Saturday, October 1, 2022

ग्रंथराज ज्ञानेश्वरी: भावार्थ-दीपिका...चिंतन

 

 





श्रीमद् भगवद् गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धप्रसंगी केलेलेला उपदेश आहे हे आपणां सर्वांना माहित आहे. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. आणि तो म्हणू लागला , मी युद्ध करणार नाही. तो स्व-धर्मा पासून दूर जावू लागला. अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपणां सर्वांच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आणि अर्जुनास बोध होऊन त्याच्या मनातील संघर्ष संपला. मनुष्याच्या मनातील द्वंद्व संपावे, त्याने निशंक होऊन जीवन जगावे. अंगीकृत कार्य करावे. याची प्रेरणा गीता ग्रंथात आहे.

गीता ग्रंथावर, श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले व्याख्यान / प्रवचन म्हणजे भावार्थदीपिका...! अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी...! या ग्रंथाचे स्वरूप मोठे सुंदर आहे.

भाद्रपद वदय षष्टी (कापिला षष्टी ) हा दिवस ज्ञानेश्वरी-जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्ञानेश्वरी या ग्रंथा बद्दल संत नामदेव महाराज म्हणतात,

 

ज्ञानराज माझी योगीयांची माउली I तेणे निगमवल्ली प्रकट केली II

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी I ब्रह्मानंद लहरी प्रकट केली II

अध्यात्म विद्येचे दाविलेंसे रूप I चैतन्याचा दीप उजळीला II

छपन्न भाषेचा केलासे गौरव I भवर्णवाची नाव उभारली II  

श्रवणाचे मिषें बैसावे येवूनी I  साम्राज्य भुवनी सुखी नांदे II

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II

 

किती गोमटे नाव दिले आहे ज्ञानदेवांनी या ग्रंथास, भावार्थदीपिका ! गीता ग्रंथात अठरा अध्याय, सातशे श्लोक, हे सर्व संस्कृत मध्ये आहे. तत्कालीन परिस्थितीत गीतेतील ज्ञान सर्वां पर्यंत पोहोचावे, म्हणून माऊलींनी प्राकृतात (म्हणजे तत्कालीन मराठी भाषेत) हा ग्रंथ नेवासे येथे सांगितला.

 गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास जीवनात शांतातापूर्ण यशासाठी उपयुक्त आहे. ज्ञानदेवांची भाषा अलौकिक आहे. आपण मनाने त्या भाषा वैभावाशी एकरूप होऊन, शांत चित्ताने ज्ञानेश्वरीच्या ज्ञान-समुद्रातील काही थेंब आपणां सर्वांना प्राप्त व्हावेत यासाठी  प्रयत्न करूया, ज्ञानेश्वरी-जयंतीच्या निमित्ताने.

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II


- श्री. अविनाश प. गोसावी

 

No comments:

Post a Comment