Saturday, January 22, 2022

चित्रकाव्य: मनभावन !


 मनभावन .......


अथांग गहिऱ्या निळ्या अंबरी

साद घालीते कुणी अंतरी

इथेच सखया आसपास तू

उगा भासते या मनमंदिरी


गगन चुंबिते सुरूपर्णाला

किरण चुंबिती गिरीशिखराला

गौरकाय चंचल हिमगौरी

घट्ट बिलगली हिमालयाला


वृक्षराजी घनदाट शहारे

लपेटताती अभ्र पांढरे

ऊन सावली बर्फावरती

यमलगीत हे चंचल हसरे


थंड थंड ही हवा कापरी

स्पर्श हवासा उठती लहरी

तरंग कोमल नदीच्या गाली

नीलजलावरी मोरपिसापरी


वल्हविते मी होडी कामिनी

एकांती या धुंद मनमनी

सापडला मनी निसर्ग साजण

प्रतिबिंबित चित्राची मोहिनी


स्मिता देशपांडे

20/4/2021

1 comment: