भाग १
कविता : कुकर
कवी: सुबोध खानोलकर
काव्यवाचन: कु. राधा कुलकर्णी
कविता : ज्याचेत्यासी
कवी: कुसुमाग्रज
काव्यवाचन: कु. निक्षुभा कापडणीस
भाग ३
कविता: अंधार
कवयित्री : कु. राज्ञी कापडणीस
काव्यवाचन: कु. राज्ञी कापडणीस
भाग १
कविता : कुकर
कवी: सुबोध खानोलकर
काव्यवाचन: कु. राधा कुलकर्णी
कविता : ज्याचेत्यासी
कवी: कुसुमाग्रज
काव्यवाचन: कु. निक्षुभा कापडणीस
भाग ३
कविता: अंधार
कवयित्री : कु. राज्ञी कापडणीस
काव्यवाचन: कु. राज्ञी कापडणीस
भाग १४: मनातलं
घर
“त्या
तिथं पलीकडे, माझिया प्रियाचे झोपडे” पासून “ये तेरा घर ये मेरा घर” पर्यंत भेटणार्या
कविकल्पनेतील घरांमध्ये नेहमीच मन गुंतलेलं असतं. याशिवाय पुस्तकांमधल्या, चित्रांमधल्या
काही स्वप्नवत घरांचाही मनाला सतत ध्यास असतो.
“टॉम
आणि जेरी” या जोडगोळीच्या करामती पाहण्यापेक्षा त्यांचे ते थशश्रश्र र्षीीपळीहशव पिटुकलं
घर माझं जास्त लक्ष वेधून घेतं. “अॅलिस”बरोबर वंडर लॅन्डमध्ये फिरताना त्या छोट्या
दाराच्या घरात शिरण्याचा मोह मला अनावर होतो. इनिड ब्लायटन या छोट्यांच्या लाडक्या
लेखिकेचा खास हीरो “नॉडी” टॉयलॅन्डमध्ये चिकाटीनं टुमदार घर बांधतो. ते सगळं घर सजवतो.
शेवटी त्याच्या खिडक्यांवर सुंदर पडदे चढल्यावर मीच स्वत:चं घर सजवल्यासारखी कृतकृत्य
होते.
पुस्तकांबाहेर
वास्तवातही काही घरं भेटतात जी मन:पटलावर कायमसाठी चितारली जातात. माझा एक मित्र मुंबईला
खूप आलिशान घरात राहतो. त्या घराच्या उभारणीत त्यानं किती वेळ आणि पैसा खर्च केलाय
हे मी जवळून पाहिलंय, पण त्याच्या मनात रुतलंय ते त्यानं मनालीला पाहिलेलं दोन झाडांच्या
मधलं एक छोटंसं घर! घराचा विषय निघाला आणि तो त्या मनालीच्या घराबद्दल बोलला नाही,
असं होतंच नाही.
माझ्या
मनातही असं एक स्वप्नातलं घर घट्ट रुतलंय. दापोलीजवळ 18 किलोमीटरवर 700-800 घरांचं
एक छोटंसं गाव “नानटे”. तेथील तो वळणं घेत जाणारा रस्ता. अशाच एका वळणावर एक टुमदार
पूल, पुलाखालून वाहणारी एक खळाळती नदी आणि नदीच्या कुशीत एक छोटी टेकडी. रस्त्याचं
वळण सोडून पूल ओलांडून, टेकडीच्या पायथ्याशी थांबायचं. वर नजर टाकली की डॉ.भिंगारेंचं
लाल रंगाचं आणि विटकरी अंगाचं ते छोटेखानी घर उभं दिसतं. टेकडीच्या चढावर लावलेल्या
केळी-पोफळीच्या बागांतून जाणार्या पायवाटेनं वर जायचं. रानफुलांनी सजलेल्या चार पायर्या
चढल्या की, तो छोटा बांधलेला हौद आणि त्यात फुललेली कमळं! अंगणातच बसू की घरात घुसू
असं द्विधा मन!
घरात
शिरल्यावर टेकडीच्या वेगवेगळ्या पातळीवर असणार्या त्या खाली-वर अशा खोल्या, आडोसा
देणारा तो लालचुटूक खांब आणि खुर्च्या, कॉट असं काहीही न घेता पायर्यांवरच निवांत
विसावावं, असं वाटायला लावणारा जिना!
काय
करू नि काय नाही असं होऊन जातं. मी जेव्हा कधी तिथे जाते तेव्हा दारात उभं राहून पाऊस
पाहू, सकाळचा चहा अंगणात घेऊ, संध्याकाळचं व्हरांड्यात वाचत बसू अशी यादी घेऊन जाते.
अधाशासारखी घरभर वावरते. टेकडीवरच्या पायवाटांनी मनसोक्त भटकते आणि परतीच्या प्रवासात
त्या घरातल्या पुढच्या मुक्कामात काय काय करायचं, याचे बेत करायला लागते.
भाग १५: घर
पहावं सजवून
स्वत:च्या
व्यवसायाव्यतिरिक्त अगदी शिवणकामापासून स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्ट स्वत:ला फार
छान करायला येते, हा जन्मजात आत्मविश्वास (?) माझ्यात आहेच. त्यामुळे गृहसजावटीचं
काम आपल्याला छानच जमेल, याची मला खात्री होती. म्हणून “गृहसजावटीचं काम आपले आपण करू
या”, असा प्रस्ताव मी मांडला. यात डिझायनरचे, आर्किटेक्टचे पैसे वाचणार होते आणि प्रत्यक्षातलं
मुख्य काम सुतारच करणार होता. (माझ्यामुळे काम बिघडण्याचा धोका नव्हता.) त्यामुळे “आपले
आपण” च्या माझ्या भक्कम आत्मविश्वासाला नवर्यानं पाठिंबा दिला. या कामातला अनुभव
दोघांनाही शून्य होता, त्यामुळे मुळातूनच अभ्यास सुरू झाला. माझ्या नवर्यात टिपिकल
नवर्याचे सगळेच गुण असल्याने त्याला प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अजिबात
वेळ नव्हता. त्याच्या कार्यबाहुल्यामुळे “आपण करू या” चं रूपांतर “तू कर हवं तसं ,
काही मदत लागली तर सांग” अशा विनंतीवजा ऑर्डरमध्ये झालं. माझा व्यस्त नवरा “आमच्या
“टीममधला न खेळणारा कर्णधार” झाला आणि पूर्णवेळ नोकरी, घरकाम, चूल-मूल करणारी मी, हौसेनं
माझ्या फुरसतीच्या वेळाचा सदुपयोग करायचा ठरवून गृहसजावटीच्या कामाला लागले.
आजपर्यंत
जाता-येता वेस्टसाईड, शॉपर्स स्टॉप अशा दुकानांमध्ये वेळ घालवणारी मी, टिंबर मार्केटमध्ये
फेरफटका मारू लागले. लाकूड, प्लाय, रनिंग फूट अशा आजपर्यंतच्या अनभिज्ञ शब्दांबरोबर
टिंबर मार्केटबाहेरील आळीतल्या वेगवेगळ्या गल्ल्या, चौक असा इतिहास-भूगोल अभ्यासू लागले.
कांदे-बटाटे, कोबीच्या बाजारभावाची चर्चा करता करताच “रॉयलटच”, “क्लासिक प्लाय” वगैरेचं
कोटेशन असं फर्डा बोलू लागले. “कसं आपल्याला नवनवीन शिकायला मिळतंय” या फाजील उत्साहात
हळूहळू त्या लाकूड-लोखंडाच्या जंगलात हरवत गेले आणि “कशी मी तुला ही बहुमूल्य संधी
देतोय”, या थाटात या सगळ्या तुंबळ व्यापासाठी नवर्याचं प्रोत्साहन मिळवत गेले.
आमच्या
सुदैवानं आमचा सुतार खूप हुषार होता. त्यामुळे माझ्या पेचात टाकणार्या सूचनाही अमलात
येऊ शकत होत्या. आमच्यात प्रश्न फक्त भाषेचा होता. त्यांचं राजस्थानी लहेजाचं हिंदी,
तर माझं मराठमोळं हिंदी. बर्याच तोडफोडीनंतर आमचं बरं जमू लागलं. खिळ्याला त्यानं
म्हटलेलं “कीला-कीला” ऐकून शेवटी शेवटी मी ही “कीला-कीला” करू लागले. त्यानं उच्चारलेलं
सगळंच टिंबर मार्केट-बोहरी आळीतील समस्त लोकांना कळत होतं. बहुतेक माझे स्पष्ट उच्चारच
त्यांना झेपत नव्हते.
माझ्या
पेशंटच्या कामाच्या गर्दीतून वेळेचं गणित जमवून माझ्या सुताराच्या आणि माझ्या रििेळपीांशपीीं
ठरू लागल्या. आमची भेटण्याची संकेतस्थळंही आम्हाला साजेशीच, टिंबर मार्केट आणि बोहरी
आळीतलीच कुठलीतरी असायची. या भेटीगाठीव्यतिरिक्त भरपूर फोनही चालायचेच.
फर्निचर
बनवण्यासाठीच्या माणसांची आणि सामानाची आखणी करण्यातच बरीच शक्ती गेली होती. अजून डिझाईन्सचा
पत्ताच नव्हता. त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं, मासिकं यांचं वाचन चालू झालं. डॉक्टरीची
पुस्तकं काही काळासाठी बासनात गेली. खपीळवश र्जीीींळवश चे अंक घरात-बाहेर सगळीकडे दिसू
लागले. कपिल देव वगैरेंसारख्या सेलेब्रिटींच्या घरांची गृहसजावट फोटो सकट वाचणे आणि
मग वाचल्यावर “आपल्या छोट्या घराला याचा काहीच फायदा नाही” असा निष्कर्ष काढणे हा रोजचा
परिपाठ झाला होता. मी स्वत:च घराचं खपींशीळेी करतीये याचा इतका गाजावाजा झाला, की माझ्या
ग्रंथपालबाईंनी गृहसजावटीची विविध मासिकं माझ्यासाठी गोळा केली. त्याशिवाय माझ्या वाण्यानंही
त्याच्याकडे आलेला रद्दीतील एक पिवळट पडलेला “थेारप”ी शीर” चा जुना अंक माझ्यासाठी
बाजूला काढून ठेवला. (त्या अंकात फक्त राजस्थानातल्या राजवाड्यांचीच अंतर्गत रचना दिलेली
होती, हा भाग वेगळा !) घर सजवण्याचे हे लोण इतकं पसरलं, की माझ्या एका मैत्रिणीनं घरापासून
लांब रस्त्याच्या दुसर्या टोकाला विकायला असलेले लाल मातीचे सुबक स्टूल स्कूटरवर पुढे
ठेवून गच्चीत ठेवण्यासाठी म्हणून आणून टाकले. (ते तिथे अगदी शोभून दिसत होते याची दाद
तिला द्यायलाच हवी!)
सगळ्यांच्या
पुण्याईने आणि सुताराच्या कल्पकतेने फर्निचर हळूहळू आकारास ंयेऊ लागलं आणि चक्क चांगलही
दिसू लागलं. मुलीच्या खोलीतली कपाटांची जिन्यासारखी केलेली रचना आणि जिना चढून सगळ्यात
वरती पुस्तक वाचत बसण्यासाठीची जागा यांची
निर्मिती तर खरंच आनंददायी होती. लुइसा अलकॉटच्या “लिटिल वीमेन” मधली ज्यो (मधली बहीण)
माळ्यावर जाऊन पुस्तक वाचल्यापासून मनात घर करून होती; ती मनातून घरात काही प्रमाणात
का होईना प्रत्यक्षात आणली गेल्याचा आनंद पुढच्या कामासाठी प्रेरणादायी होता. मुलीचे
पडदे वेगळे करण्याचं ठरलं. पंचतंत्रातल्या गोष्टी नवर्याच्या ब्रशमधून साकारल्या गेल्या. त्या गोष्टी
ऐकण्यासाठी कान टवकारलेल्या कुत्रीबरोबरचा आम्हा दोघी मायलेकींचा फोटो तिच्या टेबलावर
छानच दिसायला लागला. “तुझ्यासाठी आकाशीचे चंद्र-तारेसुद्धा आणीन”, ही पूर्वापार चालत
आलेली एखाद्यासाठी काही करून दाखवण्याची परिसीमा आहे. ती प्रत्यक्षात येऊ शकते, हे
मला याच काळात कळालं. त्यामुळे मुलीच्या खोलीचं छत चंद्र-तार्यांनी सजलं. ते उजेडात
लुप्त होतात आणि रात्री दिवे मालवल्यावर लुकलुकू लागतात. जणू आकाशाखाली तारे मोजत पडलोय
असं वाटतं.
विविध
हस्तकला प्रदर्शनांना भेट आणि तिथली खरेदी ही या गृहसजावट प्रोजेक्टमधली पुढची पायरी
होती. ही पुढची पायरी मी फार आधीपासून (म्हणजे घर घेण्याच्या आधीपासून) चढत होते, असं
सगळ्यांचं म्हणणं होतं. माझ्याकडच्या विविध सामानानं भरलेल्या गच्च ट्रंका त्या म्हणण्याला
दुजोराच देत होत्या. “विविधतेतून एकता” हा माझा राष्ट्रवाद नेहमीच खूप प्रखर असल्याने
राजस्थानी कठपुतलीच्या बाहुल्या, मोरांच्या कोरीव कामाची खिडकीची फ्रेम, दक्षिणेकडच्या
विविध पितळी घंटा, उत्तरेकडच्या दर्या, रजया या सगळ्यांना त्यांची त्यांची जागा मिळाली.
या सगळ्या विविध प्रांतीय सामानात मराठी बाणा दबून जातोय असं वाटायला लागलं. विचार
विनिमय करून गच्चीत शिसवी लाकडाच्या झोपाळ्याची जागा ठरली. तो पाट मिळवण्यासाठी कोकणात
दिवेआगार पासून बेळगावपर्यंत चौकशी झाली. झोपाळ्याच्या बाजूच्या भिंतीवर महाराष्ट्राचं
भूषण असलेल्या वारली चित्रकलेतून वारली गाव आणि वारली माणसं चितारली गेली. हे चित्रकलेचं
काम मात्र माझी काडीचीही मदत न घेता माझ्या नवर्यानं आणि भाच्च्यानं रात्रीचा दिवस
करून पूर्ण केलं. (मी त्यात काहीही करत नसल्यानं ते लवकर संपलं) केनच्या सोफासेटला
साजेशा केनच्याच विविध लॅम्पशेडस् जागोजागी टांगलेल्या असताना भारतीय बैठकीवर मात्र
कंदील लटकवला गेला.
सहाव्या
मजल्यावर इतका ऊनवारा आणि मुबलक जागा असताना गच्चीतली बाग घराची शोभा वाढवेल याची मला
खात्री होती. त्यामुळे आम्ही नवीन जागेत रहायला आल्यावर आणि सगळं घर लागल्यावर मी “बागकाम”
हा विषय अभ्यासाला घेतला. पोयटा माती, शेणखत, रोपं, कलमं, कुंड्या, नर्सरी असा माझा
शब्दकोश विस्तारत जाऊन सध्या ओल्या कचर्याचं विभाजन, त्यापासून खतनिर्मिती, गांडूळखत
अशा व्यवधानात मी अडकले आहे. या नादातून यंदाच्या ख्रिसमसला खरा ख्रिसमस ट्री घरी आलाय.
बांबूची कुंडीत वाढलेली झाडं झोपाळ्याच्या अवतीभवती डुलतायत. “बांबूच्या बनात रहायला
हवे” गुणगुणायला लावतायत.
बागकामाचा पुढचा टप्पा म्हणून घरी कमळं
गच्चीत फुलवण्याचा विचार आहे (मोठ्या टबमध्ये पाणी ठेवून) मग त्या साचलेल्या पाण्यात
डासांची अंडी होऊ नयेत, म्हणून गप्पी मासे सोडायचे आहेत. ते मासे कुठे मिळतील, कसे
जगतील, याचा अभ्यास करायचा आहे. थोडक्यात, उत्साहानं घर सजवण्याची प्रक्रिया चालूच
ठेवायची आहे.
भाग १६: माझी
खरेदी
“बायकोची खरेदी” या विषयावर शालजोडीतलं
बोलण्याची संधी कुठला पुरुष सोडेल?
पण शालजोडीतले ऐकण्याइतका मला वेळच नसतो.
“खरेदी” या विषयानंच मी भारून गेलेली आहे. या खरेदीत खूप गोष्टींचा समावेश आहे. अपवादानं
एखादीच गोष्ट अशी आहे, जी खरेदी करायला मला आवडत नाही. खरेदी “कोणासाठी” याची यादीही
खूप लांबलचक आहे.
कपडे, दागिने यात मी रमतेच. कपड्यांमध्ये
परत वेगवेगळे प्रकार. “साडी” या सलग लांबलचक कापडात हमखास हरवण्याचं तंत्र मला अगदी
उत्तमरीत्या अवगत! त्यातली वर्गवारी म्हणजे ठरवून केलेली आणि न ठरवता अचानक केलेली
खरेदी. कॉटन आणि सिल्क या दोन पक्क्या धाग्यांव्यतिरिक्त तिसर्या धाग्याशी माझी बांधिलकी
नाही.
नगरचं “सारडा”, “गुंडू साडी सेंटर” आणि
पुण्यातलं “संगम” ही माझी पहिली मानाची ठिकाणं. त्यानंतर मग बाकीची आरास केलेली कुठलीही
दुकानं वर्ज्य नाहीत; पण वाटलं तरच जायचं. याशिवाय वेगवेगळी प्रदर्शनं- तास् न तास
पायपीट, ते झळाळत्या वस्त्रांचं नेत्रसुख आणि मग पटलेल्या (शिवाय परवडणार्या) साडीची
खरेदी! माझी अगदी “आनंदाचे डोही...” अशी स्थिती होते.
दुसर्या एखाद्या प्रांतात, राज्यात जायची
वेळ आली तर मी अगदी वेळ काढून गृहपाठ करून जाते. त्यामुळे चार ठिकाणी हिंडून, शोधून
खास तिथली साडी मी खरेदी करते. त्रिवेंद्रमला जाण्याआधी केरळची “कराल कडा” साडी आणायची,
हे मला माहीत असतं. लखनौ साड्या पाहताना, ताईला खूप दिवसांची लखनवी साडी हवी आहे, ही
खूप जुनी आठवण मला लगेच येते. त्याचप्रमाणे लुधियानाचा दौरा ठरल्यावर मित्राच्या बायकोसाठी
“नारायण पेठ” ची खरेदी लगबगीनं होते. असं करता करता प्रांतोप्रांतीच्या साड्या माझ्याकडे
गुण्यागोविंदानं राहतात. “विविधतेतून एकता” चा मी हिरिरीने प्रचार करते.
ठरवून साडी खरेदी करताना रंग, प्रकार,
साधारण बजेट याचा आराखडा माझ्या मनात असतो. दुकानदाराला तो सांगून माझी खरेदी त्यांच्या
मदतीने पटकन उरकते. जेव्हा साडी अचानक घेतली जाते, तेव्हा ती खरेदी पटकनच होते आणि
ती साडी अवर्णनीय सुंदर असते. या सगळ्या साडी प्रकरणात माझी मानसिक गुंतवणूक खूपच असते;
पण तेव्हाच जीन, शर्ट, नवर्याच्या पँट, मुलीचे कपडे यांमध्येही मी रमतेच. मोठमोठी
डिपार्टमेंटल स्टोअर्स ते फॅशन स्ट्रीट- माझ्या मनात आपपरभाव नसतो. “कपडे खरेदी” हा
मला खूष करण्याचा योग्य मार्ग आहे, असं माझ्या नवर्याचं ठाम मत आहे. त्यानं तोही खूष
राहतो. कारण त्याला स्वत:साठी कपडे खरेदी करण्याची तोशीस पडत नाही. ते काम परभारे होऊन
जातं.
दागिन्यांमध्ये - सोन्यात फारसं मन रमत
नाही. पण मोत्या पोवळ्यांचे टपोरे दागिने दृष्टी खिळवून ठेवतात.
भांडीकुंडी आणि स्वयंपाकघरातील वस्तू याबातच्या
खरेदीत मी थोडं डावंउजवं करते. तांब्या-पितळेची, खूप सुरेख घाटाची, पण रोजच्या वापरात
बिनकामाची भांडी विकत घ्यायला फार आवडतं. उदा. पितळी कंदील (वीज गेली तर मात्र मेणबत्ती
लावणार) घंघाळं (अंघोळ मात्र “शॉवर” खाली) पितळी घंटा इत्यादी. एकदा तर जयपूरहून नाजूक
पितळेची मीनाकाम केलेली गुडगुडी (हुक्का) विकत घेतली, त्यावरून “तिचा खात्रीने वापर
होणार” याबद्दल त्या अमराठी दुकानदाराला इतकी खात्री वाटली, की त्यानं मला त्यासाठीचा
स्पेशल तंबाखू जयपुरात कुठे मिळतो, तो पत्तासुद्धा सांगितला. (मी “ती” खरेदी अजूनपर्यंत
केलेली नाही.)
रोजचं स्वयंपाकपाणी आणि जेवणाला कुठलीही
भांडी मला चालतात. पण पै पै साठवून चांदीची कलाकुसरीची भांडी मी निमित्त शोधून घेत
असते. “बोन चायना” “क्रिस्टल” अशा काचेच्या भांड्यांची किणकिण मनमोहक असते आणि त्यामुळे
“काचसामान जपून वापरा” ही सूचना घरात वारंवार देण्याची वेळ येते.
याव्यतिरिक्त अनेक सटरफटर गोष्टींची खरेदीही
मी आत्मीयतेने करते. उदाहरणार्थ, मुलीची खेळणी (फरच्या मऊमऊ प्राण्यांना आम्ही दुकानात
नाव देऊनच घरी आणतो.) तिचं कंपासमधलं सतत संपणारं पेन्सिल, रबर, पट्ट्या असं सामान,
महिन्याचा किराणा, झाडू, पायपुसणी, हार्डवेअरच्या दुकानातून बल्ब, वायरी, फ्यूज, घरातलं
मोडलेलं तुटलेलं सामान, हात धुवायचं बेसिन असं काहीही आणि कितीतरी.
पुस्तकं आणि कॅसेटची खरेदी हे तर जुनं
व्यसन आहे. शिकत असल्यापासून जवळच्या पैशातून काही ठराविक बचत करून मी पुस्तकं खरेदी
करते. महिन्याला एक या हिशेबानं घेतलेल्या पुस्तकांसाठी कपाटं खरेदी करणं अनिवार्य
ठरतं. या सगळ्या खरेदीच्या धागधुगीत जी कधीच खरेदी करीत नाही ती म्हणजे भाजी! भाजीवाल्या
आणि भाजीवाले मला फसवतात असं वाटतं. नवरा कधी गावाला निघाला (तो सततच निघत असतो किंवा गावाहून येत असतो) तर
तो कुठे चाललाय, हे विचारायच्या आधी मी त्याला तेवढे दिवस पुरेल एवढी भाजी आणून टाक
सांगते. त्यातून त्याने कधी अघोषित असहकार पुकारलाच, तर माझ्या कामाच्या बाई मदतीला
धावून येतात.
भाजी कधीही न आणणारी मी रविवारी सकाळी
सिंहगड फेरीत मात्र न चुकता पालेभाजी घेऊन येते. काय कारण असेल? माझं मलाच आश्चर्य
वाटतं. कदाचित तो तजेला मनाला भुरळ पाडत असेल. किंवा ती पायथ्याची मावशी ओळखीची झाली
म्हणून तिच्यासाठी मी भाजी खरेदी करत असेन. पण माझ्या नवर्याला अजिबात आश्चर्य वाटत
नाही. “तिथून खरेदी करून आणण्यासारखं भाजीशिवाय दुसरं काहीच नसतं म्हणून ती पालेभाजी
आणते.” तो ठाम मत नोंदवतो.
माझ्या या खरेदीच्या व्यापात न गुंतण्याची
खबरदारी घेण्यात नवरा अतिशय जागरूक असतो. माझा पगार हातात न पडता बँकेत जमा होतो आणि
क्रेडिट कार्डच्या जमान्यात माझ्याकडे कुठलंही के्रडिट कार्ड नाही या दोन गोष्टींमुळे
त्याला थोडं हायसं वाटतं.
भाग ११ : संवाद
मुलींच्या परीक्षा चालू होत्या. परीक्षेच्या अभ्यासात जास्त लक्ष न लागता सुटीतल्या कार्यक्रमांचे बेत करण्यातच मैत्रिणींचा जास्त वेळ जाऊ लागला. मी सईला वरवर दामटलं, पण मनातून मला खरं तर खूप छान वाटलं. चला, मुली मोठ्या व्हायला लागल्या. आपले “मैत्रिणी मैत्रिणींचे” कार्यक्रम ठरवायला लागल्या. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे सगळ्या सात-आठ जणी आमच्या घरी जमल्या. दिवसभरासाठीच राहायला आल्या. सुरुवातीचा काही वेळ “कित्ती मज्जा” असा आनंद व्यक्त करण्यात गेला. मग पुढे “खूप वेळ एकत्र खेळायचं, घरी खूप उशिरा जायचं”, हे ठरवण्यात अजून काही वेळ गेला. रोज शाळेत मधल्या सुटीत खेळत असतील ते खेळ खेळून झाले. शाळेच्या गप्पा मारून झाल्या. पुढे काय?
“आई, आता काय करू?” माझ्या कानाशी भुंगा
सुरू झाला. माझ्या लक्षात आलं. “शाळेत भेटणार्या मैत्रिणी” म्हणून त्या एरवी भेटत.
आता मात्र पहिल्यांदाच “स्वत:” अशा भेटत होत्या. तशा त्या खर्या मैत्रिणी अजून झाल्याच
नव्हत्या. वर्गमैत्रिणीच होत्या. मुली मोठ्या व्हायला लागल्यात पण इतक्या मोठ्या झाल्या
नाहीत, की स्वत:चं हितगुज, संवाद साधतील. अजून काही दिवसांनी याच चिमण्या एकमेकींबरोबर
अखंड चिवचिवत राहतील. माझी खात्री आहे, तेव्हा त्यांच्यात स्वत:चा म्हणून खूप सुरेख
संवाद असेल सगळ्याच महत्त्वाच्या आणि बिनमहत्त्वाच्याही
गोष्टींबाबत! शाळेतील ते मोठे होण्याचे माझेही दिवस असेच होते. सतत मित्रमैत्रिणी आणि
अखंड बडबड. पण वय वाढलं तसा मनाचा निबरपणा वाढीस लागून शब्दांची कोवळीक मिटू पाहते,
असं वाटायला लागलंय.
परवा माझा एक जुना मित्र खूप दिवसांनी
आला. मुंबईत काही कामानिमित्त आलेला. तो वाट वाकडी करून मुद्दाम भेटायला आला. खूप वर्षांनी
भेटलो. एकमेकांची, दुसर्या मित्रमैत्रिणींची खबरबात घेण्यात दिवस सरला. जुन्या आठवणी
काढून झाल्या. त्यानंतर पुढे काही संभाषणच होईना. ज्याच्या आठवणींचे कढ मला सतत येतात,
त्याच्याशी माझा संवादच साधेना. मनातलं मैत्र तसूभरही कमी झालेलं नाही. पण तरीही पूर्वी
वर्षानुवर्ष सतत एकमेकांशी बोलत राहणारे आम्ही एक दिवसाच्या वर बोलू शकलो नाहीत. हे
असं का झालं? वय वाढलं म्हणून ? वाढत्या वयाबरोबर संदर्भ बदलत जातात म्हणून ?
माझे काही तरुण सहकारी मध्यंतरीच्या काळात
काही कामानिमित्त दक्षिणेकडे गेले. “जाताच आहात, तर आजूबाजूला केरळ वगैरे फिरून या.
मजा करून या.” आम्ही अनाहूत सल्ला दिला. दोन-तीन दिवसांचा प्रवास. पुढे काम, फिरणं
सगळा आठ-दहा दिवसांचा कालावधी. हे सगळे आजचे मित्र निवांत दिसण्याऐवजी थोड्याफार प्रमाणात
धास्तावलेलेच दिसत होते. न राहवून मी त्यातल्या एकाला कारण विचारलं. तो म्हणाला “मॅडम,
खूपच दिवस जायचंय, बोअर होईल फार! काय बोलायचं एकमेकांशी सतत?” वर्षानुवर्ष एकमेकांबरोबर
काम करणारे हे सारे “मित्र” कामाव्यतिरिक्तच्या वेळात एकमेकांबरोबर राहण्यासाठी “अनोळखी”च
होते. ते सहकारी होते. त्यांच्यात संभाषण होतं; पण स्वत:चा संवाद नव्हता.
असंच एका दिवशीच्या पुणे-मुंबई रेल्वे
प्रवासात मला प्रद्युम्न भेटला. प्रवासात अनोळखी सहप्रवाशांबरोबर गप्पा होतात तशा गप्पा
सुरू झाल्या. हळूहळू त्या चांगल्याच रंगल्या, तो पुण्यात मुलगी बघण्याचा कार्यक्रम
उरकून मुंबईला परतत होता. लग्न, त्याच्या अपेक्षा, नुकतीच भेटलेली मुलगी याबाबत तो
बरंच विस्तारानं बोलला. मला माझी मतं विचारून, त्यांची दखल घेऊन, त्यानं या विषयावर
बरीच चर्चा केली. खरंतर मला खूप आश्चर्य वाटलं. ओळखदेख नसताना “स्वत:चं लग्न” या अतिशय
खासगी विषयावर तो माझ्याशी तीन तास बोलला. आता मला वाटतंय, त्या क्षणी कोणाशी तरी बोलणं,
ही त्याची गरज होती. माझ्यासारख्या अपरिचिताशी बोलणं त्याला निर्धोक वाटलं असेल. कारण
माझं त्याच्याबद्दल काहीच मत तयार झालेलं नव्हतं. त्यामुळे माझ्याशी तो मोकळेपणानं
संभाषण करू शकला. पण हे संभाषण आजचा “संवाद” होता का? की त्याच्या गरजेनुसारचं ते त्याचं
स्वगत होतं. वर्षानुवर्ष सोबत काम करून संवाद साधला जात नाही,
तो पाचदहा मिनिटांच्या संभाषणानंतर अभिव्यक्त होऊ शकतो?
आमच्या गोल्डीशी (कुत्री) आम्ही सतत माणसांशी
बोलतात तसं सगळं बोलत असतो. ते ऐकून तिला आता आम्ही बोललेलं बरंच कळतं, असं आम्हाला
वाटतं. यावर माझ्या एक मॅडम मला म्हणाल्या की, “खरं तर बोलायची हौस भागावी म्हणूनच
तू गोल्डी पाळलीयस.” जर हे खरं असेल, तर तिच्याशी बोलणं, हा मला संवाद का वाटतो? ती
तिच्या कृतीमधून, अस्तित्वातून, आमच्याशी, आमच्या बोलण्याशी भावनिक जवळीक साधते म्हणून
?
गोल्डी सजीव तरी आहे, जी सईला, तिच्या
बरोबरीच्या आणि लहान मोठ्या वयाच्या मुलांना त्यांच्या खेळण्याशी (बाहुल्या, सॉफ्ट
टॉइज, सुपरमॅन, ज्यांना त्यांची स्वत:शी नावंसुद्धा असतात.) एकतानतेनं गप्पा मारताना
पाहिलंय आणि मला तो कायम त्यांच्यातला संवादच वाटलाय. तिनं सांगितल्यावर मला पण एक-दोनदा
खात्रीनं वाटलंय, की तिचा “सोमू” (खेळण्यातलं माकड) हल्ली खूप त्रास देतो. “रिफ्का”ला
(खेळण्यातली कुत्री) चिडवतो.
हा सगळा संवादाचा व्याप आहे, तो बोलण्यातून जुळणार्या आणि फुलणार्या नात्यातला आहे. स्वत:चा स्वत:शीच सुरेल संवाद साधला, तर स्वत:शीच एक सुरेख नातं जुळेल.
ऑडिओ लिंक :
भाग १२ : दिलासा
संध्याकाळी नुकतीच घरी परतले होते. फोन खणाणला. माझे वडील होते फोनवर. “अगं, केतनचा काही निरोप आलाय का? तिकडे बडोद्याजवळ दंगल उसळली आहे.” मी सैरभैर. त्यानंतर टीव्हीच्या विविध बातमीसत्रांमधून एक-एक जीवघेण्या गोष्टी कळत होत्या. सईचा हवालदिल प्रश्न, “आई, काय झालंय? बाबा कुठाय? तो का फोन करणार नाही?” मी विवंचनेत. ई-मेलवरही काहीच निरोप नव्हता.
फोन
या यंत्राबद्दल एवढी आपुलकी पूर्वी कधीच वाटली नव्हती. फोन वाजतच नव्हता. मी आपली पुन्हा
पुन्हा काही न कळून तो न वाजणारा रिसिव्हर उचलून बघत होते. फोन बंद तर पडला नाही ना?
मी अंथरुणावर पडले. चित्रविचित्र स्वप्नांची मालिका, धास्तावून उठणं, सगळीच अस्वस्थता.
पहाटे पाच-साडेपाचला फोन वाजला. खूप वेगळ्या उच्चाराचं इंग्रजी होतं. मला काही कळतच
नव्हतं. खूप वेळानं कळलं. ऑस्ट्रेलियातून इयान विचारत होता की केतन कसा आहे? बडोद्यात
कुठेच फोन लागत नव्हता म्हणाला, अस्वस्थतेत अजूनच भर पडली. कसानुसा दिवस सुरू केला
आणि पुन्हा फोन, पलीकडून हिंदी भाषा. “भाभीजी, मैं फरिदाबादसे बोल रहा हूँ। मेरे पिताजी
केतन भाईसाब के साथ काम करते हैं। वे सब लोग वहाँ ठीक हैं। मुझे आपको बतानेको कहा गया
है।” त्या कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या फरिदाबादच्या माणसाच्या फोननं माझ्यावर
अनंत उपकार केले. माझ्या मनावर आत्तापर्यंत किती ताण होता हे मला आता जाणवलं.
दिवसभर
वेगवेगळे फोन येत होते. राजकोट, जुनागड, मुंबई - ठिकाणं वेगवेगळी, गुजराती, हिंदी,
इंग्रजी, मराठी, वेगवेगळ्या भाषा कधी केतनची चौकशी तर कधी त्याची खुशाली; पण त्याचा
फोन येत नव्हता. त्याचं ऑफिस बंद होतं. मी त्याला फोन करू शकत नव्हते. त्याच्या फोनची
वाट पाहणं एवढंच...
आणि
तिसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्याचा फोन आला. दोन तास संचारबंदी शिथिल केली होती.
तेवढ्या वेळात त्यानं कसाबसा फोन केला होता. दोन दिवस ते सगळे लोक एकत्रित त्याच्या
घरमालकाच्या हॉलमध्ये बसून होते. बर्याच फोन्सच्या लाईन्स मिळत नव्हत्या. जेवायला
वगैरे बाहेर जाणं शक्यच नव्हतं. घरी चहा करावा म्हटलं तर दोन दिवसांपासून दूधसुद्धा
आलेलं नव्हतं. त्याच्या घरमालकीणबाईच सगळ्यांच्या खाण्यापिण्याचं बघत होत्या. त्या
संध्याकाळी तो पूर्वनियोजनानुसार पुण्याला यायला निघणार होता. तो आता अडकला होता.
हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आल्या. तो पुण्याला
एकदा येऊनही गेला. पण त्या दोन-तीन वाईट दिवसांनी आम्हाला आयुष्यभरासाठी खूप काही चांगलं
दिलं.
आमच्यापासून
दूर राहणारा केतन आमचा किती जवळचा आहे, ते प्रकर्षानं जाणवलं. एकमेकांबद्दलच्या सगळ्याच
उत्कट भावना पुन्हा एकदा नव्यानं सामोर्या आल्या. फरिदाबादचे लाल, हालोलच्या पटेलबेन,
ऑस्ट्रेलियाचा इयान यांसारख्या अनेकांचं अस्तित्व दिलासा देणारं ठरलं. या सगळ्यातूनच
माझ्या इथल्या एकटेपणाला परत एकदा बळ आलं. मी आपली नव्यानं सिद्ध झाले; रोजचेच पाढे
आणि परवचे म्हणायला!
भाग १३ : माझं
विस्तारित कुटुंब
म्हणायला माझं कुटुंब फार छोटं इन-मीन अडीच माणसांचं. पण स्वयंपाकपाणी आणि खाणंपिणं आवरताना मला रोज जाणवते ती आजच्या छोट्या कुटुंबाची व्याप्ती! तीन खोल्यांत, चार खिडक्यांत आणि समोरच्या वीतभर अंगणात माझं विस्तारित कुटुंब राहतं आणि सगळा गोतावळा धरून ते एक मोठ्ठं खटलं तयार होतं.
साधारणत: सगळ्याच आईबाबांना कुठलाही प्राणी
घरात नको असतो. या घरातले आईबाबा एवढ्या टोकाचे नाहीत. काही सर्वमान्य(?) प्राणी त्यांना
चालतात. काही त्यांना चालवून घ्यावे लागतात. या आईबाबांच्या एकुलत्या एका लेकीला कुठलाही
प्राणी पाहिला की तो घरी पाळावासा वाटतो. “आई, आपण कोंबडी पाळू या का?” असा प्रश्न
चौथ्या मजल्यावर बिनाबाल्कनीच्या घरात राहणारी ही मुलगी खर्याखुर्या उत्साहाने विचारते.
“नाही जमणार आपल्याला” या उत्तरावर हिरमुसते. काही दिवस शांततेत जातात. सार्वजनिक बागांपाशी
लहान मुलांना उंटावरफेरी मारणारे तिच्या डोक्यात घट्ट बसलेले असतात. “तो उंट, त्याचा
स्वत:चा असतो ना गं?” असा प्रश्न विचारल्यावर आता ही मुलगी उंट पाळायचा म्हणते की
काय, या विचारानं मला वाळवंटात पळून जावंसं वाटतं.
बरं या समस्त प्राणिजगताबद्दल चर्चा होते
तेव्हा घरात बर्याच जणांनी आणि जणींनी ठाण मांडलेले असतं. म्हणजे या घरातच लहानाची
मोठी झालेली मांजरी आता बाळंतपणाला टेकलेली असते. ही माझी मांजरी फार लाडावलेली. सकाळी
पोळी होताच “तव्यावरची पानात” या चवीने खाते. ही अशी एकमेव सदस्य आहे जी मी सोडून दुसर्यांनी
केलेला स्वयंपाक खात नाही. (बहुतेक या तिच्या “जाज्वल्य” स्वाभिमानामुळेच ती इतकी लाडकी)
माझ्या हातच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त तिची ती शिकार करून खाते. तिच्या शिकारीचा घरातल्या
सर्वांनीच खूप धसका घेतलेला आहे. ती जन्मत:च शिकारी वृत्तीची. तिच्या भक्षी पडलेले
प्राणी हा कुतूहलाचा विषय. बरं ती इतकी स्वामीभक्त की प्रत्येक शिकार तोंडात धरून मला
दाखविण्यासाठी चौथ्या मजल्यावर घेऊन येते. माझ्याकडून जणू शाबासकी हवी असते. मग माझ्या
वीतभर अंगणात अक्षरश: रणकंदन! कारण शिकार खेळवत खेळवत मारायची हा तिचा स्वभावधर्म.
तिनं आणलेल्या शिकारींमध्ये मी उंदीर सोडून सगळे प्राणी पाहिलेत. कबूतर, कोंबडी, वटवाघूळ,
पाली, साप, त्यातले कबूतर आणि पाल सोडले, तर बाकी सगळे तिला कुठे सापडतात हे मला आजतागायत
कळलेलं नाहीये. तिच्या शिकारीच्या खेळानंतर अंगण साफ करणं हा एक स्वतंत्र व्याप होतो.
ही माझी लाडकी माऊ जेव्हा पिलांना जन्म
देते तेव्हा काम वाढतं. बाळंतिणीचा खुराक म्हणून अंड वाढतं. नुसतं दूध माऊला आवडत नाही.
(कशाला मांजर म्हणायचं मग?) म्हणून माझी मुलगी “कॉम्प्लान, चहा-दूध दे”, असंच सांगते.
पाच-सहा दिवस माऊ पिलांपासून हालत नाही. नंतर भटका स्वभाव उफाळून येतो. आपली मालकीण
पिलांकडे लक्ष देईलच हे ठाऊक असल्यासारखी “मी आत्ता जाऊन येते” असं अगदी टेचात सांगते
आणि निघून जाते. मी आपली पिलांची चादर स्वच्छ आहे ना, त्यांना भूक लागायच्या आत ही
बया येईल ना, बाहेरचा दुसरा बोका येणार नाही ना, अशा काळज्या करत पिलांवर लक्ष ठेवते.
कालांतराने पिलं मोठी होतात. हळूहळू दूध, पोळी, भात खायला शिकतात. शेवटी घरातल्या मनुष्य
प्राण्यांसाठीच्या पोेळ्या आणि मांजर कुळासाठीच्या पोळ्या यांची संख्या सारखीच होते.
हे मांजर खानदान घरातील प्रत्येक वस्तूवर
हक्क सांगतं. त्याशिवाय आजूबाजूचे डोकावणारे आहेतच. समोरची जुई (पांढरी पामेरियन) एक
दिवस बिचकत बिचकत आली. दारातच घुटमळली. माझ्या मांजरीनं वंशपरंपरागत असलेलं वैर आठवून,
मिशा फिस्कारून तिला काहीतरी विचारलं. तिनंही शेपटी हलवून काहीबाही सांगितलं आणि नंतर
दोघी सख्ख्या शेजारणीसारखं नाकाला नाक लावून बरंच कुजबुजल्या. या नव्या शेजारणीची भीड
चेपली. मांजरीशी गप्पा मारून झाल्यावर ती स्वयंपाकघरापर्यंत पोचली. पाहुणचार म्हणून
मी तिला ग्लुकोजची दोन बिस्किटं दिली ती क्षणात दिसेनाशी झाली. सध्या ग्लुकोज बिस्किट
“वसुली” चा रोजचा परिपाठ आहे. घराचा जिना चढत असताना माझी चाहूल लागून जुई तिचा उंबरठा
आता ओलांडते. त्यामुळे आमच्या घरात हल्ली ग्लुकोज बिस्किटांना सगळे “जुईची बिस्किटं”
म्हणतात.
घराच्या चार खिडक्यांचं दोन दोनमध्ये विभाजन
झालेलं आहे. दक्षिणेच्या दोन कबुतरांसाठी राखीव आहेत. तर पश्चिमेच्या खिडक्यांलगतच्या
निलगिरीच्या झाडावर वास्तव्य असलेल्या काही सदस्यांसाठी या दोन खिडक्या म्हणजे “फास्ट
फूडस्टॉल” आहे, ते सदस्य म्हणजे एक कावळा आणि एक खार. कावळा रोज दुपारी एक-दीडच्या
दरम्यान येऊन पोळी मागतो. “हाच तो रोजचाच असं तू कसं ओळखतेस” या घरच्यांच्या कुत्सित
प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मी त्याला त्याचा पोळीचा घास देते. तो ती पोळी खातो, पण
पोळीपेक्षा त्याला भजी जास्त आवडतात हे मला आता अनुभवानं ठाऊक झालंय.
दुसरी ती छोटी खारोटी! तिनं घरात यावं
अशी माझी खूप इच्छा आहे. पण बहुतेक माझ्या परोक्ष माझ्या मांजरी तिला धमकावत असाव्यात.
ती आपली खिडकीत बाहेरूनच दाणे-डाळ्या असा चटकमटक खाऊ गोळा करून धूम ठोकते.
कबुतरांच्या पिढ्यान् पिढ्या माझ्या सरकारी
निवासस्थानात वाढतात. माझ्या दारासमोर बिल्डिंगचे पिलर पोचतात. त्यांच्यावरचे अर्धा
फूट रूंदीचे दोन बार म्हणजे कबुतरांचं मान्यताप्राप्त प्रसुतीगृह! काही अंडी पडतात,
फुटतात. काही पिलं जन्मतात. काही माझ्या मांजरीच्या तोंडी पडतात. पण काही पिलं वाढतात.
आया-आज्यांबरोबर दाणे टिपायला बसतात. त्यांना काहीही टाकलं तरी “अन्न हे परब्रह्म”
या भावनेनं ते स्वाहा करतात. तरीही साबुदाण्याची खिचडी हा कबुतरांचा आवडता पदार्थ आहे,
असं माझं निरीक्षण आहे. एखादं दुसरं पिलू खिडकीतून घरात येऊ पाहतं तेव्हा त्याच्या
आया-आज्या त्याला माऊची भीती घालून दामटत असतील, अशी माझी खात्री आहे.
या सगळ्या गोतावळ्याला खाऊ घालणं हे माझं
रोजचं काम आणि आवडही. माझ्या मुलीला कधी कधी माझ्याबद्दल खूप कणव वाटते. मासे पाळले
तर त्यांना खाऊ घालायच्या अळ्या किंवा त्यांचं खाद्य “तयार” मिळतं, अशी अमूल्य माहिती
तिला समजलीय. “आई, माशांसाठी तुला काहीच करावं लागणार नाही.” ती मला चुचकारते.
सध्या मी मत्स्य संगोपन केंद्रात रीतसर
शिक्षणासाठी नाव नोंदवण्याच्या बेतात आहे. आमच्या खटल्याच्या घरासाठी एवढं करायलाच
पाहिजे.
ऑडिओ लिंक :
भाग ८:गृहिणींचे भविष्य
आपल्या मराठी संस्कृतीत दिवाळीच्या तयारीचा अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. मराठी संस्कृतीचे निष्ठावान पाईक असल्याने आम्ही बाकी तयारीबरोबरच उत्साहाने दिवाळी अंकांबद्दल चर्चा सुरू केली. त्यात माझ्या एका अमराठी मैत्रिणीनं हिरिरीनं दिवाळी अंकासाठी नावनोंदणी केली. मी जरा आश्चर्यानंच विचारलं, “तू मराठी (“साहित्य” हा शब्द मी मनातच उच्चारला.) वाचतेस?”
ती उत्तरली, “बाकी काही नाही; पण
तुमच्या दिवाळी अंकांमध्ये वार्षिक भविष्य असतं ना, ते मी सगळ्या दिवाळी अंकांमधलं
वाचते.” केवळ “वार्षिक भविष्या”साठी दिवाळी अंक वाचायच्या कल्पनेनं माझा ऊर भरून आला.
नव्वद टक्के लोक दैनिक, साप्ताहिक,
मासिक, वार्षिक असे भविष्याचे विविध कालखंड माहीत करून घेत असतात. त्याला मीही अपवाद
नाहीच तरीही...
रोजच्या रोज भविष्य वाचून दिवस
घालवायचा म्हटलं तर फार पंचाईत होते. मराठी, इंग्रजी, चंद्ररास, सूर्यरास या सगळ्याचा
आधार घेत वाचायचं म्हटल्यावर एका ओळीच्या खूप ओळी होत जातात. तरी त्यातल्या त्यात मी
स्वत:ला दिलासा देण्याचा प्रयत्न करते. तरीपण बहुतेक वेळा माझे प्रयत्न हाणून पाडण्याचा
चंग बहुतेक सगळ्या ज्योतिषांनी बांधलेला असतो.
“गुळाच्या व्यापार्यांना धनलाभ”,
“लोखंडाच्या व्यापार्यांना मंदी” अशाच एक एक ओळी माझ्या राशीला आलेल्या असतात. त्यामुळे
मी गुळाचा व्यापारी नाही म्हणून हळहळ किंवा लोखंड व्यावसायिक नाही म्हणून आनंद मानून
मी तो दिवस निमूटपणे घालवते. कधीतरी मात्र असतं, “संततीपासून सुख” मी संधी न घालवता
दिवास्वप्न रचते की “आज सई शाळेत काहीही न हरवता, कुठेही न पडता-झडता, सगळा डबा संपवून
घरी येईल, शहाण्यासारखी गृहपाठ करून, जेवून झोपेल.” पण एका ओळीच्या पायावर एवढ्या ओळींचं
स्वप्न रचल्यानं ते कुठल्यातरी ओळीवर ढासळतंच.
नाही म्हणता काही भविष्यं आयुष्यभर
तंतोतंत जुळतात. उदा. “गृहसौख्यासाठी भांडण टाळा”, “जोडीदाराचे मत मान्य करा”, “उत्पन्नापेक्षा
खर्च अधिक होईल” इ. संसारातील ही त्रिकालाबाधित सत्यं कुणी भविष्यवेत्यांनी तुमच्या
आमच्या राशीसाठी एखाद्या दिवशी नेमली नाहीत तरी आपल्या कुंडलीत ठाण मांडून बसलेलीच
असतात.
असं असलं तरीही मी स्वत:ची, नवर्याची,
मुलीची, आईवडिलांची, भावाबहिणीची, मित्रमैत्रिणींची रास आठवून, जवळजवळ सगळ्याच राशींची
भविष्यं सकाळीच आत्मीयतेने वाचते. याउलट माझा एक चिकित्सक मित्र दिवस संपल्यावर अलिप्तपणे
भविष्य वाचून ते संपलेल्या दिवसाशी पडताळून पाहतो. मध्यंतरी आमचे भिंगारे सर म्हणाले,
“मी पण रोज भविष्य वाचतो. त्या दिवशीचं सगळ्यात चांगलं, मला जे आवडेल ते भविष्य “माझं”
असं मी ठरवतो.” किती सकारात्मक विचार!
मला नेहमी वाटतं, गुळाचा, लोखंडाचा
किंवा अजून दुसरा कुठलाही व्यापार न करणार्या, घरदार चालविणार्या, चाकरमान्या, पूर्णवेळ
गृहिणीला दिलासा देणारी, “तिची” म्हणून भविष्याची जास्तीची एक ओळ रोजच्या भविष्यात
जरूर असावी. उदा. “आज गॅस घाईच्या वेळी संपणार नाही”, “मोलकरीण अचानक दांडी मारणार
नाही”, “स्वयंपाकाचा अंदाज चुकणार नाही”, “बस-रिक्षाची कसरत करत कामावर पोहोचताना उशीर
होणार नाही”...असं खूप काही.
ऑडिओ लिंक :
माझा “आई” असण्याचा हल्ली बर्याचदा कस लागतो. “आईला प्रत्येक गोष्ट ठाऊक असतेच” या माझ्या लेकीच्या जबर आत्मविश्वासाला मी खूपदा माझ्या वागण्याने डळमळीत करते.
जन्म-मृत्यू, आजारपण, ऑपरेशन्स, मोठे होण्याची प्रक्रिया- ही अशी
सात वर्षांच्या जिवाला पडणारी नैसर्गिक कुतूहले जी जराशी धीराने सोडवू शकते. पण....
असे कित्येक “पण” माझ्याकडून निरुत्तर राहतात.
चौकाचौकात प्रत्येक गाडीपुढे हात पसरून भीक मागणारी छोटी छोटी
मुले पाहून “भीक मागणे” हे वाईट असते, पण ती मुले छोटी आहेत, त्यांना अजून काही कळत
नाही. त्यांच्यावर चिडू-ओरडू नये हे असे विरोधाभासी बोलणे तिच्या गळी उतरवताना माझी
तारांबळ उडते.
बिल्डिंगमध्ये, घराच्या अवतीभोवती, अनोळखी लोक दिसले तर त्यांना
हटकायचे, चौकशी करायची, हे मी वारंवार करत असते. हेच तिने एकटे असताना करून पाहिले,
तेव्हा आमचे हबकलेले चेहरे (कोणी चोरचिलटे असते तर आणि त्यांनी एकट्या लेकराला काही
केले असते तर, ही काळजी) तिच्यापर्यंत आमच्या भावना पूर्णत्वाने पोहचवू शकलेत की नाही,
याबाबत मी साशंक आहे.
“बाकीच्या सगळ्या आया मंगळसूत्र घालतात. तू का नाही घालत?” या
प्रश्नावर “व्यायामानंतर घाम आला, की मानेला काचते फार, म्हणून नाही घालत गळ्यात काही”
या उत्तरावर “त्यांना नाही का काचत?” असा प्रतिप्रश्न येतोच.
“माझी तन्वीशी कट्टी आहे. तू तिच्या आईशी एवढ्या गप्पा कशा काय
मारतेस?” या सात्त्विक संतापाला मला चटकन सामोरे जाता येत नाही.
“नेहमी खरे बोलावे” असे मनावर बिंबवताना “दीदीने परवा फोनवर ती
नाहीये सांगायला सांगितले. ते खोटे बोलणे होते ना?” या प्रश्नाला मी कसनुसे “हो” म्हणते.
जुन्या बाजाराच्या तिथून वळताना टोपलीत मासे विकणार्या बाया पाहिल्यावर,
“आई, रात्री उरलेल्या माशांचे काय करतात गं? सगळे त्या स्वत:च खातात का गं?” या प्रश्नावर
मी ठामपणे “हो” किंवा “नाही” सांगू शकत नाही.
“आई”, आंब्याला आंबा का म्हणतात?”,“आई, सगळ्यांची नावे सगळ्यात
पहिल्यांदा कोणी ठेवली?” या प्रश्नांवर व्युत्पत्तिशास्त्राचे पुस्तक जवळ घेऊनही मी
ठोस उत्तर देऊन माझ्या मुलीचे समाधान करू शकत नाही.
“आई, मला जेवायचे नसेल तर मी नाही जेवणार. मी बूस्टरचे इंजेक्शन
नाही घेणार. मी तुझेच का ऐकायचे? घरात सगळे मी का नाही ठरवू शकत?” यावर “आत्ता नाही.
तू मोठी झाल्यावर ठरव” अशी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात माझा वेळ जातो.
“सई मला तुझी मैत्रीण करून घेतेस?” प्रश्नाचा ओघ कधी नाही ते
माझ्याकडून तिच्याकडे सुरू होतो. “ह्यॅ- काहीतरीच.” खूपच तातडीने आणि जोराने मला नकार
मिळतो. माझा चेहरा फारच पडलेला. त्या चिमण्या लेकराला माझी कीव येते. मोठेपणाचा आव
आणून माझी समजूत काढली जाते. “अगं आई, तू “आई” आहेस, मैत्रीण कशी होशील?” “का नाही?”
मी अडून बसते. “तुझ्या मैत्रिणींबरोबर तू खेळतेस, गप्पा मारतेस, नाचाची प्रॅक्टीस करतेस,
भांडतेस, ते सगळे माझ्याबरोबरही करतेसच की?” सांगावे की न सांगावे, यात लेक क्षणभर
घुटमळते आणि मग एका दमात बोलून टाकते, “पण आई पापा घेते, जवळ घेते, मैत्रीण घेत नाही.
तू माझा पापा घेणे बंद केले तर?...” माझे डोळे पाणवतात. माझा “आई”पणाचा अहं सुखावतो.
माझ्या मुलीचा नकार सहजतेने स्वीकारून मी तिला जवळ ओढते. मांजराच्या पिलासारखी ती मला
बिलगते. मी लेकीच्या कुशीत शिरण्याच्या आदिम हक्काला आंजारून, गोंजारून मुलगी मोठी
होण्याची वाट बघते. तिची मोठेपणाची मैत्रीण म्हणून ती मला स्वीकारेल या आशेने!
भाग १०: दहावी गोष्ट
दिवसभरात दहा गोष्टी करायच्या. त्यातल्या नऊ नक्की घर-संसार, नवरा, मूल यांच्यासाठीच्या असतात. दहावी स्वत:साठी असू शकते. या सगळ्या गोष्टींसाठी दिवसभर ऊर फुटेस्तोवर धावपळ होते. तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. स्वत:साठी जी दहावी गोष्ट असते तिच्याकडे मात्र प्रत्येकाचे लक्ष आणि प्रत्येकाची टिप्पणी! आधीच्या नऊ अधिक ही दहावी गोष्ट असा हिशेब चालतच नाही.
“बरा बाई तुला वेळ होतो” आजूबाजूचा
स्त्री वर्ग.
“तुला काय, घरात काही कामं नसतीलच.”
अजून एखादे गृहीतक.
“तुला घरकाम, स्वयंपाकपाणी येतं?”
एखादा टोकाचा कुत्सित बाण.
आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ आहेत.
माझ्या संध्याकाळी व्यायामाला जायच्या-यायच्या वेळेवर लक्ष ठेवून असायचे. एक दिवस मी
बाहेर पडताना नवरा घरी परतला. जाता जाता एक छोटे काम मी त्याला करून ठेवशील का, विचारलं;
ते या “वॉचमन” सद्गृहस्थांच्या कानांनी अगदी लगेच टिपलं. तत्काळ पुढे सरसावून माझ्या
नवर्याला सर्टिफिकेट देण्यात आलं, “तरी मला वाटलंच, तुलाच सगळं बघावं लागत असेल संध्याकाळचं.”
अशावेळी वाटतं, सकाळी उठल्यापासून
गरगर भिंगरी लावून जी कामं उरकली जातात त्याची व्हिडीओ फिल्म प्रत्येक बाईजवळ असावी;
पण त्याचाही उपयोग होईलच, असं नाही. कारण “तेवढ्यापुरतंच तुम्ही काम केलं असेल हो,”
असं ऐकावं लागू शकतं.
यावरून आठवलं. माझी एक मैत्रीण
आहे, एकटीच राहते. आमच्यातला एकजण तिला म्हणाला, “तुला काय काम असतं? यांचं ठीक आहे.
नवरा-मूल-घर!” त्यावर ती उसळून म्हणाली, “नवरा, मूल नाही; पण घर आहेच ना? घरकाम करावंच
लागतं. स्वैपाक, झाडू-फरशी, भांडी-कुंडी, ने-आण, सगळंच!” पुरुष एकटाच राहत असला तर
त्याला घराचा उकिरडा करायची सवलत. पण “बाईचा हात” मात्र तिच्या एकटीच्या घरावरून फिरलेलाच
पाहिजे. त्यातून पै-पाहुणा. एकट्या पुरुषाकडे कुणी सहसा पाहुणे जाणार नाहीत; गेले तरी
त्याच्या मठीचा फक्त राहण्यापुरता “वापर”. चहासुद्धा बाहेरच घेतील. बायकांना मात्र
वेगळा न्याय. पाहुणे आले आणि तिनं चहापाणी नाही केलं तर दुपारच्या सनसनाटी वृत्तपत्राची
हेडलाईनच झाली!
मला तिचं म्हणणं अगदी पटलं.
भाग ५: माझे स्वातंत्र्य
गेल्या महिन्यातला तो गुरुवार माझ्यासाठी अविस्मरणीय होता. साडेआठ वर्षांचं माझं पार्सल स्वत:ची स्वत:च बॅग भरून माझ्या भाच्याबरोबर मावशीकडे गावाला रवाना झालं होतं. मला सोडून ती गावाला असं पहिल्यांदाच घडत होतं. मी आपली प्रापंचिक काळजीनं सांगत होते, “एसटीत भय्याला त्रास देऊ नकोस, गावाला मावशीचं सगळं ऐक. वेणी घालून घे...” इत्यादी. गाडी हलली. हात हलवून टाटा करताना सईबाई म्हणाल्या, “आई तू मजा कर हं इथे!”
सई सांगूनच गेल्यामुळे त्या संध्याकाळपासूनच
मी मजा करायला सुरुवात केली. मी ठरवूनच घेतलं. नवरा नाही, मुलगी नाही, म्हणून स्वयंपाकही
नाही. “चूल बंद” उपक्रम सुरू केला. फक्त चहा-कॉफी करायची. अगदी हॉस्टेलसारखं राहून
बघायचं. सगळ्याच स्नेह्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचा चंग बांधला. पुढच्या तीन दिवसांतल्या
सकाळ-संध्याकाळच्या जेवणाची आमंत्रणं मिळाली.
त्या संध्याकाळी लक्ष्मी रोडवर
गेले. रमतगमत कपड्यांपासून भांड्यांपर्यंतची विविध दुकानं फिरले. “आई, लवकर चल ना घरी,
मला कंटाळा आलाय,” हा रोजचा भुंगा नसल्यामुळे तीन तास निवांत घालवले. चार-पाच हजारांचा
कपडालत्ता मनसोक्त पाहून, चार ठिकाणी घासाघीस करून तीनशे रुपयांचा ड्रेस खरेदीचा आनंद
मिळविला.
घरी जाताजाताच अॅगाथा ख्रिस्तीचं
पुस्तक घेऊन गेले. घरी पोहोचल्यावर पुस्तक वाचायला घेतलं. मध्ये वीज गेली तर मेणबत्ती
लावून वाचत राहिले. एका दमात पुस्तक वाचून ते संपवूनच झोपायला गेले. हा दुर्मिळ भाग्यक्षण
अनुभवून मी माझं लुटुपुटुचं स्वातंत्र्य अभियान सुरू केलं.
“सईशिवाय रात्री झोप येईल ना?”
नवरा फोनवर विचारत होता. अगदी डोळे मिटू लागले की, “आई गं, तेव्हा तुला तान्याची आई
काय विचारीत होती?” असं गदागदा हलवून “तेव्हा” चा तातडीचा प्रश्न विचारून झोप उडवणं
नाही. रात्रभर अंगावर कुठूनही हात, पाय, डोकं आदळणं नाही. थोडक्यात, एकदा पाठ टेकली
की सकाळ झाल्यावरच डोळे उघडायचे. असं किती दिवसांचं स्वप्न, पण ते अपूर्णच राहिलं.
सतत शहरी प्रदूषणात श्वास घेणार्या आमच्या फुप्फुसांना गावाकडच्या मोकळ्या हवेत जसं
गुदमरेल ना तशी मी त्या रात्रीच्या शांततेनं अशांत होऊन गेले.
“काय करणार आज?” शेजारच्या आजींनी दुसर्या दिवशी कुतूहलानं विचारलं, “बघूयात”. माझं मोघम उत्तर. स्वत:चे वेगळे कार्यक्रम ठरवण्याची माझी सवयच मोडलेली. मुलीनं मज्जा करायला सांगितली आहे, हे आठवून नवरा जसा एका पाठोपाठ एक चॅनेल्स बदलून टीव्ही बघतो तसा बघून झाला. जांभया आवरेनात. “अजून काय बरं मजा करावी?” विचार मनात आला. न राहवून कपाटं आवरायला घेतली. घरातली सगळी कपाटं, माळे, रद्दी आवरून झाली. शेवटी मी कंटाळून माझं स्वातंत्र्य अभियान आवरतं घेतलं. बहिणीला फोन केला आणि सांगितलं, “माझं पारतंत्र्य लवकर पाठवून दे गं!”
ऑडिओ लिंक:
आमच्या घरातील कामाच्या बाई अशिक्षित
आहेत. मी त्यांचा पगार त्यांच्या हातात देत नाही; बँकेत भरते. त्यांना पैसे हवे असल्यास
त्या माझ्याबरोबर बँकेत येतात आणि माझ्या ओळखीवर “अंगठा” करून पैसे घेतात.
रोज सई शाळेतून घरी आल्यावर बाईच
तिच्यापाशी तासभर असतात. त्या दोघींचं खूप जमतं. मी घरी येते, तेव्हा दोघीही गप्पांत
रंगून गेलेल्या असतात. अलीकडेच सईला कळलं की बाईंना लिहिता येत नाही. पहिलीपासून गेली
दोन वर्षे हिंदी शिकत असल्याने तिला आता देवनागरी चांगलीच लिहिता-वाचता येते. कामाच्या
वेळेत त्या एका तासात सईनं त्यांना लिहायला शिकवण्याचा सपाटा लावलाय. परंपरागत पद्धतीनं
आपण “क ख ग घ ङ” शिकतो, तसं ते नसावं. माझ्या मते सई फळ्यावर लिहून देते आणि त्यांना
गिरवायला सांगते. “ब” लिहिताना आधी वाटी की रेघ, हेही त्यात महत्त्वाचं नसावं; पण आता
त्या “बेबी” हा शब्द,- त्यांचं नाव पूर्ण आणि आडनाव अर्धं एवढं लिहू शकतात. बहुतेक
आमच्या बँकेतील पुढच्या खेपेस बाई अंगठ्याऐवजी नाव लिहितील, म्हणजेच सही करतील.
परवा माझी कुत्री “गोल्डी” मला
काही तरी चघळताना दिसली. काय आहे म्हणून बघितलं, तर तो होता एक सागरगोटा! आजच्या “व्हिडीओ
गेम” च्या जमान्यात सागरगोटा घरात पाहून मी चक्रावलेच. सईला विचारलं, “तुला माहितीये
का हे गोल्डीनं दगडासारखं तोंडात काय धरलंय? ते कुठून आणलंय?” ती म्हणाली, “अगं आई,
त्याला सागरगोटे म्हणतात, आपल्या बाई मला शिकवतात रोज. मला आता पाचखईपर्यंत येतंय,
म्हणजे एकाचवेळी पाच सागरगोटे उचलायचे.” मला त्यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण खूपच पसंत
पडली.
ऑडिओ लिंक::
भाग ७: एप्रन हवाच!
कडक उन्हाळ्याचे दिवस आणि ससूनच्या ओपीडीतला तो अलोट गर्दीचा भाग. तेथे मला माझी मैत्रीण पूर्ण बाह्यांच्या, जाड कापडाच्या एप्रनमध्ये भेटली. न राहवून मी म्हणाले, “एवढ्या उन्हाळ्यात काढून का ठेवत नाहीस एप्रन?” तिचं उत्तर अवाक करणारं होतं. ती म्हणाली, “एवढ्या गर्दीतही पेशंट आपल्याला डॉक्टर मानायला तयार नसतात. त्यांना आपण मुली म्हणजे नर्सच वाटतो; डॉक्टर नाहीच. एप्रनमुळे निदान पाच-दहा लोकांना तरी कळतं की या डॉक्टर आहेत.”
माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर म्हणून
मिरवावं, यातली ती नाही. तरीही...
एकदा माझा एक पेशंट अर्जंट रिपोर्ट
हवाय म्हणून आला होता. खोलीच्या बाहेर रेसिडेंट डॉक्टरांना भेटला. त्यांनी त्या पेशंटला
थांबवलं. मला स्लाईड दाखवून रिपोर्ट विचारून लिहून माझी सही घेतली. मी अगदी कळवळ्यानं
पेशंटला आत बोलावून रिपोर्टमध्ये काळजी करण्यासारखं, कॅन्सर वगैरे काही नाही असा दिलासा
दिला. तो खोलीच्या बाहेर पडला. बाहेरच्या माझ्या रेसिडेंट डॉक्टरकडे जाऊन म्हणाला,
“डॉक्टर, हा रिपोर्ट बरोबर आहे ना? खोलीतल्या त्या सिस्टरनी दिलाय” मला माझ्या मैत्रिणीचं
उकाड्यातसुद्धा एप्रन घालण्याचं दु:ख थोडंफार कळलं.
निदान ससूनचे बहुसंख्य पेशंट्स
अडाणी तरी असतात. त्यांना एखादी पोरसवदा स्त्री “वरच्या डॉक्टर” हे कळत नसेल; पण माझी
एक इंजिनिअर मैत्रीण एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करीत होती. तिची ए.सी. केबिन प्रवेशद्वाराच्या
जवळ होती. खोलीच्या दारावर नाव, हुद्दा, व्यवस्थित पाटी होती. तरी ती सांगायची दिवसाकाठी
दहा जण तरी तिला रिसेप्शनिस्ट समजून चौकशी करायचे.
ऑडिओ लिंक:
बाई..... “माणूस” म्हणून !
विविध भूमिका बजावताना पोळपाट-लाटण्यापासून मायक्रोस्कोप (जो माझ्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे.) पर्यंत वेगवेगळी आयुधं परजवत, घर-संसार, मुलं, नोकरी ही सगळी व्यवधानं लीलया सांभाळली जातात. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडलं, असं नाही. बहुतेक जणींच्या बाबतीत हे असंच घडतं. या सगळ्या घडण्यात काही क्षणच केवळ बाई म्हणून, केवळ आई म्हणून अनुभवले जातात. बाकी सगळे एकत्रच माणूस म्हणून गाठीस जमतात. अर्थात “आई-बाई” हे विश्लेषण त्या अनुभवांनंतरचं असतं. त्यात काही गोड सापडतं, तर काही कडू. असेच हे काही क्षण-काही बाई म्हणून- काही माणूस म्हणून!