Saturday, February 5, 2022

चौकस बुद्धी .. गुंतवणूक करताना !!

 


#बार्शीचं नाव अलीकडे खूप ऐकण्यात आलं असेल. विषय होता शेअर बाजार आणि त्यात झालेला स्कॅम! टीव्ही, सोशल मीडिया आणि गावागावातील कट्ट्यावर हा विषय चवीने चर्चिला जात आहे. कोणीतरी एका व्यक्तीने लोकांचे पैसे घेतले आणि तो पैसे घेऊन पळून गेला अशी साधारणपणे बातमी पसरू लागली. वास्तविक पाहता विषय असा आहे की अनेक लोकांनी भरमसाठ परतावा मिळेल म्हणून अमुक एका व्यक्तीकडे विशिष्ट रक्कम कॅश किंवा त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा केली. हा भरमसाठ परतावा म्हणजे किती तर तो खरंच भरमसाठ आहे, म्हणजे 10 लाखाचे वर्षभरात 6 कोटी वगैरे इतका! हे ऐकायलाच नवल, अशक्य वगैरे वाटत असेल तरीही लोकांनी याच परताव्याच्या हव्यासापोटी तथाकथित गुंतवणूक केली होती. पण परतावा तर सोडाच, मूळ रक्कमही परत मिळाली नाही आणि सदरील व्यक्ती जी असा परतावा मिळवून देणार होती तीसुद्धा गायब झाली अन प्रकरण सर्वांसमोर आलं.

 शेअर बाजारात सोडा पण भाजीपाला बाजारात गेल्यावरही माणूस जितका पारखी असतो तितका शेअर बाजारात नसतो. भाजीपाला बाजारात 100₹ किलोने मिळणारी एखादी भाजी जर कोण एक भाजीवाला 100₹ ला दोन किलो अशा दराने विकत असेल तर त्याच्याकडून भाजी घेतानाही आपण दोन वेळा तपासून घेतो. पण ही चौकस बुद्धी आपल्याला गुंतवणूक करताना सुचत नाही.

एक साधा सरळ विचार केला की खरंच अशा पद्धतीने परतावा मिळू शकला असता तर मोठमोठ्या उद्योगपतीना एवढे उद्योगधंदे करायची गरज काय होती.? टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे अतिश्रीमंत लोकांनी अशा 'देवदूत' लोकांना आपले अब्जो रुपये देऊन वर्षभरात दुनिया कमावली असती. तो बिचारा #Mutual_Fund_Manager वर्षभरात 18% परतावा दिला किंवा 15% CAGR जरी देऊ शकला तर बडवत फिरतो तर असे बार्शीतील हिरे आतापर्यंत काय बार्शीत तुम्हाला-आम्हाला करोडपती बनवण्यासाठी थांबणार आहेत का!

ज्या लोकांना options trading कळतं ती लोकं कदाचित अशा भूलथापांना लवकर बळी पडत असावेत कारण एका दिवसात 40₹ चा CE जेंव्हा 400₹ होतो तेंव्हा डोळे पांढरे झालेले असतात. आणि हीच जादू आपल्यासोबत झाली तर 'कधीतरी' नशीब चमकेल आणि आपल्या लाखाचे दहा लाख होतील या आशेवर ते अशा ठिकाणी गुंतवणूक करतात.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी या बाबी कायम डोक्यात ठेवा...

. शेअर बाजारात कमी वेळात श्रीमंत होता येत नाही.

. दुसरा कोणीतरी व्यक्ती तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही.

. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर स्वतःच्या नावे डिमॅट सुरू करून त्यात गुंतवणूक करावी. इतर कोणाच्याही खात्यात रक्कम जमा करू नये किंवा कॅश तर अजिबात देऊ नये.

. शेअर बाजाराकडे 'Parallel Source of Earning" म्हणून बघणार असाल तर स्वतः या क्षेत्रातील माहिती घेणे गरजेचे आहे.

. Tips च्या आधारावर ट्रेडिंग करून जगात आत्तापर्यंत कोणीही श्रीमंत झालेलं नाही.

. Quality शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तरच तुमचे पैसे सुरक्षित आहेत.

. गुंतवणूक करताना शक्यतो ओळखीच्या, विश्वासार्ह आणि ज्याला त्या क्षेत्रातील माहिती आहे अशा व्यक्तीमार्फत गुंतवणूक करा.

. भलत्या मोहात पडू नका. तुम्हाला जे समजतं त्यातच गुंतवणूक करा. आपापला नोकरी-व्यवसाय सांभाळून इकडे लक्ष द्या!

. गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ नका किंवा आपली सर्व बचत तिथे गुंतवू करू नका.

१०. शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवा.

- अभिषेक बुचके

- स्रोत कायप्पा