Saturday, December 25, 2021

अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला

    

 

अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला !

SWS करत असलेल्या सामाजिक कामांबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते. आज अनुभवण्याचा योग आला. SWSटीम सोबत  आज ‘घरकुल परिवार’ या संस्थेच्या कार्यस्थळी भेट द्यायला गेलो होतो. 

मानसिकरीत्या दिव्यांग असलेल्या जाणत्या महिलांना आधार देणारी, त्यांची काळजी घेणारी व त्यांना विविध कौशल्ये शिकवणारी आणि स्त्रियांसाठी चालविली जाणारी, ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. विद्याताई फडके  हे मातृतुल्य व्यक्तिमत्त्व या प्रकल्पाची काळजी घेते आहे. संस्थेस सरकारी मान्यता तर आहे, पण सरकारी मदत मात्र अजिबात नाही अशा परिस्थितीत, समाजाच्या सहभागातून ही संस्था चालविली जाते आहे . 

ज्या  मातापित्यांच्या घरी असे मानसिक दिव्यांग अपत्य (विशेषतः मुलगी) जन्माला येते, त्यांच्या व्यथा जाणून घेऊन, ‘आमच्या मागे या मुलीचं कसं होणार’ या चिंतेचं निराकरण करण्याचा या सांस्थेचा प्रयत्न आहे. या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी इथे घेतली जातेच, पण त्याहून अधिक म्हणजे, त्यांना विविध कौशल्ये शिकवून आपल्या पायावर उभे करण्याचा वसा विद्याताईंनी घेतला आहे. 

संस्थेच्या पिंपळगाव (बहुला) येथेल इमारतीत प्रवेश केल्या केल्या मन प्रसन्न करणारा नीटनेटकेपणा, स्वच्छता आणी सुनियोजन आपल्याला पाहायला मिळते. आपण तिथे गेल्यावर तत्पर महिला कार्यकर्त्यांचे आपली विचारपूस करतानाचे अगत्य जाणवते. आव्हानात्मक परिस्थिती सांभाळण्याचा ताण असूनही, विद्याताई अगदी हसतमुखानं आणि शांतपणे आपलं स्वागत करतात. तिथे मांडलेल्या वस्तू, अगदी अभिमानानं, ‘माझ्या मुलींनी बनवल्या आहेत’ असं सांगतात. त्या मुलीही विद्याताईंना ‘आई’ म्हणतात. 

विद्याताई  SWS बद्दल अगदी जिव्हाळ्याने बोलतात, आणि SWS ने केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख करतात. या प्रकल्पात असलेल्या दिव्यांग मुली / महिला विविध वयोगटातील आहेत. अगदी 18 वर्षांपासून ते ६३ वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्यी ५८ महिलांसाठी हे ‘घर’ आहे. ( विद्याताई, आवर्जून त्याला वसतिगृह म्हणायला नको म्हणतात. ) त्यांच्यासाठी खोल्या, प्रशस्त अन स्वच्छ असे किचन आणि डायनिंग हॉल आहेत.  मुलींची राहण्याची सोयसुद्धा स्वच्छ अन नेटकी आहे. रोज सकाळे आठ वाजतां सर्व मुली प्रार्थना, सूर्यनमस्कारासारखे व्यायाम न चुकता करतात. इथे भेट देणारांनी फार गोड पदार्थ देऊ नयेत असेही ताई कुणाला तरी सांगत होत्या, कारण त्यांना माहीत आहे की गोडाने या मुलींची वजनं अनावश्यक वाढत जातील.विद्याताईंच्या म्हणण्यानुसार यातली प्रत्येक महिला वेगळी आहे, पण वेडी नाही. त्या सगळ्यांना सांभाळणं आव्हानात्मक असलं तरी समाधान देणारं काम आहे. 

या मुलींना कार्यरत ठेवण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी विविध वस्तूंचे उत्पादन करायला त्यांना शिकवले जाते. एका पेन तयार करणार्‍या कंपनीचं जॉबवर्क या मुली करतात. कल्पना आहे का, की या मुली / महिला दिवसाला किती पेनची जुळणी (अ‍ॅसेम्ब्ली) करतात? तब्बल ८००० पेन या मुली दिवसाला जुळणी करून पॅकिंग करतात आणि या सगळ्याची गुणवत्ता तर उत्तमच असते. रिजेक्शन रेट १%च्याही खाली आहे. ही उत्पादकता आपल्यासारख्या सर्वांगाने धडधाकट असणारांना सुद्धा आश्चर्यचकित करणारी आहे. आम्ही गेलो तेव्हा या मुली पेनची जुळणी करतच होत्या. कुणीही वैतागलेले, ‘कशाला काम करायचं’ या मूडमध्ये नव्हतं. सगळ्या आनंदात दिसल्या. आम्हाला ‘नमस्ते’ही केलं. 

याच सोबत, विविध शोभेच्या वस्तू, उदाहरणार्थ पर्सेस, आकाशदिवे,  टी कोस्टर्स, तोरण, कापडाची गुलाबाची फुले पेंटिंग्ज, पिशव्या, फाईल फोल्डर्स इथे या महिला तयार करतात. या मुलींना केवळ या कामातच कुशल बनवले आहे असे नव्हे तर, स्वयंपाकातही कुशल बनवले आहे. विविध वाळवणे आणि फराळाचे जिन्नस वगैरे गोष्टीही तयार करून विकल्या जातात. 

अशा एका उत्तम काम करणार्‍या संस्थेला जमेल तशी मदत करून आणि खरेदी करून पाठबळ देण्याच्या SWS च्या भूमिकेचं कौतुक वाटतं. आपणासही घरकुल संस्थेला मदत करावयाची ईच्छा असल्यास, संस्थेच्या पिंपळगाव बहुला येथील कार्यालत / SWS प्रतिनिधींकडे अवश्य विचारणा करावी !   

- श्री.  शिरीष कुलकर्णी


Saturday, December 4, 2021

कृष्णाकाठी सायंकाळ

 


कृष्णाकाठी सायंकाळ 

असेच येथे सोन पाऊली,

लाल किरमिजी ऊन पडे,

क्षितिजावरती असेच होते,

मावळतीचे  रंग सडे !


रविबिंबाच्या वळणावरती,

केशर शिंपीत उभे आकाश,

पश्चिमेकडे डोंगर माथी,

 असाच होता संधिप्रकाश !


मोहर होता आम्र तरूचा,

घम घम होता दरवळला,

निळसर डोंगर हिरवी राई,

परिसर सारा सळसळला !


मंदिर शिखरे कातर होती,

सांजवातीला घालीत साद,

घाट पायऱ्या घुमवित होत्या,

शिवालयातील घंटानाद !


शब्द तुझे मधु चिंब हासरे,

स्पर्श हवासा गोड नवा,

पाण्यावरी तू खडा टाकता,

थरथर उठली थंड हवा !


ओले पाऊल मनही ओले,

 मधुर कोवळी साथ खट्याळ,

आठवते रे सख्या आपुली,

कृष्णाकाठी सायंकाळ !!


- सौ. स्मिता देशपांडे

21/4/2021