Friday, October 9, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २०,२१,२२ : डॉ. कल्पना कुलकर्णी





भाग २० : तीन देवियाँ

             जागतिकीकरणाचं युग होतं. एक आटपाट नगर होतं. तिथं एक धन्वंतरी राहत होता. धन्वंतरी मोठा सत्त्वशील आणि धैर्यशील होता. आरोग्यदेवतेबरोबरच आहारदेवता आणि व्यायामदेवतेचाही तो उपासक होता. त्यासाठी कडक व्रत करीत होता. धन्वंतर्‍याचे व्रत काय होते? सकाळी लवकर उठावे. “चितळे”, “साने”, “गोकूळ”, “कात्रज” असे कुठले तरी दूध प्यावे. बॅडमिंटनचे दोन हात करावेत. पोटभर नाष्टा करावा. दिवसभराचे रुग्णसेवेचे काम मन लावून करावे. वेळच्या वेळी चौरस आहारानं उदरभरण करावे. जमेल तेव्हा, जमेल तेवढे चालत राहावे.

            धन्वंतर्‍यास दोन पुत्र होते. सृजन आणि मदन. दिसामाशी ते वाढत होते. काळानुसार बदलत होते. आपले पुत्र राजबिंडे युवक होतील, असं स्वप्न धन्वंतरी पाहत होता. सृजनाची पित्यावर श्रद्धा होती. तो मनापासून धन्वंतर्‍याचं व्रत अंगीकारत होता. धन्वंतरी दोन्ही पुत्रांचे सर्व हट्ट पुरवत होता. त्यांनी एकदा घोड्यांचा हट्ट धरला. धन्वंतर्‍यानं काही घोडे मागविले. प्रत्येकास आपआपला घोडा निवडण्यास सांगितले. मदनानं “मोटारसायकल” नावाचा धट्टाकट्टा घोडा निवडला. सृजनाने “सायकल” नावाच्या मरतुकड्या घोड्यास पसंती दिली. मदनाच्या घोड्याचा आहार खूप होता. तो सतत “पेट्रोल” नावाचं द्रव पीत असे. सृजनाचा घोडा नुसत्या हवेवरच जगत असे.

            आपआपल्या घोड्यावरून दोन्ही तरणेबांड वीर दौडत असत. सृजन पित्याचे बोल प्रमाण मानून, प्रभातसमयीच त्याच्या घोड्यावरून रपेट मारून बॅडमिंटन खेळण्यास जात असे. मदन मात्र सूर्यमुखी. दर्पण न्याहाळणे हाच त्याचा छंद. सृजन दूध पीत असे. मदन विविधरंगी “पेप्सी”, “थम्सअप” “फँटा” अशी पेये प्राशन करीत असे. सृजनाचा आहार भात-वरण, पोळी-भाजी, विविध फळं.... मदनाला मात्र हॉट-डॉग, व्हेज बर्गर असे पदार्थ भावत असत.

            दिवस जात होते. धट्ट्या-कट्ट्या घोड्यावरचा मदन दिवसेंदिवस सुकत होता. मरतुकड्या घोड्यावरचा सृजन कसा राजबिंडा होत चालला होता. पोरीबाळींच्या नजरेत भरत होता. मदन स्वप्न पाहत असे, “मी मदन आहे. एक दिवस माझी रती माझ्याकडे येईल.” सृजन घोडा हाकून, बॅडमिंटन खेळून दमत होता. श्रमल्या शरीरानं शांतपणे झोपत होता.  स्वप्नांसाठी त्याला वेळच नव्हता.

            एक दिवस चमत्कार घडला. रतीचं आगमन झालं. मदन हरखून गेला. तिच्या स्वागतासाठी सज्ज झाला. पण रतीचं मदनाकडे लक्षच नव्हतं. ती आली तशी थेट पोहोचली बॅडमिंटन कोर्टवरच. सृजनाला विचारती झाली, “बॅडमिंटन मिक्स्ड डबल्समध्ये पार्टनर म्हणून घेतोस?” सृजनानं होकार दिला. दोघे मिळून बॅडमिंटनचे दोन हात करू लागले. हळूहळू हात हातांत गुंफले गेले. सृजन-रती चतुर्भुज झाले.

            मदन मनी निराश झाला. उदास मनानं पित्याकडे गेला. विचारता झाला, “बाबा, माझं काय चुकलं? मला रती का नाही लाभली?” धन्वंतरी उत्तरला, “बाळा तू उतलास, मातलास. माझं व्रत पाळलं नाहीस. आहारदेवता आणि व्यायाम देवतेस रुष्ट केलेस. त्यामुळे आरोग्यदेवता कोप पावली आणि केवळ त्याचमुळे रतीनामक भाग्यदेवतची तुझ्यावर मेहेरनजर झालीच नाही.”

            “बाबा, त्याला उपाय काय?”

            “मदना, उतू नकोस, मातू नकोस, घेतलं व्रत टाकू नकोस. आरोग्यदेवता, आहारदेवता आणि व्यायामदेवता या “तीन देवियाँ” ची योग्य उपासना कर. तुझी रती तुझ्याकडे नक्कीच येईल. मदनानं आपली चूक सुधारली. यथावकाश त्याची रती त्याला मिळाली आणि “रती-मदन” सुखानं नांदू लागले. जसे ते सुखी झाले, तसेच सर्व “रती-मदन” “तीन देवियाँ” ची उपासना करून सुखाने  नांदोत, ही साठा उत्तराची  कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !

 

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २१: सखी पार्वती

सखी पार्वती, तू तुझ्या सहचराला, महादेवाला विचारलंस, कुठल्या पुण्याईने तू त्या शिवाची पार्वती झालीस. त्यावर प्रत्यक्ष महादेवांनी सर्व व्रतांत श्रेष्ठ असलेल्या हरतालिका व्रताचं माहात्म्य तुला सांगितलं, ज्याच्यामुळे तुला तुझा वर मिळाला होता.

हे ज्ञानदीप कलिके, चौसष्ट वर्षे घनदाट जंगलात तू घोर तप केलंस. नुसती झाडांची पानं खाऊन राहिलीस. अशा तेजस्वी कन्येसाठी योग्य वर कोण, असा तुझ्या पित्याला प्रश्‍न पडला. नारदमुनींनी विष्णूचे नाव सुचविले; पण तू शंकराला मनोमन वरलेले होतेस. त्यामुळे तू रागावलीस, निर्जन अरण्यात गेलीस, हरतालिकेचे व्रत केलेस, वाळूचे शिवलिंग स्थापिलेस, पूजा केलीस, दिवसभर निर्जल उपवास केलास, रात्र जागवलीस. या तुझ्या पुण्याईने साक्षात कैलासपतीचे आसन ढळले आणि त्याने प्रसन्न होऊन तुझा पत्नी म्हणून स्वीकार केला. अशा रीतीने या व्रतपूर्तीने तुझी मनोकामना पूर्ण झाली.

तुझ्या पावलावर पाऊल टाकून युगानुयुगे आम्ही स्त्रिया हे व्रत धरतोय. पण देवी, तुझ्या दीर्घ दैवी आयुष्यातल्या चौसष्ट वर्षांच्या काळाची पुण्याई तुझ्या गाठीस होती. आमचं मर्त्य मानवी आयुष्यच उणंपुरं चौसष्टच्या आतबाहेर. त्यात त्या वर्षातल्या एका दिवसाच्या व्रतानं आम्हाला लाभलेलं पुण्य तुझ्या पासंगालाही पुरत नाही. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी आमच्या कुमारिकांना या एका व्रताबरोबर आजच्या युगातली अनेक व्रतं घ्यावी लागतात. काही काही जन्मभराची खडतर व्रतं असतात. उच्चशिक्षित व्हावं लागतं, स्वयंपाकपाणी शिकावं लागतं. “गृहकृत्य दक्ष” असं बिरुद मिळवावं लागतं. एकाच वेळी घरंदाज आणि मॉड दिसू शकण्याची दीक्षा घ्यावी लागते. त्यानंतर बर्‍याचदा नोकरी करून लग्नासाठी पैसेही जमवावे लागतात. लग्नाच्या बाजारात “दाखवून” घेण्याच्या व्रताची खडतरता, तर तुझ्या कल्पनेच्या पलीकडची आहे.

भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या हरतालिका व्रताचा तू घालून दिलेला पायंडा, तर आम्ही पाळतोच. त्याशिवाय वेगवेगळ्या लहानमोठ्या कालमाहात्म्याची अनेक व्रतं आजकाल पाळावी लागतात.

काही व्रतांमध्ये ठराविक साबणानंच स्नान करावं लागतं; मग ते पाळलं तर काही कालावधीनंतर त्या “साबण व्रता”मुळे हल्लीचा महादेव मिळतो. दुसर्‍या काही व्रतांमध्ये ठराविक अशीच सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतात. अशा रीतीने दर थोड्या दिवसांनी नवीन कुठल्या तरी व्रताचा महिमा ऐकायला मिळतो आणि जास्तीतजास्त पुण्य पदरात पडण्याच्या आशेनं आमच्या कन्या त्या सगळ्या व्रतांचा स्वीकार करतात.

माते, तू वेगवेगळ्या जन्मी वेगवेगळी दिव्यं पार पाडलीस. त्या तुझ्या थोर पुण्याईनं तुला तुझा भोळा शंकर मिळाला. मात्र, आमच्या आजच्या सख्यांना एकाच जन्मी इतक्या दिव्यांना सामोरं जाऊनही, एवढ्या व्रतवैकल्यांच्या सोपस्कारानंतरही मनातलाच वर मिळेल याची खात्री नसते. कधीकधी तर “वर”च मिळत नाही. “मनातला” कुठे घेऊन बसलीस? पर्वतदुहिते, या सगळ्यांमुळे आमच्या दुहिता या असंख्य व्रतांच्या चक्रात अडकल्यात बघ. कधी तरी आपापली कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण होईल, या आशेनं!

काही थोड्या कन्या “स्व”त्वाचं व्रत स्वीकारायचं ठरवतात. लग्नाचं व्रत नाकारतात. त्यांनाही त्यांच्या व्रतपूर्ततेत अनेक अडथळ्यांचे पर्वत येतात. “लग्न हीच जीवनाची इतिश्री” असं ठरवण्याचं कर्तव्य भोवतालचा जनसमुदाय करीतच असतो.

हे आदिशक्ती, मनापासून हरतालिका पूजणार्‍या आमच्या मुलाबाळींना या आजकालच्या वेगवेगळ्या व्रतांच्या दुष्टचक्राशिवाय “जो जे वांछिल तो ते लाहो” असा तुझा आशीर्वाद दे. आज तुझ्याकडे एकच मागणं, ज्या प्रबळ इच्छाशक्तीनं तू तुला हवा असलेला महादेव मिळवलास, ती तुझी इच्छाशक्ती आणि सहनशक्ती काही प्रमाणात का होईना, आम्हाला मिळू दे. जी आम्हाला आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बळ देईल, ती मनोकामना महादेव मिळविण्याची असो अथवा न मिळविण्याची, किंवा दुसरं काही मिळविण्याची!

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २२: हे विद्युल्लते...

 हे विद्युल्लते, तुझ्या चापल्याची ख्याती आम्ही पामरांनी काय बरं वर्णावी? आकाशात लख्खकन चमकतेस आणि दिसेनाशी होतेस. आमच्या काळजात मात्र रूतून बसतेस.

ही तू आकाशीची वीज, काय बरं म्हणालीस धरतीला? आणि अवतीर्णच झालीस की आमच्या घरात. अगदी अंकितच केलंस हं तू आम्हाला! मात्र आम्हा धरित्रीच्या लेकरांना अधूनमधून तुझी आकाशलोकीची चमक दाखवतेस बघ. तिथे कशी क्षणात चमकून दिसेनाशी होतेस; तशीच आता इथे गायब होते आहेस. क्षण-पळ-घटिका ही मोजमापं मात्र तू आकाशलोकीच ठेवून आलीस. तुझं भूलोकीचं गायब होणं मिनिटं-तास-दोन तास-अर्धा दिवस- पूर्ण दिवस असं वाढतच चाललंय. ठाऊक आहे का तुला, किती हाहाकार माजवतेस तू, तुझ्या नसण्यानं?

पण सौदामिनी, माझ्या भाबड्या जिवाला वाटतंय की, तू जी नाहीशी होते आहेस ती मात्र नक्कीच काही स्वर्गसुखं आमच्या पदरात टाकण्यासाठीच!

आता हेच बघ ना, “फ्रीज” नावाच्या थंडगार कपाटाच्या आम्ही किती आहारी गेलो होतो. तेच ते गारढोण शिळंपाकं खात होतो. आता तू नाहीस, म्हटल्यावर कसं गं चालायचं ते यंत्र? आपोआप सकाळ-संध्याकाळ ताजं रुचकर जेवण सुरू झालं बघ! मिक्सरचं खोकं जरा मागे सरकलं आणि तो खलबत्याचा सुबक घाट पुन्हा दिसायला लागलाय. एरवी दिव्यांच्या अमावस्येची वाट बघत बसलेले सगळे दिवे बघ कसे घासूनपुसून घराला उजळवून टाकताहेत. परवा मी भिंतीच्या कानांनी पलीकडच्या घरातल्या जोडप्याची कुजबूज ऐकली. घरातच दोघं “कँडल लाईट डिनर”ची लज्जत चाखत होते. किती प्रेमी जिवांना तू ही कँडल लाईट डिनरची संधी दिलीस गं!

तुझ्या नाहीसं होण्यानं माझ्या घरात स्वर्गच उतरलाय, हे मला कधी उमजलं माहिती आहे? अगं, नेहमी “कालनिर्णय”च्या पानांवरच राहणारी आणि दर पानागणिक उलटणारी पौर्णिमा माझ्या वीतभर खिडकीतून माझ्या घरात उतरली. त्या आकाशीच्या चंद्राचा पूर्ण प्रकाश आणि भोवतालच्या लुकलुकणार्‍या असंख्य चांदण्या मी अंगभर लपेटून झोपले बघ. पहाटवारा आला आणि त्या उबदार प्रकाशातून अलगद झिरपला. शिरशिरत आलेली ती जाग किती प्रसन्न होती म्हणून सांगू?

तू असतीस तर खिडक्या-खिडक्यांवर टांगलेल्या बल्बमधून दिसला असता का असा चंद्र? डोक्यावर गरगरणार्‍या पंख्याखालून भेटला असता पहाटवारा?

 


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

No comments:

Post a Comment