Saturday, September 12, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ८,९,१० : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग ८:गृहिणींचे भविष्य

आपल्या मराठी संस्कृतीत दिवाळीच्या तयारीचा अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. मराठी संस्कृतीचे निष्ठावान पाईक असल्याने आम्ही बाकी तयारीबरोबरच उत्साहाने दिवाळी अंकांबद्दल चर्चा सुरू केली. त्यात माझ्या एका अमराठी मैत्रिणीनं हिरिरीनं दिवाळी अंकासाठी नावनोंदणी केली. मी जरा आश्‍चर्यानंच विचारलं, “तू मराठी (“साहित्य” हा शब्द मी मनातच उच्चारला.) वाचतेस?”

ती उत्तरली, “बाकी काही नाही; पण तुमच्या दिवाळी अंकांमध्ये वार्षिक भविष्य असतं ना, ते मी सगळ्या दिवाळी अंकांमधलं वाचते.” केवळ “वार्षिक भविष्या”साठी दिवाळी अंक वाचायच्या कल्पनेनं माझा ऊर भरून आला.

नव्वद टक्के लोक दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक असे भविष्याचे विविध कालखंड माहीत करून घेत असतात. त्याला मीही अपवाद नाहीच तरीही...

रोजच्या रोज भविष्य वाचून दिवस घालवायचा म्हटलं तर फार पंचाईत होते. मराठी, इंग्रजी, चंद्ररास, सूर्यरास या सगळ्याचा आधार घेत वाचायचं म्हटल्यावर एका ओळीच्या खूप ओळी होत जातात. तरी त्यातल्या त्यात मी स्वत:ला दिलासा देण्याचा प्रयत्न करते. तरीपण बहुतेक वेळा माझे प्रयत्न हाणून पाडण्याचा चंग बहुतेक सगळ्या ज्योतिषांनी बांधलेला असतो.

“गुळाच्या व्यापार्‍यांना धनलाभ”, “लोखंडाच्या व्यापार्‍यांना मंदी” अशाच एक एक ओळी माझ्या राशीला आलेल्या असतात. त्यामुळे मी गुळाचा व्यापारी नाही म्हणून हळहळ किंवा लोखंड व्यावसायिक नाही म्हणून आनंद मानून मी तो दिवस निमूटपणे घालवते. कधीतरी मात्र असतं, “संततीपासून सुख” मी संधी न घालवता दिवास्वप्न रचते की “आज सई शाळेत काहीही न हरवता, कुठेही न पडता-झडता, सगळा डबा संपवून घरी येईल, शहाण्यासारखी गृहपाठ करून, जेवून झोपेल.” पण एका ओळीच्या पायावर एवढ्या ओळींचं स्वप्न रचल्यानं ते कुठल्यातरी ओळीवर ढासळतंच.

नाही म्हणता काही भविष्यं आयुष्यभर तंतोतंत जुळतात. उदा. “गृहसौख्यासाठी भांडण टाळा”, “जोडीदाराचे मत मान्य करा”, “उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल” इ. संसारातील ही त्रिकालाबाधित सत्यं कुणी भविष्यवेत्यांनी तुमच्या आमच्या राशीसाठी एखाद्या दिवशी नेमली नाहीत तरी आपल्या कुंडलीत ठाण मांडून बसलेलीच असतात.

असं असलं तरीही मी स्वत:ची, नवर्‍याची, मुलीची, आईवडिलांची, भावाबहिणीची, मित्रमैत्रिणींची रास आठवून, जवळजवळ सगळ्याच राशींची भविष्यं सकाळीच आत्मीयतेने वाचते. याउलट माझा एक चिकित्सक मित्र दिवस संपल्यावर अलिप्तपणे भविष्य वाचून ते संपलेल्या दिवसाशी पडताळून पाहतो. मध्यंतरी आमचे भिंगारे सर म्हणाले, “मी पण रोज भविष्य वाचतो. त्या दिवशीचं सगळ्यात चांगलं, मला जे आवडेल ते भविष्य “माझं” असं मी ठरवतो.” किती सकारात्मक विचार!

मला नेहमी वाटतं, गुळाचा, लोखंडाचा किंवा अजून दुसरा कुठलाही व्यापार न करणार्‍या, घरदार चालविणार्‍या, चाकरमान्या, पूर्णवेळ गृहिणीला दिलासा देणारी, “तिची” म्हणून भविष्याची जास्तीची एक ओळ रोजच्या भविष्यात जरूर असावी. उदा. “आज गॅस घाईच्या वेळी संपणार नाही”, “मोलकरीण अचानक दांडी मारणार नाही”, “स्वयंपाकाचा अंदाज चुकणार नाही”, “बस-रिक्षाची कसरत करत कामावर पोहोचताना उशीर होणार नाही”...असं खूप काही.

दिवाळी अंकांची नोंदणी करताना आम्ही ठरवलंय, या अशा सगळ्या एका ओळीच्या आल्हाददायक भविष्यांची नोंद करायची आणि पुढच्या दिवाळीला एक वेगळा अंकच काढायचा, “गृहिणींचे भविष्य!”

ऑडिओ लिंक : 

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

भाग ९: मैत्रीण

        माझा “आई” असण्याचा हल्ली बर्‍याचदा कस लागतो. “आईला प्रत्येक गोष्ट ठाऊक असतेच” या माझ्या लेकीच्या जबर आत्मविश्‍वासाला मी खूपदा माझ्या वागण्याने डळमळीत करते.

          जन्म-मृत्यू, आजारपण, ऑपरेशन्स, मोठे होण्याची प्रक्रिया- ही अशी सात वर्षांच्या जिवाला पडणारी नैसर्गिक कुतूहले जी जराशी धीराने सोडवू शकते. पण.... असे कित्येक “पण” माझ्याकडून निरुत्तर राहतात.

          चौकाचौकात प्रत्येक गाडीपुढे हात पसरून भीक मागणारी छोटी छोटी मुले पाहून “भीक मागणे” हे वाईट असते, पण ती मुले छोटी आहेत, त्यांना अजून काही कळत नाही. त्यांच्यावर चिडू-ओरडू नये हे असे विरोधाभासी बोलणे तिच्या गळी उतरवताना माझी तारांबळ उडते.

          बिल्डिंगमध्ये, घराच्या अवतीभोवती, अनोळखी लोक दिसले तर त्यांना हटकायचे, चौकशी करायची, हे मी वारंवार करत असते. हेच तिने एकटे असताना करून पाहिले, तेव्हा आमचे हबकलेले चेहरे (कोणी चोरचिलटे असते तर आणि त्यांनी एकट्या लेकराला काही केले असते तर, ही काळजी) तिच्यापर्यंत आमच्या भावना पूर्णत्वाने पोहचवू शकलेत की नाही, याबाबत मी साशंक आहे.

          “बाकीच्या सगळ्या आया मंगळसूत्र घालतात. तू का नाही घालत?” या प्रश्‍नावर “व्यायामानंतर घाम आला, की मानेला काचते फार, म्हणून नाही घालत गळ्यात काही” या उत्तरावर “त्यांना नाही का काचत?” असा प्रतिप्रश्‍न येतोच.

          “माझी तन्वीशी कट्टी आहे. तू तिच्या आईशी एवढ्या गप्पा कशा काय मारतेस?” या सात्त्विक संतापाला मला चटकन सामोरे जाता येत नाही.

          “नेहमी खरे बोलावे” असे मनावर बिंबवताना “दीदीने परवा फोनवर ती नाहीये सांगायला सांगितले. ते खोटे बोलणे होते ना?” या प्रश्‍नाला मी कसनुसे “हो” म्हणते.

          जुन्या बाजाराच्या तिथून वळताना टोपलीत मासे विकणार्‍या बाया पाहिल्यावर, “आई, रात्री उरलेल्या माशांचे काय करतात गं? सगळे त्या स्वत:च खातात का गं?” या प्रश्‍नावर मी ठामपणे “हो” किंवा “नाही” सांगू शकत नाही.

          “आई”, आंब्याला आंबा का म्हणतात?”,“आई, सगळ्यांची नावे सगळ्यात पहिल्यांदा कोणी ठेवली?” या प्रश्‍नांवर व्युत्पत्तिशास्त्राचे पुस्तक जवळ घेऊनही मी ठोस उत्तर देऊन माझ्या मुलीचे समाधान करू शकत नाही.

          “आई, मला जेवायचे नसेल तर मी नाही जेवणार. मी बूस्टरचे इंजेक्शन नाही घेणार. मी तुझेच का ऐकायचे? घरात सगळे मी का नाही ठरवू शकत?” यावर “आत्ता नाही. तू मोठी झाल्यावर ठरव” अशी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात माझा वेळ जातो.

          “सई मला तुझी मैत्रीण करून घेतेस?” प्रश्‍नाचा ओघ कधी नाही ते माझ्याकडून तिच्याकडे सुरू होतो. “ह्यॅ- काहीतरीच.” खूपच तातडीने आणि जोराने मला नकार मिळतो. माझा चेहरा फारच पडलेला. त्या चिमण्या लेकराला माझी कीव येते. मोठेपणाचा आव आणून माझी समजूत काढली जाते. “अगं आई, तू “आई” आहेस, मैत्रीण कशी होशील?” “का नाही?” मी अडून बसते. “तुझ्या मैत्रिणींबरोबर तू खेळतेस, गप्पा मारतेस, नाचाची प्रॅक्टीस करतेस, भांडतेस, ते सगळे माझ्याबरोबरही करतेसच की?” सांगावे की न सांगावे, यात लेक क्षणभर घुटमळते आणि मग एका दमात बोलून टाकते, “पण आई पापा घेते, जवळ घेते, मैत्रीण घेत नाही. तू माझा पापा घेणे बंद केले तर?...” माझे डोळे पाणवतात. माझा “आई”पणाचा अहं सुखावतो. माझ्या मुलीचा नकार सहजतेने स्वीकारून मी तिला जवळ ओढते. मांजराच्या पिलासारखी ती मला बिलगते. मी लेकीच्या कुशीत शिरण्याच्या आदिम हक्काला आंजारून, गोंजारून मुलगी मोठी होण्याची वाट बघते. तिची मोठेपणाची मैत्रीण म्हणून ती मला स्वीकारेल या आशेने!



ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग १०: दहावी गोष्ट

दिवसभरात दहा गोष्टी करायच्या. त्यातल्या नऊ नक्की घर-संसार, नवरा, मूल यांच्यासाठीच्या असतात. दहावी स्वत:साठी असू शकते. या सगळ्या गोष्टींसाठी दिवसभर ऊर फुटेस्तोवर धावपळ होते. तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. स्वत:साठी जी दहावी गोष्ट असते तिच्याकडे मात्र प्रत्येकाचे लक्ष आणि प्रत्येकाची टिप्पणी! आधीच्या नऊ अधिक ही दहावी गोष्ट असा हिशेब चालतच नाही.

“बरा बाई तुला वेळ होतो” आजूबाजूचा स्त्री वर्ग.

“तुला काय, घरात काही कामं नसतीलच.” अजून एखादे गृहीतक.

“तुला घरकाम, स्वयंपाकपाणी येतं?” एखादा टोकाचा कुत्सित बाण.

आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ आहेत. माझ्या संध्याकाळी व्यायामाला जायच्या-यायच्या वेळेवर लक्ष ठेवून असायचे. एक दिवस मी बाहेर पडताना नवरा घरी परतला. जाता जाता एक छोटे काम मी त्याला करून ठेवशील का, विचारलं; ते या “वॉचमन” सद्गृहस्थांच्या कानांनी अगदी लगेच टिपलं. तत्काळ पुढे सरसावून माझ्या नवर्‍याला सर्टिफिकेट देण्यात आलं, “तरी मला वाटलंच, तुलाच सगळं बघावं लागत असेल संध्याकाळचं.”

अशावेळी वाटतं, सकाळी उठल्यापासून गरगर भिंगरी लावून जी कामं उरकली जातात त्याची व्हिडीओ फिल्म प्रत्येक बाईजवळ असावी; पण त्याचाही उपयोग होईलच, असं नाही. कारण “तेवढ्यापुरतंच तुम्ही काम केलं असेल हो,” असं ऐकावं लागू शकतं.

यावरून आठवलं. माझी एक मैत्रीण आहे, एकटीच राहते. आमच्यातला एकजण तिला म्हणाला, “तुला काय काम असतं? यांचं ठीक आहे. नवरा-मूल-घर!” त्यावर ती उसळून म्हणाली, “नवरा, मूल नाही; पण घर आहेच ना? घरकाम करावंच लागतं. स्वैपाक, झाडू-फरशी, भांडी-कुंडी, ने-आण, सगळंच!” पुरुष एकटाच राहत असला तर त्याला घराचा उकिरडा करायची सवलत. पण “बाईचा हात” मात्र तिच्या एकटीच्या घरावरून फिरलेलाच पाहिजे. त्यातून पै-पाहुणा. एकट्या पुरुषाकडे कुणी सहसा पाहुणे जाणार नाहीत; गेले तरी त्याच्या मठीचा फक्त राहण्यापुरता “वापर”. चहासुद्धा बाहेरच घेतील. बायकांना मात्र वेगळा न्याय. पाहुणे आले आणि तिनं चहापाणी नाही केलं तर दुपारच्या सनसनाटी वृत्तपत्राची हेडलाईनच झाली!

मला तिचं म्हणणं अगदी पटलं.


ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

No comments:

Post a Comment