Friday, October 23, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २६, २७, २८ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग २६: गर्दी

 

आमचे दातारकाका लक्ष्मी रस्त्यावर राहतात. गणपतीतल्या गर्दीला टाळण्यासाठी ते दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या दरम्यान गावाला गेले आणि सालाबादाप्रमाणे यंदाही गणपती बघण्यासाठी माणसांचा महापूर लक्ष्मी रस्त्यावर लोटलाच. वेगवेगळ्या गावांहून गाड्या भरभरून रोजच माणसं आली आणि प्रत्येकानं रस्त्यावरच्या गर्दीत भरच टाकली. दातारकाकांचं चूक नाही. दरवर्षी रस्त्यावरच्या गर्दीनं त्यांना त्यांच्याच घरात बांधून टाकल्यासारखं होतं. रस्त्यावर लोटणार्‍या गर्दीचंही बरोबरच आहे. घरादाराच्या रहाटगाड्यात दिवसेंदिवस जखडलेल्या जिवांना ही गर्दीच जरासा सैलपणा देते.

आपण सगळे रोजच्या बस-रिक्षाच्या गर्दीला वैतागलेले असतो. पुण्याच्या रस्ता भरून वाहणार्‍या वाहनांच्या “ट्रॅफिक जॅम”बाबत तर काय बोलावं? तरीही काही काही वेळा मात्र वाहनांची गर्दी चालेल; पण एकटेपणा नको अशी स्थिती येते. आम्ही (अडीच माणसं आणि एक कुत्री) बडोद्याला रेल्वेने न जाता गाडी घेऊन गेलो, तेव्हा कुठल्या रस्त्यानं जायचं याची खूप चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन-दोन दिवससुद्धा ट्रॅफिक जॅम राहू शकतो वगैरे अनेक किस्से आम्ही ऐकले. त्याचबरोबर सापुतार्‍याच्या जंगलातून जाणारा रस्ता अगदीच सुनसान आहे हेही ऐकलेलं. पुण्याच्या ट्रॅफिक जॅमवर कायमच आग पाखडणारे आम्ही सापुतार्‍याच्या एकाकी रस्त्यापेक्षा ट्रॅफिक जॅम परवडेल, कारण कधी गरज लागली तर आजूबाजूला माणसं तरी असतील असा अगदी पोक्त विचार करून त्या “वाहत्या” रस्त्यानंच गेलो.

थोडक्यात प्रत्येकाला सोयीनुसार, गर्दी हवी किंवा नको असते. मला मात्र वेगवेगळ्या प्रकारची गर्दी अनुभवायला आवडते. “बालगंधर्व”सारख्या नाट्यगृहांमध्ये एखादा नेटका प्रयोग पाहण्यासाठी जमलेली ती रेशमी सळसळीची आणि मोगर्‍याच्या गजर्‍यांच्या घमघमाटाची गर्दी खूप प्रसन्न करते. “भरत नाट्य मंदिरा”च्या आवारात “पुरुषोत्तम”, “फिरोदिया” करंडकांच्या वेळी तुडुंब भरलेली तरुणाईची मस्ती आजूबाजूचा परिसरच तरुण करून सोडते.

गर्दीचा कोलाहल पार्श्‍वसंगीतासारखा सुरेल झंकारतोय आणि माझी माझ्या मनाशी सुरेख तार जुळली हे मी खूपदा अनुभवलंय. सिंहगड चढता-उतरताना ती आजूबाजूची बिनओळखीची गर्दी मला सतत सोबत करते; पण तेव्हाच मन मात्र एकटं सुसाट धावत सुटतं, आठवणींचे किती तरी चढउतार सहज पार करतं. फार प्रसन्न अनुभव असतो तो! अल्पबचत भवनच्या लग्नाच्या हॉलमधली गर्दी अंगावर घेत, समोरच्या मैदानावर खेळणार्‍या मुलांचा कल्ला ऐकत, त्या तालावर मी आजपर्यंत कितीतरी शब्द कागदांवर उतरवले आहेत.

या सगळ्यांच्या पलीकडची, भोवतालच्या चराचरातील गर्दी? झुंजुमुंजु व्हायला लागतं आणि फांद्याफांद्यावरच्या पानांच्या गर्दीतून पक्ष्यांच्या विविध सुरावटींची झुंबड उडते. या गर्दीची मंजूळ सोबत घेऊन मी उठते आणि दिवसभराच्या भाऊगर्दीला सामोरी जाते. दिवसाअखेरी बगळे आकाशात गर्दी करतात आणि कावळे विजेच्या तारांवर शाळा भरवतात. मनात आठवणींची गर्दी दाटते. या गर्दीतून वाट काढत “द ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय” या सिनेमातलं एक दृश्य समोर येतं. सुनसान जंगलात बंदुकीचा मोठा दचकणारा आवाज येतो. घनदाट झाडांच्या पानापानांमधून हजारो पंख फडफडत बाहेर पडतात आणि आकाश व्यापून टाकतात! त्या आभाळभर पसरलेल्या पंखांनी माझं मन व्यापून गेलंय, असं मला वाटतं. मन व्यापणार्‍या अशा कितीतरी गोष्टी मला आसमंतातल्या गर्दीत सामावून टाकतात.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग २७ : ...ये रे पावसा
 

 वरुणराजा, किती दिवस रे वाट पाहायला लावायची? येतोस की नाही, या चिंतेने मीसुद्धा हवालदिल झाले बघ. खरं तर मी आणि माझ्यासारख्या अनेक तुझ्यापासून अंतर राखून असतो. तुझ्या न येण्यानं नद्या आटल्या, पेरण्या खोळंबल्या हे सगळं आपलं ऐकीव! खरिपाची पिकं तुझ्यावर अवलंबून, हेही पुस्तकीच ज्ञान. रोजचं विजेचं भारनियमन आणि नळाचा कमी अथवा बंद झालेला पाणीपुरवठा आम्हाला जाणवून देणारा की तुझं येणं लांबलंय. मग आम्ही चर्चा करणार, “यंदा पाऊस कमी आहे म्हणतायत, पाणी जपून वापरलं पाहिजे. आता धान्य, भाज्या सगळंच महागणार. पेट्रोल तर आधीच महागलंय.” म्हणजे त्या चर्चेतसुद्धा तू शुद्ध स्वरूपात नाहीच. आमच्या नेहमीच्या महाग पेट्रोल वगैरेची तुझ्या असण्या-नसण्यात भेसळ. या अशा चर्चेनंतर तू बरसायला लागल्यावरही आम्हाला भरभरून आनंद होत नाहीच. आमचा आपला थोडका आनंद, आता पाणी भरून ठेवायला नको, भाज्या स्वस्त वगैरे.. तुझं रौद्र स्वरूपसुद्धा आम्हाला लांबचच. आमच्या एक दिवसाच्या पगाराच्या कोरड्या नोटांचा पूरनिधी दिला, की टी.व्ही.च्या बातम्यांमध्ये पूर पाहायला आम्ही मोकळे! पण तुझ्याशी असा दुरान्वयेच संबंध असला, तरी पावसाळ्याचे चार महिने आमची रोजनिशी नेहमीपेक्षा थोडी का होईना, पण वेगळी असतेच. म्हणजे कसं, की तू येणार म्हणून आम्ही आमच्या छत्र्या, रेनकोट काढतो; त्यांची डागडुजी उरकतो. कधी कधी त्याही पुढे जाऊन त्यांची नव्यानं खरेदी करतो. कपडे, चपला यांचा प्रकार बदलतो. (त्या खरेदीसाठी “मान्सून सेल” च्या “छत्र्या” जागोजागी उगवलेल्या असतातच) कपड्यांवर चिखलाचे डाग पडणार नाहीत, गाड्या पावसाच्या पाण्यानं बंद पडणार नाहीत, बॅगांचं लेदर खराब होणार नाही. अशा अनेक काळज्या घेतो. जेणेकरून आम्ही स्वत: आणि आमची कुठलीही गोष्ट तुझ्या वर्षावात भिजणार नाही. तुझ्या आगमनाची तयारी म्हणजे तुझ्यापासून बचावाचीच तयारी! असं असलं तरी, पहिल्या पावसात चिंब भिजायचं, पाऊस ऐकत चालत राहायचं अशी रोमँटिक स्वप्ने आम्हालाही अधूनमधून पडतात. “ऑफिसात जाताना कपडे भिजायला नकोत” सारख्या नन्नाच्या पाढ्याला बाजूला सारून आम्ही मध्यम मार्ग काढतो. खिडकीतून पाऊस बघत, एक-दोन शिंतोडे अंगावर घेत आम्ही चहा-भज्यांवर ताव मारतो आणि तुझं स्वागत करतो. “सरीवर सरी आल्या गं” सारख्या पावसाच्या विविध कवितांमधून, गाण्यांमधून तुला बंद घरामध्येच अनुभवतो. कधी तरी हा बंद अनुभव पुरेसा वाटत नाही. उघड्यावरच्या पावसाची उर्मी अनावर होते आणि त्यातूनच वर्षा सहलीचं आयोजन होतं. खास भिजण्यासाठी म्हणून चक्क सुट्टी घेऊन, रोजच्या धकाधकीपासून आम्ही दूर जातो. तू कोसळत असतोसच. ऐनवेळी मनच माघार घेतं. बेनकाब होऊन तुला सामोरं जाणं घडतंच नाही. “खूप नको भिजायला, किमान डोकं तरी झाकूयात. नंतर आजारी पडलो तर? सर्दी-खोकला झाला तर बाम लावायला आहे ना?” अशा धाकधुकीमध्येच ती वर्षा सहल उरकली जाते. त्यानंतर कोरड्या मनानं आणि कोरड्या हातानं सहलीचा जमाखर्च लिहितो. पण कधीतरी भरलेल्या आभाळाचं ओझं मनाला पेलवत नाही. मनही भरून येतं आणि झिरपू लागतं. लक्षात येतं, आपल्याच मनाच्या कोपर्यात पावसाचं गाव वसलेलं आहे. तिथे तो वर्षानुवर्षे कोसळतोच आहे. तरीही आपल्या वाट्याला “कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही” अशी स्थिती. आशा वाटते, कधी तरी असा दिवस उजाडेल, जेव्हा पाऊस आपल्यासाठी सुद्धा असेल. त्यासाठी वाट आहे ती मनाच्या कोपर्यातल्या पाऊस मन व्यापून टाकण्याची. या मनातल्या पावसाच्या पुराची, ज्यात आमच्या सगळ्या प्रापंचिक विवंचना, बंधने आणि कोरडे शिष्टाचार वाहून जातील आणि मग समोरासमोर भेटता येईल पावसाला. मला खात्री आहे, “अशा” पावसात मग चिंब भिजता येईल-स्वत:च पाऊस होता येईल. म्हणूनच मनातल्या पावसा ये, बाहेर कोसळणार्या पावसाला भेटण्यासाठी, या वरुणराजाला साकडं घालत असतानाच त्याच्या जोडीनंच तुलाही आमंत्रण- ये रे ये रे पावसा, भिजव मला रे “पावसा”. 


 ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २८:पाऊस मनातला, गाण्यातला! 

आभाळ गच्च दाटून आलंय, कुठल्याही क्षणी पाऊस कोसळू लागेल, असं वाटतंय, दाटलेल्या आभाळाबरोबरच मनात हुरहुरही दाटून येते. “घन ओथंबून येती” म्हणता म्हणता आठवणी ही ओथंबून येतात. जणू - 

“आठवणीत पाऊस असतो, पावसात आठवण असते,
आठवणींची साठवण, पावसाच्या गाण्यांत असते” 

असा हा पाऊस ! पाऊस मनातला-पाऊस गाण्यातला !! संततधार पाऊस चाललाय. आभाळातलं मळभ हळूहळू मनावर पसरत चाललंय. त्या संततधारेचं बोट धरून ग्रेसचा दुखरा पाऊस कधी आठवून जातो कळतच नाही - 

“पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने,
 हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने...” 

 तिन्ही सांजेला किरकिरत पडणारा पाऊस गहिवर वाढवणाराच असतो. ग्रेसचंच “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...” गाणं आठवून आपल्यालाही घनव्याकूळ रडू कोसळेल, असं वाटायला लागतं. अशीच व्याकूळता व्यक्त होते गुलजारच्या गाण्यातून - 
 “एक अकेली छत्रीमें हम आधे-आधे भीग रहे थे । 
आधा सुखा, आधा गिला... सुखा तो मै ले आई हूँ,
 गिला मन शायद, बिस्तर के पास पडा है....” 

आजपर्यंत तुडवलेल्या आयुष्याच्या मुलखातल्या, मागे पडलेल्या या “गिला मन” च्या आठवणींनी डोळे भरून येतात. जणू पाऊस आणि अश्रू एकजीव होतात. गुलजारच्याच दुसर्या एका गाण्यातून ते ओघळतात.

 “शाखो पे पत्ते थे पत्तों पे बूँदे थी, बूँदो में पानी था, पानी में आसूँ थे...” 

आभाळीचा पाऊस डोळ्यांत उतरतो - “पाऊस रुपेरी आभाळ मेघ पापण्यांत आसू भिजे काजळ रेघ...” पडून गेलेल्या पावसानं आणि वाहून गेलेल्या आसवांनी आभाळ आणि मन मोकळं व्हायला लागतं. विरत चाललेल्या ढगांमधून सूर्याची किरणं दिसायला लागतात. इंद्रधनुष्याचे रंग मनात मिसळत जातात. तेव्हाच ऊनपावसाचा लपंडाव ओठांवर एक हसू उमटवतो. बालकवींची अजरामर कविता प्रकर्षाने आठवते, 

 “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
 क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे...” 

हिरवळीवर बागडणार्या उन्हाच्या सोनकिरणांबरोबरच प्रसन्नताही पसरत जाते. मागचा कधीतरीचा सोनेरी पाऊस अलगद मनात उतरतो आणि पाडगावकरांच्या गाण्यातल्या मोरपिसासारखा मखमली बनून जातो. 

 “भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात  गवतातून चालत होतो,
 मोहुनी मनात चुकलेल्या, त्या वाटेची शपथ तुला आहे,
 दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे,
 मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे...” 

 मोरपिसाच्या मुलायम स्पर्शानं मनच मोर बनून जातं. थुईथुई नाचू लागतं. गदिमांच्या सदाबहार गीताबरोबरच अल्लडपणे सांगतं - “पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघांत निळ्या सवंगड्या नाच. नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच...” या नाचर्या गाण्यात तल्लीन होऊन पावसात भिजता भिजता मनीचं गूज ओठांवर येतं, सुधीर मोघेंच्या गाण्यातून - 

 “गाणं मनातलं पावसात येईल फुलून, तुझ्या माझ्यातलं अंतर जाईल पुसून, 
 बीज नवीन गाण्याचं पेरायचं, गुज ओठांनी ओठांना सांगायचं,
 एका पावसात दोघांनी भिजायचं...” 

 बरसणार्या पाऊसधारांमध्ये एकमेकांवर विसंबून भिजताना शुचिर्भूत झालेल्या मनात पाडगावकरांच्या आश्वासक ओळी उमटतात- “पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा अंतर्यामी सूर गवसला नाही. "आत किनारा श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा...” सगळी फडफड थांबवून विसावलेल्या मनात विश्वास ओतप्रोत भरून जातो. अशा वेळी “थोडासा रूमानी हो जाए” च्या स्वप्न विकणार्या “बारिशकर” ची आठवण आल्यावाचून राहत नाही. पाऊस नसला तरी पावसाचा हलका शिडकावा आल्याचा भास होतो. त्या आभासातच ऐकू येतं - 

 “मुश्किल है जिना, उम्मीद के बिना,
 आँखो में सपने सजाए, थोडासा रूमानी हो जाए।” 

 भूतकाळातले अश्रू बाजूला होऊन भविष्यातल्या स्वप्नांना जागा करून देतात. डोळ्यांत स्वप्न सजतात आणि झिरपणार्या पावसाबरोबरच मनात खोलवर रुजतात. रुजणारी स्वप्नं, पडणारा पाऊस आणि भरलेलं मन सगळं एकजीव होऊन जातं. सुधीर मोघेंंचा पाऊस चौफेर व्यापला जातो- 

 “पाऊस चौफेर, आत नि बाहेर पावसाचा ऊर,
 दुभंगला पाऊस कणात, पाऊस क्षणात, पाऊस मनात,
 ओसंडला- पाऊस चौफेर आत नि बाहेर...!” 


 ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

1 comment: