Saturday, August 13, 2022

हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट

 हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट




सेंट्रल पार्क येथे चालू असलेल्या घे भरारीच्या भव्य प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देण्यासाठी माझी मावशी  आली होती. तशी ती बहुतेक सर्व घे भरारीच्या प्रदर्शनात आवर्जून भेट देतेच. पण काल मात्र प्रदर्शना दरम्यान तिचा मोबाईल हरवला. सध्याच्या दिवसांत मोबाईल म्हणजे प्राणवायू. तो जितका अचानक हरवला तितक्याच आश्चर्यकारक रितीने सापडला देखील. त्याला कारणीभूत आहे तंत्रज्ञान (technology). खूप जणांसाठी (अगदी माझ्यासाठी सुद्धा) आत्ताची माहिती नवीन असेल पण काही गोष्टी शिकल्याने आयुष्य सोपे होऊ शकते. 

पुढील किस्सा तिच्याच शब्दांत:

माझ्या पिढीतल्या अनेकांना तंत्रज्ञानातील मूलभूत पण उपयुक्त सुविधा माहीत नसतील ह्याची मला खात्री आहे म्हणुन एक अनुभव सर्वांना आवर्जून सांगावासा वाटतोय. फोन हरवणे आणि नंतरचा काही काळ तो शोधण्याची फुटकळ धडपड करणं ह्याचा अनुभव कधी ना कधी सगळ्यांनीच घेतला असतो. त्यात भर म्हणून सगळ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती - शेवटी कुठे वापरला होतास आठव? टेबलाखाली बघितलेस का? बॅग जरा उपडी करुन बघ, त्यातच असेल! असा कसा बाई मोबाईल विसरता ग तुम्ही ..!

त्या क्षणी अगदी ऐकवत नसणाऱ्या प्रश्नोत्तरांचा तास सुरु होतो ..

सांगायचा मुद्दा असा की काल संध्याकाळी मी आणि माझी मुलगी पुण्यात हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन येथे घे भरारीच्या प्रदर्शनाला गेलो होतो आणि परत येताना रिक्षात लक्षात आले की पर्स मधे मोबाईल नाही. माझ्या भाचीचा , राधिका देसाईचा तिथे स्टॉल होता त्यामुळे लगेच तिला फोन केला आणि लगेच रिक्षा पुन्हा प्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन गेलो. अर्थातच नेहमीचे सगळे प्रश्न पडताळून पाहिले.. संचालकांच्या कानावर फोन हरवल्याची बातमी दिली. त्यांनी तत्परतेने mike वरुन announcement सुद्धा केली. तो पर्यंत food court मधे फोन हरवल्याची बातमी सगळ्यांना कळली..आयोजकांसकट सर्वांनी फोनवर् रिंग द्यायला सुरवात केली पण कुठेच वाजलेले  ऐकू येत नव्हते....पण त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे 'रिंग वाजतेय म्हणजे फोन चोरीला गेला नसावा, नाहीतर लगेच  phone switch off केला असता,  पडला असावा.. सापडेल ' असा दिलासा मला सर्वांनी दिला..फोन नंबरची देवाणघेवाण करुन आम्ही तिथून निघालो व घरी पोचलो.

फोन गेल्यापेक्षा त्यात काय काय data होता, फोन चुकीच्या हातात गेल्यास काय काय नुकसान होइल याच्या विचाराने आधी घालमेल सुरु झाली..विशेषत: financial apps..स्वत:लाच लक्षात रहावे म्हणून Password नेहमी प्रमाणे अत्यंत सोपा pattern किंवा  ढोबळ तारखा  ठेवायची बायकांची बाळबोध पद्धत असते ..माझे अत्यंत फालतु screen lock आठवून  चोरसुद्धा आपल्याला हसेल याची मला भीती वाटू लागली .

घरी आलो..आणि  मुलाला सांगितले.काही क्षणातच त्याने laptop उघडला. आपल्या प्रत्येकाच्या google account वर FIND MY DEVICE अशी सुविधा असते.ती वापरून आपल्या कम्प्युटर वर सर्च केला आणि आपला फोन जर गूगल अकाउंटला लिंक केला असेल तर आपल्याला ताबडतोब आपल्या फोनची सगळी  माहिती मिळते. ..हरवलेला फोन सापडावा किंवा कसले नुकसान होऊ नये या करिता हे feature खूपच उपयोगी आहे.  माझ्या गूगल अकाउंट वरुन आम्हाला फोनचे लोकेशन ताबडतोब कळले.फोन 45% charged आहे ही समजले. अर्थात आम्ही गेलो होतो त्यापेक्षा वेगळेच लोकेशन होते ते.. त्या feature वरुन आपण आपल्या device ला रिंग देऊ शकतो. फोन लॉक करायची सुद्धा सोय त्यात आहे आणि कोणाला मिळाला तर अमूक नंबर वर संपर्क करावा असा मेसेजही आपण आपल्या device वर display करु शकतो. आम्ही त्याप्रमाणे केले.

नाईलाजच झाल्यास आपल्या फोन वरचा सगळा data erase करायचा हा ही पर्याय त्या फीचर मधे होता..पण तसे केल्यास मग फोन सापडणेही अवघड झाले असते. गरज पडल्यास उद्या करु असे ठरवले. तरी चैन पडेना..एवढे लोकेशन आलेय फोनचे त्यात काही तथ्य असेल का? असा मनात विचार आला.. आणि एकदम आम्ही उठलो आणि निघालो..जाऊन बघायला काय हरकत आहे...नाहीतरी 'तुमचा फोन आम्हाला सापडला आहे ' अशा फोन ची वाट बघण्यापेक्षा दुसरे आम्ही काय करणार होतो!

बाइक FC रोड वरून सरळ सरळ पुढे जात होती आणि तुकाराम पादुका चौकानंतर डावीकडे वळली ..आम्ही गेलो होतो आपटे रोडवर ..हे अगदी विरुद्ध दिशेला झाले..तरी पण आत शिरत शिरत आम्ही अगदी शेवटच्या अपार्टमेंट पाशी पोचलो. आत इथे कुठे फोन शोधणार? फोन वाजवला तरी कोणाच्या घरात विचारणार? 'जाऊ या बाहेरच्या बाहेर परत,  इथे कुठे मिळणार?' असे मी म्हटले..पण 'इथपर्यंत आलोच आहोत तर अजून झूम करुन लोकेशन बघु' असे ईशान म्हणाला. तसे केले तर लोकेशन कंपाउंडच्या आतलेच आहे असे कळले..बघूया तर खरं असे म्हणुन आत शिरलो. राखणीला एक बाई होत्या.त्यांना एवढ्या रात्री बिल्डिंग बाहेर आमचे घोटाळणे संशयास्पद वाटलेच होते..त्या आम्हाला हटकणार इतक्यात आम्हीच म्हटले आम्ही फोन शोधायला आलोय..पण तुम्ही कधी इकडे आला होतात? अशी त्यांनी रास्त विचारणा केली..आम्हाला इथलेच लोकेशन दाखवतेय म्हणून इथे आलोय असे आम्ही त्यांना समजावले आणि घरी मुली ला त्या app वरुन माझ्या फोन वर रिंग करायला सांगितले.

आणि काय आश्चर्य..

त्या पार्किंग एरिया मधून चक्क माझ्या फोन ची रिंगटोन श्रीराम जयराम जय जय राम ची धून वाजू लागली..आता त्या बाईसुद्धा थक्क झाल्या..त्याही आमच्या बरोबर शोधू लागल्या..खाली कुठे दिसेना पण एका बाईक च्या डिक्कीतून आवाज येतोय असे वाटले..आणि मग आमची खात्री पटली..पण ती त्यांच्या बिल्डिंग मधली बाईक नव्हती..कोणातरी पाहुण्यांची होती..त्यांनी लगेच मुलाला बोलावले .त्याने बाईक चा नंबर घेतला व बिल्डिंग मधे सर्वांना सांगितले..बाईक ज्यांची होती त्या बाई खाली आल्या..डिक्की उघडली आणि तिथे फोन सापडला !..तुम्ही पण घे भरारी च्या प्रदर्शनाला आला होतात का असे मी विचारले तर त्या हो म्हणाल्या .गर्दीत गडबडीत माझा फोन त्यांच्या सामानात गेला असणार.

घडल्या प्रसंगाने आम्ही इतके अचंबित झालो होतो की विश्वास ठेवणेच अवघड जात होते ..गूगल ने सरळ आम्हाला फोन असलेल्या गाडीच्या डिक्कीसमोरच उभे केले होते..केवळ अविश्वसनीय..2 तासात फोन सापडला होता. फोन हातात घेतला तर तो लॉकड् होता आणि वर मेसेज होता..Phone lost. pls contact...

तंत्रज्ञान हे खरे तर दुधारी शस्त्रच आहे.. त्यातल्या सुविधांचा वापर करण्याऐवजी आपण बऱ्याच वेळा त्याचे शिकारच होत असतो पण त्यातल्या आवश्यक अशा Smart Features ची  आपण जर योग्य दखल घेतली तर नुसताच फोन नाही तर वापरणारा सुद्धा स्मार्ट होइल !!

---

स्रोत : कायप्पा 

No comments:

Post a Comment