लेखांक २:गंगाधर पुरुषोत्तम
डोक्यावर
करडे परंतु भरपूर केस, भावुक डोळे, वरकरणी हसरा पण मधूनच गंभीर होणारा चेहरा, सामान्य मराठी
माणसाचा बुशशर्ट व पँट हा पेहराव, कधी चौकटी वा निळा कोट घालून
एक्झिक्युटिव्ह दिसण्याचा वा थंडी आवरण्याचा गोंडस प्रयत्न, कशालाही
हो म्हणून डावा हात केसावरून फिरवत आत्मविश्वास वाढवण्याची ढब
एवं गुणविशिष्ट गंगाधर पुरूषोत्तमंचा आणि अस्मादिकांचा परिचय घडला तो थोडा नाट्यमय
प्रसंगानेच.
आमच्या कंपनीत एक नवीन सामाजिक
प्रकल्प आकार घेत होता. त्यासाठी तळमळीची दोन माणसे हवी होती.
आम्ही कारखान्यातले कर्मचारी असलो तरी युवा कार्यकर्ते असल्याने आमचा
लोकसंग्रह बरा होता. लोक आमचा प्रामाणिकपणा ओळखत होते.
शब्दाला थोडे वजन होते. कामात टापटीप व वक्तशीरपणा
होता. यामुळे आम्हाला त्या कामासाठी बोलावणे आले व गंगाधार पुरूषोत्तमांच्या
नेतृत्वाखाली परिणामकारक अंमलबजावणीची आज्ञा झाली. आम्ही त्यांच्या
कार्यालयात गेलो तेव्हा कुठल्यातरी प्रदर्शनाचे आयोजन सुरू होते. आम्हाला पाहून त्यांनी केवळ हॅलो न करता जवळ येत हस्तांदोलन करून पाठीवर हात
ठेवला व सार्यांना उद्देशून ते म्हणाले 'Here come the two friends. Now the
project will march ahead, galloping & dancing.' आणि खरोखरच प्रकल्पाने
वेग घेतला. त्यांचा कामाचा उरक चांगला होता. दृष्टी तीक्ष्ण होती पण नको त्या विषयाकडे दुर्लक्ष करण्याइतकी ती उदारही होती.
स्वत: प्रसिद्धीप्रमुख असले तरी ते प्रसिद्धी पराङ्मुख
होते. जवळजवळ दर आठवड्याला एक कार्यक्रम, दरम्यान भेटी, भोजन, नियोजन,
आर्थिक तरतूद, आमंत्रणे, स्थानिक नेते मंडळींशी सल्लामसलत, वार्तापत्र,
बुलेटिन, हिशेब, फोटोग्राफी
सारे असायचे. प्रकल्प वृक्षारोपणाचा. त्यामुळे
तीही तरतूद असायचीच. शिवाय त्यांचे इतर कामही असायचे.
तेही मोठेच असावे असे आज वाटते. त्यावेळी आम्हाला
आमचेच काम मोठे वाटायचे. तेही तसेच भासवायचे. आणि आमच्याबरोबर आमच्या कामात रममाण व्हायचे.
वरून धडधाकट असले तरी जी.पी. (हे टोपणनाव त्यांच्या मित्रांनी त्यांना दिले होते)
प्रकृतीने तसे नव्हतेच. चहा जास्त व्हायचा की ते फक्त चहाच प्यायचे
हे कळत नसे. जेवण हा अप्रिय विषय होता. इतरांसमोर खाणे त्यांना कदाचित असंस्कृतपणाचे वाटत असावे. बरोबरचा डबा बहुधा घरी परत जाई अथवा दान केला जाई. त्यामुळे
आम्लपित्त वाढून त्रास होई पण त्यांनी कधी इलाज केल्याचे दिसले नाही.
जी. पी.
म्हणजे “बॉर्न टू सफर” याचे
आणखी एक उदाहरण म्हणजे आमची संयुक्त दिल्ली भेट-ट्रेड फेअरमध्ये
आमच्या कंपनीचा प्रदर्शन स्टॉल होता. त्यानिमित्त आम्ही तिथे
होतो. महाराष्ट्र भवनात आमचा मुक्काम होता. थंडीचे दिवस होते, ते दररोज सकाळी नाश्ता झाल्यावर अथवा
रात्री मला दूध वा फळांचा रस प्यायला घेऊन जात. नको म्हटले तरी
स्वत:च पैसे देत. स्वत: काही खात नसत. एकेदिवशी सकाळी ते उठले नाही म्हणून मी
त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा ते पंचा ओढून झोपले होते. कांबळे
अथवा शाल का घेतली नाही हे तर त्यांनी मासलेवाईक उत्तर दिले. “थंडी सहन होते का ते पाहत होतो.”
खरे पाहता ते कुडकुडत होते.
बहुदा कपडे मिळाले नसावेत किंवा कंटाळा केला असावा. स्वत:ची सोय करून घेण्यापेक्षा त्रास काढणे त्यांना पसंत
होते की काय ते कळत नसे, आपली कामे ते सफाईने करीत. मग ती सभा असो, मिटिंग असो वा चर्चा-फील्डमधले काम करण्यातही त्यांचा हातखंडा होता. टिपणे,
रिपोर्ट, कलासक्ती, सौंदर्य
यांची त्यांना जाण होती. सहकार्यांविषयी
सहानुभूती व वरिष्ठांविषयी आदर होता. विषयाचा आवाका त्यांच्या
सहज लक्षात येत असे. इंग्रजी व मराठी त्यांना सारखेच चांगले येत
असे. या सर्व गुणांमुळेच त्यांची प्रतिमा चांगली होती.
ती वाढविण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांचा उपजत स्वभावच ममत्व असणारा होता. त्यांना राग
येत असेच पण तो व्यक्त करणे त्यांना कमीपणाचे वाटे.
मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना
जी.पी. जिल्हा प्रसिद्धी अधिकारी म्हणून
काम पाहत होते. कामाचा उरक व अचूकता त्यावेळी त्यांनी उत्तमपणे
दाखवली. वर्तमानपत्रे व इतर प्रसिद्धी माध्यमे यांच्याशी जवळीक
साधणे व कार्यक्रमांची वृत्ते प्रसिद्धीला देणे; तसेच मनमोहक
स्वभावाने ते वार्ताहरांना स्विकारण्यास प्रवृत्त करणे या गोष्टी सहज करीत.
वृत्तसंकलन व प्रसिद्धी यातील विशेष नैपुण्यामुळे त्यांच्या नावाला प्रसारमाध्यमांच्या
जगात मोठे वजन होते.
त्यांच्या कार्यकाळात ट्रॉम्बे
विस्ताराचे दोन टप्पे, विपणन विभाग विस्तार व थळ खत कारखान्यासंबंधीच्या
प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या. कंपनीचे अस्तित्व 1978 साली वहिवाटीस आले. हे सर्व त्यांनी चांगल्याप्रकारे
कार्यान्वित केले. थळ खत प्रकल्प उभा राहण्याअगोदर त्या जागी
राज्य व केंद्र सरकारचे अधिकारी व मंत्री यांनी दिलेल्या भेटी, जागतिक बँकेच्या पथकांनी केलेली पाहणी, स्थानिक पातळीवर
झालेला विरोध व तोे कमी करण्यासाठी आखलेल्या योजना यात जी.पी.
अग्रभागी होते. आम्ही त्यांच्याबरोबरच होतो.
कृषिविकास व समाजसेवा या क्षेत्रात कंपनीतर्फे जे प्रामाणिक प्रयत्न
झाले त्यात जी.पी. चे स्थान मोठे व मानाचे
होते.
समाजाविषयी कृतज्ञता व कंपनीची
सामाजिक उद्दिष्टे याविषयी दक्ष असणारे जी.पी. स्वत:विषयी मात्र बेफिकीर असत. त्यांना पगार नेहमीच कमी मिळे. वेगवेगळ्या कामासाठी घेतल्या
गेलेल्या अग्रिम रकमांचा हिशेब करणे व तो नियमांप्रमाणे देणे त्यांना जमत नसावे.
त्यामुळे मोठ्या जागेवर काम करूनही त्यांना नेहमी चणचण भासे.
खिशात असलेले पैसेही गरजूंना वाटले जात. त्यामुळे
सतत अडचण असे. प्रकृतीकडे लक्ष देण्याइतके अवधान व वेळही त्यांना
सापडत नसे. त्यामुळे ते सारेच अंगावर काढीत. परिणामी केवळ 49 व्या वर्षी त्यांना पक्षाघात होऊन ते
कोसळले आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
आज विचार करता 40 वर्षांनी देखील जी.पीं ची आठवण मनात ताजी आहे.
त्यांच्याबरोबर काम करणार्या आमच्यासारख्या असंख्य
मनांना जी.पी. चटका लावून गेले.
घरातले वडिलधारे माणूस गेल्यावरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू दिसणार नाही,
अशांच्या डोळ्यांना धारा लागल्याचे आम्ही पाहिले. काही असो, जी.पी. हे कंपनीला व समाजाला पडलेले एक हवेहवेसे स्वप्न होते हे मात्र खरे
!