Saturday, January 9, 2021

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १०: प्रा. मधुसूदन नाडकर्णी आणि लेखांक ११: श्री. अशोक अरोंदेकर --- श्री. बलबीर अधिकारी

 



लेखांक १०:  प्रा
. मधुसूदन नाडकर्णी 

   खादीचा कोट, सदरा पतलून, सहा फूट उंची, करडी झाक असणारे केस शांत नजर, चेहर्यावर एक निर्मळ साधेपणा विषयाचे निरूपण करतांना जाणवणारा आवाजातील एक विशिष्ट गोडवा. एवंगुण विशिष्ट नाडकर्णी सर जेव्हा वर्गात येत तेव्हा आम्ही पदवीला रसायन हा प्रमुख विषय घेतलेले विद्यार्थी, आपलेपणाच्या अनुभवाने चिंब भिजत असू. सेंद्रिय रसायन शास्त्र  हा विषय तसा किचकटच. परंतु तो कसा हाताळावा यासंबंधी त्यांचे स्वत:चे काही म्हणणे असे. पुस्तकातील प्रकरणे, त्यात उधृत केलेली समीकरणे, वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या, संयुगांच्या संज्ञा, त्यांचा परस्पर संबंध अनुक्रम . लक्षात ठेवताना ते परिक्षेत पेपरात उतरवताना आमच्या नाकी नऊ येत असत. 12 वी पर्यंत कसेतरी आलेले विद्यार्थी जेव्हा पदवीला येतात, त्यांना नाडकर्णी सरांसारखा आपला मार्गदर्शक  मिळणे आवश्यक असते. अन्यथा क्लासेसला जाणे अथवा नापास होणे एवढाच पर्याय उरतो. पण आम्ही सुदैवी होतो. ज्युनिअर बी.एस्सी. ला गेल्यावर पहिल्या तासाला त्यांनी आमचा जो ताबा घेतला तो अखेरपर्यंत. आजही नाडकर्णी सर आमच्या सारख्या अनेकांच्या मनात घर करून आहेत. ते त्यांच्या ह्या गोडव्यामुळेच.

   त्यांनी आमच्या हाती बालवर्गाची पाटी पेन्सिलच दिली. जशी आपण मुळाक्षरे गिरवतो तशीच आम्ही रसायन शास्त्रातील समीकरणांनाही गिरवायचे. एकदा दोनदा, दहादा, शंभरदा. आणि ते  करता करता संगती लागत गेली. ओळख वाढत गेली दोस्ती होत गेली. आत्मविश्वास वाढत गेला. पाठांतर करताही सारे आठवू लागले. जात्यावर ओवी सुचते तसे पाटी वा कागद घेतला की सारे ब्रह्म होऊन आठवू लागले. परीक्षेत चांगले गुण मिळाले (त्यावेळी 60% गुण सुद्धा गुणवत्ता समजले जायचे यावर वाचकांनी विश्वास ठेवावा.) सर्वसाधारण विद्यार्थ्याने एवढे यश मिळवायचे तर गुरू हवा तो नाडकर्णी सरांसारखा. केवळ अभ्यास गुण यात सरांना रूची नव्हती. सामाजिक बांधिलकी त्यांना प्रिय होती. राष्ट्रसेवा दलाचे ते कार्यकर्ते होते. 1962 साली पानशेतचे धरण फुटून पुण्यात अपरिमित हानी झाली होती. हजारो लोक बेघर शेकडो व्यवसाय विस्कळीत झाले होते. सरांनी कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांची एक सभा घेतली. मदत गोळा करण्यासाठी आवाहन केले. आम्ही तर त्यांचेच विद्यार्थी ! त्यांच्या बोलण्यातील कळकळ आर्जव (दमदाटी धाक दपटशा नव्हे !) यांनी सारे कामाला लागले. गोळा केलेली मदत मूळजी जेठा कॉलेज जळगाव तर्फे पुण्याला पाठवली गेली. सरांना बरे वाटले. त्यांचे समाधान पाहून आम्हीही खूष झालो. समाजकार्य, युवकार्य, परोपकार, बंधुता या शब्दांची माझी अधिक ओळख झाली ती या कामामुळे ! नंतरची 35 वर्षे मी युवा कार्यकर्ता म्हणून वावरलो हे खरे असले तरी त्याचा श्रीगणेशा नाडकर्णी सरांनी केला हेही खरेच आहे. समाजातील दुर्लक्षित घटकात मोडणार्या माझ्या सारख्याला युवा कार्य करण्याची प्रेरणा देणारे सर आजही मला कार्यप्रवृत्त करू शकतात हा गुरु महिमा आहे. कदाचित त्यामुळे तर त्याला साक्षात परब्रह्म म्हणत नसावेत ?

मी बी. एस्सी. झाल्यावर जळगावातच सरांबरोबर प्रयोगशाळेचे काम पाहू लागलो. त्यावेळचा प्रसंग आहे. तत्कालीन जळगावचे नगराध्यक्ष सरांकडे येऊन त्यांच्या मुलीची शिकवणी सुरू करण्यासाठी त्यांना आग्रह करू लागले. सरांना वेळ नव्हताच. त्यांनी पर्यायी शिक्षक देण्याची सूचना केली. मुलगी असल्यामुळे विश्वासाचा प्रश् आलाच मला बोलवणे आले. मी सरांची आज्ञा प्रमाण म्हणून काम केले. पण त्यांनी संपूर्ण विश्वास दाखवला होता, तो विश्वास आजही माझी पाठराखण करून मनोधैर्य उंचावण्यास लाभदायी  बनला आहे.

   नाडकर्णी सर पुढे आंबेजोगाई ठाणे येथेही प्रिन्सिपॉल म्हणून राहिले. आपल्या त्या ठिकाणच्या वास्तवातही त्यांनी अनेक विद्यार्थी पाहिले असतील. त्यांना असेच समजावले असेल. कार्यप्रवृत्त केले असेल.  असेल ! हे खरेच असेल. कारण त्यांना भेटलेल्या माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचा जो लाभ झाला तसाच तो इतरांचाही झाला असेल. माणूस घडवणे हा मुळी छंदच होता त्यांना !

vvv


लेखांक  ११: अशोक अरोंदेकर


   कोणतेही देखणे प्रदर्शन भरवायचे असेल, होर्डिंग, नियॉन साइन्स बनवायच्या असतील, त्रिमिती परिणाम साधणारे दृश्य उभे करायचे वा चितारायचे असेल अथवा अगदी साधा कापडी फलक वा बोर्ड बनवायचा असेल तरी कौशल्य, नीटनेटकेपणा, सादरीकरण, चर्चा या सर्वातून उभे राहणारे काम यात अरोंदेकर आर्ट स्टुडिओ आता . जे. आर्टस् स्टुडिओ चा क्रम बराच वर लागेल. त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या कामाची पार्श्वभूमी, छायाचित्रे, कॉपी . एकदा यांना दिली की आपण बिनधास्त राहून ते काय करामत करतात याकडे फक्त लक्ष द्यायचे मधून मधून सूचना करायच्या एवढेच काम राहते. कामाची प्रत वेळापत्रक ते चांगले सांभाळतात. तसेच त्यात आपल्या बुद्धीने कौशल्याने भर  घालून तुमच्या-आमच्या  कल्पनेत असणारे अंतिम सादरीकरण अधिकच लोभस बनवतात. व्हिज्युअल्स, कॉपी, इलेक्ट्रॉनिक गॅडगेटस्, प्रकाश परिणाम (Light effect) रंगसंगती, अक्षराचा टाईप, ठळकपणा, गोंडसपणा, देखणेपणा, क्रम, मजबुती . सारे जपताना आपला नफा आणि वेळ यांचा विशेष विचार करता निर्मितीतील सुबकपणा आकर्षकता यांच्या जोडीला सौंदर्य आणि आस्था याचा प्रत्यय आणून देत ते आपली असाइनमेंट पुरी करतात. हे ते आहेत. अशोक आणि विनय (आता अशोक जतीन) . जे. आर्टस् स्टुडिओचे दोन कल्पक आणि मेहनती आधार विनय अरोंदेकरांचा परिचय फार पुढे जाऊ शकला नाही. तरी त्यांचे सहकार्य व्यक्तीमत्त्व आकर्षक आहे. हे सहज समजण्यासारखे आहे. पण विषय अशोक अरोंदेकरांचा आहे. त्यांचा सहवास अधिक घडला म्हणून व्यक्तिवैशिष्ट्ये अधिक कळली एवढेच.

   1976 साल होते. आमच्या कंपनीने हरित चेंबूर योजना कार्यान्वित केली होती. त्या योजनेला एक बॅनर द्यायचा होता वृक्ष प्रतिक म्हणून वापरायचे होते. सौंदर्याचे, औदार्याचे सुखशांती आणि स्वस्थता अनुभवू इच्छिणार्या समाजाला दिलासा देण्यासाठी वृक्षमैत्री सारखे दुसरे औषध आजही उपलब्ध नाही. वृक्ष निसर्गाचे देणे आहे. त्याची अनेक रूपे आहेत. अनेक प्रकार आहेत. ही सारी रूपे मानवाला भावणारी जपणारी आहेत. अथ पासून इतिपर्यंत साथ करणारी आहेत हे सर्व परिणाम दृश्य करणारे वृक्षाचे चित्र बॅनरवर  यायचे होते. कपड्याचा रंग त्यावरचे डिझाइन ठरवायचे होते. कपड्याचा पोत, त्यावर वापरावयाचे ऑइल कलर्स, बॅनरची साईज हे सारे अगोदर ठरवायचे होते. कारण पंच हवा होता. तो बॅनर अशोक अरोंदेकरांनी डिझाईन केला तयारही करून दिला. योजना सुरू झाली. आज त्याला 40 वर्षे होऊन गेली. परंतु कल्पकपणे रंगवलेला वृक्ष हरित चेंबूर ही अक्षरे आजही वृक्षप्रेमींच्या मनात रूतून बसली आहेत. एक बॅनर तो काय पण तो बनवताना अरोंदेकर कसा विचार करतात आणि कसा परिणाम साधतात हे पाहण्यासारखे आहे.

   दिल्लीच्या प्रगती मैदानावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित होतो. त्यात प्रदर्शने असतात. आमची कंपनीही कधी स्वतंत्ररित्या तर कधी इतर खत कंपन्यांच्या संगतीने खर्च विभागून या प्रदर्शनात भाग घेत असते. हल्ली थोडे कमी आहे. परंतु पूर्वी हे दरवर्षी असायचे. त्यात ज्या ज्या वेळी अरोंदेकर हे नाव असायचे त्या त्या वेळी काम वेगळे वाटायचे. आकर्षक, चमकदार, कोरे मजबूत त्यातील सार्या अंगांचा विचार त्यांनी केलेला असायचा.  त्यांनी उभ्या केलेल्या पॅव्हिलियन्स आतली रचना मजबूत असायची. पॅनल्स, त्याबद्दलच्या टाइल्स, कॉपी यांचा रंग सौंदर्य ताजे असायचे. विजेची जोडणी पक्की सुरक्षित असायची. थातुर-मातुर कच्चे काम त्यांना चालतच नाही. त्यांची स्ट्रक्चर्स उभी राहताना सुरक्षितता महत्त्वाची असे. माणसे आणि वस्तू ते जीवापाड सांभाळतात. आणि तरीही वेळापत्रकाप्रमाणे सारे करून ठरल्या  वेळेअगोदर प्रदर्शन वा दालन तुम्हाला सुपूर्द करतात. तक्रार करण्यासाठी कुरबुरीसाठी काही वावच नसतो. चोख काम चोख दाम याबद्दल ते दक्ष असतात. 1980 च्या सुमारास मला हे सारे नवीन होते. अमुक एक प्रदर्शन असेल तर ते उभे करताना पॅनलचा क्रम, त्यावरची दृश्ये, कॉपी, डिझाईन, प्रकाश योजना, प्रवेश करण्याची बाहेर जाण्याची सोय, छताचा रंग, आधार, सेंटर डिस्प्ले, रिसेप्शन टेबल, लिटरेचर, व्हीजीटर्स बुक, हॉर्टिकल्चर डिसप्ले, फ्लोअरिंग, त्याचा रंग प्रकार डिझाईन, फॉलो अप हे सारे काही माहित नव्हते. मी नुकताच अमोनिया उत्पादन विभागातून बदलून जनसंपर्क विभागात आलो होतो. पण अरोदेकरांबरोबर प्रदर्शने करताना केवळ कंपनीचे प्रतिनिधित्व करता त्यांना गुरू मानून राहिलो. प्रत्येक टप्प्यावरचे बारकावे समजून घेतले. केव्हा-कुठे-कसे-असेच का - तसे का नको अशा अनेक प्रश्नांना त्यांनी कंटाळता समाधानकारक उत्तरे दिली प्रात्यक्षिकेही दाखविली. त्यांनी केलेल्या आमच्या कामांना अनेक पारितोषिकेही मिळाली. कालांतराने प्रदर्शन उभे करणारा कोणीही असला तरी त्याला प्रश् विचारण्याइतकी कंपनीतील विविध सभांमध्ये स्पष्टीकरणे देण्याइतपत हिंमत कमावणे मला शक्य झाले. आज राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रदर्शने आयोजित करण्याइतपत अनुभव ज्ञान होऊ शकले याचे बरेचसे श्रेय अशोक अरोंदकरांचे आहे. आपणास अशी व्यक्ति भेटली याबद्दल आनंद वाटावा असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

   अरोंदेकर अतिशय कामसू आहेत. निर्व्यसनी सरळ स्वभाव; आपल्या कामाबद्दल प्रचंड आत्मविश्वास, निवडून, पारखून घेतलेली माणसे नियोजन - कृति - मूल्यमापन असा ध्यास ही त्यांची शक्तीस्थाने आहेत. मोठ्या कामांनी ते दचकत नाहीत छोट्या कामांना ते कमी लेखत नाहीत. प्रत्येक गोष्ट मन लावून करण्याच्या त्यांच्या दृष्टीमुळे त्यांना कमी प्रतीचे काही करताच येत नाही.

   या सर्वांमुळे I.S.I. मार्क साठी त्यांची त्यांच्या क्षेत्रात निवड झाली. तरी आश्चर्य वाटायला नको. अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही तर मात्र त्यांचा तापटपणा जागृत होतो. तथापि पुन: स्ट्रीमलाईन करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. मृदु संभाषण आणि कार्यतत्परता यामुळे आज ते स्पर्धेत टिकून आहेत. अनेक कंपन्या, व्यक्ति, संस्था सरकार यांची कामे ते घेत आहेत, यशस्वीरित्या पुरी करीत आहेत.

   अरोंदेकर बहुदा आपल्या कामाविषयीच तुमच्याशी बोलतात. जनरल गप्पा कधीतरी मारतात पण त्यात ते रमत नाहीत. इतरांनी-ही ते करता आपला वेळ सत्कारणी लावावा असे त्यांचा चेहरा सतत सांगत असतो. वैयक्तिक माहिती देणे वा त्यावर बोलणे त्यांना रूचत नसावे. कदाचित ऑस्कर ने म्हटल्याप्रमाणे इतरांना तुम्ही जेवढी माहिती देणे आवश्यक असेल तेवढीच द्या. तपशीलात शिरू नका. याची त्यांना सतत आठवण असेल. कुटुंब आणि व्यवसाय, मनाच्या आवडी-निवडी आणि व्यवसाय, आपल्या वैयक्तिक अडचणी आणि व्यवसाय यातला फरक ते ओळखतात. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांनाही अनेक तडजोडी कराव्या लागत असतील. आशा, अपेक्षा, आकांक्षा यांचे दफन करावे लागत असेल. तथापि तुम्ही दूरध्वनीवर अथवा वैयक्तिक जाऊन त्यांना भेटलात तर हसतमुखाने अरोंदेकरांच्या शैलीदार कमावलेला आवाज तुमच्या कानावर येईल - "हॅलो, अशोक अरोंदेकर स्पीकिंग किंवा वेलकम टू अरोंदेकर आर्टस् स्टुडिओ !" आणि काम सुरू होण्याअगोदरच ते पूर्ण झाले की काय असा संभ्रमयुक्त दिलासा तुम्हाला मिळेल. इतरत्र अशी माणसे नाहीत असे नाही पण त्यांची संख्या आणि ताकद कमी होत चालली आहे. अशी रूखरूख मात्र वाटत राहते.

No comments:

Post a Comment