Saturday, November 21, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ३५,३६,३७: डॉ. कल्पना कुलकर्णी

 

 भाग ३५: आठवण

 

हल्लीच्या घरांना “लॅच” नावाचं जास्त सुरक्षा देणारं जे कुलूप असतं त्याची मला खूप दहशत आहे. “आई दारात, बाळ घरात, वारा जोरात” असा घटनाक्रम घडतो आणि हे लॅच हमखास लागून जातं. किल्ली कधी कमरेला नसतेच, मग तो हलकल्लोळ! प्रत्येकाच्या ओळखीत कधी ना कधी अशा गोष्टी घडलेल्या असतातच. मी अशा गोष्टी ऐकून धडा शिकले. आमच्या लॅचची जास्तीची किल्ली अडीअडचणीच्या वेळी मिळावी म्हणून शेजारी आजींकडे ठेवून दिली. एक दिवस माझी रोजची किल्ली हरवली म्हणून या ठेवणीतल्या किल्लीची मला आठवण झाली. आजीकडे किल्ली घ्यायला गेले तर आम्हाला कुणालाच किल्ली लवकर सापडेना. हरवायला नको म्हणून ती खूप व्यवस्थित कुठेतरी ठेवलेली होती. त्या दिवसानंतर आम्ही सगळ्यांनी ते “व्यवस्थित ठिकाण” नीट लक्षात ठेवलंय.

“तरी तू जागा चुकलासी” असा अनुभव खूपदा येतो. मागे एकदा माझं एम.डी.च्या डिग्रीचं मोठ्ठं भेंडोळं सापडेना. सगळ्या फाईल्स, कपाटं, बॅगा दहा वेळा उचकून झालं. शेवटी कंटाळून युनिव्हर्सिटीतून डुप्लिकेट आणायचं ठरवलं. मध्ये काही दिवस गेले आणि सहज म्हणून व्ही.सी.आर. मधील कॅसेट बदलायला गेले तर सगळी मोठ्या आकाराची सर्टिफिकेटस् चुरगाळू नयेत म्हणून व्ही.सी.आर. खाली नीट रांगेत पसरून ठेवलेली दिसली. त्या दिवशी कॅसेट बदलायला म्हणून व्ही.सी.आर. चा खण मी उघडला नसता आणि त्या सर्टिफिकेटस्वर माझी नजर पडली नसती, तर बहुधा डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळविण्याचा सगळा सोपस्कार मी केला असता. खरं तर त्या आधीही किती वेळा तरी मी तो खण उघडला होता; पण तेथे व्ही.सी.आर. व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे माझ्या डोळ्यांना आणि मेंदूला कधी जाणवलंच नव्हतं.

अशा गोष्टी घडू नयेत म्हणून महत्त्वाच्या गोष्टी कुठे आहेत याच्या नोंदी डायरीत वगैरे करून ठेवाव्यात अशी एक बहुमूल्य सूचना मला मध्यंतरी मिळाली; पण कोणती गोष्ट कधी लागेल आणि किती महत्त्वाची हे कसं ठरवायचं आणि शिवाय ती नोंदी केलेली डायरी कुठे ठेवली ते कुठे नोंदवायचं?

हे फक्त वस्तुंबाबतच होतं असं नाही. कधी कधी एखाद्या कुठल्या घटनेनं आपण आपल्या मनातल्या कुठल्या आठवणी, कुठल्या व्यक्ती, कुठल्या ओळी कधी धुंडाळायला लागतो ते कळतच नाही. जोपर्यंत ते हरवलेलं सापडत नाही, तोपर्यंत दिवस-रात्र मनात एकच चलबिचल असते. अस्वस्थता अगदी शिगेला पोहोचते. आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन सापडलं, सापडलं म्हणता निसटलेले हेलकावे वाढत जातात आणि ध्यानीमनी नसता “आज अचानक गाठ पडे...” स्थिती येते. जणू आठवणींनी शिणलेल्या मनावर हळुवार फुंकर!


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग  ३६:सवय

 

“माणूस सवयीचा गुलाम आहे” हे वाक्य मी नेहमीच ऐकत आलीये. एखादा शब्द, एखादं वाक्य नकळत मनात धरून ठेवायचं आणि मग दिवसभर तेच विचार...ही माझी एक जुनी सवय. त्यानुसार आज मी “सवयी”लाच चिकटून बसलीये.

आपल्याला बहुतेक सर्वांनाच चहाची सवय असते. “सकाळी उठल्या उठल्या चहा हवाच”, हे वाक्य आपण कितीदा ऐकतो. या सकाळच्या चहापायी एकदा आम्ही एका नवख्या गावात उठल्या-उठल्या हातात दुधासाठी भांडं घेऊन गोठा गाठला होता; कारण तिथे तयार चहा मिळणं शक्य नव्हतं आणि चहा तर हवाच होता. त्यामुळे गोठ्यातून दूध आणण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. (मिल्क पावडर वगैरे तेव्हा खूप बोकाळलं नव्हतं.) तेव्हा तो गोठा शोधत फिरताना अगदी वाटलं होतं, अजिबात अशी चहाची सवय नसावी, पण...! बरं, तो चहा तरी सगळ्यांना एकसारखा कुठे चालतो? कुणाला अगदी भरपूर दुधाचा, मसाल्याचा आटवलेला अमृततुल्य चहा हवा तर कुणाला अगदी पाणीदार “लाईट” चहा हवा. पुन्हा बिनदुधाचा, लिंबू पिळलेला...असे प्रकार आहेतच.

आम्ही जैसेलमेरच्या वाळवंटात सूर्यास्त पाहायला गेलो होतो. तिथे चहाची तलफ आली म्हणून त्या उंटांच्या गराड्यात चहा प्यायलो तो अवर्णनीय होता. ती चव तिथल्या खारट पाण्यामुळे की सांडणीच्या दुधामुळे (तिथे तेच दूध मिळतं असा आमचा समज) ते देव जाणे! पण त्यानंतर काही महिने तरी माझी चहाची सवय मोडली होती. या चहापुराणावरून आठवलं. आमची गोल्डी (कुत्री) जेव्हा आणली तेव्हा ते छोटं पिलू होतं. ज्यांच्याकडून आणली त्या बाईंना विचारलं की तिच्या काही खास सवयी आहेत का? त्यांनी सांगितलं की दुपारी चार वाजता तिला कॉफी लागतेच बघा. तिची कॉफीची सवय मी मोडायची ठरवली. ती मोडताना मी तिला संध्याकाळच्या पाचच्या चॉकलेटची सवय लावून बसले.

रेडिओ ऐकत काम करण्याची माझी जुनी सवय. एखाद्या दिवशी रेडिओ बंद पडला तर (प्रायोजक - विद्युत महामंडळ, सबब-भारनियमन) सगळ्या कामावर पाणी! वेळापत्रक चुकलंच म्हणून समजा. दुपारी फक्त पाच मिनिटं डोळा लागण्याची अशीच एक घातक सवय. “त्या”च पाच मिनिटांच्या दरम्यान एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये वगैरे असले की डोळे उघडे ठेवताना कसे नाकीनऊ येतात म्हणून सांगू?

बोलताना काही विशिष्ट शब्दांच्या काहींना सवयी असतात. आमचे एक सर दर वाक्यात “बरं का” म्हणायचे. त्यांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष होऊन, सर “बरं का” किती वेळा म्हणतात हे मोजण्याची सवय आम्हाला कधी आणि कशी लागली हे कळलंच नाही.

अशा आपल्याला असणार्‍या सवयीशिवाय काही गोष्टी, काही माणसं आपल्या सवयीची होऊन गेलेली असतात. बागेच्या कुंपणावर पसरलेली जाईची वेल रोजच्या सवयीची. मध्यंतरी वेल छाटली. सवयीचं हिरवंगार कुंपण ओकंबोकं दिसू लागलं. त्या बिनवेलीच्या कुंपणाची सवय व्हायला मला कितीतरी दिवस लागले. वटवृक्षांच्या सोबतीचा सिंहगड रस्ता सवयीचा होता. मध्यंतरी रस्ता रुंदीकरणाच्या निमित्तानं ती सगळी झाडं तोडली गेली. हल्ली त्या रस्त्यानं जाताना बिनओळखीचीच भावना असते.

थोडक्यात सवय कशाचीही असू शकते. चांगली अथवा वाईट सवय हेही सापेक्षच असतं. “सवय” आणि “व्यसन” यातील सीमारेषाही अतिशय पुसट असतात. याचनुसार “वाचन” आणि “व्यायामा”सारख्या सवयींच्या अतिसेवनामुळे या बाबतीत सवयींची सीमा ओलांडून मी व्यसनग्रस्त ठरते. या दोन्ही सवयी आजूबाजूच्या सगळ्यांना लावण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. आता माझ्या जहाल प्रयत्नांची सवय झालेले आजूबाजूचे सगळेच माझ्यापासून पळ काढत असतात. निदान “व्यायामा”ला तरी ते “सवयी”तून “व्यसना”त ढकलू इच्छित नाहीत.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग  ३७: क्रॉस कनेक्शन

 

माझं आणि मैत्रिणीचं फोनवरचं संभाषण अगदी रंगात आलेलं होतं. मध्येच जाडा-भरडा आवाज ऐकू आला. “कापसाच्या किती पेंड्या पोहोचल्या?” मी दचकलेच. आम्ही नक्कीच कापसाबद्दल बोलत नव्हतो. आमचं संभाषण बाजूला पडलं आणि त्यानंतर कापसाच्या बाजारभावापासून पेंड्या उतरवून घ्यायच्या व्यवस्थेपर्यंतच सगळं संभाषण आम्ही यथासांग ऐकलं. टेलिफोनच्या क्रॉस कनेक्शनमुळे! बहुतेक वेळा वैताग देणारं हे क्रॉस कनेक्शन कधीकधी खूप करमणूकप्रधान ठरू शकतं.

आपल्या स्वत:च्या मनात खूप क्रॉस कनेक्शन्स दडलेली असतात. कधीतरी अचानक ती समोर येतात आणि आपण किती असंबद्ध संबंध लावलेत हे जाणवतं.

सुधीर फडके गेले तेव्हाच्या त्या दु:खाच्या उमाळ्यात मला आमच्या सरांचे सासरे (ज्यांना मी ओळखतही नाही) आठवले. क्रॉस कनेक्शन कसं, तर आजोबांना सुधीर फडकेंचा “वीर सावरकर” सिनेमा पाहायचा होता. आजोबांना वयोमानानुसार कमी ऐकू येतं. त्यामुळे सिनेमातले संवाद त्यांना कसे समजणार याची चर्चा मी आणि सरांनी सिनेमा लागल्या लागल्या केली होती.

आम्हाला बारावीत फिजिक्समध्ये र्डेीपव (ध्वनी) चा धडा शिकवायला सुरुवात करताना आमचे सर आधी आम्हाला देवआनंद-साधनाच्या “हम दोनों”मधल्या “अभी ना जाओ छोडकर...” या गाण्याचं लायटरच्या म्युझिकसकटचं पूर्ण दृश्य सांगून हिरो कसा पाण्यात दगड टाकतो, मग कसे पाण्यात दूरवर तरंग उठत जातात, असं सविस्तर सांगायचे आणि मग त्या श्राव्य चित्राची सांगता करून म्हणायचे, र्डेीपव ुर्रींशी त्या पाण्यातल्या तरंगाप्रमाणेच असतात. हे भन्नाट क्रॉस कनेक्शन माझ्या लेखी आयुष्यभरासाठी पक्वं आहे. (आता र्डेीपव चे प्रॉब्लेम मात्र पूर्ण विसरलेत.)

माझ्या मेडिकलचा सगळा अभ्यास मी गाणी ऐकत करायचे. वाचत असलेल्या पुस्तकातल्या पानावर काही ओळी किंवा कधी कधी पूर्ण गाणं लिहायचे. अजूनही जेव्हा कधी त्या पुस्तकांमधलं काही आठवायची वेळ येते तेव्हा त्या अमूकअमूक गाणं लिहिलेल्या पानावर ही माहिती आहे, अशी “द्राविडी प्राणायाम”आठवण येते.

मध्यंतरी मी ब्रेन ट्युमर शिकवताना मुलांसमोर अमिताभच्या “मजबूर”ची आठवण काढता काढता त्याला ब्रेन ट्युमरमुळे चक्कर येऊन त्याच्या हातातला फिश टँक पडून फुटतो या फ्रेमवर थांबले. फिश टँक आणि ब्रेन ट्युमर हे क्रॉस कनेक्शन मी मुलांच्या मनावर नकळत ीींरपीलीळिीं तर नव्हते करत?

परवा चहा पिताना कधी नव्हे ती आमची अमावस्या-पौर्णिमेची चर्चा चाललेली आणि अचानक मला माझा बालमित्र प्रभव आठवला. हे कुठलं क्रॉस कनेक्शन? आठवणी धुंडाळल्या आणि, साखळी जुळली - “प्रभव-पौर्णिमा चहा” आमच्या लहानपणी मुलांनी चहा पिणं महापाप समजलं जायचं; पण आम्हा प्रत्येकाला त्याचा मोह तर व्हायचाच. एकदा आम्ही खेळत असताना माझ्या आईनं प्रभवला विचारलं. “चहा घेतोस का तू?” त्यावर विचार करून (?) तो बालजीव उत्तरला, “नेहमी नाही घेत. फक्त पौर्णिमेलाच घेतो. आज पौर्णिमा आहे.” तेव्हा शाळेत नुकत्याच शिकलेल्या तिथींच्या ज्ञानाचा इतका व्यवहार्य उपयोग. एक कप चहासाठी चंद्र वेठीला धरला गेला होता.

तर थोडक्यात “त्या” आम्हा दोघी मैत्रिणींच्या फोनमधल्या क्रॉसकनेक्शननं माझ्या मनातल्या किती तारा जुळल्या. कापसाच्या पेंढ्यांची खरखर ऐकून वैतागलेलं मन कसं रेशमाच्या लडीसारखं मऊसूत झालं.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

No comments:

Post a Comment