Saturday, October 17, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २३, २४, २५ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 




 भाग २३: ई-दिवाळी

 

“तुझा नवरा इथे नसताना तुमचा रोज फोन व्हायचा का गं?” माझी एक मैत्रीण चौकसपणे विचारत होती. मी फोनच्या पुढच्या जमान्यातली विरहिणी असल्याने तत्परतेने नकार दिला आणि सांगितलं, “नाही, आम्ही रोज एकमेकांना ई-मेल करायचो.”

आता माझा नवरा परतलाय. त्यामुळे घरातल्या घरात ई-मेल न करता आम्ही एकमेकांशी बोलतोय, पण ह्याच्या मानगुटीवरून मात्र हे ई-मेल भूत अजिबात उतरत नाहीये. उलट ते जास्तच घट्ट बसत चाललंय. तो दिवसेंदिवस अगदी ई-आधीन होतोय. म्हणजे बँकेची कामं, बिलं भरणं, ई-कॉमर्स इत्यादी इत्यादी आणि मी आपली बिचारी! काही इलाजच नसल्याने इतर अनेक गोष्टींबरोबर या “ई” उलाढालीही सांभाळते.

तर सांगायचा मुद्दा, या “ई”चा सुळसुळाट वाढत चाललाय. यंदा आमचा गणपती “ई-गणेशोत्सव” होता. म्हणजे डाऊनलोड केलेल्या गणपतीच्या फोटोची कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपोआप होणारी आरती व माऊस क्लिक केला, की वाजणार्‍या घंटा, पेटणारी  उदबत्ती, पायाशी पडणारी फुलं, दाखवला गेलेला नैवेद्य इत्यादी इत्यादी.

गणपतीनंतर यंदाच्या दिवाळीवरही ही “ई” चालून आली. आमच्या घरात घोषणा झाली. “यंदाची दिवाळी - ई दिवाळी”! आतापर्यंत मीही थोडीफार ई-वातावरणाला सरावले होतेच. त्यामुळे मी होकार दिला आणि कॉम्प्युटरवर कामांची यादी करायला बसले.

मन जरा सुखावलंच. पंधरा दिवस आधीपासून आठवणीनं भेटकार्ड आणून पत्ते शोधून, तिकिटे चिकटवून, पोस्टात टाकण्याचं माझं किचकट काम कमी होणार. ई-भेटकार्ड नवरा हौसेनं पाठवेल. चला माझं एक तरी काम कमी झालं आणि त्याच्या खाती गेलं. पुढचा विचार तर फारच आल्हाददायी होता. नवरा, मुलगी, मोलकरीण सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळत, घर आवरण्याचं बिकट काम! ती कटकटच नाही. यंदा कशी सुटसुटीत, ई-स्वच्छता! ई-रोषणाई! फटाकेसुद्धा आणायला नको. प्रदूषणात भर न घालण्याचं पुण्यही मिळेल आणि शिवाय खिसाही आनंदित राहील.

मन जरा जास्तच वाहवत चाललं होतं. फराळाचे पदार्थ करायलाच नकोत.

ई-फराळाला बोलवायचं सगळ्यांना! लाडवाचा पाक फसणे, अनारशाचं पीठ बिघडणे, चकल्या-शेवेचे घाणे घालून मनगटं दुखणे, करंज्या लाटून लाटून हात भरून येणे.... या सगळ्या संकटांमधून सुटका! मी अगदी हरखून गेले. स्वप्नरंजनाच्या पुढच्या पायरीवर अलगद चढले.

यंदा अगदी छान साडी घ्यायची आणि ती  घालून, नटूनथटून नुसतं मिरवायचं. काही कामच नसणार दुसरं या ई-दिवाळीमुळे! अगदी खुशीत येऊन नवर्‍याला सगळा बेत सांगितला आणि मागणी केली, की या वेळच्या पाडव्याची पैठणी मला आधीच घेऊन दे. म्हणजे पाडव्याला नेसता येईल. नेहमीच निवांत दिसणारा माझा नवरा आरामात म्हणाला, “काय घाई आहे ? ई-पैठणी तर घेऊन द्यायचीये. दोन मिनिटांत काम होईल.”

मी क्षणार्धात भानावर आले. म्हणजे खरा फराळ करायचा नाही, तशी खरी पैठणी पण मिळणार नाही? “ईऽऽऽ” मी अगदी ईडलिंबूतला “ई” चीत्कारले. “कशाला ही नसती सोेंगं? आपल्या आहेत त्या जुन्या गोष्टीच चांगल्या आहेत बरं का!” - इति मी. त्यानंतर रोजच्या रोज मी दुकानात, पोस्टात जाते, बाजारातून वाणसामान खरेदी करून आणते. फटाके आणते, गॅसजवळ तास न् तास उभी राहून घाम गाळते, ही नेहमीची उस्तवार ओघानं आलीच. हे सगळं केवळ ती “ई-पैठणी” नाकारून पाडव्याची पैठणी मिळण्याच्या आशेनं.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग  २४: भोंडल्याची गाणी

 

नवरात्रीतले सगळे नऊ दिवस जमलं नाही तरी एक दिवस मी सईचा भोंडला अगदी हौसेनं केला. रूचकर खिरापती सजल्या. सईच्या आणि माझ्याही छोट्या-मोठ्या मैतरणी नटूनथटून आल्या. सुरेख फेर धरला गेला. कळणारी आणि न कळणारी सगळीच गाणी मुलींनी मजेत म्हटली. खिरापतींवर ताव मारताना मात्र माझ्या एका सखीनं नाक मुरडलं. “काय गं ही कालबाह्य आणि निरर्थक गाणी शिकवतेस मुलींना..?”

“पण मुलींना तर आवडतात ती गाणी !” माझं समर्थन.

“त्यांना काय कळतंय?” तिचा प्रतिप्रश्‍न.

मी विचार करू लागले. “अडगुळं-मडगुळं” पासून किती निरर्थक गाणी आपण म्हणतो, ती आपल्याला आवडतातच ना. भोंडल्याची कितीतरी गाणी मुलींना कळंत होतीच की.

“ऐलमा, पैलमा...” चा फेर संपल्यावर मुलींनी किती यमक जुळविले होते. “एक लिंबू झेलू बाई” च्या चालीवर तर “एक झाड लावू बाई” असं कोणत्यातरी शाळेतच शिकवलं होतं म्हणे. “अक्कणमाती, चिक्कणमाती” गाणं म्हणजे मला एखादा फ्लो चार्ट कसा असावा, याचं खूप चांगलं उदाहरण वाटतो. खड्डा-माती-जातं-सपिटी-करंज्या-तबक-शेला-पालखी-माहेर अशा एकातून एक गोष्टी सहज उलगडत समोर येतात. रोजचे वार शाळेच्या आणि टीव्हीच्या वेळापत्रकानुसार पाठ करणार्‍या मुलींना “आज कोणवार बाई...” गाण्यातून, त्या - त्या वारासाठी “नेमलेल्या” देवांची ओळख होते. “सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण” ऐकल्यावर कितीतरी जोडशब्दांची उजळणी मुलींनी केल्याचं मला आठवतंय.

सासू, सासरा, दीर, नणंद, भावजय ही सगळी सासरची नाती मुलींना तशी टी.व्ही. च्या “क” च्या बाराखडीतल्या मालिकांमधून दिसतातच. ती त्यांनी गाण्यांमधून अनुभवली. शिवाय या गाण्यात प्रत्येक जण काही ना काही दागिना आणतच असतो. नटून आलेल्या त्या मुलींना हार-बांगड्यांचं अप्रूप तर कळत होतं ना ! “सासरच्या वाटे, कुचुकुचु काटे” गाण्यात “कुचुकुचु” शब्द म्हणायला मुलींना फार आवडतं, हे माझ्या लक्षात आलं. “झिपर्‍या कुत्र्याला बांधा-सोडा” हा आदेश मुली खूप दणक्यात देत होत्या, बहुतेक “झिपर्‍या” शब्दाच्या प्रेमात पडूनच ! सई लहान असताना हे गाणं म्हणताना “सासर्‍यानं आणल्या बाटल्या” (पाटल्या आणि बांगड्या) असं म्हणून तिनं आमची खूप करमणूक केली होती.

रोजची भाजीतली मिरची - कोथिंबीर दिसली की सई अजूनही प्रेमानं साद घालते. “कोथिंबिरी बाई गं!” त्या चेंडूच्या गाण्यात “आला चेंडू, गेला चेंडू” अशा चेंडूपासून खेळ सुरू करून, राम, आकाश, बोहलं, लग्न, झाड, फूल, वेणी, भांग, खोपा आणि त्यात उंदीर घेतो झोपा गं.. अशा खेळाचा शेवट ऐकताना मुली कानगोष्टी खेळतायत असं वाटतं. “कृष्ण घालितो लोळण” या गाण्याचा वापर तर भोंडल्याव्यतिरिक्त नाजूकसं अंगाईगीत म्हणूनही करावासा वाटतो.

अशी अनेक गाणी असली तरी मुलीचं सदा सर्वदाचं लाडकं गाणं आहे. “श्रीकांता कमलकांता...” आम्ही लहानपणी हे गाणं आवर्जून म्हणायचो. आजही मुलींना ते हवंच असतं. “तिकडून आला वेडा, त्यांनं डोकावून पाह्यलं.” या ओळीला फेर धरलेला असतानासुद्धा मुली इतक्या छान थोड्याशा कोनात डोकावतात ना की पाहत राहवंस वाटतं ! वेड्याच्या नावावर खपवलेल्या करंज्या-होड्या, लाडू-चेंडू, शेवया-अळ्या आणि झोप-मरण या साम्यभेदाच्या जोड्या मुलींना खिळवून ठेवतात.

माझ्या सखीला भोंडल्याची गाणी कालबाह्य वाटतात. “अवलगीचं पाणी गं” सारखे संदर्भ घेऊन येणारे काही सोपस्कार कालबाह्य झाले असतीलही. आजची स्त्री ही कालच्या सुनेइतकी सासुरवाशीण नसेलही, तरीही बहुतेक वेळा कामानिमित्त आणि क्वचित कधीतरी विरंगुळ्यासाठी घराबाहेर पडणार्‍या आजच्या गृहिणीची स्थिती भोंडल्याच्या गाण्यातल्या सुनेसारखीच “कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा अपुल्या माहेरा” अशीच असते. अनेक कडू कारल्यांचे वेल जोपासत आणि त्यांच्या भाज्या करत करत ती बाहेर पाऊल टाकेपर्यंत एकच पालुपद अनुभवते “मग जा जरा बाहेर!”

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग २५: आस्तिक-नास्तिक

 

जेव्हा जेव्हा मी पहाटे सिंहगड चढायला सुरुवात करते तेव्हा तेव्हा मला माझ्या बाबांची हमखास आठवण येते. पंचाहत्तरी उलटलेला हा वृद्ध (?) तडफेने अजूनही आषाढीच्या वारीला पायी जात असतो. मला वाटते, चालत जाण्याची ही अनावर ऊर्मी आनुवंशिकतेनेच माझ्यात आली असावी. संदर्भ, भावना वेगवेगळ्या असतील. पण मूळ प्रेरणास्रोत हा चालण्याचाच असावा. ते त्यांच्या विठ्ठलाच्या ओढीनं थंडी-पावसाची तमा न बाळगता दिवसेंदिवस चालत राहतात. खरं तर त्यांना बसने जाऊनही दर्शन होईलच पण त्या नुसत्या दर्शनापेक्षा तेथे चालत जाण्याचा सोहळा त्यांच्यासाठी जास्त आनंददायी असावा.

माझ्या सिंहगडला जाण्यात कुठलं लौकिकार्थातलं देवदर्शन नसतं, पण ती आजूबाजूची नीरवता, ते पुसट होणारं चांदणं, चित्रातले रंग भरत जावेत तसं ठळक होत समोर येणारं ते सूर्यबिंब हे सारं “ईश्‍वर” या संकल्पनेचं उलगडणंच असतं.

आस्तिक-नास्तिक या वादात मी कधी पडले नाही, पण स्वत: कधी व्रतवैकल्यामध्ये अडकले नाही. सोमवार ते रविवार या विविध वारांचे उपवास करणार्‍या भाविकाचं मला खूप कौतुक वाटतं. मी कुठल्या वाराच्या वाटेला कधी गेले नाही. कुठल्या मंदिरामध्ये कधी गेलेच तर ते मंदिर पाहणं, ते स्वच्छ आहे की नाही हे शोधणं हेच मी जास्त कुतूहलानं करते. देवाला केलेला नमस्कार हा केवळ उपचाराचाच भाग असतो. आमच्या घरी गणपती, दिवाळी अगदी उत्साहात साजरे होतात. पण त्यात धार्मिक कर्मकांडाऐवजी उत्सवप्रियताच जास्त असते. त्याच उत्साहात घरी ख्रिसमसचीही तयारी होते.

मी एकदा पाहुणी म्हणून एका छोट्या गावात गेले होते. पाहुणचाराचा भाग म्हणून मला आजूबाजूच्या प्रसिद्ध तीर्थस्थळांना (जेथे दिवसाकाठी भारतातून हजारोंनी लोक येतात) घेऊन जाण्याचा बेत ठरत होता. मी जायला नकार देताच सगळ्यांच्या आश्‍चर्याला पारावार उरला नाही. कारण त्यांचा अनुभव होता की, त्या देवस्थळांच्या भेटीसाठीच लोक त्या छोट्या गावाला येणं पसंत करत होते. त्यांनी मला नास्तिक म्हणायचं ठरवून टाकलं होतं. पण माझ्या दुसर्‍या दिवशीच्या वागण्यानं मी त्यांना गोंधळात टाकलं होतं. संध्याकाळचं फिरत फिरत गावापासून दोन-तीन किलोमीटरवर असलेल्या छोट्याशा टेकडीवरच्या गावदेवीच्या मंदिरात मी आनंदाने गेले. तेथे जाऊन सूर्यास्त पाहून त्या शांत मंदिराच्या आवारात मी अगदी प्रसन्नचित्त होते.

माझ्या लहानपणी आई ज्या श्रावणातल्या कहाण्या वाचायची त्या ऐकून ऐकून पाठ होत्या. त्यातली एक मला फारच भावलेली होती. राजा फर्मान काढतो. देवाचा गाभारा दुधानं भरायचा. प्रत्येकानं घरात काहीच दूध न ठेवता सगळं दूध देवाच्या गाभार्‍यात ओतायचं म्हणजे गाभारा भरेल. पण गाभारा काही भरत नाही. एक म्हातारी राजाचं न ऐकता मुला-बाळांना, वासरा-बछड्यांना दूध पाजते. त्यातून उरलेलं वाटीभर दूध गाभार्‍यात ओतते आणि त्यानं गाभारा भरतो.

मला वाटतं, माझी आजची उघड नास्तिकता आणि अल्पशा आस्तिकतेबरोबर जोपासत गेलेली सृजनावरची गाढ श्रद्धा यांच्या घडणीत श्रावणातल्या त्या कहाणीचा पाया आहे.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

7 comments:

  1. भाग 25..मस्त! मीही काहिसा आस्तिक आणि बव्हंशी नास्तिक आहे. मला देव आठवतो पण फक्त अडिअडचणीला!मला स्वतःलाही याचा कधी कधी राग येतो. पण... आहे ते असे!असो! छान लेख!!

    ReplyDelete
  2. मस्त लेख .. मस्त ऑडियो ..

    ReplyDelete
  3. Very nice writeup. Thanks !!!
    Asmita Phadke

    ReplyDelete
  4. V nice. So many details.. Thanks for reviving childhood memories

    ReplyDelete
  5. तुझी बहुश्रृतता आणि रसिक आणि सजगतेने जगण्यावरची श्रद्धा या लेखातून दिसून येते.

    ReplyDelete