासंबंधीची चर्चा मी माझ्या कुटुंबियांशी त्यांच्या कलानं करत्येय. या चर्चासत्रात माझा नवरा आणि मुलगी त्यांची वक्तृत्वकला अगदी पणाला लावताहेत. 

ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी ) 



भाग 4: बर्तन टूटे... 

गाणी माझ्या मनात सततच असतात. मला बहुतेक गाणी वेगवेगळ्या कारणांनी खूपच आवडतात. काही गाणी मात्र तशी खूप आवडती वगैरे नसतात. तरीही मनात ठसलेली असतात, त्यांची स्वत:ची एक आठवण जागवत! नाचाच्या एका कार्यक्रमाला गेले होते. छोट्या-छोट्या मुली तालात नाचत होत्या. “नाच रे मोरा....” माझ्या पायांनी ठेका धरला. आठवणीत चिंब भिजत माझं मन नाचरं झालं. मला थेट माझ्या बालपणात घेऊन गेलं. लहानपणाच्या मला आठवत नसलेल्या अनेक अतर्क्य आठवणी माझी आई आणि ताई सांगत असतात. त्यातली एक म्हणजे तेव्हा मला कुणीही गाणं म्हण म्हटलं (माझ्या आठवणीत कुणी ती घोडचूक केलेली नाही.) की, मी सुरू करायची - “नंदाघरी नंदनवन फुलले...” यातले फक्त “फुलले” एवढंच नीट कळायचं, असं ताई सांगते. या फुलण्याची आठवण पुढे माझ्या पाचव्या-सहाव्या इयत्तेत पण आहे. “वेळ झाली भर माध्यान्ही, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला...” हे गाणं मी बर्‍याचदा ऐकायची. एकदा का कुणास ठाऊक पण लिहून घ्यावसं वाटलं. “प्रीतीचं फूल” समजायचं ते वय नव्हतं. तो शब्द नीट कळला नाही. त्यामुळे ती जागा रिकामी राहिली. “माझ्या रिबिनीच्या फुला” कुणीतरी खोडकरपणे गाळलेली जागा भरली. दोन वेण्या रिबिनीनं वर बांधणारी मी तेच खरं समजून चालले. यथावकाश योग्य शब्द कळला; पण आजही ते गाणं ऐकलं की “रिबिनीच्या फुला”च ओठी येतं. हिंदी सिनेसंगीत ऐकत ऐकत आमचं राष्ट्रभाषेचं शिक्षण चालू होतं. त्या काळात “कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखो का” ऐवजी “हिम्मतवाली आँखों का” असं बिनदिक्कत म्हणत होतो. “आँखो में गजरा आणि बालों में कजरा” अशा उलट्यापालट्या जोड्या तर कितीदा जुळवत होतो. त्याच काळात पुढेमागे शाळेत कधी रिकामा वेळ असेल, तर शिक्षक हमखास काही गाणार्‍या विद्यार्थ्यांना गायला सांगत. माझी मैत्रीण स्मिता वेगवेगळी गाणी खूप छान म्हणायची. “गोरे गोरे, ओ बाँके छोरे” मला आजही तिच्याच तोंडून ऐकायला आवडेल. तिच्याशिवाय बाकीही गाणारे होतेच. कुणीही गाणं म्हण म्हटलं की, आमची ठकी (पाठक आडनावाचं शाळेतलं सर्वमान्य रूप) सुरू करायची, “स्वप्नातल्या कळ्यांनो”. त्याची इतकी सवय झालेली की, खुद्द आशाबाईंच्या कार्यक्रमात जरी हे गाणं ऐकू आलं तरी “ठकीच” आठवते. दुसरा एक मुलगा सुरू करायचा, “नारायणा, रमा रमणा..” तल्लीन होऊन तो गात असायचा आणि त्याच्यामागे बसणारे त्याचे मित्र त्याला करकटकनं टोचत असायचे. “नारायणा, रमारमणा” आणि “करकटक” असंच आता माझं समीकरण आहे. “उष:काल होता होता काळ रात्र झाली” गाणं आलं आणि त्यानं आमची झोप उडवली. एका बैठकीत आम्ही ते पाठ केलं. (आमच्या परीनं!) एक जण म्हणाला, “काय ते गाणं, उगाचच आपलं लल ललाल.” मी दचकलेच. जे आलाप अवघड म्हणून सोडून देऊन बाकी शब्द आम्ही पाठ केलेले, तर त्यानं तेच मोडीत काढले. दुर्दैवाने मला आता दरवेळी उष:काल ऐकताना तोच कानसेन (?) आठवतो. सई दोन-अडीच वर्षांची होती, तेव्हा बडबडगीतं वगैरे न शिकवता केतननं तिला दोन गाणी शिकवली होती. पहिलं होतं, “लबाड लांडगं ढोंग करतंय” आणि दुसरं, “अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान”. कुणी तिला गाणं म्हण म्हटलं की तो बोबडकांदा स्फुरणानं दोन्ही गाणी एका पाठोपाठ एक म्हणायचा. आता ती तिच्या आवडीची गाणी पाठ करते. परवा आरशापुढे रंगात येऊन चाललं होतं. “कोई कहे, कहता रहे, कितना भी हमको दिवाना...” ओळीमागून ओळी चाललेल्या. मध्येच मला ऐकू आलं, “बर्तन टूटे, टूटने दो” स्वयंपाकघरात माझ्या हातातून भांडंच निसटलं ! चला, सईची राष्ट्रभाषा हळूहळू प्रगल्भ व्हायला लागली.

 ऑडिओ लिंक :     
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

No comments:

Post a Comment