Saturday, October 1, 2022

ग्रंथराज ज्ञानेश्वरी: भावार्थ-दीपिका...चिंतन

 

 





श्रीमद् भगवद् गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धप्रसंगी केलेलेला उपदेश आहे हे आपणां सर्वांना माहित आहे. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. आणि तो म्हणू लागला , मी युद्ध करणार नाही. तो स्व-धर्मा पासून दूर जावू लागला. अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपणां सर्वांच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आणि अर्जुनास बोध होऊन त्याच्या मनातील संघर्ष संपला. मनुष्याच्या मनातील द्वंद्व संपावे, त्याने निशंक होऊन जीवन जगावे. अंगीकृत कार्य करावे. याची प्रेरणा गीता ग्रंथात आहे.

गीता ग्रंथावर, श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले व्याख्यान / प्रवचन म्हणजे भावार्थदीपिका...! अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी...! या ग्रंथाचे स्वरूप मोठे सुंदर आहे.

भाद्रपद वदय षष्टी (कापिला षष्टी ) हा दिवस ज्ञानेश्वरी-जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्ञानेश्वरी या ग्रंथा बद्दल संत नामदेव महाराज म्हणतात,

 

ज्ञानराज माझी योगीयांची माउली I तेणे निगमवल्ली प्रकट केली II

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी I ब्रह्मानंद लहरी प्रकट केली II

अध्यात्म विद्येचे दाविलेंसे रूप I चैतन्याचा दीप उजळीला II

छपन्न भाषेचा केलासे गौरव I भवर्णवाची नाव उभारली II  

श्रवणाचे मिषें बैसावे येवूनी I  साम्राज्य भुवनी सुखी नांदे II

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II

 

किती गोमटे नाव दिले आहे ज्ञानदेवांनी या ग्रंथास, भावार्थदीपिका ! गीता ग्रंथात अठरा अध्याय, सातशे श्लोक, हे सर्व संस्कृत मध्ये आहे. तत्कालीन परिस्थितीत गीतेतील ज्ञान सर्वां पर्यंत पोहोचावे, म्हणून माऊलींनी प्राकृतात (म्हणजे तत्कालीन मराठी भाषेत) हा ग्रंथ नेवासे येथे सांगितला.

 गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास जीवनात शांतातापूर्ण यशासाठी उपयुक्त आहे. ज्ञानदेवांची भाषा अलौकिक आहे. आपण मनाने त्या भाषा वैभावाशी एकरूप होऊन, शांत चित्ताने ज्ञानेश्वरीच्या ज्ञान-समुद्रातील काही थेंब आपणां सर्वांना प्राप्त व्हावेत यासाठी  प्रयत्न करूया, ज्ञानेश्वरी-जयंतीच्या निमित्ताने.

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II


- श्री. अविनाश प. गोसावी

 

Friday, September 9, 2022

विसर्जन ?


जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,

जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,

ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,

जो आमच्या जगण्याचा असे सूर  !! 


भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन,

त्याचे काय संभव  विसर्जन ?

संकल्प घ्यावा  त्यास आज प्रार्थून,

मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज  विसर्जन !! 🙏🏼


- रुपाली

Saturday, August 27, 2022

शूरा मी वंदिले - अनघा मोडक

 

 


II    स्वातंत्र्य लक्ष्मी कि जय II

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्र समाज सेवा संघ तसेच  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, "शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेय मुलांसमोर उलगडल्या !!

रचना विद्यालय नासिक, पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, ज्यू..रुंग्टा हायस्कूल सिन्नर येथिल . ना. सारडा विद्यालय या चार  शाळांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या अप्रतिम कार्यक्रमांद्वारे, उमलत्या मनांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले !! आपल्या देशासाठी प्राण वेचलेल्या वीर सैनिकांच्या पालकांच्या बलिदानाचे यानिमित्ताने स्मरण आणि त्यांचा गौरव हे देखील या आयोजनामागचे उद्दिष्ट्य होते.  

महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अनघाला आपले दृष्टी गमवावी लागली. परंतु तिने सखोल अभ्यास, इतरांच्या मदतीने केलेले सततचे वाचन, चिकाटी आणि प्रचंड मेहनत यांच्या पाठबळावर आपल्या अधूत्वावर मात केली आहे. तिचा अभयास आणि वैचारिक श्रीमंती तिच्या रसाळ वाणीतुन प्रकट होत असते

"शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाद्वारे अनघाने शालेय  मुलांच्या दृष्टीने अनुकूल अशा वक्तृत्वामार्फत, भारतीय स्वातंत्र्य सेनानी तसेच सैनिक यांच्या कार्याबद्दल कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला.    

१० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी रचना विद्यालयात झालेल्या पहिल्या व्याख्यानाआधी, अनघाचा सत्कार करण्यात आला. शहीद निनाद मांडवगणे यांचे पालक -वडील श्री अनिल मांडवगणे आई सौ. सुषमा मांडवगणे यांच्या हस्ते हा सत्कार  झाला ! त्याच्या आई-वडिलांची कार्यक्रमात असलेली उपस्थिती अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेली. श्री सौ. मांडवगणे यांच्या चेह-यावर मुलाच्या कर्तृत्वाच्या छटा दिसत होत्या. आणि आई-वडील म्हणून मुलास गमाविल्याची अंधुक तरीही स्पष्ट वेदना ही...! यावेळी   " मेरे वतनके लोगों जरा आंखमे भरलो पानी...! जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...!" हे गीत  एका विद्यार्थिनीने अतिशय अप्रतिमरित्या  सादर केले आणि व्याख्यानाआगोदर साजेसा  माहोल निर्माण झाला.   व्याख्यानात सैनिक या शब्दाची फार सुंदर व्याख्या अनघाने सादर  केली. ' "सैद्धांतिक-कर्तव्य-निष्ठा" या शब्द-भावार्थासह जीवन जगणारा तो सैनिक ' असे मत अनघाने मांडले आणि अनेक उदाहरणांचे दाखले देत तिने ही व्याख्या उपस्थितांना समजाविली. अनघाने मुलांना प्रश्न विचारला , " मेरा रंग दे बसंती चोला", यातील बसंती या शब्दाचा अर्थ  काय असावा ? त्याचा अर्थ वसंत का होतो हे सांगताना वसंत म्हणजे केशरी रंग आणि  केसरिया बाणा म्हणजे राष्ट्रभक्ती कशी ते तिने महाराणा प्रताप, तसेच २३ व्या वर्षी मातृभूमीच्या चरणी बलिदान देणा-या शहीद भगतसिंगांच्या कथा सांगितल्या. 

 


याच दिवशी दुपारचे व्याख्यान पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, येथे होते. एनसीसी-कॅडेटस् नी सैनिकी थाटात केलेल्या स्वागताने वातावरण निर्मिती फार सुंदर झाली. धामणकर सभागृहातील भव्य रंगमंचावर दोन्ही बाजूने असणारी भारतमातेचे प्रतिमा नजतेल आणि मनात भरत होती. कारगिल युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजाविलेले श्री. नामदेव जायभावे, निवृत्त मेजर-सुभेदार यांच्या हस्ते अनघाचा सत्कार करण्यात आला. नामदेव हे नाव ऐकताच अनघाने संत नामदेव आणि ज्ञानदेवांचा उल्लेख केला. याच संदर्भात तिच्या व्हाटस्अप-स्टेटस वर असलेले वाक्य मनाला स्पर्शून जाते .ते वाक्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ओळ आहे, "श्रीगुरुं सारिखा असता पाठीराखा , इतरांचा लेखा कोण करी!" याही व्याख्यानासाठी काही सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते, मेजर रोहनचे आई-वडील श्री सौ. सुधाकर चव्हाण , कर्नल अविनाशचे आई-वडील श्री सौ बाळासाहेब मोगल आणि मेजर श्रीकांत मेजर प्रशांतचे वडील श्री पंढरीनाथ शिंदे यांनाही वंदना देण्यात आली.    

 


१२ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरे व्याख्यान जु. .  रुंग्टा हायस्कूल येथे संपन्न झाले. भव्य  सभागृह, मुला-मुलींच्या हातात फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज यांनी वातावरणात ऊर्जा भरली होती. मंचावर सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते.  भारतीय सैन्यात कार्यरत असणा-या शुभमचे आई-वडील श्री सौ.दीपक कुलकर्णी.त्यांच्या हस्ते अनघाचा सत्कार झाला.  व्याख्यानात नंदुरबार येथे शहीद झालेला अवघ्या  चौदा वर्षाच्या  शिरीष कुमारची आठवण करीत अनघाने विद्यार्थीवर्गाशी संवाद सुरु केला. महाराणा प्रतापांचा चेतक घोडा आणि सौदागर या शब्दाची पूर्वपीठीका सांगत, झांशीच्या राणीची आठवण करीत अनेक सैनिकांच्या बलिदानाच्या कथा सांगत अनघाने उपथितांच्या मनामध्ये आदर आणि देशप्रेमाच्या भावना जागविलय. युद्धभूमीवर बंकर उडवून देतांना सैनिकांनी केलेले साहस, त्यात अनेकांना  प्राप्त झालेले शहिदपण तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख होत व्याख्यान उत्तरोतर देशप्रेमाने भारावून गेले. जयहिंद...! जय भारत ...! व्यर्थ हो बलिदान चा प्रेरणा-संदेश घेवून कार्यक्रम संपन्न झाला.

 


मग शेवटच्या टप्प्याकडे कार्यक्रम पुढे सरकला. . ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी अनघा सिन्नरला आली.विद्यालयाचा भव्य परिसर एनसीसी कॅडेटस् चा उस्त्फुर्त सहभाग. श्री वाघ सरांनी विद्यार्थ्यासह तबला-वादनावर म्हंटलेले गाणे खूपच  भावपूर्ण असे झाले. तिचा सत्कार स्क़्वाड्रन लीडर चिन्मयचे आई-वडील श्री सौ कोरडे यांच्या हस्ते झाला. दोघेही भारावलेले होते. चिन्मयच्या एनडीए तील शिक्षणाच्या आणि तेथील काटेकोर शिस्तीच्या आठवणीनी त्यांनी सांगितल्या राष्ट्र आणि राष्ट्रकार्य या विषयावर बोलतांना अमृत महोत्सव म्हणजे काय,-मृत म्हणजे काय ? याचा सहज उलगडा अनघाने केला .! 

रात्री उशिरा अनघा मुबईच्या दिशेने रवाना  झाली  परंतु  या चारही व्याख्यांत झालेला  "जय हिंद,भारत माता कि जय, वंदे मातरम्"  चा जयघोष,  आम्हा तिच्या वाणीने, सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याने  मंत्रमुग्ध झालेल्या श्रोतृवर्गाच्या मनात दुमदुमत राहिला !!  

 

- श्री अविनाश गोसावी,

   ९४२३९६४३१९

Saturday, August 20, 2022

मनोगत : अल्पारंभाच्या उपक्रमांविषयी : श्री. अविनाश गोसावी.

 

अल्पारंभा एज्यूकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेचा २०१८ साली उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. 

संस्थेची उद्दिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत, त्यावर माझे मनोगत सादर करतो !! 

१) शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

२) सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

३) 'आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार' यासाठी उपक्रम राबविणे

संस्थेच्या वेबसाईटवर सुरुवातीचे वाक्य कार्याची प्रेरणा सदैव जागृत ठेवणारे आहे.  "केल्याने होत आहे रे...आधी केलेची पाहिजे...!" समर्थ रामदास स्वामींचे हे वाक्य आहे. यत्न तोची देव जाणावा. प्रयत्न करीत राहणे महत्वाचे आहे. अर्थसाक्षरता या मुलभूत-मौल्यवान संदेशाचा विचार व्यक्ती-व्यक्ती पर्यंत पोहचावा, अर्थ आणि आर्थिक बाब या बद्दलचा संदेह कमी व्हावा, अर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारचे अकारण द्वंद्व मनात असू नये, अर्थसाक्षरतेचे प्रमाण वाढावे !! असे घडत गेल्यास, समाज-जीवनावर व्यापक असा परिणाम होतो. म्हणून हे समाज उपयोगी काम आहे.  

मनो- Money वाचत असतांनारुजवात अर्थसाक्षरतेची हे शब्द समोर आले! आपण म्हणतो ना, बोली भाषेत रुजणे महत्वाचे. रुजवात करून देणे...म्हणजे मेळ जमवून देणे. जमलेला मेळ सांभाळणे. जपणे. टिकवून ठेवणे.आपण अर्थसाक्षरते बद्दल विचार करतो आहोत. आपली संस्कृती नितांत अर्थपूर्ण आहे.धर्मअर्थ , काम आणि मोक्ष हे चार परम् पुरुषार्थ सांगितले आहेत. अर्थकारणातील सच्चेपणा आणि स्व-प्रामाणिकता या दोन्ही गोष्टी आयुष्यावर मोठा परिणाम करतात.पर्ययाने याचा परिणाम कुटुंबावर, संबधित घटकांवर, आणि समाजावर होतोSWS Financial Solutions Pvt. Ltd. या व्यावसायिक संस्थेच्या कामास पूरक असे अल्पारंभाचे काम आहे. यातून तीन गोष्टी साध्य होतात.

१)     समाजातील घटकांना योग्य मदत

२)     कार्य-समाधान

३)     जन-संपर्क अभियान

People …People & People …What more ….! माणूस आणि त्याच्या भोवती असणारी परिस्थिती या दोन घटकांवर सकारात्मक काम होत राहणे हे सदैव उपयुक्त आहे. माणूस समंजस होत जाणे महत्वाचे. सर्वपल्ली राधाधाकृष्णन म्हणतात"More we understand each other …More we feel we are like one another….!” असाच काहीसा विचार पैसा आणि माणूस यासाठी लागू होतो. माणूस माणसाशी आणि पैशांशी कसा वागतो, याचा परिणाम त्याच्या जीवनावर सतत होत असतो. Will & Good Will या बद्दल अधिकारी सरांचा एक संवाद आठवला. संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त असते, कारण संपत्ती असेल तर फक्त विल (Will) तयार होते आणि संस्कार असतील तर गुडविल ( Good Will  ) तयार होते.  किती अर्थपूर्ण आहे , संस्कारांचे महत्व...!

बालवयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वयम वाचक कट्टा हा उपक्रम सुरु आहे. दिवसामाजी काहीतरी लिहावे...प्रसंगी अखंडित वाचीत जावे असे समर्थ रामदास म्हणाले...! वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. योग्य विचारास प्रवृत्त होतो. कार्य-प्रवणतेतून कार्य-प्रवीण होत जातो. वाचनाने माणूस बहुआयामी तर होतोच परंतु आपणास काय कळाले आहे यापेक्षा आपल्याला काय समजावून घ्यायचे आहे, याचा विचार तो प्राधान्याने करू लागतो./ करू शकतो. वाचन-संस्कृतीच्या संवार्धनाची नितांत आवश्यकता आहे. आणि अल्परंभ: क्षेमकरा: या नीती-विचाराने अल्परंभाच्या माध्यामतून वाचन हा विचार रुजण्यासाठी काम सुरु आहे.

मन:पूर्वक धन्यवाद...!

- श्री. अविनाश गोसावी. 

९४२३९६४३१९