Saturday, July 11, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १: पठाणमामू : : श्री. बलबीर अधिकारी



लेखांक १: पठाणमामू

      त्याचे खरे नाव काय होते ते माहित नाही. सारे जण त्याला पठाणमामू म्हणत. आम्हीही तेच नाव वापरत असू. खरे नाव माहीत करून घेण्याची वेळ वा गरज कधी पडलीच नाही. नामपूर गावात चार फाट्यावर एका झोपडीवजा घरात मामूचा संसार होता. स्वत: व्यवसायाने गवंडी असूनही त्याने आपल्या घराची वीट कधी सरळ रेषेत बसवली नाही. ओळंब्याचा वापर करणे त्याला जणू कधी जमलेच नाही, पण त्यामुळे त्याचे कधी अडले आहे, असेही कधी दिसले नाही.

      मामूचा गोतावळा बराच मोठा होता. गावात त्याचा भाऊ आणि त्याचा परिवार बहाद्दर म्हणून प्रसिद्ध होता. पुराने वेढलेल्या नदीत उतरणे, कोणाच्या घरात साप घुसला असेल तर तो हुसकणे वा मारणे, खोल बारवेत उतरून तळाची चीजवस्तू काढून देणे यात त्याचा हातखंडा होता. कदाचित त्यामुळेच तो लोकांना हवाहवासा वाटत होता. त्यालाही असे कलंदराचे जीवन प्यारे असावे, असे त्याच्या एकंदर वागण्या-बोलण्यात जाणवत होते. मामू मनस्वी जीवन जगत होता.

      मनस्वी स्वभावामुळेच मामूने एक दिवस आपल्या भाईबंदाना आवडणारी गोष्ट केली. त्याने चक्क प्रेमविवाह केला. गावच्याच परिसरात असणार्या भिल्ल वस्तीतील राबिया नावाच्या तरूणीने त्याच्या मनात घर केले होते. दिसायला साधारण, सावळ्या वर्णाची राबिया नवीन लुगडे पडशी अंगावर ओढत पठाणमामूबरोबर मोमिनवाड्यात आल्याचे पाहून सार्यांनी गिल्ला केला. मामूला धमक्या दिल्या. गावातून बाहेर काढण्याबद्दल सुनावले, पण पठाणमामू सच्चा होता. मोठ्या दिलाचा होता. तिच्यासाठी त्याने सारा गोतावळा सोडला, पण अखेरपर्यंत तिला अंतर दिले नाही. त्याचा परिणाम म्हणूनच गावाच्या चार फाट्यावर त्याला झोपडीत संसार मांडावा लागला. पठाणमामू राबियाला आपले अपत्य नव्हते, पण गांवातील सारी मुले त्याच्या झोपडीत खेळत. बकर्या, कोंबड्या, म्हैस, यांच्याबरोबर मुलांचा वेळ चांगला जाई. खाटेवर मामू चिलीम ओढत बसलेला आणि राबिया घरकाम करताना दिसे. आला गेला मामूला हाक देई. तेव्हा मामू उठण्याचे कष्ट घेता आतूनच उत्तर देत असे. चंद्रमौळी घरामुळे आत-बाहेर असे काही नसायचंच. दर दिवाळीला आणि राखीला आईकडून तो ओवाळून घ्यायचा. आईही नाते जपायची. जमेल ते गोडधोड त्यांच्यापुढे ठेवायची अन् दुखले खुपले पाहायची. अशी नाती शेजारधर्माला उन्नत स्वरूप प्राप्त करून देत असायची. बघणारालाही बरे वाटायचे. गावात एक बरे असते. रीतिभाती सोडल्या तर सारी माणसे - माणसेच असतात. त्यात कुणी हिंदू, कुणी मुसलमान, कुणी बाई, कुणी पुरूष असा भेद नसतो. सारे रोखठोक असते. मनात एक, ओठात एक अशी द्विधा वा लेचीपेची प्रवृत्ती नसते. प्रेमही खरे असते आणि वैरही खरेच असते. ते परिणामाची विशेष पर्वा करीत नाही. पठाणमामूने तर कधीच ती केली नाही.

      परिणामांची पर्वा करणार्या पठाणमामूला गांवातल्या सर्वच मुलांचा कळवळा असे. गांवातील आठवडे बाजारच्या दिवशी सारी पोरे मामूच्या भोवती धिंगाणा घालत. त्यांचे मनोगत त्याच्या ध्यानी येई. राबिया कधी त्याला डाफरत असे, पण तो तिला जुमानत नसे. कधी भेळभत्ता, कधी टरबूज, कधी आंबे, कधी पपया विकत घेऊन तो मुलांसमोर ठेवी त्यांच्याकडे पाहात तो मुलांना खाऊ भरवीत असे. कधी मुलांसाठी तो असा खाऊ स्वत: घेऊन येई. शाळेत जाताना मधल्या सुटीत काहीबाही लागले तर मामूचा खिसा हमखास मोकळा सापडे अन् मुलांच्या चेहर्यावरच्या स्मितरेषा मामूला सुखावून जात.

      1969 साली महापूर आल्याने गावात मातीच्या घरांची  पडझड झाली. त्यात आमचेही घर होते. संसार उघड्यावर आला होता. मामू गवंडी होता. त्याच्याकडे गरजूंची रीघ लागली. हाताखाली कामाला माणूस मिळेना. घराचे खांब आणि छत उभे करण्यासाठी मातीच्या विटा तयार करण्यासाठी माणूसबळ हवे होते. आम्ही घरातल्या मुलांनीच मामूला साथ द्यायचे ठरवले. मामूने चार पैसे मिळण्याचे साधन सोडून बहिणीचे घर उभे करायला घेतले आणि आठवड्यात जसे होते तसे करून दिले. मोबदल्याची बात करताच तो उसळून म्हणाला होता."आप क्या दोगे? पैसा ? कीमत करोगे मेरे काम की ? छोटे हो - छोड दता हूँ - पर आइंदा ऐसी बात करना - बडा धक्का लगता है."

      आम्ही त्याच्या गरजेविषयी बोललो, पण मामू आपल्या शब्दावर ठाम होता. तो म्हणाला, "यह घर मेरा अपना है. जो चाहे ले लूँगा. पर इस तरह नहीं, ऐसे समय भी मैं काम आया तो कब आऊंगा ?"

      खरे पाहता मामू मुलांच्या कामी अनेकवेळा येत असे. जणू त्याने त्यांना दत्तकच घेतले होते. मुलांच्या शिक्षणासाठी कपडालत्ता, पुस्तके, फी यात त्याचा हात असे, प्रसंगी तो आपल्या कोंबड्या बकर्या विकत असे. ते पाहून कधी अवघडल्यासारखे वाटले तर, "अरे, उसके लिए तो रखा था उनको ?" असे म्हणून हसण्यावारी सारे नेत असे. किरकोळ दुखणे जास्त होऊन राबिया सोडून गेल्यानंतर पठाणमामू एकटा पडला. एव्हाना मुलेही मोठी होऊन आपआपल्या व्यवसायात अडकली होती. तथापि गावी गेल्यावर मामूकडे उठबस चालूच होती. तोही आता थकला होता.मधून मधून तो आजारी पडे. कधी जास्त झाल्यावर सार्यांना बोलावून घेई. निरवानिरवीचे बोलत असे. आम्हाला ते सारे असह्य होत असे. कारण उत्साही कार्यमग्न असणार्या परोपकाराच्या पायघड्या घालणार्या पठाणमामूचे असे दर्शन त्रासदायक असे, पण सार्यांचेच सगळे दिवस सारखे नसतात. आपल्याला आठवण असो वा नसो काळ आपले काम करीतच असतो. अशाच एका दिवसाने मामूची जीवनयात्रा संपवली.

      आजही एस.टी. ने गावी जाताना जेव्हा नामपूरच्या चार फाट्यावर मी उतरतो तेव्हा उजवीकडे वळून पाहतो. जेथे मामूची झोपडी होती तिथे आता हॉटेल उभे आहे. पण मला मात्र ती झोपडीच दिसते आणि खाटेवर मामू बसलेला दिसतो. तो मला साद घालील असे वाटते, पण हाक आल्यामुळे मी हातातली पिशवी सावरत घराकडे पाऊल टाकतो. थोडे थबकून पाठीमागे माझी नजर जाते तेव्हा तिथे काहीच दिसत नाही. मामू आणि झोपडी - दोन्ही आता दिसणारच नाहीत. मनातले कधी जेव्हा बाहेर दिसू लागेल तेव्हा कदाचित मला पठाणमामूला भेटण्याचा योग येईल. अन् त्यापाठी शब्दही येतील. "आओ बेटा. कहो, कैसे हो ?"


- श्री. बलबीर अधिकारी  


No comments:

Post a Comment