Saturday, November 7, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ३२,३३,३४ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 



भाग ३२: मनाचे संकल्प

 

“नेमेचि येतो पावसाळा” या चालीवर दिवसांमागून दिवस, महिने, वर्षे उलटतच असतात. सुधीर मोघे म्हणतात तसं

“काळ धावे म्होरं म्होरं, जणू वाघ लागे पाठी

त्येच्या जोडीनं धावनं हेच मानसाच्या हाती...”

कालचा दिवस मागे टाकून रोज उठून धावताना “मागील पानावरून पुढे चालू” असे आयुष्याचे रकाने भरताना आपण मागे वळून पाहतच असतो. सरत्या वर्षाचा निरोप घेताना वर्षभरात घडलेल्या घटनांचा आपण अगदी बारकाईने मागोवा घेतो. पण, त्या घटनांबरोबरच्या भावनिक आवर्तनांना आपण कायमच मागे ढकलतो आणि भूतकाळाचं ओझं वाढवतो. भूतकाळाचं कडू-गोड ओझं घेऊनच वर्तमान चालत आपण भविष्याकडे वाटचाल करतो. हे ओझं घेऊन ऊर फुटेस्तोवर धावताना ते कुठे तरी टेकवून विश्रांती घेण्याची नितांत गरज असते. “वर्ष-अखेरी”च्या या थांब्यावर जरा ते ओझं थोडं टेकवलं तर?

आर्थिक, सामाजिक, राजकीय, कला-क्रीडा या अनेक सार्वजनिक गोष्टींचा तसंच थोड्याफार प्रमाणात वैयक्तिक गोष्टींचा आपण “गेल्या वर्षा”तला आढावा घेतो आणि नवीन वर्षासाठीचे संकल्प सोडतो. हे करतानाच जुन्या गोष्टींची आवराआवर करतो. तसंच कधी तरी अस्ताव्यस्त झालेलं मनही आवरायला पाहिजे. घरातल्या वस्तूंची वर्गवारी करून वस्तू जागच्या जागी ठेवून आपण घर आवरतो. तसेच मनातले सगळे कानेकोपरे धुंडाळून मनातलं सगळं काही जागच्या जागी जायला पाहिजे. आठवणींचे वेगवेगळे कप्पे व्हायला पाहिजेत. जपून ठेवायच्या आठवणी वेगळ्या काढून बकुळफुलागत सांभाळण्याच्या कप्प्यांत अलगद ठेवल्या पाहिजेत. जरासुद्धा नको वाटणार्‍या, अडगळीतल्या सामानासारख्या असणार्‍या ठसठसतं दु:ख देणार्‍या गोष्टी तातडीने मनाच्या बाहेर फेकल्या गेल्या पाहिजेत, त्या ठसठसण्याचा निचरा व्हायला पाहिजे. रोजच्या वापरातल्या वस्तूंसारख्या लागणार्‍या रोजच्या व्यावहारिक आठवणी सहजासहजी उघडणार्‍या मनाच्या खणात संगतवार रचल्या पाहिजेत.

“क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात”

हातातून निसटून गेलेल्या कित्येक क्षणांसाठी जीव हळहळत राहतोच. त्या दूरवर गेलेल्या क्षणांकडे मागे वळून बघताना, त्या क्षणांपासून स्वत:ला वेगळं काढून त्याचं विश्‍लेषण करता आलं पाहिजे. रिकाम्या ओंजळींचा आदर करता आला पाहिजे. भविष्यात  रिकाम्या झालेल्या ओंजळी पुन्हा भरण्याची उमेद वाढवता आली पाहिजे. खपली निघून जखम भळभळण्याची भीती न बाळगता मनाचं उत्खनन जमलंच पाहिजे. स्वत:च्या मनाशी संवाद साधता आलाच पाहिजे. “नवीन वर्षात सायकल चालवायची” किंवा “रोज फिरायला जायचं” या चालीचे अनेक संकल्प वर्षानुवर्षे जुन्या वर्षाला निरोप देताना आपण सोडत असतोच. त्या व्यतिरिक्त काही “मनाचे संकल्प” आपण का सोडू नयेत? नवीन वर्षात मनाच्या आरशात स्वत:ला न्याहाळायचं. मन मारत आजपर्यंतचे दिवस ढकललेत. इथून पुढे मनाचे थोडे लाड करायचेच. किमानपक्षी छोट्या छोट्या गोष्टींवरून मनाला दुखवायचं तरी नाही, असं आपण का ठरवू नये? “रोजनिशी लिहायचा” संकल्प सोडणे हा अजून एक खूप लाडका पायंडा! पण, बहुतेक सगळ्याच रोजनिशीची पानं आर्थिक, सामाजिक हिशेबांचीच असतात. सार्वजनिकदृष्ट्या लेबल केलेल्या वैयक्तिक फायद्या-तोट्यातच ती संपून जातात. तसं न होता या रोजनिशीच्या संकल्पातून स्वत:लाच भेटत गेलो तर? या निमित्तानं घडणार्‍या स्वत:च्याच गाठीभेटीतून स्वत:चीच सोबत मिळवली तर? वेगवेगळ्या आधारांच्या सोबतीने आजपर्यंतची वाटचाल झाली. पण, ते कुठवर पुरणार? म्हणूनच कुठल्याही आधारांशिवाय स्वत:चं मन भेटेल त्या दिवसापासूनचा आयुष्याचा मुलूख स्वत:च्याच मनाला तोडून देऊयात. आजवर रिकाम्या झालेल्या ओंजळींशी इमान राखत, मनाच्या हातात हात गुंफत विश्‍वासाने भविष्याला सामोरे जाऊयात. या संकल्पासाठी यंदाचा हा वर्षारंभाचा दिवस आयुष्यातल्या प्रवासातला मैलाचा दगड ठरवूयात.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग ३३: 
खिडकी

एका पार्टीत एक खेळ चालला होता. वेगवेगळे शब्द दिले जात होते. एखादा शब्द उच्चारल्यावर मनात जे काय येतं ते लगेचच एका मिनिटात सांगायचं. माझ्यावर शब्द आला, “खिडकी”. प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेसारखं मला आठवलं. ते किशोरचं लटक्या तक्रारीचं गाणं, “मेरे सामनेवाले खिडकी में एक चाँद सा मुखडा रहता है...” याच गाण्याचं लहानपणी पाठ केलेलं “दूधवाला भय्या रहता है..” हे विडंबनही लगेचच समोर आलं. “पलभरके लिए कोई हमें प्यार कर ले...” म्हणत वेगवेगळ्या खिडक्यांमधून डोकावणारा देव आनंद डोळ्यांसमोर आला. (त्या खिडक्या मोजण्याचा मी आतापर्यंत खूपदा प्रयत्न केलाय. दरवेळी वेगळीच मोजदाद होते.) हिंदी फिल्मी संगीतावरची निष्ठा सिद्ध केल्यानंतर कितीतरी वेगवेगळ्या “खिडक्यां”नी आपल्या मनात घर (?) केलंय हे जाणवलं आणि हा “खिडक्या”चा ऐवज मिनिटभरापेक्षा खूपच जास्त आहे हे मला कळून चुकलं.

हिचकॉकचा “रिअर विंडो” नावाचा सिनेमा तर नावातच “खिडकी” घेऊन बसलाय. फक्त एका खिडकीतून दिसणार्‍या विविध घटनांमधून एका खुनाचा शोध लावणारा तो सिनेमा अद्भुतच होता.

सिनेमाव्यतिरिक्त प्रत्यक्षात जयपूर-जोधपूरचे स्वप्नवत कलाकुसरीचे किल्ले-राजवाडे पाहताना कितीतरी नक्षीदार खिडक्या मी छायाचित्रांमध्ये बंदिस्त केलेल्या आहेत असं मला आठवलं. पण त्या राजस कलाकृतींना “खिडकी” म्हणवेना. त्याऐवजी “गवाक्ष”सारखा राजवर्खी शब्द वापरावासा वाटला.

राजस्थानातल्या त्या गवाक्षांमधून बाहेर झेपावून आपल्या साध्या घरांच्या खिडक्यांवर मी स्थिरावले. आपल्या खिडक्यांची ख्याती काय वर्णावी? बंद दारांच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणार्‍या आमच्यासाठी या खिडक्या म्हणजे निसर्गात डोकावण्याचे “झरोखे”च. खिडक्यांमध्ये ऊन येते म्हणून आमची कुंडीतली तुळस आणि बाटलीतला मनीप्लांट शेजारीशेजारी दाटीवाटीनं खिडकीत विसावतात. याच खिडकीत आमच्या बाळासाठी चिऊ-काऊ येऊन बसतात आणि एखादी धिटुकली खारोटी आत डोकावते. खिडकीत उभं राहून चिऊ-काऊंबरोबरच आमच्या बाळालाही घास भरवले जातात. आमच्या बाळाचे कपडेही याच खिडकीच्या गजांवर वाळतात. बंद, सरकत्या काचांच्या खिडक्यांमधल्या फटींतून जागा करून उन्हाची तिरीप घरात घुसते आणि ऊनसावलीचा खेळ रंगतो. हा खेळ मांडणारा, तो छोटा-मोठा होणारा उन्हाचा कवडसा. अमृता प्रीतमच्या “धूप का तुकडा” ची आठवण हमखास जागवतो.

पण याही पलीकडे, आमच्या झपाट्यानं बकाल होणार्‍या शहरी वस्त्यांमध्ये “खिडक्यां”चं अनन्यसाधारण असं वेगळंच महत्त्वाचं स्थान आहे. याच खिडक्यांमधून घरातला केरकचरा बाहेर भिरकावून आम्ही घर स्वच्छ ठेवत असतो. खिडकीखाली साचणार्‍या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आणि त्याचबरोबर वाढणार्‍या डासांच्या फौजांमुळे हैराण होऊन आम्ही आमच्या खिडक्या बंदच ठेवतो. खिडकीतून येणार्‍या वार्‍याला थोपवतो आणि घरात वारा खेळवण्यासाठी पंखे किंवा एसी बसवतो. अशा “एसी”वाल्या घरांच्या खिडक्यांचं अस्तित्व जाड पडद्यामागं लपून जातं, हे मला माझ्यावर आलेलं “खिडक्यां”चं एक मिनिट संपता संपता आठवल्याशिवाय राहिलं नाही.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ३४: स्वप्न

 “पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला, फिरसे तो फरमाना, नैनों ने सपनों की मैफिल सजायी है, तुम भी जरूर आना...”

गोरज मुहूर्त बघून, स्वागताची जय्यत तयारी करून, लाडिकसं आमंत्रण देऊन स्वप्नांची सुंदर मैफल सजणार...जीव ओवाळून टाकावासा वाटतो या कल्पनेवर! गाण्याच्या मैफिलीत कशी वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी गाणी फुलतात, तशी हवी तेव्हा हवी ती स्वप्नं दिसली तर? पण या अशा कवी कल्पना माझ्या वाट्याला स्वप्नातसुद्धा येत नाहीत.

माझ्या आठवणीत मला स्वप्नंच क्वचित पडतात. “कावळ्याची झोप तुझी, स्वप्नं पडायला झोपेत तरी वेळ असतो का तुला?” अशी शालजोडीतली कारणमीमांसा त्यासाठी तयारच आहे. तरी क्वचित केव्हातरी “मनी वसे ते स्वप्नी दिसे” याची प्रचिती देणारी काही थोडीफार स्वप्नं मला पडलीयत. म्हणजे कसं की गावाला जायचे बेत ठरत असले की स्वप्नात हमखास माझी गाडी चुकते, तिकीट हरवतं. परीक्षेच्या दरम्यानची स्वप्नंही ठरलेलीच असतात. स्वप्नांत मी कायम गणिताच्या पेपरला इतिहासाचा अभ्यास करून जायचे. सुट्टी आहे असं समजून माझा पेपर बुडायचा.

खरंच मनात सतत असलेलंच स्वप्नात दिसतं का? बहुधा असावं. अन्यथा माझ्या एका मैत्रिणीच्या स्वप्नाची काही संगतीच लावता येणार नाही. ही माझी मैत्रीण अगदी पक्की भांडवलशाही विरोधी. एका मोठ्या कारखान्यात नोकरी करते. तिला एकदा स्वप्न पडलं की, ती तिच्या कारखान्याच्या मालकांच्या घरी गेली तर त्यांचं घर म्हणजे एक छोटासा तीन रूमचा फ्लॅट! प्रत्येक मोठ्या शहरात आलिशान बंगला असणार्‍या त्या कारखानदाराला तिनं स्वप्नात का होईना; पण छोट्याशा मध्यमवर्गीय घरात राहायला लावून आर्थिक समानता आणलीच ना!

माझ्या दुसर्‍या एका मैत्रिणीनं मागे मला सांगितलं होतं की, ती केरळच्या ट्रीपला जाऊन आल्यानंतर तिथली ती जिवंत निसर्गचित्रं तिला स्वप्नात दिसत होती. कॅसेट रिवाईंड करून परत सिनेमा पाहावा तसा फिरून पाहिलेला प्रदेश पुन्हा स्वप्नात पाहायचा. या कल्पनेवर मी बेहद्द खूश झाले. मी स्वत: फिरून पाहिलेले आणि आवडलेले प्रदेश त्याचबरोबर न फिरताच पाहिलेले आणि आवडलेले प्रदेशही (हिंदी सिनेमा झिंदाबाद) मनात आठवून ठेवले. दिवसभर मनाशी एकच खूणगाठ, आज रात्री स्वप्नात यापैकी कुठेतरी फिरायला जायचंय, पण कसलं काय! पदरी निराशाच आली.

स्वप्न बघण्याचा हा सिलसिला कधी जमलाच नाही तरी स्वत:ची काही छोटी-मोठी स्वप्न असण्याचा प्रयत्न आणि ती प्रत्यक्षात आणण्याची धडपड मी मन:पूर्वक करते. त्यातलंच एक आहे चांगलं माणूस बनण्याचं. “स्वप्नांच्या वाटेवर स्वप्नांची सोबत” या आधारानं या स्वप्नपूर्तीचं स्वप्न मी सततच माझ्या डोळ्यांत जागवतीये.

 ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

2 comments:

  1. खूपच छान लेख.
    धन्यवाद .
    अस्मिता फडके, पुणे

    ReplyDelete
  2. हे सर्व स्फूट अतिशय छान आहेत. कल्पना तू नवनवीन लिहित रहा. आम्हाला ते सर्व वाचावयास आवडेल.

    ReplyDelete