भाग २९:ती
तेव्हा तशी!
श्रावणसरी
संपून जातात. भाद्व्यातला पाऊसही कमी होतो आणि आश्विन येतो. शरदाची चाहूल लागते. झुंजुमुंजु
होताना दवानं ओलेती झालेली धरती हिरवी शाल लपेटून बसल्यागत दिसते. दिवस हळूहळू तापायला
लागतो. सांजवेळी अंधारून येताच हवेत हळूच गारवा शिरतो. ही थंडी नाजूक किणकिणणारी, जणू
झिरझिरीत वस्त्रातून शरीराला स्पर्श करणारी! या अशा भारलेल्या आसमंतात टिपूर चांदणं
ओसंडणारी शरदाची पौर्णिमा येते, कोजागिरी येते.
एखाद्या
कोजागिरीला मागे घुटमळलेले काही चुकार पावसाळी ढग त्या नभीच्या चंद्रम्याशी लपंडाव
खेळतात, तर कधी दुसर्या एखाद्या कोजागिरीला लख्ख चांदणं नभात हसू सांडत राहतं आणि
पाहता पाहता या भुईवर शिंपडलं जातं. आकाशीच्या पौर्णिमेला जमिनीवर पोहचवतं. इथे जमिनीवर
ही कोजागिरी, रात्र जागवणारी, कधी अशी तर कधी तशी!
एखादी
अल्लड नवयौवना लगबगीनं तयारी करणार असते. अखंड चिवचिवणारा मित्र-मैत्रिणींचा मोठा थवा
जमणार असतो. गप्पागोष्टी, गाणं खाणं...पाहता पाहता रात्र सरणार असते.
याच
रात्री दुसरीकडे कुठेतरी मात्र नि:शब्दतेचं बेट सजणार असतं. पहिल्या प्रीतीला पंख लाभणार
असतात. नवथर गारव्यानं आणि निसटत्या स्पर्शानं अंगांगावर शिरशिरी उमटणार असते. पौर्णिमेच्या
चंद्राच्या साक्षीनं तनू झंकारणार असते.
तोच
चंद्र अजून कुठेतरी मुलाबाळांत रमलेल्या वत्सल गृहिणींवर, त्यांच्या कुटुंबांवर स्निग्धतेचा
वर्षाव करणारा असतो. त्याची ती स्निग्धता घरादारांमधून आजूबाजूला पाझरणार असते.
कुठे
कुठे हा लख्ख चंदेरी प्रकाश हृदयात आरपार घुसणार असतो. घट्ट बंद केलेला आठवणींचा कप्पा
किलकिला होणार असतो. गालांवरून ओघळणारे चमचमते अश्रू स्वत:च्याच बंद ओठांशी संवाद साधणार
असतात.
आणखी
कुठे निवांत विसावलेल्या आयुष्यात, श्रांत तन आणि शांत मनानं कोजागिरी साजरी होणार
असते. त्या सोहळ्यात वर्षानुवर्षांच्या सवयीची तयारी असते. आजच्या घोटभर दुधाच्या प्याल्यात,
आजवरच्या जगलेल्या, काठोकाठ भरलेल्या, प्याल्याची तृप्ती जाणवणार असते. आजपर्यंत एकमेकांसमवेत
घालवलेला पौर्णिमेच्या रात्रीचा प्रवास आणि प्रकाश आजची कोजागिरी उजळवणार असतो.
अशी
ही कोजागिरी, वेगवेगळी साजरी होणारी. तरी एक समान सूत्र असलेली, रात्र जागवणारी! जागणार्या
रात्रीबरोबर मनही जागवणारी! मनाला हुरहुर लावणारी तशीच मनाला दिलासाही देणारी! मनाला
साद घालणारी, मनाचा प्रतिसाद घेणारी! मनात बहरणारी, तर कधी कधी मनातच थबकणारी! आठवणींचा
गहिवर दाटणारी आणि आठवणींनी विश्वासही पेरणारी!
ती
कोजागिरी? केव्हा कशी?
ती
तेव्हा तशी!!
ऑडिओ लिंक :
भाग ३०: हुरहुर
नजर
टाकावी तिथपर्यंत धुकंच पसरलेलं दिसावं. सवयींच्या वाटाही त्या धुक्यात हरवून दिसेनाशा
व्हाव्यात. वाटा शोधण्यासाठी त्या धुक्यात पाऊल टाकावं तर धुक्यानं स्वत:ही पुरतं वेढलं
जावं. “धुके दाटलेले उदास उदास...” अशी मनाची
अस्वस्थ बेचैनी वाढावी. त्या दाट धुक्यातून गडद एकटेपण सोबतीला यावं. हरवलेल्या वाटा
सापडण्याऐवजी स्वत:लाच हरवलेपण यावं. या हुरहुरीला अंत नाही, असं वाटत असतानाच कुठल्या
तरी दवबिंदूवर पाय पडावा. आपले अश्रू तर सांडले नाहीत ना, या भावनेनं दचकायला व्हावं.
विखुरलेले दवबिंदू आणि ओघळणारे अश्रू वेचण्याइतके आपण हळुवार राहिलोच नाहीत, या विषादानं
स्वत:भोवतीचे धुक्याचे, एकांताचे पदर टराटर फाडले जावेत. विरलेल्या धुक्यात स्वत:ला
नेहमीच्याच वाटेवर उभं ठाकलेलं पाहून, “हीच तर शोधत होतो आपण” असा आनंद होण्याऐवजी
“नेहमीच्याच वाटेवर पोहोचलो की आपण...” असं कळेल न कळेलसं दु:ख व्हावं आणि त्या दु:खाच्या
किनारीनं मग सूर्यप्रकाशातल्या दिवसात भाजत राहावं.
मनातला
हिवाळा असा सामोरा येतो. आपल्याला काय हवं होतं? त्या धुक्यात लपलेल्या वेगळ्या वाटेवर
हरवून जाणं की रोजच्या मळलेल्या वाटेवरचं स्वत:ला सापडवणं? हे विचित्र अधांतरीपण पेलेनासं
होतं आणि हिवाळ्यातली पानगळ सुरू होते. मनाला अगदी ओकंबोकं करते. एकीकडून वाटत असतं,
मनाला कुठूनतरी ऊब मिळवून द्यावी. निष्पर्णतेपासून वाचवावं. दुसरीकडे थंडीच्या थिजलेपणाचे
थर साचताना दिसतात. सार्या हालचालींनाच हतबल करतात.
गोठलेलं
मन दिवसभराच्या सूर्यप्रकाशानं वितळेल की काय, असं वाटत असतानाच लहानलेला दिवस संपून
जातो. सैलावू बघणारा बर्फाचा थर वेढणार्या काळोखात पुन्हा घट्ट जमू लागतो.
एरवी
स्वच्छंदी फिरणारा वारा या रात्रीच्या अंधारबेटात जणू अडकलाय, असं वाटू लागतं. पालापाचोळा
उडत तो गोलगोल घुमू लागतो. आजूबाजूच्या सगळ्या नाजूक स्वरलयींना स्वत:च्या रौद्र तालात
ओढून घेतो. थंडी अंगात भिनते. हीव भरल्यामुळे तनमन थरथरू लागतात.
थरथर
थांबवून शांत होण्याची गरज जाणवत असते. फडफड थांबवून पंख मिटल्या देही घरट्यात घुसण्याची
सक्ती त्यासाठी अपरिहार्य असते. घरट्याची ऊब आश्वासक वाटते. मिटल्या पंखांचं दु:ख
विसरायला लावते. सकाळच्या कोवळ्या किरणांचे स्वप्न दाखवायला लावते.
काळोखगर्भ
भेदून, पहाटस्वप्न लेवून हळदपिवळी सकाळ येते. ऊबदार घरट्यातून बाहेरच्या धुक्यात झेपावताना
आता हरवण्या-गवसण्याचा लपंडाव नसतो, तर धुकं भेदून नवीन वाटा शोधण्याचा उन्मेष असतो.
मनातला
हिवाळा ऊबदार घरट्यात आता विसावलेला असतो. वसंताच्या चाहुलीसाठी आसुसलेला असतो.
ऑडिओ लिंक :
पहाटे-पहाटे
अंगावर रजई ओढताना तिला थंडीची चाहूल लागली. अर्धवट जागी झालेली ती रजईत घुसून अजूनच
पेंगुळली. गुलाबी पहाटे ती गुलाबी थंडीची स्वप्नं पाहू लागली. तारुण्याच्या उंबरठ्यावर
असताना स्वप्नात राजकुमार आला नाही तर नवल! तिची स्वप्नातली थंडी स्वप्नातल्या राजकुमाराच्या
ऊबदार मिठीत कुठल्याकुठे पळून गेली. त्या पहाटेच्या दवबिंदूंच्या वर्षावाने ती सुस्नात
झाली. धुक्याची जाडसर शाल लपेटून, राजकुमाराच्या हातात हात गुंफून ती सज्ज झाली. उगवत्या
सूर्याच्या कोवळ्या किरणांचा मखमली गालिचा आता लवकरच अंथरला जाणार होता. त्याचा मुलायम
पदस्पर्श होण्यासाठी तिची जीवनोत्सुक पावलं आसुसली होती.
सूर्योदयाबरोबरच
तिला मोठी प्रसन्न जाग आली. पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणे. इतकं हळुवार स्वप्न घेऊन
येणारा हिवाळा तिला खूप हवाहवासा वाटला. वाफाळत्या चहाच्या कपानं शरीराला ऊब देऊन ती
लगबगीनं स्वत:च आवरायला लागली. आनंदानं गिरकी घेणार्या मनाला आता नळाचं थंडगार पाणीसुद्धा
थुईथुई कारंज्यांचे तुषार वाटू लागले. हिवाळ्याला साजेसे, पण आपलं रूप खुलवणारे विविध
पेहराव, त्यानुसार साजशृंगार या सगळ्यांच्या धांदलीत हिवाळ्यातला छोटा दिवस तिच्यासाठी
अजूनच लहानला. हिवाळ्याच्या खरेदीसाठी ती उत्साहात घराबाहेर पडली.
स
स
पहाटे
पहाटे होणारा घड्याळाचा गजर बंद करण्यासाठी तिला पांघरुणातून हात बाहेर काढवेना तेव्हा
बाहेरच्या थंडीची तिला चांगलीच जाणीव झाली. डोळे उघडवत नव्हते, तरी पुढचा कामाचा पूर्ण
दिवस आठवून ती त्या गारठ्यात उठलीच. थंडीनं गार पडलेल्या फरशीवर पाऊल ठेवताना, घरात
घालण्यासाठी आता चपला वापराव्यात, असं तिच्या मनात आलं. सवयीनं तिनं शेजारीच झोपलेल्या
मुलीच्या बिना पांघरुणाच्या पायांकडे बघितलं. आपल्या थंडीचं काय, मुलीच्या पायांना
थंडी वाजतीय. रुळलेल्या वात्सल्याची नेहमीची कर्तव्यदक्ष जाणीव तिच्या मनाला झाली आणि
थंडीनं गारठलेलं तिचं शरीर चटचट हालचाली करू लागलं. मुलीच्या अंगावर स्वत:चेही पांघरूण
घालून ती सकाळच्या कामाच्या धबडग्याला सामोरी गेली.
एक
कप चहाचं इंधन शरीराला पुरवल्यावर तिच्या नकळत तेही जरा सुखावलं. हात सरसर काम उरकू
लागले. मनही हिवाळ्यासाठीच्या वेगवेगळ्या कामांची आखणी करू लागलं. मुलीला मागच्या वर्षीचा
स्वेटर होणार नाही. यंदा नवा घ्यावा लागेल. नवर्यालाही सकाळीच स्कूटरवर बाहेर पडावं
लागतं. त्याने निदान कानटोपी, हातमोजे तरी घालावेत. हिवाळ्याची भूक खूप लागते. मुलांचं
वाढीचं वय आहे. त्यांच्यासाठी भरपूर सुकामेवा आणायला हवा. येता जाता खाऊ म्हणून खातील.
एकीकडे
घरकाम होताहोताच तिच्या मध्यमवर्गीय मनातला हिवाळ्यातला जास्तीच्या खर्चाचा हिशेब पूर्ण
झाला. “गार फरशीवर फक्त पहिल्या पावलालाच शहारतं. त्यानंतर कामाच्या गर्दीत तर थंडीतसुद्धा
अक्षरश: घाम येतो. काय करायच्यात मला घरात घालायला चपला?” ऑफिसात जाण्यासाठी पायात
चपला सरकवताना घरातल्या चपलांचा विचार तिनं सवयीच्या सोईस्करपणे मनाआड केला आणि ती
उरलेल्या दिवसांची कामं उरकण्यासाठी घराबाहेर पडली.
स
स
पावसाळा
संपता-संपता या नव्या इमारतीच्या कामावर ती पोहोचली होती. उंच उंच मजल्यांच्या त्या
भव्य इमारतीसमोर तिचं ते चार पत्र्यांचं खोपटं खूपच बापुडवाणं दिसत होतं. या अशा टोलेजंग
इमारतींवर काम करायला तिला नेहमी आवडायचं, पण येऊन ठाकलेल्या हिवाळ्याच्या काळजीनं
ती यंदा हिरमुसली होती. रात्रीचे खोपटाचे पत्रे गार पडत होते. त्यांच्या फटींमधून थंडी
घुसत होती. थेट हाडांपर्यंत भिनत होती. खरं तर तिच्या हाडांना या थंडीची सवय होती,
पण या वर्षी झोळीतल्या तान्ह्या लेकरासाठी तिचा जीव खाली-वर होत होता. थंडी सहन न होऊन
ते रात्ररात्र किरकिरत होतं.
आजूबाजूला
अजून काहीच बांधकाम न झाल्यानं वार्याला अडसरच नव्हता. रानोमाळ भणाणणारा तो वारा तिच्या
लेकराच्या थंडीत अजूनच भर घालीत होता.
सकाळी
चुलीपुढे भाकरी थापताना चुलीची ऊब तिला फार सुखाची वाटत होती. दिवसभर कामाच्या चक्रात
राहूनराहून तिला चुलीची आठवण येत होती. पेटत्या चुलीवरून तिला शेकोटी आठवत होती. शेकोटी
पेटवून थंडी कमी करता येईल, असं तिला खात्रीनं वाटत होतं.
त्यासाठीच्या
सरपणाच्या काळजीनं तिचं मन व्यापलं होतं. वरच्या मजल्यांवर विटा-सिमेंट वाहून नेताना
तिची नजर चहूबाजूंना झाडं-झुडपं धुंडाळत होती. पण नवीन इमारती उभारण्यासाठी इथलं जंगल
तोडून पार साफ केलं होतं. नजरेच्या टप्प्यात तर काहीच दिसत नव्हतं.
दिवसभराचं
काम संपलं, मजले उतरून खाली आल्यावर बरोबरच्या सगळ्या जणी आपापल्या झोपड्यांकडे वळल्या.
ती मात्र तिकडे वळली नाही. हिवाळ्यातला दिवस छोटा असल्यानं लवकर अंधारून येणार होतं.
अंधाराच्या
आत लांबवर फिरून जिथून मिळेल तिथून काही सरपण तिला गोळा करायचं होतं. रात्री शेकोटी
पेटवून तान्ह्या बाळाची थंडी घालवायची होती. दिवसभराच्या कामाचा शीण विसरून पाला-पाचोळा,
काटक्या-कुटक्यांच्या शोधात ती घाईनं पावलं उचलू लागली.