Saturday, October 3, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग १७,१८,१९ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग १७: आमचे व्यायामाचे प्रयोग

             शालेय जीवनापासूनच आम्हा सर्वांची प्रयोगशीलता अनुकरणातच होती. म्हणजे साहित्य, कृती लिहून मिळालेली, वर्षानुवर्षांची चालत आलेली निरीक्षणं आपली आपण डोळे भरून करायची आणि पुस्तकातल्यासारखाच निष्कर्ष आला की आम्हाला भरून पावायचं.

            आम्ही प्रयोग तर करायचो हेही नसे थोडके! शालेय शिक्षण संपवून आम्ही संसारात पडलो, पण “प्रत्येक जण हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.” या उच्च विचाराचा पाठपुरावा करत आम्ही आमच्या परीनं, मनाला भावलेल्या काही गोष्टींचं अनुकरण केलं. आमच्यासाठी ते सगळे प्रयोग अनोखेच होते.

            घर, नोकरी, मुलं ही कसरत करता करता व्यायामाची आवड आणि निकड स्वस्थ बसू देत नव्हती. आजूबाजूला खूपच प्रयोगशील मित्र-मैत्रिणी! आजच्या प्रयोगांची सुरुवात निष्कर्षापासून व्हायची. उदाहरणार्थ, “रोज सकाळी पळण्याचा व्यायाम प्रकृतीला चांगला हे त्रिकालबाधित सत्य! आजची सवय म्हणजे माहितीतलेच प्रयोग स्वत:चे म्हणून करायची. त्यामुळे आम्ही हा प्रयोग सुरू केला. साहित्याची जमवाजमव म्हणजे पळण्यासाठी वेगळे बूट, वेगळा ट्रॅक सूट यांची खरेदी अगदी धामधुमीत झाली. कृती करण्याची वेळ आली, तेव्हा आमची प्रयोगशीलता उफाळून आली. मूळ कृतीत बदल करून आम्ही रोजच्या ऐवजी एक आड एक दिवस, पुढे दोन दिवसांनी एकदा, त्याही पुढे आठवड्यातून एकदा असं सुरू केलं. किती वेळ पळायचं, गहन प्रश्‍न! स्वत:ची तयारी आणि एकमेकांच्या भेटीगाठींत जास्त वेळ जाऊन “पळण्याचा व्यायाम” कमी होत होत पाच मिनिटांवर येऊन ठेपला. आजचा निष्कर्षसुद्धा मूळ सिद्धांताहून बदलला. “पळण्याचा व्यायाम” प्रकृतीसाठी चांगला असला तरी आजच्यासारख्या घरीदारी कामात असणार्‍या लोकांना करता येण्यासारखा नाही. (सकाळी उठणं झेपत नाही!)

            या प्रयोगानंतर भूमीवरून आमची नजर पाण्याकडे वळली. “पोहणे” या विषयावर आम्ही खूप भारून जाऊन चर्चा करू लागलो. सूट-बूट मागे पडले आणि पोहण्याचे पोशाख आले.

            याही प्रयोगात आमचीच परीक्षा पाहिली गेली. थंडी आणि पाऊस आमच्या विरोधात गेले आणि आमचा बारमाही पोहण्याचा व्यायाम हंगामी सुटीपुरताच उरला. तरीही आम्ही मागे हटलोच नाही. आमची नजर भिडली ती थेट सिंहगडच्या माथ्याला. “सिंहगड वारकरी संघाची” वाटचाल आमच्यापर्यंत येऊन पोहोचली. दर रविवारी पहाटे उठून सिंहगड चढायला जायचं नक्की ठरलं.

            मगर जमाना बहुत बुरा है। ती पहाटेची प्रसिद्ध “स्वारगेट-सिंहगड बस” कायमच गच्च भरलेली आणि आम्हालाच जागा न देणारी. अतिशय वेळेवर सुटणारी आणि आम्हाला मागेच टाकून जाणारी. शेवटी कंटाळून बसचा नाद सोडून आमच्या खाशा स्वार्‍या दुचाकींवर बसच्या मागे निघाल्या. बस पायथ्यापासून परतली. पण आम्ही मात्र पायउतार न होता थेट त्या दुचाक्याच वरपर्यंत दौडवल्या. वर पोहोचून पिठलं भाकरी आणि दही खाण्यासाठी चाललो तेवढाच व्यायाम.

            आमच्या तावडीतून हेल्थ क्लब आणि एरोबिक्सही सुटले नाहीत. आमची प्रयोगशीलता आम्ही एरोबिक्सच्या इंग्लिश गाण्याऐवजी हिंदी गाणी वाजवण्यात (प्रायोजक - दलेर मेहंदी आणि सहकारी) दाखविली. त्यानंतर सगळे जमलोच आहोत तर कॉफी, वडा, कधीतरी पाणीपुरी हा परिपाठ खूप दिवस (महिने किंवा वर्ष नाही) पुरवला.

            पुढची गाठ पडली ती व्यायामासाठीची घरातली सायकल आणि जवळपास फिरण्यासाठी दुसरी सायकल यांच्याशी! चाकात हवा नसणे हा यातला मोठा अडथळा ठरला. घरातल्या सायकलीच्या हॅन्डलचा छत्र्या टांगण्यासाठी बराच उपयोग झाला.

            अशी ही आजची प्रयोगशीलता गेली 10-12 वर्ष सातत्यानं टिकून आहे, आजच्या फसलेल्या प्रयोगांनी नाउमेद न होता आम्ही सतत नव्याच्या शोधात आहोत. माझी खात्री आहे, न्यूटन, आईनस्टाईनसारख्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांचेसुद्धा कित्येक प्रयोग फसले असतीलच. आम्हालासुद्धा कधीतरी  “युरेका” म्हणण्यासारखा शोध लागेल. पण तरीही या व्यायाम-प्रयोगाच्या वाटचालीत काही थोड्या “शोधकणिका” आमच्या हाती लागल्याच आहेत. या यशस्वी प्रयोगांच्या शोधाचं श्रेय कोणाचं? यावरून आता आमच्यात थोडे कुंग फू, कराटे (चक्क मारामारीचा व्यायाम) चाललेत. त्यामुळेच मी अजिबात दिरंगाई न करता या शोधकणिका “माझ्या” म्हणून सांगतेय. उदाहरणार्थ-1. राहण्यासाठी शक्यतो वरचा मजला व लिफ्ट नसलेली बिल्डिंग निवडावी. 2. अशा घरांमध्ये जमल्यास कुत्रा किंवा मांजर असे पाळीव प्राणी पाळावेत. म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी वारंवार खालीवर जावं-यावं लागेल. 3. स्वयंपाकघरात काम करताना जमतील तेवढी कामं जमिनीवर बसून करावीत; ओट्याशी उभं राहून करू नयेत. ही कामं साधारणत: कणिक तिंबणे, भाज्या चिरणे अशा पद्धतीची असावीत म्हणजे हातांना व्यायाम होतो. काहीतरी सामान घ्यायचं राहिलं, की ते घेण्यासाठी ऊठबस होऊन पायांना, पोटाला, पाठीला व्यायाम होतो.

            “हसत-खेळत स्वयंपाक व व्यायाम” अशा बर्‍याच छोट्या छोट्या प्रयोगांच्या कृती माझ्याकडे आहेत. त्या माहीत करून घेण्यासाठी लवकरात लवकर भेटा, कारण ही “शोधकणिका” वाचून माझ्याविरूद्ध नक्कीच कुणीतरी कोर्टाची नोटीस बजावणार. जी स्वयंपाकघरातल्या कृतीबाबत बोलणं म्हणजे अमेरिकेनं कडुनिंबाचं पेटंट घेण्यासारखं आहे.

ऑडिओ लिंक : 

(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग १८:भांडण्याची कला

 माझ्या बारशाच्या वेळी माझं नाव काय ठेवावं यावर म्हणे बराच खल झाला होता. “क” अक्षरावरून नाव ठेवायचं होतं. “कलावती” नाव सुचवलं गेलं, पण आईनं त्याला तातडीनं नकार दिला, कारण एक तर माझ्या ताईचं नाव “लीलावती” नव्हतं, ज्यायोगे “कलावती” चं यमक जुळेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, “मुलाचे (मुलीचे) पाय पाळण्यात दिसतात”, या म्हणीनुसार मी मोठेपणी काय करीन, हे जरी दिसत नसलं, तरी कोणत्याही कलेच्या क्षेत्रात फार हातपाय मारू शकणार नाही, याची तिला माझ्या पाळण्यात उडणार्‍या हातापायांकडे पाहून खात्री पटली होती.

माझ्या नावाबद्दलचा हा किस्सा ऐकत-ऐकतच मी मोठी झाले. त्याचबरोबर आपल्याला कोणतीच कला येत नाहीये, या दु:खाचं रूपांतर हळूहळू संतापात होऊ लागलं. मी खूप भांडखोर बनत चालले (म्हणणारे म्हणोत, की मुळातच तिचा स्वभाव भांडखोर आहे.) “वार्‍याशीसुद्धा भांडू शकते”, अशी वरची श्रेणी मला प्रत्येक भांडणात मिळू लागली. “भांडण” ही एक अवघड कला आहे आणि तिची साधना इतकी वर्षे करीत असल्याने आपल्याला ती काही प्रमाणात का होईना, पण साध्य झालीय, अशा निष्कर्षाप्रत मी पोहोचले. आपण इतरांना ही कला शिकवू शकतो, असं मला जाणवलं. “भांडण : एक कला” या विषयाचा कोचिंग क्लास आपण सुरू करावा, असं मला वाटू लागलं. त्यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्याचं मी ठरवलं.

लेखी अभ्यासक्रमाची मी काही ढोबळ वर्गवारी केली. भांडणाचा आजवरचा इतिहास, कालानुरूप भांडणाच्या स्वरूपात होत गेलेले बदल याचा आढावा घेतला. इतिहासातल्या महत्त्वाच्या भांडणांची उजळणी क्रमवार मांडली. उदा. - रामायण, महाभारतातील राज्यासाठीची भांडणं, इंग्रजांनी भारतावर राज्य केले, त्या काळातली इंग्रजांबरोबरची आणि इंग्रजांनी लावलेली भांडणं, स्वतंत्र भारतातील विविध राजकीय पक्षांमधली भांडणं ते अगदी अलीकडच्या हॉकी-क्रिकेटसारख्या खेळांमधली भांडणं वगैरे वगैरे....

“भांडणांची कारणे” असे एक वेगळे पाठ्यपुस्तक तयार केले. त्यात सुरुवातीला भांडणं ज्या कोणत्या  नात्यांमध्ये होऊ शकतात, त्या सगळ्या वेगवेगळ्या नात्यांचे गट केले. उदा. आईवडील-मुलं, नवरा-बायको, भावंडे, शेजारी, सहकारी, सार्वजनिक ठिकाणची गर्दी इ. इ. प्रत्येक नात्यानुसारच भांडणाच्या वेगवेगळ्या कारणांची यादीही लांबू लागली. उदा. शेजार्‍यांमधील भांडणांसाठी नळाचं पाणी आणि खिडकीतून भिरकावलेला कचरा त्या दोन कारणांची टक्केवारी सगळ्यात जास्त आली. नवरा-बायकोच्या भांडणात बायकोनं नवी साडी नेसलीय्, हे नवर्‍याच्या लक्षात आले नाही आणि त्यानं बायकोचं कौतुक केलं नाही. त्यामुळे कडाक्याचं भांडण पेटलं. या कारणाला अग्रमानांकन मिळालं. भांडणासाठीचा शब्दकोश संग्रहित करणं. हे खूप अवघड काम होतं. अस्सल ग्रामीण मराठीतले भांडणासाठीचे इरसाल शब्द, शहरी मध्यमवर्गीय भांडणातले जपून वापरले जाणारे शब्द, शालजोडीतले शेलके शब्द, भांडताना मधूनमधून पेरता यावेत यासाठी हाताशी असणारे काही खास फॅशनेबल इंग्रजी शब्द (सिली, स्टुपिड, शट अप...) तात्त्विक भांडणासाठी लागणारे मोठमोठे अवजड शब्द असं करीत-करीत ते एक मोठं बाड झालं.

लेखी अभ्यासक्रम पुरा करता-करताच प्रात्यक्षिकांची तयारी सुरू केली. भांडणासाठी लागणारा मुख्य गुण म्हणजे तारस्वरात लागलेला आवाज! आवाज चढवून सतत सतत दुसर्‍यावर शब्दांचा भडिमार करणं सोपं नसतं महाराज! भांडता भांडता तापत जाणारा आवाज जर मध्येच चिरका झाला, तर त्या भांडणातली सगळी हवाच जाईल. त्यामुळे तो भांडणासाठीचा खास वरच्या पट्टीतला आवाज कमविण्यासाठी गळ्याची मेहनत आली. तीव्र आवाजात बोलण्याची सवय होण्यासाठी दोन-दोन जणांचे गट केले. रोज संध्याकाळी 15 मिनिटे पुण्याच्या कोणत्याही वेगवेगळ्या चौकात उभे राहून त्या दोघांनी मोबाईल फोनवरून संभाषण करण्याची योजना केली. आठ दिवसांत मोठ्याने बोलण्याची सवय होते, असं लक्षात आलं. या चाचणीचा पुढचा टप्पा म्हणजे, कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवातल्या चालू ध्वनिवर्धकांसमोर 10 ते 15 मिनिटे समोरच्याशी संवाद (?) साधणं, हे उद्दिष्ट दिलं. ते साध्य करणार्‍यांच्या आवाजाची प्रत तपासल्यावर ती विशेष गुणवत्ता मिळविण्याइतकी उंच गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही पूर्ण चाचणी प्रात्यक्षिकांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली. भांडणाच्या विषयानुसार आवाजाचा चढ-उतार, शब्दफेक, आवेश, जोष या सगळ्यांचा रियाज हा आवश्यकच. त्यामुळे तोही अभ्यासक्रमात घातला. भांडताना तोंडाचा पट्टा चालू असतो, तेव्हा नजरेतूनही संताप वगैरे व्यक्त होण्यासाठी डोळ्यांचे काही खास व्यायाम विकसित केले. भांडण कधीही मुद्यावरून गुद्यावर जाऊ शकतं, हे लक्षात घेऊन पुढची पायरी म्हणून गुद्यांसाठीही मानसिक आणि शारीरिक क्षमता अंगी बाणवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून ज्युदो-कराटेसारखे काही खेळ ठरविले.

इंटरनेटच्या जमान्यात “चॅट” वरच्या भांडणात कमी पडू नये, म्हणून संगणकाचे मूलभूत प्रशिक्षण आणि इंटरनेट वापरासंबंधीची काही प्रात्यक्षिके नेमून दिली. त्याबरोबर भांडणाच्या विविध वेबसाईटस (संकेतस्थळे) तयार केल्या.

भांडण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी गटागटांच्या वेगवेगळ्या सार्वजनिक नळांना भेटी, रिक्षावाल्यांशी हुज्जतीची सवय व्हावी म्हणून रिक्षातून अभ्यास सहल, सरकारी ऑफिसातून एखादे काम करून आणण्यासाठी खास नियुक्ती अशा षळशश्रवुेीज्ञ चा भांडणाच्या वरच्या वर्गाच्या अभ्यासक्रमात अंतर्भावच केला.

हा सगळा अभ्यासक्रम एखादी मैफल जमावी, तसा मनासारखा जमून आलाय याची खात्री पटताच “भांडण-एक शास्त्रोक्त शिक्षण” असे पेटंट मिळविण्यासाठी मी अर्ज केला, पण परंपरेनुसार कोणत्याही भारतीय गोष्टींच्या पेटंटवर फलाण्या अमेरिकी माणसानं आधीच हक्क सांगितलेला असतोच. त्यामुळे माझा पेटंटचा अर्ज हा त्याला अपवाद नव्हताच. आता हे पेटंट मिळविण्यासाठी मी न्यायालयीन भांडण करण्याच्या विचारात आहे. त्या निमित्तानं “भांडण” या कलेचं आजपर्यंत माझ्याकडून दुर्लक्षित राहिलेलं हे न्यायालयीन अंगही जवळून अभ्यासायला मिळेल. शेवटी काहीही झालं, तरी या भांडणकलेची मी हाडाची उपासक आहे आणि कोणत्याही सच्चा कलाकाराप्रमाणे या कलेचा एकेक पैलू आत्मसात करण्याचा मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न करणारच!



ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

भाग १९: विश्‍वकरंडक असाही

 2003 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सईची “किती हा कंटाळवाणा खेळ” अशी कुरकुर असायची. “चौथीत गेलीय तशी अजूनही क्रिकेट पाहत नाही; कसं व्हायचं हिचं पुढे आयुष्यात?” अशी एक आदिम चिंता मला भेडसावत असायची. क्रिकेटची मॅच चालू असताना खुशाल तरातरा जाऊन टीव्हीचं चॅनल बदलणारी ही माझी (!) मुलगी मला विश्‍वकरंडकाच्या मॅचेस सुरळीत पाहू देईल की नाही, ही शंकासुद्धा होतीच.

मी मॅच बघण्याचे प्रयत्न सोडत नव्हते. हळूहळू विरोध करायचा तिला कंटाळा येऊ लागला. मारून-मुटकून ती माझ्याबरोबर टीव्हीसमोर मॅच पाहायला (?) बसायला लागली. दर ओव्हरनंतर फिरणारे जाहिरातींचे गारुड तिला हळूहळू खेचू लागलं. “पेप्सी”च्या माध्यमातून सचिन, गांगुली, द्रविड, हरभजनसिंग अशा सगळ्या भारतीय क्रिकेटपटूंची ओळख तिला थोडी-थोडी पटू लागली. सतत समोर दिसत असल्यामुळे शेन वॉर्नसुद्धा तिच्या डोळ्यांत ओळखीची खूण उमटवू लागला. माझ्या आशा पल्लवित झाल्या. वार्षिक परीक्षा जवळ आल्यानं इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र असा सगळा अभ्यास घेता-घेता हिचा क्रिकेटचा अभ्यासही करवून घेण्याचा मी निश्‍चय केला. सईला “क्रिकेटवाली” करवून खर्‍या अर्थानं (!!) तिला भारतीय नागरिक बनवणं, हे एक भारतीय आई म्हणून माझं परमकर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी निष्ठेनं पार पाडायचं ठरवलं.

“ते बघ, तिला पण क्रिकेटमधलं काहीच कळत नाहीये, तरी बसलीये ना तिथे” असा “मंदिरा”चा दाखला देत “एक्स्ट्रा इनिंग” मध्ये जमणार्‍या पतौडी, कपिलदेव, श्रीकांत या जुन्या रथी महारथींबद्दलची माझी भक्तिभावना मी तिच्यापुढे आनंदाने प्रकट करू लागले. तिच्या इतिहासातल्या ग्रीक, रोमन साम्राज्यांच्या रसभरित हकिगती पाठ करून घेतानाच क्रिकेटमधल्या वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान अशा विविध परकीय साम्राज्यांच्या आणि त्यातील विविध सम्राटांच्या रोमहर्षक लढायांचा आढावा घेऊ लागले. ज्युलियस सीझर, फिडीपिडीस, रोम्युलस यांच्या स्पेलिंग्जबरोबर वॉल्श, सोबर्स, रिचर्ड, बोथम, रणतुंगा, बॉर्डर, इम्रान वगैरेंची स्पेलिंग्जही गिरवू लागले.

भूगोलाच्या अभ्यासात, भारतातली सगळी राज्यं, त्यांच्या राजधान्या, तिथलं पीकपाणी हे पाठांतर चालूच होतं. सईनं आणि मी मिळून आमच्या भूगोलाच्या कक्षा रुंदावल्या. “विश्‍वकरंडका”त सहभागी झालेल्या सगळ्या टीम्सच्या देशांची नावं पाठ झाली. (म्हणजे कांगारूंचा ऑस्ट्रेलिया, किवींचा न्यूझीलंड वगैरे) मॅचेसच्या ठिकाणांनुसार दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेमधील त्या त्या प्रसिद्ध स्थळांची सगळी माहिती तिच्या मेंदूत कोंबली गेली.

प्रत्येक मॅचमध्ये “रनरेट” काढताना सहाचा पाढा अगदी पाठ झाला. “मॅच जिंकण्यासाठी अजून किती रन्स?” “किती बॉलमध्ये किती रन्स?” अशा प्रश्‍नांमुळे बेरीज-वजाबाकी, त्रैराशिक तयार होऊन गेलं. हा क्रिकेटचा इतिहास-भूगोल, गणिताचा अभ्यास करता-करता क्रिकेटच्या भाषाशास्त्राचा अभ्यास चालूच होता. क्रिकेटचे मूलभूत कायदेकानून ती हळूहळू शिकत होती. भारत-पाकिस्तान मॅचपर्यंत “एल.बी.डब्ल्यू” “क्लीन बोल्ड”, “सिक्स-फोर” यॉर्कर, फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह, स्वीप असे काही शब्द अर्थासह किंवा अर्थाशिवाय म्हणण्याइतकी तिची प्रगती झाली. त्या मॅचच्या भारलेल्या वातावरणाचा नाही म्हटलं तरी तिच्यावरही परिणाम झालाच. इतके दिवस रडत-खडत मॅच बघणारी सई, पुढच्या “सुपर सिक्स”च्या मॅचेस हिरिरीने पाहू लागली. “सचिनला “मॅन ऑफ द मॅच” द्यायचं सोडून श्रीनाथला का?” अशी माझ्याशी हुज्जत घालू लागली. “कसा सोपा कॅच सोडला” वगैरे टिपण्या करू लागली. या सगळ्यामुळे माझ्या “क्रिकेट फिव्हर” मध्ये तीही आजारली.

माझ्या क्रिकेटमधल्या अंधश्रद्धांनी तिचाही ताबा घेतला. “आपल्या बॅटिंगच्या पहिल्या दोन ओव्हर्स आपण पाहिल्या नाहीत की आपण जिंकतो” हे माझं समीकरण तिनंही आचरणात आणलं. मागच्या केनियाच्या मॅचला मावशी गवार निवडत मॅच पाहत होती. ही निकडीची आठवण तिनंच मला केली. त्यामुळे मीही लगेचच ताईला फोन करून “सेमी फायनल” साठी किलोभर गवार आणून निवडायला सांगितलं. ऐश्‍वर्या रायच्या एका जाहिरातीत दाखवलं होतं, की तिनं “कोक”ची बाटली उघडली, की चौकार अथवा षटकार ठोकला जायचा. म्हणून ती मॅच संपेपर्यंत ढीगभर बाटल्या कोक प्यायची. आम्ही आपले गवार निवडणार!

फायनलला आमची गणितं चुकली. आजपर्यंतच्या मॅचेस न पाहिलेल्या लाखो लोकांनी शेवटची मॅच पाहायची ठरवली आणि तिथेच सगळं चुकलं. आजपर्यंतच्या प्रत्येक मॅचला आम्ही जे जे केल्यामुळे किंवा न केल्यामुळे मॅच जिंकली गेली (म्हणजे गवार वगैरे) ते संतुलन या लाखो लोकांच्या अचानक मॅच पाहण्यामुळे ढळलं आणि मॅच “हातची” गेली. डाव्या हातानं करंडक स्वीकारण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. (डावखुर्‍या कर्णधाराप्रमाणे आम्ही दोघीही डावखुर्‍याचं!)

पण तरीही, फार काही बिघडलं नाही. क्रिकेटबाबतचा भारतीय दुर्दम्य आशावाद आहेच. “ओनिडा” च्या जाहिरातीसारखं. यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या विश्‍वकरंडकापासून पुढच्या वेस्ट इंडिजमधल्या विश्‍वकरंडकापर्यंत पुन्हा अभ्यास, पुन्हा जय्यत तयारी. नव्या जोमानं! शिवाय एक जास्तीचं समाधान आहेच. सईच्या सुजाण क्रिकेटीय भारतीय नागरिकत्वाच्या निर्मितीची प्रक्रिया या विश्‍वकरंडकापासून पुढच्या विश्‍वकरंडकापर्यंत!

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

2 comments: