Saturday, December 10, 2022

देणाऱ्याची भूमिका ..


कट्टर तत्वनीष्ठ विंदा करंदीकरांची एका लेखक मित्राने सांगीतलेली एक आठवण.आयुष्यात एकाही पुरस्काराचे पैसे त्यांनी कधी घरी सोबत नेले नाहीत. पुरस्कार घेतल्या बरोबर तिथल्या तिथे कोणत्यातरी संस्थेला ते दान करुन टाकायचे. 

"आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. विंदा म्हणाले, " तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे? ", " टाटाच्या समोर, जवळच आहे. पाहायला जायचं आहे का कुणाला ? ", मी म्हणालो.

विंदाचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना 'शोधून' काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. "औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो."

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. " तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत? ". शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं. " असं बघा, घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय. अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत. अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही. शेवटी महत्त्वाचं काय? त्या व्यक्तीला मदत मिळणं ! कुणी केली हे नाही " .

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत. देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे. पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणं आणि " इदं न मम " असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे.

- माधव सावळे.

(स्रोत : कायप्पा )

Saturday, December 3, 2022

भारताचा युवा वैज्ञानिक : प्रताप

 

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग:

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत.  याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले कि त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही. प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्ट पासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग:

आय. आय. टी. दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने दुसरे पारितोषक पटकावले. त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा. जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते. हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते. प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता.  निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा... आणि घोषणा झाली 'आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे' त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले.  त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)  "रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन"  मध्ये त्याला सामावून घेतले आहे भारतीय 'बलस्य मूलं विज्ञानं' चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी !!

More Read @ https://www.leadcampus.org/rolemodels/prathap-n-m


Saturday, November 26, 2022

वानोळा


"घरी चाललाच आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!", वरिल वाक्य ऐकले आणि

 वानोळा शब्द मनात फिरत राहिला नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी. आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला !

 मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.  तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं. वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा. सगळ्यात विशेष म्हणजे "कैरीचं लोणचं." मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धतही तीच. तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी !!

थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्या च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची. एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची. आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं. हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत. 

जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली. मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.  सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..

माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते, तिच्या  गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते. तरी अजूनही तुमच्या माझ्या सारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच "वानोळा" असतो.

देत राहणाच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो... वानोळा.

स्रोत : कायप्पा 

Saturday, November 19, 2022

बोलावे ऐसे..

 



बोलावे ऐसे व्हावे जे रटाळ🥱

 नेमकेच वदावेका ठरावे वाचाळ !! 🤬

 

लिहावे ऐसेमांडावा मतितार्थ🎯

 कमी,अचूक शब्दांतउतरवावा अर्क !! 💧

 

ऐकावे ऐसेकी समजून घ्यावे,😊

 प्रतिक्रिया टाळुनीप्रतिसादा द्यावे !!😇

 

वर्तावे ऐसेजे बोलू ते चालावे😎

 गदारोळ टाळुनियाजगा शांतवावे !!😇

 

ऐसे गुणदर्शनेजनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽

अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯

 

रुपाली


Saturday, October 22, 2022

सिग्नलवरची दिवाळी ...


पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त,

या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत !


आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले,

काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले  चिमुकले ? 


सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची  न्याहाळत असते आकाशातील रोषणाई,

एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई !!


पुन्हा सिग्नल लाल, पुन्हा फिरफिर, भरकटलेली नजर मात्र अवकाशात,

हे सगळे नाही उतरत, वातानुकूलित, काचबंद वाहनातील मनांत !!       


आजतरी थोडावेळ नशिबाने द्यावी ना त्यांना थोडी उसंत?

थोडे उजळावे त्यांचेही चेहरे, थोडाकाळ मिटावी त्यांचीही  भ्रांत !!


दिसतो एखादा अनामिक चेहरा, एखाद्याचे जागृत मन, 

फराळाची पाकिटे आणि फटाके, त्यांना वाटणारा एखादाच जण !!


त्यांच्याही अंधारलेल्या चेहऱ्यांवर, उजळत जाते मग दिवाळी पहाट, 

'चूक-की-बरोबर'च्या हिशेबात न पडता, मीही पकडते तीच  वाट !!      


- डॉ.  रुपाली दिपक कुलकर्णी  

Saturday, October 8, 2022

लाल बहादूर शास्त्री

 भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व - लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर.

११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


प्रसंग १. 

देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची आई एका कार्यक्रमात पोचली. अर्थात तिला कोणीच ओळखले नाही. तिने चौकशी केली की, माझा मुलगा तिथे आला आहे. तुम्ही पाहिलं का? लोकांनी विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की तो रेल्वेत काम करतो.तिने केलेल्या वर्णनाचा कोणीही व्यक्ती तिथे कामाला नव्हता. अखेर तिने मुलाचे नाव सांगताच सर्वजण अवाक झाले. ते होते लाल बहादूर शास्त्री. लोकांनी तिला शास्त्रीजींजवळ नेले. शास्त्रीजी कार्यक्रमातून बाहेर आले. त्यांनी आईला बसविले, विचारपूस केली आणि घरी पाठविले.त्या दरम्यान त्यांना त्या कार्यक्रमात बोलायचे होते पण त्यांनी संयोजकांना हळूच नकार कळविला. आई घरी गेल्यावर लोकांनी शास्त्रीजींना विचारले की ते बोलले का नाही? त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावर अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांना सांगितले की, ते रेल्वेमंत्री आहेत हे त्यांच्या आईला माहिती नाही. ती फारशी शिकली नव्हती. आपला मुलगा केंद्र सरकार मध्ये इतका मोठा मंत्री आहे हे कळले असते तर तिने त्यांच्या नात्यातील गरीब, गरजू मुलांना नोकरीत लावण्यासाठी आग्रह केला असता.एकीकडे आईचा आग्रह मोडवला गेला नसता आणि दुसरीकडे ते ज्या तत्वाने,निस्पृहपणे जीवन जगत होते त्याचे पालन झाले नसते.

आज जगात आपल्या असलेल्या/नसलेल्या पदाबाबत शेखी मिरवणारे लोक आजूबाजूला पाहत असतांना शास्त्रीजींचे हे उदाहरण आगळेवेगळेच आहे.

प्रसंग २.

१९६५ मधली घटना आहे. स्थळ- दिल्लीच्या एका महाविद्यालयातील प्रवेशाची रांग. या रांगेत बराच वेळ उभा राहून चक्कर आल्याने एक युवक खाली कोसळला.ताबडतोब काही जणांनी धावत जाऊन त्याला पाणी पाजले आणि त्याचे नाव विचारले.नाव ऐकताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.ही बातमी महाविद्यालयाच्या प्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. युवकाचे नाव ऐकताच ते पण धावत आले.कोण होता हा युवक? की ज्याचे नांव ऐकून प्राचार्यही धावत आले? महाविद्यालयात तासनतास प्रवेशासाठी उभ्या असलेल्या या युवकाचे नाव होते - अनिल लालबहादूर शास्त्री! 

होय, देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा महाविद्यालय प्रवेशासाठी चक्क अन्य विद्यार्थ्यांबरोबर रांगेत उभा होता.या गोष्टीवर आज कोणीही विश्वास ठेवणार नाही.पण हे सत्य आहे.

प्रसंग ३.

१९६६ मधील घटना. पंतप्रधानांची दोन्ही मुले त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यांच्या खासगी मालकीच्या साध्या फियाट गाडीतून जाण्याऐवजी ते पंतप्रधान कार्यालयाची शेव्हरलेट इंपाला ही आलिशान गाडी घेऊन गेले. दुपारी जेवायला घरी आलेल्या पंतप्रधानांना त्यांच्या पत्नींनी ही गोष्ट सांगितली. परत आल्यावर मुलांना वडील नाराज झाल्याचे कळले. सकाळी मुले वडिलांसमोर येण्याची हिम्मत करीत नव्हते. शेवटी वडिलांनीच दोघांना आणि त्यांच्या खासगी सचिवांना समोर बोलाविले. पंतप्रधान कार्यालयाची गाडी काल दिल्लीत खासगी कामासाठी १४ किलोमीटर फिरली आहे. त्याचा शासकीय दराने जो खर्च झाला आहे तो माझ्या मानधनातून कापून घ्या असा आदेश झाला. इकडे दोन्ही मुलांची मान शरमेने खाली गेली. यापुढे अशी चूक करायची नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.ही दोन्ही मुले अर्थातच अनिल आणि सुनील शास्त्री होते आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.

हे अनिल शास्त्री आणि त्यांचे बंधू सुनील शास्त्री वडील पंतप्रधान असतांना देखील महाविद्यालयात बसने जात असत.शासकीय किंवा खासगी कारने नाही. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, राजकारण म्हणजे लांगूलचालन, राजकारण म्हणजे जातीपातीचा, धर्माचा वापर,राजकारण म्हणजे आपले खिसे भरून जनतेची लूट असाच सर्वसामान्य समज असतो.या साऱ्यांच्या पलीकडे स्वच्छ,निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक राजकारण ज्या मोजक्याच लोकप्रतिनिधींनी देशात केले त्यात लाल बहादुर शास्त्री यांचे नाव सर्वोच्च स्थानी होते,आहे आणि राहील.

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ चा. उत्तर प्रदेशातील मुगलसराय म्हणजे आताच्या पंडित दीनदयाल उपाध्याय नगरचा.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ असे मोजके दीड वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.पण आपल्या निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक कार्याने त्यांनी आपल्या कार्याचा ठसा देशात आणि जगात उमटविला. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी परराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्त्वाची खातीही दीर्घकाळ सांभाळली.

त्याआधी स्वातंत्र्यानंतर ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे संसदीय सचिव झाले. उत्तर प्रदेशातच पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात ते पोलीस आणि परिवहन खात्याचे मंत्री झाले. देशातील पहिल्या महिला कंडक्टरची नियुक्ती एस टी मध्ये करण्याचे श्रेय लालबहादूर शास्त्रींना आहे.दंगलीतील संतप्त जमावावर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज ऐवजी पाण्याच्या फवार्‍याचा वापर त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्याच प्रेरणेने आणि कल्पकतेने सुरु झाला. १९५१ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव झाले. १९५२,१९५७ आणि १९६२ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम केले होते. २७ मे १९६४ ला पंडित नेहरूंच्या अचानक निधनानंतर स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून देशाचे पंतप्रधान पद त्यांच्याकडे चालत आले.याच काळात पाकिस्तानने भारताशी युद्ध छेडले.त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती अशी दारुण स्थिती भारताने पाकिस्तानची केली. एरवी मेणाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्राहून कठोर झाले. त्यांनी तिन्ही दलाच्या सेनापतींना पूर्ण स्वातंत्र्य दिले; त्यांना सांगितले की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी काय करावे हे तुम्ही सांगा, मी त्या आदेशावर सही करतो.त्यांच्या प्रेरणेने भारतीय सैन्याने थेट लाहोरपर्यंत मजल मारली होती.मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे रशियातील ताशकंद येथे पाकिस्तानबरोबर तह करण्यासाठी ते अनिच्छेने गेले आणि ११ जानेवारी  १९६६ ला तिथेच त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. 

साधेपणा,प्रामाणिकपणा, देशभक्ती या गुणांमुळे १९६६  मध्येच त्यांना देशाची भारतरत्न ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली.

१९५१ मध्ये देशाचे रेल्वेमंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.अशी नैतिकता आज कुठे दिसून येते? घोटाळे सिद्ध होतात, शिक्षा होते पण पद आणि शासकीय बंगले न सोडणाऱ्या आजच्या खुज्या, थिट्या राजकारणापुढे शास्त्रीजींची उंची कितीतरी मोठी आहे.

त्यांच्या साधेपणाच्या कितीतरी गोष्टी सांगता येतील. शास्त्रीजी पंतप्रधान असताना त्यांनी एका कापड गिरणीला भेट दिली. शास्त्रीजींना पत्नीसाठी साडी घेण्याची इच्छा झाली.त्या उद्योजकाने गिरणीतील सगळ्यात भारी साडी त्यांना दाखवली मात्र किंमत ऐकून शास्त्रीजींनी ती साडी घेण्यास नम्र नकार दिला आणि ते देऊ शकतील तितक्याच रकमेची साडी घेऊन त्यासाठीचे पैसेही त्यांनी  दिले आणि उद्योजकाने विनामूल्य देऊ केलेली सर्वात भारी साडी नम्रपणे नाकारली. स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगात असतांना त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली.तिची सुश्रुषा करता यावी म्हणून लाल बहादूर शास्त्री ब्रिटिशांची परवानगी घेऊन तुरुंगातून काही काळासाठी बाहेर आले.मात्र त्याच दिवशी त्यांची मुलगी मरण पावली.मुलीचे अंत्यसंस्कार आटोपून शास्त्रीजी तडक पुन्हा तुरुंगात गेले.ज्या कामासाठी बाहेर आले होते ते काम शिल्लक राहिले नाही म्हणून ते स्वतः तुरुंगात परत गेले.

एकदा त्याचा मावसभाऊ स्पर्धा परीक्षेला जात असताना घाईगडबडीत तिकीट न घेता रेल्वेत बसला.पकडले गेल्यानंतर त्याने लालबहादूर शास्त्रींचे नाव सांगितले.पोलिसांनी खात्री करण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांना फोन केला.शास्त्रीजींनी तो आपला मावसभाऊ आहे हे मान्य केले परंतु तरीही पोलिसांना नियमानुसार कारवाई करायला सांगितले.पंतप्रधान असताना देखील शास्त्रीजी आपले फाटलेले कपडे शिवून वापरत असत.वरच्या कोटाखाली आत फाटका सदरा असे.फाटलेल्या कपड्यांचे रुमाल करून ते वापरत.आजच्या राजकारणी लोकांकडे, त्यांच्या कपड्यांकडे पाहून आपला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळात ते काँग्रेससाठी पूर्णवेळ काम करीत असत.त्यांना या कामाचे मानधन मिळत असे. या मानधनातून दरमहा काही रक्कम पत्नीकडे शिल्लक राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः पक्षाला पत्र लिहून मानधन कमी करून घेतले.पंतप्रधान झाल्यावर सुद्धा त्यांनी आपली झोपण्याची गादीही बदलली नव्हती.शास्त्रीजींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले पैसे देखील त्यांच्या बँक खात्यात नव्हते इतका साधा पंतप्रधान अजून कोणी झाला नसेल आणि होणार नाही.

ते दीड वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांची आई माहेरी वडिलांकडे राहायला आली. मात्र आजोबांचाही मृत्यू झाला.प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. नावेतून शाळेत पलीकडे जाण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्याकडे पैसे नसत म्हणून आपले दप्तर नावेतील मित्राकडे देऊन ते थेट गंगा नदीत उडी मारून पोहत पलिकडे जात आणि पुन्हा आपलं दप्तर घेऊन शाळेत जात असत.

काशी विद्यापीठात त्यांनी सुवर्णपदकासह शास्त्री मिळवली.तेव्हापासून आपले श्रीवास्तव हे जातीवाचक आडनाव त्यांनी कायमचे काढून टाकले आणि शास्त्री बनले.शास्त्रीजी महात्मा गांधीजींचे कट्टर कार्यकर्ते होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकदा तुरुंगात गेले.महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये "करो या मरो" असा मंत्र दिला परंतु शास्त्रीजींनी त्यात बदल करून "मरो नही मारो" असा बदल करून तो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. पुरुषोत्तम दास टंडन, पंडित गोविंद वल्लभ पंत आणि पंडित नेहरू यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले. "जय जवान जय किसान" हा नारा शास्त्रीजींनी दिला.पाकिस्तान बरोबरच्या युद्धात भारतीय सैन्य थेट लाहोरपर्यंत पोहोचले होते मात्र युद्धविरामासाठी जगभरातून भारतावर दडपण आले व पाकिस्तान बरोबर तहाची बोलणी करण्यासाठी शास्त्रीजी रशियातील ताशकंदला गेले.भारतीय सैनिकांनी जिंकलेली जमीन पाकिस्तानला परत देण्याची अट शास्त्रीजींना अजिबात मान्य नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांनी करारावर स्वाक्षरी केली खरी परंतु त्याच मध्यरात्री त्यांचे रहस्यमय निधन झाले.

त्यांचा आणि महात्मा गांधींचा वाढदिवस एकाच दिवशी येई. याचा कोणी उल्लेख केला की त्यांना संकोच वाटत असे. आपल्यापेक्षा गांधीजींचे कार्य खूप मोठे आहे असे ते विनयाने म्हणत. एक इमानदार, साधी राहणी, सरळ, सच्चे, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.राजकारणाच्या भांगेतील तुळस असेच वर्णन त्यांच्या कार्याचे करता येईल. त्यांच्या कार्यास, स्मृतीस,साध्या आचरणास,उच्च विचारसरणीस त्यांच्या 

११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏼

जय जवान- जय किसान

- दिलीप वैद्य,रावेर मो नं ९६५७७१३०५०

स्रोत : कायप्पा  

Saturday, October 1, 2022

ग्रंथराज ज्ञानेश्वरी: भावार्थ-दीपिका...चिंतन

 

 





श्रीमद् भगवद् गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धप्रसंगी केलेलेला उपदेश आहे हे आपणां सर्वांना माहित आहे. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. आणि तो म्हणू लागला , मी युद्ध करणार नाही. तो स्व-धर्मा पासून दूर जावू लागला. अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपणां सर्वांच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आणि अर्जुनास बोध होऊन त्याच्या मनातील संघर्ष संपला. मनुष्याच्या मनातील द्वंद्व संपावे, त्याने निशंक होऊन जीवन जगावे. अंगीकृत कार्य करावे. याची प्रेरणा गीता ग्रंथात आहे.

गीता ग्रंथावर, श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले व्याख्यान / प्रवचन म्हणजे भावार्थदीपिका...! अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी...! या ग्रंथाचे स्वरूप मोठे सुंदर आहे.

भाद्रपद वदय षष्टी (कापिला षष्टी ) हा दिवस ज्ञानेश्वरी-जयंती म्हणून साजरा केला जातो. ज्ञानेश्वरी या ग्रंथा बद्दल संत नामदेव महाराज म्हणतात,

 

ज्ञानराज माझी योगीयांची माउली I तेणे निगमवल्ली प्रकट केली II

गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी I ब्रह्मानंद लहरी प्रकट केली II

अध्यात्म विद्येचे दाविलेंसे रूप I चैतन्याचा दीप उजळीला II

छपन्न भाषेचा केलासे गौरव I भवर्णवाची नाव उभारली II  

श्रवणाचे मिषें बैसावे येवूनी I  साम्राज्य भुवनी सुखी नांदे II

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II

 

किती गोमटे नाव दिले आहे ज्ञानदेवांनी या ग्रंथास, भावार्थदीपिका ! गीता ग्रंथात अठरा अध्याय, सातशे श्लोक, हे सर्व संस्कृत मध्ये आहे. तत्कालीन परिस्थितीत गीतेतील ज्ञान सर्वां पर्यंत पोहोचावे, म्हणून माऊलींनी प्राकृतात (म्हणजे तत्कालीन मराठी भाषेत) हा ग्रंथ नेवासे येथे सांगितला.

 गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास जीवनात शांतातापूर्ण यशासाठी उपयुक्त आहे. ज्ञानदेवांची भाषा अलौकिक आहे. आपण मनाने त्या भाषा वैभावाशी एकरूप होऊन, शांत चित्ताने ज्ञानेश्वरीच्या ज्ञान-समुद्रातील काही थेंब आपणां सर्वांना प्राप्त व्हावेत यासाठी  प्रयत्न करूया, ज्ञानेश्वरी-जयंतीच्या निमित्ताने.

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी I एक तरी ओवी अनुभवावी II


- श्री. अविनाश प. गोसावी

 

Friday, September 9, 2022

विसर्जन ?


जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,

जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,

ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,

जो आमच्या जगण्याचा असे सूर  !! 


भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन,

त्याचे काय संभव  विसर्जन ?

संकल्प घ्यावा  त्यास आज प्रार्थून,

मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज  विसर्जन !! 🙏🏼


- रुपाली

Saturday, August 27, 2022

शूरा मी वंदिले - अनघा मोडक

 

 


II    स्वातंत्र्य लक्ष्मी कि जय II

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्र समाज सेवा संघ तसेच  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, "शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेय मुलांसमोर उलगडल्या !!

रचना विद्यालय नासिक, पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, ज्यू..रुंग्टा हायस्कूल सिन्नर येथिल . ना. सारडा विद्यालय या चार  शाळांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या अप्रतिम कार्यक्रमांद्वारे, उमलत्या मनांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले !! आपल्या देशासाठी प्राण वेचलेल्या वीर सैनिकांच्या पालकांच्या बलिदानाचे यानिमित्ताने स्मरण आणि त्यांचा गौरव हे देखील या आयोजनामागचे उद्दिष्ट्य होते.  

महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अनघाला आपले दृष्टी गमवावी लागली. परंतु तिने सखोल अभ्यास, इतरांच्या मदतीने केलेले सततचे वाचन, चिकाटी आणि प्रचंड मेहनत यांच्या पाठबळावर आपल्या अधूत्वावर मात केली आहे. तिचा अभयास आणि वैचारिक श्रीमंती तिच्या रसाळ वाणीतुन प्रकट होत असते

"शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाद्वारे अनघाने शालेय  मुलांच्या दृष्टीने अनुकूल अशा वक्तृत्वामार्फत, भारतीय स्वातंत्र्य सेनानी तसेच सैनिक यांच्या कार्याबद्दल कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला.    

१० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी रचना विद्यालयात झालेल्या पहिल्या व्याख्यानाआधी, अनघाचा सत्कार करण्यात आला. शहीद निनाद मांडवगणे यांचे पालक -वडील श्री अनिल मांडवगणे आई सौ. सुषमा मांडवगणे यांच्या हस्ते हा सत्कार  झाला ! त्याच्या आई-वडिलांची कार्यक्रमात असलेली उपस्थिती अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेली. श्री सौ. मांडवगणे यांच्या चेह-यावर मुलाच्या कर्तृत्वाच्या छटा दिसत होत्या. आणि आई-वडील म्हणून मुलास गमाविल्याची अंधुक तरीही स्पष्ट वेदना ही...! यावेळी   " मेरे वतनके लोगों जरा आंखमे भरलो पानी...! जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...!" हे गीत  एका विद्यार्थिनीने अतिशय अप्रतिमरित्या  सादर केले आणि व्याख्यानाआगोदर साजेसा  माहोल निर्माण झाला.   व्याख्यानात सैनिक या शब्दाची फार सुंदर व्याख्या अनघाने सादर  केली. ' "सैद्धांतिक-कर्तव्य-निष्ठा" या शब्द-भावार्थासह जीवन जगणारा तो सैनिक ' असे मत अनघाने मांडले आणि अनेक उदाहरणांचे दाखले देत तिने ही व्याख्या उपस्थितांना समजाविली. अनघाने मुलांना प्रश्न विचारला , " मेरा रंग दे बसंती चोला", यातील बसंती या शब्दाचा अर्थ  काय असावा ? त्याचा अर्थ वसंत का होतो हे सांगताना वसंत म्हणजे केशरी रंग आणि  केसरिया बाणा म्हणजे राष्ट्रभक्ती कशी ते तिने महाराणा प्रताप, तसेच २३ व्या वर्षी मातृभूमीच्या चरणी बलिदान देणा-या शहीद भगतसिंगांच्या कथा सांगितल्या. 

 


याच दिवशी दुपारचे व्याख्यान पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, येथे होते. एनसीसी-कॅडेटस् नी सैनिकी थाटात केलेल्या स्वागताने वातावरण निर्मिती फार सुंदर झाली. धामणकर सभागृहातील भव्य रंगमंचावर दोन्ही बाजूने असणारी भारतमातेचे प्रतिमा नजतेल आणि मनात भरत होती. कारगिल युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजाविलेले श्री. नामदेव जायभावे, निवृत्त मेजर-सुभेदार यांच्या हस्ते अनघाचा सत्कार करण्यात आला. नामदेव हे नाव ऐकताच अनघाने संत नामदेव आणि ज्ञानदेवांचा उल्लेख केला. याच संदर्भात तिच्या व्हाटस्अप-स्टेटस वर असलेले वाक्य मनाला स्पर्शून जाते .ते वाक्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ओळ आहे, "श्रीगुरुं सारिखा असता पाठीराखा , इतरांचा लेखा कोण करी!" याही व्याख्यानासाठी काही सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते, मेजर रोहनचे आई-वडील श्री सौ. सुधाकर चव्हाण , कर्नल अविनाशचे आई-वडील श्री सौ बाळासाहेब मोगल आणि मेजर श्रीकांत मेजर प्रशांतचे वडील श्री पंढरीनाथ शिंदे यांनाही वंदना देण्यात आली.    

 


१२ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरे व्याख्यान जु. .  रुंग्टा हायस्कूल येथे संपन्न झाले. भव्य  सभागृह, मुला-मुलींच्या हातात फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज यांनी वातावरणात ऊर्जा भरली होती. मंचावर सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते.  भारतीय सैन्यात कार्यरत असणा-या शुभमचे आई-वडील श्री सौ.दीपक कुलकर्णी.त्यांच्या हस्ते अनघाचा सत्कार झाला.  व्याख्यानात नंदुरबार येथे शहीद झालेला अवघ्या  चौदा वर्षाच्या  शिरीष कुमारची आठवण करीत अनघाने विद्यार्थीवर्गाशी संवाद सुरु केला. महाराणा प्रतापांचा चेतक घोडा आणि सौदागर या शब्दाची पूर्वपीठीका सांगत, झांशीच्या राणीची आठवण करीत अनेक सैनिकांच्या बलिदानाच्या कथा सांगत अनघाने उपथितांच्या मनामध्ये आदर आणि देशप्रेमाच्या भावना जागविलय. युद्धभूमीवर बंकर उडवून देतांना सैनिकांनी केलेले साहस, त्यात अनेकांना  प्राप्त झालेले शहिदपण तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख होत व्याख्यान उत्तरोतर देशप्रेमाने भारावून गेले. जयहिंद...! जय भारत ...! व्यर्थ हो बलिदान चा प्रेरणा-संदेश घेवून कार्यक्रम संपन्न झाला.

 


मग शेवटच्या टप्प्याकडे कार्यक्रम पुढे सरकला. . ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी अनघा सिन्नरला आली.विद्यालयाचा भव्य परिसर एनसीसी कॅडेटस् चा उस्त्फुर्त सहभाग. श्री वाघ सरांनी विद्यार्थ्यासह तबला-वादनावर म्हंटलेले गाणे खूपच  भावपूर्ण असे झाले. तिचा सत्कार स्क़्वाड्रन लीडर चिन्मयचे आई-वडील श्री सौ कोरडे यांच्या हस्ते झाला. दोघेही भारावलेले होते. चिन्मयच्या एनडीए तील शिक्षणाच्या आणि तेथील काटेकोर शिस्तीच्या आठवणीनी त्यांनी सांगितल्या राष्ट्र आणि राष्ट्रकार्य या विषयावर बोलतांना अमृत महोत्सव म्हणजे काय,-मृत म्हणजे काय ? याचा सहज उलगडा अनघाने केला .! 

रात्री उशिरा अनघा मुबईच्या दिशेने रवाना  झाली  परंतु  या चारही व्याख्यांत झालेला  "जय हिंद,भारत माता कि जय, वंदे मातरम्"  चा जयघोष,  आम्हा तिच्या वाणीने, सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याने  मंत्रमुग्ध झालेल्या श्रोतृवर्गाच्या मनात दुमदुमत राहिला !!  

 

- श्री अविनाश गोसावी,

   ९४२३९६४३१९