Saturday, January 30, 2021

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे आणि लेखांक १७: श्री.राजाराम माने -- श्री. बलबीर अधिकारी

 


लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे 

      सुरूवातीस छोटी दाढी ठेवणारा चेहरा, मुत्सद्दी नजर, कोकणस्थ हिशेबीपणा आणि वर्हाडी दिलखुलासपणा यांचे लेणे घेऊन वावरणारे भैय्यासाहेब आगाशे जेव्हा आमच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांच्या पदरी बुलढाण्याची अविकसित घटकाच्या मुलांसाठी सुरू केली गेलेली शाळा युवक प्रगती सहयोग ही युवा संस्था यांचे संगठन होते. त्या संस्थेतर्फे ते एक नियतकालिक प्रसिद्ध करीत. त्यात संस्थेच्या इतर माहिती समवेत खलील जिब्रानचा एक विचारही असे. त्यांच्या-जवळ असणारा स्पष्टवक्तेपणा, धडाडी राज्य केंद्र सरकारी खात्यातून त्यांना मिळणारा पाठिंबा हे गुणही त्यावेळी आम्हाला लोभस वाटत. या सर्वांतून मिळालेल्या प्रेरणेमुळे मी, अशोक वैद्य, पांडुरंग गायकवाड, जयसिंग सोलंकी, अनंत कुलकर्णी सदाशिव कोळी या प्रमुख कार्यकर्त्यांनी यूथ कौन्सिल, चेंबूर या युवा संस्थेची आर.सी.एफ. मध्ये 1967 साली स्थापना केली. आज पावेतो या संस्थेने 40 वर्षे युवा कार्य समाजकार्य करून हजारो लोकांना विनामूल्य सेवा प्रदान केली आहे.

   युवा क्षेत्रात काम करण्याची भैय्यासाहेब आगाशे यांना फार प्रबळ इच्छा होती. त्यासाठी विश् युवक केंद्र दिल्ली इंटरनॅशनल यूथ सेंटर, नागपूर यांचे सहकार्य ते घेत असत. त्यातून तयार वा प्रशिक्षित युवकांना समाजाच्या विविध क्षेत्रात प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी ते प्रेरित प्रोत्साहित करीत. मुंबईतही एखादे खात्रीचे ठिकाण असावे तेथून या महानगरातील कामे संचलित करावीत या उद्देशाने त्यांनी आमच्या संस्थेतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित कुशल होण्यासाठी मदत केली. युवक प्रगति सहयोग तर्फे अनेक वर्षे अनेक कार्यक्रम प्रकल्प हाती घेतले. ते करीत असतानाच बुलढाणा येथील स्वीकार केंद्राची कार्यकक्षा वाढवली तेथील विद्यार्थी शिक्षक यांनाही अनौपचारिक शिक्षण पद्धतीशी परिचय करवून देऊन विद्यार्थी केवळ पुस्तकी राहता व्यवहारी, संतुलित विचाराचा काटकसरीने राहून समाजाच्या उपयोगी पडावे या वृत्तीचा बनावा यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

   भय्यासाहेब प्रसिद्धीसन्मुख नव्हते. ते त्यापासून दूरच राहत. तथापि पुण्यातील यदुनाथ थत्ते, आनंदवनचे बाबा आमटे, त्यावेळच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेअर या संस्थेचे श्री. गोखले, अनेक मंत्री, सचिव यांच्याकडे त्यांचा सतत राबता असे. अनेक चर्चा होत, प्रकल्प उभे राहत. आणि युवा संघटन, युवा प्रशिक्षण, युवा व्यक्तिमत्त्व विकास या सर्वांचे उद्दिष्ट एकच असले तरी ते प्राप्त करण्याचे मार्ग मात्र भिन्न होते. हे आमच्या त्यावेळी लक्षात येत नसे. ही सारी माणसे युवकांचा, समाजाचा, विकासाचा आणि उन्नतीचा विचार करीत आहेत हेच आम्हाला अत्यंत आदरणीय वाटे आमच्या संस्थेच्या  आवाक्यात असणार्या सार्या बाबी आम्ही त्यांच्या समाधानासाठी करायला तयार असूं. लहानपणी राष्ट्रपुरूषांच्या तोंडून नवसमाजनिर्मितीची भाषा ऐकताना गहिवरल्यासारखे होत असे. या देशातील गरीब, अविकसित, लाचार नडलेल्या लोकांना स्वतंत्र भारतात कुठेतरी न्याय मिळेल  या भावनेने कार्य करणारी सारी माणसे आम्हाला पूजनीय वाटत. त्यांचे विचार, त्यांचे काम त्यांच्या जाणीवा समाजात स्थित्यंतर घडवतील असा विश्वास वाटे. परिणामी, आपण ज्या कोपर्यात आहोत तो प्रकाशमान करण्याची आमची प्रबळ इच्छा होती. यूथ कौन्सिलची निर्मिती त्याचा आजवरचा प्रवास यामागे ही पार्श्वभूमी आहे. या संस्थेची सुरूवात भैय्यासाहेब आगाशे यांनी करण्यास प्रवृत्त केले म्हणून ते आदरणीय.

   भैय्यासाहेब युवक प्रगती सहयोग तर्फे सुरू केलेले अनेक प्रकल्प गाजले. त्यात प्रमुख म्हणजे मुंबई, गोवा, सागरी सहल, बंगालमध्ये पूर्णिया जिल्ह्यातील प्रकल्प, महाराष्ट्रात रत्नागिरी, धुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्प यांना विशेष स्थान आहे. विविध ओद्योगिक संस्था सरकार यांच्या मदतीने त्यांनी अनेक प्रकल्प राबवून ते पूर्ण केले या ठिकाणी आयोजलेली युवा शिबीरे यातून अनेक शाळा, समाजमंदिरे उभी राहिली त्यातून तयार झालेल्या युवकांनी पुढे स्वतंत्रपणे अनेक कामे हाती घेतली.

   भैय्यासाहेबांना लिहिण्याची हौस हातोटी उत्तम होती. तथापि त्यांनी सर्वकष विचार करून युवकांना प्रेरणादायी ठरणारे एखादे नियतकालिक वा पुस्तक का लिहिले नाही हा मलाच नव्हे तर अनेकांना पडणारा प्रश् आहे. कदाचित त्यांना त्यात रूचि वाटली नसावी. भैयासाहेब कधी कधी फार वादग्रस्त विधाने करीत.

वानगी दाखल एक उदाहरण -

     सुरवातीस समाजसेवा करण्याच्या युवा कार्यकर्ते म्हणून काहीतरी साध्य करण्याच्या सात्विक भावनेने उन्नत विचाराने आम्ही भारले गेलो होतो. आपण शक्य तो वेळ श्रम देऊन, प्रसंगी वर्गणी देऊन कोणाचे तरी भले करावे ही भावना आम्हाला सतत उब देत होती. आठ तास नोकरी करूनही आम्ही यासाठी उभे राहत होतो. आवडीची क्षेत्रे उदा. वाचन, खेळ सोडून या कार्याचा विचार अग्रक्रमाने स्वीकारत होतो.  परंतु एकेदिवशी चर्चेत आपण समाजकार्य का करतो याचे उत्तर : ““आपणांस गरज (खाज) आहे म्हणून असे मिळाले. स्थूल मानाने खरे असले तरी हे उत्तर व्यक्तिश: मला मान्य होण्यासारखे नाही. गरज कोणाची ? या प्रश्नाचे उत्तर आपण ज्याचे काम करतो त्याची असा सरळ अर्थ आहे. काम आम्ही करत होतो ते इतर कुणासाठी तरी होते. त्यातून आम्हाला मिळणारे समाधान एवढाच आमचा स्वार्थ होता. आज समाज-कार्य जसे कॅश करतात तसा तो मामला नव्हता. त्यात स्वार्थ नव्हता. सद्भावना होती. पण असे विचित्र उत्तर आपल्या गुरूंस्थानी वाटणार्या व्यक्तिने द्यावे याचे वैषम्य वाटले. आजही निरलस काम करताना देखील हे काम आपण कशासाठी करतो आहोत असा निरर्थक विचार डोक्यात भिरभिरत राहतो.

     चर्चेत, संवादात वा भाषणांतही भैयांची वाणी छाप पाडणारी होती. ज्याच्याशी ते बोलत त्याची सहमती सहज शक्य होत असे. फकिरी वृत्ती भारदस्त बोलणे यांच्या जोरावर त्यांनी अनेकांकडून अनेक प्रकल्पांसाठी अभिवचने आणि सहाय्य मिळवले. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना अनेक क्षेत्रे उपलब्ध करून दिली त्यामुळे युवा कार्याला विशेषत: युवक व्यक्तिमत्त्व विकासाला एक निश्चित मार्ग सापडलेला आहे. आज तो मार्ग कुणाला भावतो की नाही हा प्रश् अनुत्तरीत असला तरी त्यांनी आपला काळ गाजवला असे समजण्यास बराच वाव आहे.

     आज समाजाची स्थिती 40 वर्षांपूर्वीची राहिली नाही. छोटा पडदा, शिक्षण, संस्कार, लोकसंख्या, संगणकीकरण . अनेक प्रश् वा उत्तरे आज समाज ढवळून काढीत आहेत. स्थानिक वा राष्ट्रीय नेतृत्व जनमानसात आपली प्रतिमा टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले आहे. पोलिस, गुंड, गुप्तहेर, आयकर घोटाळे, कोर्ट, कचेर्या या शब्दांनी समाजाला भंडावून सोडले आहे. सरळ विचार आचार यांना जणु आपल्या समाजातून हद्दपार केले आहे. कोणी कोणाचे प्रबोधन करायचे याचा प्रश् पडावा इतका गोंधळ मनात भरून राहिला आहे. त्यामुळे युक्तीच्या चार गोष्टी सांगून वा करवून घेऊन येणार्या पिढीचे जीवन संपन्न चारित्र्य उज्ज्वल करण्याच्या खटाटोपाला एक निरर्थक प्रयास असे नाव मिळण्याइतपत स्थिती चिंताजनक आहेे. आज एका बाजूला देव-धर्म, सत्त्प्रवृत्ती, पूजा, पाठ, जप यांना आपण स्वीकारत आहोत दुसर्या बाजूने फसवेगिरी, दादागिरी, ढोंग, लाचारी, बदमाशी यांनी त्रस्त होऊन पोलिस, न्यायालये यांच्यामागे आपण धावत आहोत. आज जीवनात नि:स्वार्थापणा पेक्षा स्वार्थीपणा, कामसूपणा ऐवजी आळस, खर्या ऐवजी खोटे, प्रामाणिकपणा सचोटी ऐवजी ढोंग, अप्रमाणिकपणा फसवेगिरी, विश्वासाऐवजी संशय, यामुळे आपण अस्वस्थ- बेचैन झालो आहोत. कष्टाने काही मिळवण्यावर त्याचा अभिमान बाळगण्यावर आपला जणू विश्वासच राहिला नाही असे भेसूर चित्र युवा पिढीसमोर उभे राहात आहे. वयाने ज्येष्ठ ज्ञानी त्याचेविषयी निष्ठा आदर दाखविण्यास आपण संकोचत आहोत. अशा स्थितीत नव्या पिढीला जोम प्राप्त होण्यासाठी त्यांच्या आयुष्याला परिमाण लाभण्यासाठी आपण कोणती शिदोरी त्यांच्याबरोबर देत आहोत? मावळती पिढी नव्या पिढीचे भले करताना कसा विचार करीत आहे ? कोणती मूल्ये जोपासत आहे ? कोणता आदर्श जपत आहे ?

     काही मूल्ये चिरंतन असतात. समाज त्यांना मानतो की नाही यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून नसते. या जगात अशी जी माणसे होऊन गेली त्यांनी या मूल्यांच्या पाठपुराव्यासाठी आपले जीवन वेचले. त्या सर्वांना परत आवाहन करणे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे एवढाच एक उर्जेचा स्त्रोत आजच्या तरूणांजवळ आहे.

     भैय्यासाहेबांनी असे आवाहन आपल्या विचारातून आचारातून करावे असे मनातून फार वाटत असले, तथापि शरीर स्वच्छ झाले तरी तळवे स्वच्छ करायचे राहून जाते अथवा तेवढी मलिनता अपरिहार्य असते असे गृहित धरले तरी भैय्यासाहेबांना आम्ही ज्या उंचीवर पाहू इच्छित होतो ते घडले नाही कदाचित सामान्यत्वाचा मोह त्यांनाही पडला असेल. बुद्धी मन यात तफावत झाली असेल. परिस्थितीने, काळाने कदाचित त्यावर मात केली असेल. पण सल मात्र राहून गेला आहे. भैय्यासाहेब नावाचे शिखर षड्रिपू आणि समाज यांना अजिंक्य राहायला हवे होते. तेवढा धीर त्यांनी दाखवायला हवा होता. युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी हा उर्जास्त्रोत आम्ही निश्चितच फार जपून वापरला असता आणि त्यात आम्ही आजवर केलेल्या धडपडीचे समाधानही शोधले असते.

 

लेखांक १७: श्री.राजाराम माने 


   आर.सी.एफ. ही नवीन कंपनी 1978 साली स्थापन झाल्यावर एक नवीन सार्वजनिक सतत लाभ मिळवणारा उद्योग म्हणून तसेच आदर्श कंपनी म्हणून प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा वर्तमानपत्रात दूरदर्शनवर बातमी देऊन आम्ही समाधान शोधत असू. त्यावेळेचे कंपनीचे अध्यक्ष हरहुन्नरी, क्रियाशील उन्नत विचारांचे होते. समाजासाठी शक्य ते सारे करावे, चांगले उपयुक्त कार्य करणार्या समाजातील अनेक संस्था व्यक्ति यांना प्रोत्साहन द्यावे असा त्यांचा कल होता. कार्यक्रमानंतर त्याची प्रसिद्धी व्हावी अप्रत्यक्षपणे प्रतिमा संवर्धन (Image-Building)  व्हावे असा त्यांचा प्रांजळ प्रयत्न असे. त्यामुळेच बातमी, फोटो, कॅप्शन त्यासाठी संपर्क अशी आमच्या कार्याची दिशा असे.

   मुंबई दूरददर्शनच्या संपादकीय विभागात सुरूवातीस डॉ. गोविंद गुंठे नंतर राजाराम माने यांच्याशी आमचा थोडा अधिक संबंध येत असे. सार्वजनिक उद्योग म्हणून त्याच्या बातम्या दिल्या जाव्यात असे  सामान्य तत्त्व असले तरी दरवेळी ते शक्य होत नसे. पूर्वी बातम्यांना केवळ दहा मिनिटे असत त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, महत्त्वाच्या व्यक्ति संस्था यांच्या यादीत दरवेळी घुसून स्थान मिळेलच याची शाश्वती नसे. त्यामुळे केवळ फोटो आणि बातमीचा कागद संपादकाच्या हाती देऊन काम होईल असे वाटत नसे. मग ते साध्य करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न, संपर्क यांची मदत घ्यावी लागे. आपली मदत होऊ शकेल अशा मोक्याच्या जागा हेरून प्रस्ताव पुढे करण्यात नंतर आम्ही कुशल झालो त्यामुळेच राजाराम माने नावाच्या दिलखुलास माणसाची आमची मैत्री झाली.

   मोक्याच्या जागा हेरण्याची मनात स्थान मिळवण्याची जी गोष्ट मी सांगतो आहे ती अतिशय मर्यादित स्वरूपाने घ्यायची आहे. कारण या वाक्याचा अर्थ जो जसा लावील तसा तो होऊ शकेल. असे करण्यात वैयक्तिक संबंध सुधारण्याचे जसे सुख आहे तसेच जे दुरावण्याचे दु:खही लपले आहे. कोणी हात सैल सोडला तर तो खेचून उखडणारेही कमी नाहीत. घेणाराला घेण्याचे बंधन नसले तरी देणाराला मात्र ते गैरसोईचे वा जाचक ठरू शकते याचे भान घेणाराला असावे लागते असे उत्तम भान राजाराम माने यांच्याकडे होते. त्यामुळे कधी कधी चहापान अथवा कंपनीच्या अतिथिगृहात आग्रहास्तव भोजन एवढेच त्यांनी स्वीकारले पण गप्पा मारणे हा त्यांचा छंद. यामुळेच लक्षात येऊ शकला. वृत्तसृष्टीतले अनुभव संदर्भवाचन यांनी समृद्ध असलेले माने गप्पांचा अड्डा छान जमवीत. वेळ कमी असे पण जो मिळेल तो ते सत्कारणी लावत.

   माने यांनी जनसंपर्क खात्यात बरीच वर्षे काम केले होते. या खात्यात काम करणारांचे मनोबल कसे असावे यासंबंधी कधी गप्पा होत ते म्हणत-

   "अधिकारी, तुमचे काम पाहिले की मला पु.लं. च्या नारायणाची आठवण येते." जेव्हा लग्न-कार्य-समारंभ व्हायचा तेव्हा प्रत्येक वेळी प्रत्येक कामात नारायणरावाच्या नावाने गजर होणे अपरिहार्य त्यांचेशी हो, झालेच ते - आत्ता करतो - बिलकूल काळजी नको - सारे ठीक होईल - निघा तुम्ही, मी पाहतो - अगदी चिंता नको - हो, मी इथेच आहे. असे आश्वासक वागणे आणि सारे होऊन गेल्यावर खांद्यावरचे उपरणे झटकून अतिश्रमाने विव्हळ झाल्यावरही कुणाला दखल घ्यावीशी वाटणे - असे त्याचे दैव आहे. तुम्ही जे करता त्यात तुमची भूमिका यजमानाची असली तरी श्रेय मात्र इतरांचेच असते. यात तुम्ही स्वत:ला जपता तरी कसे ?

   मनोमन त्यांचे म्हणणे पटले तरी माझे उत्तरही ठाम असते. जनसंपर्काचे काम हा योगायोग आहे. ही ठरवून घेतलेली भूमिका नव्हे. तथापि अंगावर येत असेल तर शिंगावर घेतलेच पाहिजे. सर्कशीत जसा विदूषक असावा तसा कंपनीत पी.आर.. असतो. कुठलाही खेळ चालू असेल तरी त्यात त्याला काहीतरी उमजावे लागते. मोठ्यांच्या सतत संपर्कात असले तरी छोटेपण पी.आर..च्या डोक्यात भिरभिरत असते. इतर आपणास विचारतात ते केवळ आपल्या (त्यांच्या) उद्दिष्टांच्या पूर्तिसाठी. उद्दिष्टेही अनेकांची अनेक प्रकारची असतात. तो कोणाला शिडी म्हणून, कोणाला पूल म्हणून तर कोणाला ढाल म्हणून हवा असतो. हे सारे जरी खरे असले तरी जर पी.आर.. चे पाय जमिनीवर असतील डोके अस्मान पाहत असेल तर तो यशस्वी होतो, पायाची जमीन जेव्हा सुटते तेव्हा जणू बांधिलकी त्याला सोडून जाते, तो सर्वज्ञानी असलाच पाहिजे असे नाही. पण त्याला ज्ञानाचे शक्तिचे स्त्रोत कुठे आहेत याची माहिती हवी.

   पण पी.आर. हे लग्नबंधनासारखे आहे अन् म्हणूनच जाचक आहे. या प्रश्नावर माने यांचे उत्तर मोठे उद्बोधक आहे. ते म्हणतात लग्न हा करार असला तरी विश्वास त्याचा पाया आहे. ज्या ठिकाणी विश्वास नाही तेथे उठवळपणा अथवा परिपक्वता यांचा आभास होतो. जेथे विश्वास त्याचा पाया आहे ते सारे एकजीव एकसंध दिसते. पी.आर.. विश्वास पात्र हवा. त्याच्या शब्दात कृतीत बांधिलकी विश्वास यांचा प्रत्यय यायला हवा आणि त्याला तसे वाटावे यासाठी कंपनीने दक्ष रहायला हवे. पी.आर.. ने मागता त्याला योग्य ते सारे मिळायला हवे पण तसे घडले तरी त्याची निष्ठा, विश्वास आणि कृती कंपनीला पोषकच असायला हवी. ते जमत नसेल तर ते पद आणि व्यक्ति दोन्ही फुकटच.

   मानेंची मते खरी की वादग्रस्त ! कसे ठरणार ? पण अनुभव बोलला हे मात्र खरे, जनसंपर्क विभागात काम करणार्या कर्मचार्यांविषयी सामान्य जनता कंपनीचे कर्मचारी यात अनेक गैरसमजही असू शकतात. वरिष्ठ मंडळींच्या सतत अवतीभवती फिरणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांच्याकडे सहज जाता येईल अशी परिस्थिती असते पण हवा तो विषय काढण्याची संधी मिळेलच असे नसते. समजा, अशी संधी मिळाली तरी अनेक विघ्ने असतात. ज्याच्याकडे आपण जातो त्या वरिष्ठांवरही अनेक बंधने असतात. त्यांचे वरिष्ठ त्यांना अनेक गोष्टीबद्दल जाबही विचारत असतात. तेव्हा आखून दिलेली चौकट हे पहिले बंधन. अनेक ठिकाणी वार झाल्यामुळे असंतुलित मनस्थिती हे दुसरे बंधन, कमी वेळेत जास्तीत जास्त कामे उरकण्याची घाई. पी.आर.. संबंधी देखील अनेक कोपर्यांतून वरिष्ठापर्यंत पोचलेली मते, वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणारे लिखाण, मंत्रालयाकडून येणारे विनंतीवजा आदेश या सर्वांमुळे संबंधीत वरिष्ठही अतिशय निसरड्या फरशीवरून जात असतो. खूप विश्वास. थोडीशी आस्था बरेचसे मानसिक संतुलन . कमावलेले वरिष्ठच केवळ-चेहर्यावर हास्याचा प्रकाश ठेवून काम करू शकतात आणि त्या प्रकाशाचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करणारा पी.आर.. देखील तेवढा चाणाक्ष असावा लागतो. त्याला कटाक्ष, दूरध्वनी, महत्त्वाच्या लेखी सूचनांऐवजी चिठ्ठी, विशेष इशारा  यांचे अधिक भान ठेवावे लागते. दोन ओळींच्या मजकूरातील मधल्या कोर्या जागेत काय लिहिले आहे याचा अंदाज बांधावा लागतो. काम करताना 100 टक्के यशच हवे असते. ते करूनही त्याचे श्रेय दुसर्या कुणाला तरी देऊन आपल्याकडे कमीपणा (विजयी वृत्तीने) घ्यावा लागतो. खरे म्हणाल तर जनसंपर्क अधिकारी होणे ही माणसाची फार मोठी कसोटी असू शकते. त्याला सारे माहित असावेच लागते. नसेल तर शोधावे लागते. स्त्रोत जपावे लागतात. त्यांना खूष ठेवावे लागते. नियमाने करता आले नाही तर थोडे अनियमितही  वागावे लागते. पण ते करताना आपण तोल जाऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मतलबाच्या अनेक गोष्टी - त्यात स्वत:ची प्रकृती, मानसिक स्वास्थ्य, मुलांचे शिक्षण, नातेवाईक मित्र, खाजगी गोष्टी . सोडावे लागतात. थोडक्यात कंपनीसाठी संपर्क वाढवावा लागतो त्याचबरोबर स्वत:च्या अनेक बाबी नजरेआड कराव्या लागतात. ही व्यक्ति स्वत:साठी तत्त्वाने काही मागू शकत नाही. सारा संसारच मुळी कंपनीच्या उद्दिष्टांसाठी असतो. कधी कधी त्यामुळे घरची मंडळीही होरपळतात पण आहे हे असेच असल्यामुळे त्याला लग्नबंधन म्हटले आहे.

   नाही म्हणायचे नसते हे या व्यावसायिकाचे आणखी एक तत्त्व. सरळ विचार करता नाही म्हणायचे नसले तर हो म्हणावे असाच याचा अर्थ आहे. पण हो म्हणताना जबाबदारी येते. ती पेलणे शक्य होईल की नाही हे माहित नसते म्हणून हो म्हणता येत नाही. मग कुणीही भेटले तर सांगतो, बघतो, करून टाकू, तुमचे काम नाही करायचे तर कोणाचे ? या शब्दांनी सुरू होणार्या भेटी सांगून ठेवले आहे, थोडे दिवस थांबायला सांगितले आहे., जमून जाईल, भेटायला बोलावले आहे. इथपर्यंत येतात. कालांतराने खूप प्रयत्न केला, फोनवर हो म्हटले होते, आम्ही भेटून आलो, आपण भेटूनच पुढे जा, असे करीत करीत शेवटी प्रस्ताव नकाराच्या. मृत्युपंथावर येतो. म्हणजेच नाही म्हटले असते तर परवडले असते अशी स्थिती होते. पण जनमानसात नाही पेक्षा हो ला प्रतिष्ठा अधिक आहे. दुखणे असे आहे की होकार आणि नकार या दोन्ही गोष्टी इतक्या निसरड्या आहेत की त्या केव्हाही एकमेकांचे रूप जागा घेतात. कामे झाली, तर साहेबांनी केली झाली तर ती विशिष्ठ व्यक्तिमुळे झाली नाही ती व्यक्ति पी.आर.. असते. सर्व अप्रियाचे खापर त्याला स्वत:वर घ्यावे लागते. तथापि त्यानंतरही पी.आर.. चा प्रवास असाच चालू राहतो.

   या अनिश्चिततेला, या वैतागाला तसेच या वृथा प्रतिष्ठेला कंटाळून राजाराम माने वृत्तपत्र सृष्टीत घुसले खरे पण तिथे तरी ते स्वस्थता मिळवू शकले काय ?