Saturday, July 25, 2020

वाटा.. आनंददायी ऑनलाईन शिक्षणाच्या


१५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने  विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा  माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे.  या शिक्षण पद्धतीमध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अशा परिस्थितीत सर्वच पालक आपापल्या परीने, विविध विषयांच्या शिक्षणावर तोडगा काढताना दिसत आहे. विषय सोपा करून सांगण्यासाठी कुठले माध्यम , खेळ , उपक्रम, प्रयोग उपयुक्त ठरतो आहे याबद्दलच्या संकल्पनांची  पालकांमध्ये देवाण घेवाण सुरु आहे. 

अशात आम्ही काही मैत्रिणींनी मिळून मराठी भाषा शिक्षणाचा असाच एक प्रयोग आमच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी केला.  सर्वप्रथम मराठी भाषा शिक्षण द्यायचे म्हणजे काय यावर ऊहापोह केला. तेव्हा असे लक्षात आले की  भाषा शिक्षणामागील हेतू हा मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, नवीन शब्दांविषयी त्यांना योग्य ते आकलन होणे, त्याद्वारे त्यांची संवाद साधण्याची कला तसेच विचार करण्याची क्षमता वाढीस लागणे असे असायला हवे. मग हे हेतू साध्य करण्यासाठी दुसरी-तिसरीच्या मुलांसमोर आपण असे काय खाद्य ठेवले पाहिजे ज्याचा ते आनंदाने, सहज  वृत्तीने स्वीकार करतील असा विचार आम्ही केला आणि "कविता" हे मुलांच्या आवडीचे माध्यम निवडले.  सुंदर ताल, नाद, ठेका असणाऱ्या कविता मुले सहजपणे गुणगुणायला लागतात, त्यातील  शब्दांचा अन्वयार्थ लावण्यात सुरुवात करतात हा अनुभव पाठीशी होताच.  तेव्हा, मुलांसमोर हा  बालसाहित्याचा अमूल्य ठेवा उलगडण्यासाठी  आम्ही एक ऑनलाईन उपक्रम घेण्याचे ठरविले आणि "कविता मनातल्या" या कार्यक्रमाचे आयोजन केले! मराठी भाषेमध्ये कित्येक श्रेष्ठ, ज्येष्ठ, अनुभवी रचनाकारांनी बालसाहित्य निर्मिले आहे.  कवयित्री शांता शेळके, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज.  विं. दा.  करंदीकर, मंगेश पाडगावकर, कवी ग्रेस  आदींमार्फत उत्तमोत्तम बालकविता रचल्या गेलेल्या आहेत शिवाय त्या चालबध्द केल्यामुळे गेय स्वरूपात त्यांची गाणी देखील उपलब्ध आहेत.  अशाच काही  बालकविता आम्ही मुलांना सुचविल्या, त्या म्हणून दाखवायला, ऐकवायला सुरुवात केली आणि मग त्या सुंदर तालबद्ध केलेल्या कवितेच्या माध्यमातुन  मुले नवीन शब्द, भावनांच्या व्यक्त करणाच्या पद्य-पद्धती   सहजपणे शिकू लागली. कवितांनी  मुलांच्या मनावर गारुड केले.  काहींनी त्या पाठ करून  साभिनय सादरीकरण केले, काही मुलांनी आपल्याला येत असणाऱ्या वाद्यांवर त्या वाजविल्या तर काही मुलांनी त्यावर नृत्य करणे पसंत केले.  विशेष म्हणजे मुलांनी स्वतःहून रस दाखवित, कल्पकता लढवत  उत्साहाने कार्यक्रमाची तयारी केली.   मुलांची तयारी झाल्यावर मुलांच्या पालकांकडून आम्ही त्या कवितांचे व्हिडिओ मागविले  आणि मग तयार झाला "कविता मनातल्या " कार्यक्रमाचा युट्युब प्रीमिअर !! सर्वच मुले उत्कंठतेने प्रिमिअरची वाट बघत होती. त्या  प्रीमिअरचा  सगळ्या मुलांनी, घरातील सर्व कुटुंबियांसोबत आनंद घेतला. कित्येक दिवसांनंतर आपल्या वर्गमित्रांना असे डिजिटली भेटणे मुलांना जाम आवडले.  युट्यूब वरील हा व्हिडिओ मुलांनी  पुनः पुनः पाहिला आणि आता तर आपल्याशिवाय आपल्या इतर मित्रवर्गाने सादर केलेल्या जवळपास १७ कविता, आठवड्याच्या कालावधीतच मुलांना मुखोदगत झालेल्या आहेत.  या  युट्युब प्रीमिअर उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी, भाषा तज्ज्ञांनी  कौतुक केले आहे. हा व्हिडिओ पुढील लिंकवर उपलब्ध आहे. 

https://www.youtube.com/watch?v=PEDn8UoPWkM

या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन आम्ही पुढील हेतू साध्य करण्यास सफल ठरलो. १) कवितांच्या माध्यमातून मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, २) विविध भावना व्यक्त करणेसाठी कवितेच्या माध्यमाचा उपयोग, ३) मराठीतील संपन्न  बालसाहित्याची ओळख, ४) प्रभावी सादरीकरण पद्धती, ५) मुलांच्या कल्पकतेला चालना  इ.   

शैक्षणिक टाळेबंदीचा कालावधी किती लांबणार आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. पण तो पर्यंत शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी कसे करता येईल यावर मात्र कल्पक उपाय शोधत राहिले पाहिजे. बघुया, काय काय समोर येतेय ते !!       

       डॉ. रुपाली कुलकर्णी,

९०११८९६६८१

                                                                                                                    alparambha@gmail.com 

                    



No comments:

Post a Comment