भाग ३८: इंडियन
स्टँडर्ड टाईम
मध्यंतरी
मुलीच्या एका स्पर्धेला जायचा योग आला. प्रवेशिका एकदम चकाचक. सोनेरी अक्षरात वेळ,
ठिकाण छापलेलं. “वेळेच्या आधी दहा मिनिटे स्थानापन्न व्हावे”. ही सूचनाही आवर्जून छापलेली.
स्पर्धेचं ठिकाण घरापासून लांब होतं म्हणून मी आपली तासभर आधीच घरातून निघून वेळेआधी
पाच मिनिटं तिथे पोहोचले. सगळा शुकशुकाट. खूप फिरल्यावर आवारात दोन डोकी दिसली. चौकशी
केल्यावर त्यांनी आत हॉलमध्ये बसा, असं सुचवलं आणि गायब झाले. हॉलमध्ये खुर्च्या आणि
आम्ही. स्पर्धेच्या आधी स्थानापन्न होण्याच्या सूचनेतील दहा मिनिटं जवळ आलेली आणि प्रवेशद्वारातून
काही स्त्रिया प्रवेशल्या. “भाईर थांबा, झाडू मारायचाय”, त्यांनी फर्मावलं. छापलेल्या
चकाचक सूचनेपेक्षा ही सूचना थेट अंगावर आली असल्यानं आम्ही तिचं त्वरित पालन केलं.
“स्पर्धा
कधी सुरू होणार?” - बाहेर थांबलेलं असताना पुन्हा अवतीर्ण झालेल्या एका डोक्याला माझा
अधीर प्रश्न.
“होईल
अर्ध्या-पाऊण तासात”- मोघम उत्तर.
झाडझूड,
स्टेजची मांडामांड, संयोजक कार्यकर्त्यांच्या एकेक एंट्रया असं सगळं होता होता अर्धा-पाऊण
तास खूपच गजगतीनं सरकला आणि दिलेल्या वेळेपासून अडीचव्या तासाला स्पर्धा सुरू झाली.
आम्ही आणि आमच्यासारखेच एक-दोन वेळेचे पालनकर्ते सोडले तर बाकी स्पर्धक, स्पर्धा सुरू
होण्याच्या बरोबर दहाच मिनिटं आधी येऊन स्थानापन्न झाले. “इंडियन स्टँडर्ड टाईम” त्यांना
कसं अचूक कळलं, याचा मी मात्र अचंबा करीत राहिले.
इतके
उन्हाळे, पावसाळे पाहिल्यावर मला हे भारतीय वेळेचं गणित थोडंफार उमजू लागलंय. तरीही
कित्येक सार्वजनिक कार्यक्रमांत मी आपली तासन् तास तिष्ठत बसलेली आहे. खासगीत, माझ्या
मित्रमैत्रिणींची वक्तशीर आणि बेवक्तशीर अशी वर्गवारी करण्यात मात्र मी यशस्वी झाले
आहे.
मध्यंतरी
आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. माझी एक मैत्रीणही येणार होती. “कितीला निघायचंय?”
तिनं विचारलं. भारतीय प्रमाणवेळेची ती पक्की निष्ठावंत पाईक असल्याचं मला ठाऊक होतं.
त्यामुळे मी तिला दुपारी दोनची वेळ दिली. “आई, आपल्याला चारला जायचंय, दोनला नाही”,
सईनं आठवण करून दिली. तिचे “दोन” म्हणजे “चार” होतील. मी खुलासा केला आणि खरोखरच ती
गजर लावल्यासारखी पावणेचारला हजर!
या
घड्याळांच्या काट्यांच्या जंजाळात काही सुखद अनुभवही येतात. सईला एक क्लास लावायचा
होता. त्या बाईंनी संध्याकाळी साडेपाचची वेळ दिली आणि पत्ता सांगितला. ठिकाण शोधायला
वेळ लागेल म्हणून मी आधीच निघाले. नियोजित वेळेच्या दहा मिनिटं आधी पोहोचले. दाराला
कुलूप पाहून वाट पाहत थांबले. पाच मिनिटांनी त्या आल्या. मला पाहून चक्रावल्या. घर
शोधायचंय आणि वेळ पाळायची म्हणून मी थोडा वेळ हाताशी राखून ठेवला हे कळल्यावर खुश झाल्या.
केवळ वेळ पाळली गेल्यामुळेच आमची ती मुलाखत सुरू होण्याआधीच निम्मी यशस्वी झाली.
खरोखरच,
वेळ पाळण्यात तत्पर असलेली मी सकाळी उठताना मात्र पाचला उठायचं ठरवलेलं असतं; पण साडेपाच
झाले तरी डोळे उघडवत नाहीत. मी आपला माझ्या परीनं सुवर्णमध्य काढलाय. मी घड्याळ अर्धा
तास पुढे करून ठेवलंय. सकाळी झोपेत हे काही आठवत नाही. साडेपाच वाजलेत, असं समजून मी
उठते. त्यामुळे वेळेचं पालन होतंच शिवाय भारतीय प्रमाणवेळेचंही!
भाग ३९: आमचा
पाणी-प्रश्न
ऐन दिवाळीत पाण्याचा माठ बदलला. पाण्याला कोर्या माठाचा वास, चव तीन-चार दिवस येतच राहिली. सईनं चांगलाच असहकार पुकारला आणि ते पाणी प्यायला नकार दिला. दर वेळी पाणी चाखून ती म्हणायची, “आई, याला किल्ल्याचा वास येतो.” दिवाळीच्या सुटीतला किल्ला बांधून तयार होता आणि त्यावर धान्यही पेरलेलं होतं. किल्ल्यावर पाणी शिंपडलं की, येणारा तो मातीचा घमघमाट आणि कोर्या माठाच्या मातीचा वास एकत्र होऊन आमच्या नव्या माठातलं पाणी “किल्ल्याच्या वासा”चं बनलं होतं. चार-पाच दिवसांत ती मातीची चव गेली, किल्लाही जमीनदोस्त झाला आणि आमचा हा गहन पाणीप्रश्न संपला.
आताचा
हा प्रश्न सुटला असला, तरी वेगळा कुठला तरी प्रश्न अधूनमधून डोकं वर काढतच असतो आणि
कृष्णा-कावेरी व इतर सर्व नद्यांच्या पाणी-प्रश्नाइतकाच दर वेळी मला तो सतावतही असतो.
“बारा
गावचं पाणी प्यायलेला” ही उपाधी महानच आहे. पाण्याच्या चवीत जरा बदल झाला, तरी आमचा
जीव कासावीस होतो, तहान भागत नाही, तर बारा चवीच्या पाण्याची सवय करायची?
प्रत्येक
गावाच्या पाण्याच्या चवीत फरक असतोच; पण आपापल्या गावीसुद्धा नेहमीच्याच नळातून येणार्या
पाण्याची चव बदलत राहते. पावसाळ्यात क्लोरिनचा डोस खूप वाढवून पाणी कडवट बनतं. गढूळ
पाण्यात तुरटी फिरवली जाते आणि त्या पाण्याच्या घोटानं तोंडच तुरट होतं. पाणी उकळून
प्यायलं, तर अतिशय मचूळ लागतं. उन्हाळ्यात वेगळ्याच चवदार प्रश्नांना तोंड द्यावं
लागतं. फ्रीजमध्ये स्टीलच्या भांड्यात गार केलेलं पाणी अगदीच बेचव लागतं. माठांमध्ये
वाळा, मोगरा, खस असे सुवासिक पदार्थ डुबकी मारतात आणि ते सुगंधित पाणी माझ्या घशाखाली
उतरत नाही.
“दृष्टिआड
सृष्टी” या नियमानुसार बंद नळातून येणार्या पाण्यावर आमची भिस्त असते. बाहेर कुठे
ट्रेकिंग-ट्रीपला गेल्यावर विहिरी, तळी, नदी नाल्यातलं पाणी प्यायला आमचा जीव घाबरतो.
त्यातल्या त्यात “मेडिक्लोर” सारख्या बाटल्या मनाला जरा दिलासा देतात. खरं तर आता तो
जमानाही गेलाय. पाण्याच्या सीलबंद बाटल्या जवळ बाळगायच्या. सील फोडून रिकाम्या करायच्या
आणि ट्रीपच्या ठिकाणी आपली खूण म्हणून आवर्जून तिथेच टाकून यायच्या, अशी सध्याची फॅशन
आहे. मात्र आजही काही “ओल्ड फॅशन्ड” लोक “डिस्पोजेबल” बाटल्या न वापरता, मोठ्या “वॉटरबॅग्ज”
वापरतात. अगदीच फिरकीचा तांब्या नेत नाहीत!
घरचं पाणी नेतात आणि घरी परतेपर्यंत तेच पितात.
माझी
मैत्रीण पुण्याहून महाबळेश्वरला जाताना ट्रीपभर पुरेल एवढं पाणी दरवेळी नेते. या बाबतीत
तिच्यावरही मात करणार्या एका जेष्ठ नागरिकांविषयी मला माहिती मिळाली. ते कामानिमित्त
चार-पाच दिवस मॉस्कोला गेले, तर पुण्याचं घरचं पाणी वॉटरबॅगमधून घेऊन गेले.
आम्हाला
पाण्याचं कुठलंही दुर्भिक्ष नसताना, घरी-दारी, प्रवासात कुठला तरी पाणी-प्रश्न डोकं
वर काढतोच आणि तहानेनं जीव व्याकूळ करतो. जे रोजच्या रोज पाणीटंचाईला तोंड देताहेत,
त्यांच्या पाणी-प्रश्नाचं काय, याचा विचार आम्ही आमचे अवघड (?) प्रश्न सोडवताना अधूनमधून
तरी करायलाच हवा.
ऑडिओ लिंक :
इतिहासाचा अभ्यास करताना कोलंबस-सिंदबाद यांच्या धाडसी सफरी वाचून अगदीच जग जिंकल्याचा नाही तरी पूर्ण जग फिरून बघण्याचा कल्पनाविलास करत करतच मी मोठी झाले. खरं तर इंग्लंड, स्पेन, पोर्तुगीज साम्राज्यांच्या कोलंबस, ड्रेक, मॅगेलीनसारख्या खलाशांनी सगळ जग शोधून ठेवल्यामुळे माझ्यासारख्यांसाठी काहीही शोधायचं बाकी राहिलं नाही. “पृथ्वी गोल आहेे” सारखे गहन शोधही आधीच लागून गेल्यामुळे तशा जिज्ञासेपोटी फिरण्याचीही संधी माझ्यासारख्यांना राहिली नाही. त्यामुळे बिनाउद्देशाने फिरणं एवढंच हातात राहिलं. यालाच “पर्यटन” असं गोंडस नाव मिळालं. माझ्यासारख्या पर्यटनवाद्यांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढली, की लोक सतत फक्त फिरायला जायचंच काम करतात की काय, अशी शंका यावी. पृथ्वीचे कानेकोपरे धुंडाळून झाल्यानं, जग खूपच जवळ आल्यानं चंद्रावरच्या सफरीसुद्धा सुरू झाल्या.
आम्ही
चंद्र-सूर्यापर्यंत काही पोहोचू शकत नसल्याने “भारत माझा देश आहे” याची आठवण ठेवत आम्ही
किमान भारतभर तरी पर्यटन करीत फिरतच असतो. अर्थात वेळ, पैसा, सोय यानुसार भारतात कुठे
फिरायचं हे ठरत असतं. जुन्या इंग्लंड, स्पेन, पोर्तुगीज साम्राज्यांच्या तोडीस तोड
आजकालच्या पर्यटन संस्थांची साम्राज्यं! त्या पूर्वीच्या साम्राज्यांना राज्याची, प्रजेची
बाकीची कामं तरी असायची. सागरी सफरींना फक्त अर्थपुरवठा करण्याची त्यांची जबाबदारी असायची. आमच्या पर्यटन संस्थांची
साम्राज्यंच मुळी फक्त “फिरण्या”वर उभारलेली असतात, त्यामुळे त्यांच्या खलाशांच्या
(पर्यटकांच्या) सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी ते घेतात. इथे पर्यटकांनी फक्त अर्थपुरवठ्याची
जबाबदारी घ्यायची असते. एकदा पैसा दिला, की सगळ्या सोयी होतात आणि सगळ्या धाडसी सफरी
अगदी पंचतारांकित होऊन जातात. सिंदबादने धाडसी सफरी केल्या म्हणून त्याला अतोनात पैसा
मिळाला. आमच्याकडे पैसा असतो आणि तो आम्ही अतोनात (?) खर्च करू शकतो, म्हणून आम्ही
धाडसी सफरी करतो. इतिहासातल्या विविध सफरींमधून वेगवेगळे देश त्या त्या साम्राज्यांच्या
अधिपत्त्याखाली गेले. आमच्या पर्यटन संस्थांनी हिमालयासारख्या पर्वतराजापासून अंटार्क्टिकासारख्या
हिमखंडांनाच अंकित केलंय.
हिमालयात
ट्रेकिंग ही आजकालची फॅशनच आहे. खरं सांगायचं तर मीही या फॅशन -फॅडमध्ये मागे नाहीच.
आजपर्यंत मराठी कणखरतेने शिवरायांचे सगळे गडकिल्ले, उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी
हिंडून फिरून पालथे घातलेल्या मला या हिमालयातल्या वातानुकूलित सहलींचा मोह पडलेला
आहे. मुंबई-पुण्यापासून ए.सी. रेल्वेने प्रवास करून दिल्ली, पुढे ए.सी.(च) बसनं मनाली,
नैनिताल अशी थंड हवेची ठिकाणं आणि तिथून पुढे हिमालयातल्या त्या वेगवेगळ्या शिखरांकडे
कूच! राहायची-खायची सगळी चोख व्यवस्था, फक्त स्वत:चं सामान आणि कॅमेरा घेऊन जायचं.
सामानसुद्धा स्वत: वाहायची गरज नाही. त्यासाठी “पोर्टर” मिळतोच. (मी तर कित्येकांना
“स्वत:लाही” खेचरावरून वाहून नेताना बघितलंय)
जेवणखाण्यात सुद्धा किती मज्जा ! दररोज वेगवेगळे पदार्थ मिळतात. (“घरी तरी रोज पोळी-भाजीच
खावी लागते”, असं माझ्या मुलीचं अमूल्य मत आहे.) तरीही या ट्रेकिंगदरम्यानच्या ठरवलेल्या,
नेमलेल्या जेवणाचा कंटाळा आलाच, तर अधूनमधून लागणार्या टपर्यांमध्ये ऑम्लेट, मॅगी,
पहाडी चाय आणि बर्फाची गरज नसलेली शीतपेये मिळतातच. बारा-चौदा हजार फूट उंचीपर्यंत
सगळीकडे मॅगी मिळताना बघून, मॅगीचा आसेतू हिमाचल संचार जाणवून “मॅगी” हे भारताचे राष्ट्रीय
खाद्य आहे, असं लवकरच जाहीर होईल, असं मला वाटतं. थम्सअप आणि कोकाकोलाने तर त्या मिट्ट
गोड “पहाडी चाय” लाही मागे टाकून हिमालयातली सगळीच शिखरं काबीज केलीयत हे नक्की!
या
सगळ्या चैनीमुळे उन्हाळी सुटीत मुलांना हिमालयात
ट्रेकिंगला पाठवणं आता सरावाचं झालंय. मीही माझ्या सईला घेऊन गेलेच ना! हे असं सगळं
सोपं वाटत असलं, तरीही कित्येक मुलांना हे फाईव्ह स्टार ट्रेकसुद्धा झेपत नाहीत. कितीही
सोई-सुविधा मिळाल्या, तरी रोज किमान दहा-वीस किलोमीटर तरी आपलं आपल्यालाच चालावं लागणार
आहे, हे बहुतेक या अशा मुलांना उमजलेलंच नसतं. रोजच्या आयुष्यात कधी पाचशे मीटरसुद्धा
चालायची सवय नसताना ते थेट हिमालयात डेरेदाखल होतात आणि मग हात-पाय गाळतात. विशी-बाविशीची
मुलं तीन-चार किलोमीटरमध्येच ढेपाळतात आणि दहा वर्षांची सई मात्र आमच्या सगळ्यांच्या
बरोबरीने चार-पाच तासांत तो ठरलेला टप्पा हसतखेळत पार करते. हा विरोधाभास अशा वेळी
“सईची आई” म्हणून मला भूषणावह वाटतो. वेगवेगळं जेवण रोज समोर येत असतं, तरी ते तेव्हाच
जे आहे तेच स्वत:च्या हातानं वाढून घेऊन जेवणं, त्यानंतर स्वत:ची ताट-वाटी गारढोण पाण्यानं
स्वत: धुणं, हेही आमच्या मुलांना संकट वाटतं. आमच्या “हिमालया इको ड्राईव्ह” थीम असलेल्या
ट्रेकमध्ये एका मुलानं डझनाच्या हिशेबानं डिस्पोझेबल प्लास्टिकच्या प्लेटस् आणून आणि
त्या प्रवासभर भिरकावून द्यायचं ठरवून आमच्या थीमला अगदी मोडीत काढलं होतं.
हे
असं काहीही आणि कितीही उथळ वागणं असलं, तरीही हिमालयातली अथांग शिखरे, उंच उंच वृक्ष,
खळाळत्या-उसळत्या नद्या, बहुतेक रोजच संध्याकाळी कोसळणारा पाऊस, मध्येच अनुभवायला मिळणारा
हिमवर्षाव आणि ते नियोजित हिमशिखर गाठल्यावर होणारा आनंद अतुलनीय आहे, त्याबरोबरच हिमालयाकडे
पुन:पुन्हा खेचण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच दर उन्हाळ्यात खिशाला चाट देऊन, खांद्याला
सॅक अडकवून आलिशान हिमालय ट्रेकसाठी सुसज्ज होण्याचा माझा आणि सईचा उत्साह कायमस्वरूपी
आहे.