Saturday, September 26, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग १४,१५,१६ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग १४: मनातलं घर

 सध्या बांधकाम व्यवसायाला चांगलीच मंदी असावी; कारण हल्ली दृकश्राव्य माध्यमात घरांच्या जाहिरातींची अगदी रेलचेल असते. प्रॉडक्ट खपवायला असतात तशा प्रत्येक जाहिरातीचं आकर्षक वेष्टन वेगवेगळं असतं, पण सगळ्याच जाहिरातीतलं घर हे खात्रीनं “ग्राहकांच्या मनातलं”च असतं. प्रत्यक्षातली गृहखरेदी ग्राहकाच्या मनासारखी होते की नाही ते तो ग्राहकच जाणे; पण प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेली काही घरं अशी जाहिरातीतल्या अटींची पूर्तता करून खरंच मिळत असतील?

“त्या तिथं पलीकडे, माझिया प्रियाचे झोपडे” पासून “ये तेरा घर ये मेरा घर” पर्यंत भेटणार्‍या कविकल्पनेतील घरांमध्ये नेहमीच मन गुंतलेलं असतं. याशिवाय पुस्तकांमधल्या, चित्रांमधल्या काही स्वप्नवत घरांचाही मनाला सतत ध्यास असतो.

“टॉम आणि जेरी” या जोडगोळीच्या करामती पाहण्यापेक्षा त्यांचे ते थशश्रश्र र्षीीपळीहशव पिटुकलं घर माझं जास्त लक्ष वेधून घेतं. “अ‍ॅलिस”बरोबर वंडर लॅन्डमध्ये फिरताना त्या छोट्या दाराच्या घरात शिरण्याचा मोह मला अनावर होतो. इनिड ब्लायटन या छोट्यांच्या लाडक्या लेखिकेचा खास हीरो “नॉडी” टॉयलॅन्डमध्ये चिकाटीनं टुमदार घर बांधतो. ते सगळं घर सजवतो. शेवटी त्याच्या खिडक्यांवर सुंदर पडदे चढल्यावर मीच स्वत:चं घर सजवल्यासारखी कृतकृत्य होते.

पुस्तकांबाहेर वास्तवातही काही घरं भेटतात जी मन:पटलावर कायमसाठी चितारली जातात. माझा एक मित्र मुंबईला खूप आलिशान घरात राहतो. त्या घराच्या उभारणीत त्यानं किती वेळ आणि पैसा खर्च केलाय हे मी जवळून पाहिलंय, पण त्याच्या मनात रुतलंय ते त्यानं मनालीला पाहिलेलं दोन झाडांच्या मधलं एक छोटंसं घर! घराचा विषय निघाला आणि तो त्या मनालीच्या घराबद्दल बोलला नाही, असं होतंच नाही.

माझ्या मनातही असं एक स्वप्नातलं घर घट्ट रुतलंय. दापोलीजवळ 18 किलोमीटरवर 700-800 घरांचं एक छोटंसं गाव “नानटे”. तेथील तो वळणं घेत जाणारा रस्ता. अशाच एका वळणावर एक टुमदार पूल, पुलाखालून वाहणारी एक खळाळती नदी आणि नदीच्या कुशीत एक छोटी टेकडी. रस्त्याचं वळण सोडून पूल ओलांडून, टेकडीच्या पायथ्याशी थांबायचं. वर नजर टाकली की डॉ.भिंगारेंचं लाल रंगाचं आणि विटकरी अंगाचं ते छोटेखानी घर उभं दिसतं. टेकडीच्या चढावर लावलेल्या केळी-पोफळीच्या बागांतून जाणार्‍या पायवाटेनं वर जायचं. रानफुलांनी सजलेल्या चार पायर्‍या चढल्या की, तो छोटा बांधलेला हौद आणि त्यात फुललेली कमळं! अंगणातच बसू की घरात घुसू असं द्विधा मन!

घरात शिरल्यावर टेकडीच्या वेगवेगळ्या पातळीवर असणार्‍या त्या खाली-वर अशा खोल्या, आडोसा देणारा तो लालचुटूक खांब आणि खुर्च्या, कॉट असं काहीही न घेता पायर्‍यांवरच निवांत विसावावं, असं वाटायला लावणारा जिना!

काय करू नि काय नाही असं होऊन जातं. मी जेव्हा कधी तिथे जाते तेव्हा दारात उभं राहून पाऊस पाहू, सकाळचा चहा अंगणात घेऊ, संध्याकाळचं व्हरांड्यात वाचत बसू अशी यादी घेऊन जाते. अधाशासारखी घरभर वावरते. टेकडीवरच्या पायवाटांनी मनसोक्त भटकते आणि परतीच्या प्रवासात त्या घरातल्या पुढच्या मुक्कामात काय काय करायचं, याचे बेत करायला लागते.

ऑडिओ लिंक : 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

 

भाग १५: घर पहावं सजवून

 पहाटे झुंजुमुंजु होतानाची लाली पूर्ण उंचीच्या काचेच्या खिडक्यांवर हळुवार पसरतीय. उगवत्या सूर्याची कोवळी किरणं गच्चीला, खिडक्यांना स्पर्श करतायत. पूर्वेचा आणि पश्‍चिमेचा वारा घरात फिरतोय. अगदी सगळी काचेची तावदानं बंद केली, तरी त्या बाहेरच्या भणाणत्या वार्‍याचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. ही अशी बरीच छोटी-मोठी कारणं मला “त्या” घराच्या प्रेमात पाडायला पुरेशी होती. या शिवाय मध्यमवर्गीय “आखुडशिंगी-बहुगुणी” च्या व्याख्येतही “ते” घर बसत होतं. प्रेम आणि व्यवहाराची हातमिळवणी होऊ शकल्याने एका गोरज मुहूर्तावर “ते” घर “आमचं” झालं. तेव्हा ते इमारतीतल्या बाकीच्या सगळ्या घरांसारखंच साचेबंद दिसत होतं. त्याला वेगळं “आमचं” अस्तित्व द्यायचं आम्ही ठरवलं.

स्वत:च्या व्यवसायाव्यतिरिक्त अगदी शिवणकामापासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वत:ला फार छान करायला येते, हा जन्मजात आत्मविश्‍वास (?) माझ्यात आहेच. त्यामुळे गृहसजावटीचं काम आपल्याला छानच जमेल, याची मला खात्री होती. म्हणून “गृहसजावटीचं काम आपले आपण करू या”, असा प्रस्ताव मी मांडला. यात डिझायनरचे, आर्किटेक्टचे पैसे वाचणार होते आणि प्रत्यक्षातलं मुख्य काम सुतारच करणार होता. (माझ्यामुळे काम बिघडण्याचा धोका नव्हता.) त्यामुळे “आपले आपण” च्या माझ्या भक्कम आत्मविश्‍वासाला नवर्‍यानं पाठिंबा दिला. या कामातला अनुभव दोघांनाही शून्य होता, त्यामुळे मुळातूनच अभ्यास सुरू झाला. माझ्या नवर्‍यात टिपिकल नवर्‍याचे सगळेच गुण असल्याने त्याला प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अजिबात वेळ नव्हता. त्याच्या कार्यबाहुल्यामुळे “आपण करू या” चं रूपांतर “तू कर हवं तसं , काही मदत लागली तर सांग” अशा विनंतीवजा ऑर्डरमध्ये झालं. माझा व्यस्त नवरा “आमच्या “टीममधला न खेळणारा कर्णधार” झाला आणि पूर्णवेळ नोकरी, घरकाम, चूल-मूल करणारी मी, हौसेनं माझ्या फुरसतीच्या वेळाचा सदुपयोग करायचा ठरवून गृहसजावटीच्या कामाला लागले.

आजपर्यंत जाता-येता वेस्टसाईड, शॉपर्स स्टॉप अशा दुकानांमध्ये वेळ घालवणारी मी, टिंबर मार्केटमध्ये फेरफटका मारू लागले. लाकूड, प्लाय, रनिंग फूट अशा आजपर्यंतच्या अनभिज्ञ शब्दांबरोबर टिंबर मार्केटबाहेरील आळीतल्या वेगवेगळ्या गल्ल्या, चौक असा इतिहास-भूगोल अभ्यासू लागले. कांदे-बटाटे, कोबीच्या बाजारभावाची चर्चा करता करताच “रॉयलटच”, “क्लासिक प्लाय” वगैरेचं कोटेशन असं फर्डा बोलू लागले. “कसं आपल्याला नवनवीन शिकायला मिळतंय” या फाजील उत्साहात हळूहळू त्या लाकूड-लोखंडाच्या जंगलात हरवत गेले आणि “कशी मी तुला ही बहुमूल्य संधी देतोय”, या थाटात या सगळ्या तुंबळ व्यापासाठी नवर्‍याचं प्रोत्साहन मिळवत गेले.

आमच्या सुदैवानं आमचा सुतार खूप हुषार होता. त्यामुळे माझ्या पेचात टाकणार्‍या सूचनाही अमलात येऊ शकत होत्या. आमच्यात प्रश्‍न फक्त भाषेचा होता. त्यांचं राजस्थानी लहेजाचं हिंदी, तर माझं मराठमोळं हिंदी. बर्‍याच तोडफोडीनंतर आमचं बरं जमू लागलं. खिळ्याला त्यानं म्हटलेलं “कीला-कीला” ऐकून शेवटी शेवटी मी ही “कीला-कीला” करू लागले. त्यानं उच्चारलेलं सगळंच टिंबर मार्केट-बोहरी आळीतील समस्त लोकांना कळत होतं. बहुतेक माझे स्पष्ट उच्चारच त्यांना झेपत नव्हते.

माझ्या पेशंटच्या कामाच्या गर्दीतून वेळेचं गणित जमवून माझ्या सुताराच्या आणि माझ्या रििेळपीांशपीीं ठरू लागल्या. आमची भेटण्याची संकेतस्थळंही आम्हाला साजेशीच, टिंबर मार्केट आणि बोहरी आळीतलीच कुठलीतरी असायची. या भेटीगाठीव्यतिरिक्त भरपूर फोनही चालायचेच.

फर्निचर बनवण्यासाठीच्या माणसांची आणि सामानाची आखणी करण्यातच बरीच शक्ती गेली होती. अजून डिझाईन्सचा पत्ताच नव्हता. त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं, मासिकं यांचं वाचन चालू झालं. डॉक्टरीची पुस्तकं काही काळासाठी बासनात गेली. खपीळवश र्जीीींळवश चे अंक घरात-बाहेर सगळीकडे दिसू लागले. कपिल देव वगैरेंसारख्या सेलेब्रिटींच्या घरांची गृहसजावट फोटो सकट वाचणे आणि मग वाचल्यावर “आपल्या छोट्या घराला याचा काहीच फायदा नाही” असा निष्कर्ष काढणे हा रोजचा परिपाठ झाला होता. मी स्वत:च घराचं खपींशीळेी करतीये याचा इतका गाजावाजा झाला, की माझ्या ग्रंथपालबाईंनी गृहसजावटीची विविध मासिकं माझ्यासाठी गोळा केली. त्याशिवाय माझ्या वाण्यानंही त्याच्याकडे आलेला रद्दीतील एक पिवळट पडलेला “थेारप”ी शीर” चा जुना अंक माझ्यासाठी बाजूला काढून ठेवला. (त्या अंकात फक्त राजस्थानातल्या राजवाड्यांचीच अंतर्गत रचना दिलेली होती, हा भाग वेगळा !) घर सजवण्याचे हे लोण इतकं पसरलं, की माझ्या एका मैत्रिणीनं घरापासून लांब रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला विकायला असलेले लाल मातीचे सुबक स्टूल स्कूटरवर पुढे ठेवून गच्चीत ठेवण्यासाठी म्हणून आणून टाकले. (ते तिथे अगदी शोभून दिसत होते याची दाद तिला द्यायलाच हवी!)

सगळ्यांच्या पुण्याईने आणि सुताराच्या कल्पकतेने फर्निचर हळूहळू आकारास ंयेऊ लागलं आणि चक्क चांगलही दिसू लागलं. मुलीच्या खोलीतली कपाटांची जिन्यासारखी केलेली रचना आणि जिना चढून सगळ्यात वरती पुस्तक वाचत बसण्यासाठीची जागा  यांची निर्मिती तर खरंच आनंददायी होती. लुइसा अलकॉटच्या “लिटिल वीमेन” मधली ज्यो (मधली बहीण) माळ्यावर जाऊन पुस्तक वाचल्यापासून मनात घर करून होती; ती मनातून घरात काही प्रमाणात का होईना प्रत्यक्षात आणली गेल्याचा आनंद पुढच्या कामासाठी प्रेरणादायी होता. मुलीचे पडदे वेगळे करण्याचं ठरलं. पंचतंत्रातल्या गोष्टी  नवर्‍याच्या ब्रशमधून साकारल्या गेल्या. त्या गोष्टी ऐकण्यासाठी कान टवकारलेल्या कुत्रीबरोबरचा आम्हा दोघी मायलेकींचा फोटो तिच्या टेबलावर छानच दिसायला लागला. “तुझ्यासाठी आकाशीचे चंद्र-तारेसुद्धा आणीन”, ही पूर्वापार चालत आलेली एखाद्यासाठी काही करून दाखवण्याची परिसीमा आहे. ती प्रत्यक्षात येऊ शकते, हे मला याच काळात कळालं. त्यामुळे मुलीच्या खोलीचं छत चंद्र-तार्‍यांनी सजलं. ते उजेडात लुप्त होतात आणि रात्री दिवे मालवल्यावर लुकलुकू लागतात. जणू आकाशाखाली तारे मोजत पडलोय असं वाटतं.

विविध हस्तकला प्रदर्शनांना भेट आणि तिथली खरेदी ही या गृहसजावट प्रोजेक्टमधली पुढची पायरी होती. ही पुढची पायरी मी फार आधीपासून (म्हणजे घर घेण्याच्या आधीपासून) चढत होते, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. माझ्याकडच्या विविध सामानानं भरलेल्या गच्च ट्रंका त्या म्हणण्याला दुजोराच देत होत्या. “विविधतेतून एकता” हा माझा राष्ट्रवाद नेहमीच खूप प्रखर असल्याने राजस्थानी कठपुतलीच्या बाहुल्या, मोरांच्या कोरीव कामाची खिडकीची फ्रेम, दक्षिणेकडच्या विविध पितळी घंटा, उत्तरेकडच्या दर्‍या, रजया या सगळ्यांना त्यांची त्यांची जागा मिळाली. या सगळ्या विविध प्रांतीय सामानात मराठी बाणा दबून जातोय असं वाटायला लागलं. विचार विनिमय करून गच्चीत शिसवी लाकडाच्या झोपाळ्याची जागा ठरली. तो पाट मिळवण्यासाठी कोकणात दिवेआगार पासून बेळगावपर्यंत चौकशी झाली. झोपाळ्याच्या बाजूच्या भिंतीवर महाराष्ट्राचं भूषण असलेल्या वारली चित्रकलेतून वारली गाव आणि वारली माणसं चितारली गेली. हे चित्रकलेचं काम मात्र माझी काडीचीही मदत न घेता माझ्या नवर्‍यानं आणि भाच्च्यानं रात्रीचा दिवस करून पूर्ण केलं. (मी त्यात काहीही करत नसल्यानं ते लवकर संपलं) केनच्या सोफासेटला साजेशा केनच्याच विविध लॅम्पशेडस् जागोजागी टांगलेल्या असताना भारतीय बैठकीवर मात्र कंदील लटकवला गेला.

सहाव्या मजल्यावर इतका ऊनवारा आणि मुबलक जागा असताना गच्चीतली बाग घराची शोभा वाढवेल याची मला खात्री होती. त्यामुळे आम्ही नवीन जागेत रहायला आल्यावर आणि सगळं घर लागल्यावर मी “बागकाम” हा विषय अभ्यासाला घेतला. पोयटा माती, शेणखत, रोपं, कलमं, कुंड्या, नर्सरी असा माझा शब्दकोश विस्तारत जाऊन सध्या ओल्या कचर्‍याचं विभाजन, त्यापासून खतनिर्मिती, गांडूळखत अशा व्यवधानात मी अडकले आहे. या नादातून यंदाच्या ख्रिसमसला खरा ख्रिसमस ट्री घरी आलाय. बांबूची कुंडीत वाढलेली झाडं झोपाळ्याच्या अवतीभवती डुलतायत. “बांबूच्या बनात रहायला हवे” गुणगुणायला लावतायत.

            बागकामाचा पुढचा टप्पा म्हणून घरी कमळं गच्चीत फुलवण्याचा विचार आहे (मोठ्या टबमध्ये पाणी ठेवून) मग त्या साचलेल्या पाण्यात डासांची अंडी होऊ नयेत, म्हणून गप्पी मासे सोडायचे आहेत. ते मासे कुठे मिळतील, कसे जगतील, याचा अभ्यास करायचा आहे. थोडक्यात, उत्साहानं घर सजवण्याची प्रक्रिया चालूच ठेवायची आहे.

 ऑडिओ लिंक : 

(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

भाग १६: माझी खरेदी

             मुलीचा गृहपाठ होता, “Shopping with Mom” या विषयावर दहा-बारा वाक्यं लिहायची. नेमकं संध्याकाळी मला जरा बाहेर जायचं होतं. नवर्‍याला विचारलं, “जरा बघतोस का, तिला काही मदत लागली तर.” त्यावर त्याचं स्वगत सुरू झालं. “दहा-बारा(च) वाक्यं कशी पुरणार? पानं लिहायला लागतील या विषयावर! एक पुस्तक सहज होईल...” इत्यादी.

            “बायकोची खरेदी” या विषयावर शालजोडीतलं बोलण्याची संधी कुठला पुरुष सोडेल?

            पण शालजोडीतले ऐकण्याइतका मला वेळच नसतो. “खरेदी” या विषयानंच मी भारून गेलेली आहे. या खरेदीत खूप गोष्टींचा समावेश आहे. अपवादानं एखादीच गोष्ट अशी आहे, जी खरेदी करायला मला आवडत नाही. खरेदी “कोणासाठी” याची यादीही खूप लांबलचक आहे.

            कपडे, दागिने यात मी रमतेच. कपड्यांमध्ये परत वेगवेगळे प्रकार. “साडी” या सलग लांबलचक कापडात हमखास हरवण्याचं तंत्र मला अगदी उत्तमरीत्या अवगत! त्यातली वर्गवारी म्हणजे ठरवून केलेली आणि न ठरवता अचानक केलेली खरेदी. कॉटन आणि सिल्क या दोन पक्क्या धाग्यांव्यतिरिक्त तिसर्‍या धाग्याशी माझी बांधिलकी नाही.

            नगरचं “सारडा”, “गुंडू साडी सेंटर” आणि पुण्यातलं “संगम” ही माझी पहिली मानाची ठिकाणं. त्यानंतर मग बाकीची आरास केलेली कुठलीही दुकानं वर्ज्य नाहीत; पण वाटलं तरच जायचं. याशिवाय वेगवेगळी प्रदर्शनं- तास् न तास पायपीट, ते झळाळत्या वस्त्रांचं नेत्रसुख आणि मग पटलेल्या (शिवाय परवडणार्‍या) साडीची खरेदी! माझी अगदी “आनंदाचे डोही...” अशी स्थिती होते.

            दुसर्‍या एखाद्या प्रांतात, राज्यात जायची वेळ आली तर मी अगदी वेळ काढून गृहपाठ करून जाते. त्यामुळे चार ठिकाणी हिंडून, शोधून खास तिथली साडी मी खरेदी करते. त्रिवेंद्रमला जाण्याआधी केरळची “कराल कडा” साडी आणायची, हे मला माहीत असतं. लखनौ साड्या पाहताना, ताईला खूप दिवसांची लखनवी साडी हवी आहे, ही खूप जुनी आठवण मला लगेच येते. त्याचप्रमाणे लुधियानाचा दौरा ठरल्यावर मित्राच्या बायकोसाठी “नारायण पेठ” ची खरेदी लगबगीनं होते. असं करता करता प्रांतोप्रांतीच्या साड्या माझ्याकडे गुण्यागोविंदानं राहतात. “विविधतेतून एकता” चा मी हिरिरीने प्रचार करते.

            ठरवून साडी खरेदी करताना रंग, प्रकार, साधारण बजेट याचा आराखडा माझ्या मनात असतो. दुकानदाराला तो सांगून माझी खरेदी त्यांच्या मदतीने पटकन उरकते. जेव्हा साडी अचानक घेतली जाते, तेव्हा ती खरेदी पटकनच होते आणि ती साडी अवर्णनीय सुंदर असते. या सगळ्या साडी प्रकरणात माझी मानसिक गुंतवणूक खूपच असते; पण तेव्हाच जीन, शर्ट, नवर्‍याच्या पँट, मुलीचे कपडे यांमध्येही मी रमतेच. मोठमोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स ते फॅशन स्ट्रीट- माझ्या मनात आपपरभाव नसतो. “कपडे खरेदी” हा मला खूष करण्याचा योग्य मार्ग आहे, असं माझ्या नवर्‍याचं ठाम मत आहे. त्यानं तोही खूष राहतो. कारण त्याला स्वत:साठी कपडे खरेदी करण्याची तोशीस पडत नाही. ते काम परभारे होऊन जातं.

            दागिन्यांमध्ये - सोन्यात फारसं मन रमत नाही. पण मोत्या पोवळ्यांचे टपोरे दागिने दृष्टी खिळवून ठेवतात.

            भांडीकुंडी आणि स्वयंपाकघरातील वस्तू याबातच्या खरेदीत मी थोडं डावंउजवं करते. तांब्या-पितळेची, खूप सुरेख घाटाची, पण रोजच्या वापरात बिनकामाची भांडी विकत घ्यायला फार आवडतं. उदा. पितळी कंदील (वीज गेली तर मात्र मेणबत्ती लावणार) घंघाळं (अंघोळ मात्र “शॉवर” खाली) पितळी घंटा इत्यादी. एकदा तर जयपूरहून नाजूक पितळेची मीनाकाम केलेली गुडगुडी (हुक्का) विकत घेतली, त्यावरून “तिचा खात्रीने वापर होणार” याबद्दल त्या अमराठी दुकानदाराला इतकी खात्री वाटली, की त्यानं मला त्यासाठीचा स्पेशल तंबाखू जयपुरात कुठे मिळतो, तो पत्तासुद्धा सांगितला. (मी “ती” खरेदी अजूनपर्यंत केलेली नाही.)

            रोजचं स्वयंपाकपाणी आणि जेवणाला कुठलीही भांडी मला चालतात. पण पै पै साठवून चांदीची कलाकुसरीची भांडी मी निमित्त शोधून घेत असते. “बोन चायना” “क्रिस्टल” अशा काचेच्या भांड्यांची किणकिण मनमोहक असते आणि त्यामुळे “काचसामान जपून वापरा” ही सूचना घरात वारंवार देण्याची वेळ येते.

            याव्यतिरिक्त अनेक सटरफटर गोष्टींची खरेदीही मी आत्मीयतेने करते. उदाहरणार्थ, मुलीची खेळणी (फरच्या मऊमऊ प्राण्यांना आम्ही दुकानात नाव देऊनच घरी आणतो.) तिचं कंपासमधलं सतत संपणारं पेन्सिल, रबर, पट्ट्या असं सामान, महिन्याचा किराणा, झाडू, पायपुसणी, हार्डवेअरच्या दुकानातून बल्ब, वायरी, फ्यूज, घरातलं मोडलेलं तुटलेलं सामान, हात धुवायचं बेसिन असं काहीही आणि कितीतरी.

            पुस्तकं आणि कॅसेटची खरेदी हे तर जुनं व्यसन आहे. शिकत असल्यापासून जवळच्या पैशातून काही ठराविक बचत करून मी पुस्तकं खरेदी करते. महिन्याला एक या हिशेबानं घेतलेल्या पुस्तकांसाठी कपाटं खरेदी करणं अनिवार्य ठरतं. या सगळ्या खरेदीच्या धागधुगीत जी कधीच खरेदी करीत नाही ती म्हणजे भाजी! भाजीवाल्या आणि भाजीवाले मला फसवतात असं वाटतं. नवरा कधी गावाला निघाला  (तो सततच निघत असतो किंवा गावाहून येत असतो) तर तो कुठे चाललाय, हे विचारायच्या आधी मी त्याला तेवढे दिवस पुरेल एवढी भाजी आणून टाक सांगते. त्यातून त्याने कधी अघोषित असहकार पुकारलाच, तर माझ्या कामाच्या बाई मदतीला धावून येतात.

            भाजी कधीही न आणणारी मी रविवारी सकाळी सिंहगड फेरीत मात्र न चुकता पालेभाजी घेऊन येते. काय कारण असेल? माझं मलाच आश्‍चर्य वाटतं. कदाचित तो तजेला मनाला भुरळ पाडत असेल. किंवा ती पायथ्याची मावशी ओळखीची झाली म्हणून तिच्यासाठी मी भाजी खरेदी करत असेन. पण माझ्या नवर्‍याला अजिबात आश्‍चर्य वाटत नाही. “तिथून खरेदी करून आणण्यासारखं भाजीशिवाय दुसरं काहीच नसतं म्हणून ती पालेभाजी आणते.” तो ठाम मत नोंदवतो.

            माझ्या या खरेदीच्या व्यापात न गुंतण्याची खबरदारी घेण्यात नवरा अतिशय जागरूक असतो. माझा पगार हातात न पडता बँकेत जमा होतो आणि क्रेडिट कार्डच्या जमान्यात माझ्याकडे कुठलंही के्रडिट कार्ड नाही या दोन गोष्टींमुळे त्याला थोडं हायसं वाटतं.

ऑडिओ लिंक : 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

1 comment:

  1. ये तेरा घर ये मेरा घर ......

    ReplyDelete