Saturday, June 4, 2022

निमित्त : ५ जून : जागतिक पर्यावरण दिवस : प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!


प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!



आपल्या आजूबाजूच्या कचरापेट्यात, रस्त्यावरच्या मोकळ्या जागेत, हायवे आणि रेल्वेरूळांच्या शेजारी सहज नजर गेली तरी काय दिसतं? प्लास्टिकच्या पिशव्या, चिप्स, खाऊची रिकामी पाकिटं, कोल्डड्रिंकच्या बाटल्या यांचा अगदी खच. असं वाटतं की हे प्लास्टिक पृथ्वीला दशांगुळे व्यापून राहतंय की काय?  अगदी गायी- गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशीच एक घटना केशव- सीता मेमोरियल ट्रस्टच्या शिरिष फडतरे आणि डॉ. मेधा ताडपत्रीकर या संस्थापक सदस्यांच्या बाबतीत घडली. एका अभयारण्यात फिरायला गेलेले असताना, तिथल्या एका हरिणाचा मृत्यू पोटात प्लास्टिक गेल्याने झाल्याचं कळलं, आणि हे दोघेही खूप हळहळले. 

“या घटनेनं आम्हांला विचार करायला भाग पाडलं. आजूबाजूला वाढत जाणारे प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग अस्वस्थ करतच होते. शिवाय त्यात असे मुक्या प्राण्यांचे प्लास्टिक पोटात गेल्याने होणारे मृत्यू पाहून जास्तच त्रास होत होता. यावर काहीतरी उपाय करूया, असं ठरवलं. खरंतर मी आणि मेधा या दोघांपैकी कुणीच थेट संशोधक किंवा विज्ञान विषयाच्या पार्श्वभूमीचं नाही. मी कॉस्ट अकाऊंटंट तर मेधा यांची मार्केटिंग क्षेत्रात पीएचडी झालेली आहे. पण एकदा यात उतरायचं ठरवल्यावर या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक, संस्था, केमिकल, पॉलिमर इंजिनिअर्स यांच्याशी चर्चा- संशोधनं वाचणं सुरू केलं.” संस्थापक शिरिष फडतरे सांगत होते.

“क्रूड ऑईलपासूनच पेट्रोल इ. बनतं तसंच प्लास्टिकही बनतं. एवढं बेसिक ज्ञान आम्हांला होतंच. मग याचं उलटं करून प्लास्टिकपासून काही इंधन बनवता येईल का यावर आम्ही विचार सुरू केला. त्याबद्दल तज्ज्ञांशी बोललो, पण असं काही होण्याच्या शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या. तरीही काही जणांच्या विचारानं प्रयोग तरी करून बघू म्हणून आधी पातेल्यात प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या टाकल्या तर ते पेटलं. मग विचार केला हाच प्रयोग आपण प्रेशर कुकरमध्ये करून पाहू, तिथंही ते पेटतच होतं. मग कुकरच्या शिट्टीला सोल्डरिंग करून घेतलं आणि ते पाण्यात सोडलं. जे गॅसेस होते, ते पाण्यात येताच तेलासारखे तरंगू लागले. ते वेगळं काढून त्याला काडेपेटीची काडी लावून पाहिली, तर ते पेटलं! हा अगदी बेसिक प्रयोग आमच्यासाठी ‘युरेका’ क्षण होता.”

“या प्रयोगात बऱ्याच सुधारणा करण्याची गरज होती. मग हे नीट व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी आम्ही 2009 साली रूद्रा एन्व्हायर्नमेंट सोल्युशन कंपनीची केशव- सीता ट्रस्टअंतर्गत स्थापना केली. आणि एका फॅब्रिकेटर मित्राकडून 25-30 किलोच्या प्लास्टिकवर काम करणारा एक प्लांट तयार करून घेतला. यातून शिस्तीत ऑईल अर्थात इंधन निघायला लागलं. त्यातून जो वायू येत होता, तो तसाच हवेत निघून जात होता. एनसीएलमध्ये काम कऱणाऱ्या माझ्या मामांनी मला सांगितलं की तो वायू तसाच सोडू नका, गोळा करा. तो वायू आम्ही कॉम्प्रेसरद्वारे एका टाकीत जमा केला. आणि ऑईलचे प्रॉडक्शनही वाढलं. ते आम्ही जनरेटरमध्ये वापरून पाहिलं, विजेचे दिवे त्यावर सहज सुरू झाले. अर्थात हा प्रयोग यशस्वी झाला.” फडतरे सर सांगत होते.

यानंतर त्यांनी मशीनची क्षमता वाढवली, 300 किलोच्या क्षमतेचा प्लांट जेजुरी इथं सुरू केला. शिवाय  पॉलिमर्सची साखळी तोडणारे Thermo Catalytic Depolymerization ही प्रक्रिया वापरून ऑक्सिजनचा वापर न करता अधिक चांगल्या क्षमतेचं इंधन तयार होऊ लागलं. प्लांटचा Feasibility Analysis केला, या फ्युएलचे त्यांनी पीयूसी टेस्टिंग करून घेतले. त्यातून पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत अत्यंत कमी सल्फर वातावरणात सोडणारे उत्तम पर्यावरणपूरक इंधन असल्याची पावती त्यांना मिळाली. शिवाय डिझेल आणि केरोसिनच्या तुलनेत उच्च म्हणजेच सुमारे 10500 कॅलरीफिक व्हॅल्यू या इंधनाची असल्याचे त्यांना समजले. या सगळ्या गोष्टींत 2014-2016 अशी दोन वर्षं गेली. 

हे फ्युएल उत्तम दर्जाचे, पर्यावरणाची हानी न करणारे असल्याने इंडस्ट्रीमधल्या बॉयलर्स, बर्नर्स, इनसिनिरेटर आणि अगदी स्वयंपाकासाठीच्या स्टोव्हच्या बर्नरमध्ये काही बदल करून वापरता येते, हे लक्षात आलं. शिवाय या फ्युएलची प्रतिलीटर किंमत ही फक्त 45रू. आहे, जिथं डिझेलची किंमत आजच्या घडीला 110रू. प्रतिलीटर झाल्याने हे उद्योगांना अगदीच परवडणारे आहे. त्यामुळे यांनी हे फ्युएल विकायला सुरूवात केली, फक्त तेवढंच नाही तर प्लास्टिकपासून इंधन बनवणारे असे 14 प्लांटही तयार करून त्यांनी उद्योग आणि काही मनपांना विकले. त्यात पुणे महानगरपालिका आणि कल्याण- डोंबिवली मनपाने असे प्लांट विकत घेतलेले आहेत.

यासोबतच रूद्रा कंपनीने प्लास्टिकचे पार्टिकल्स रस्ते बनवण्याच्या कामात वापरता येतात, हे ही दाखवून दिलं. ज्याने रस्ते पावसाळ्याच्या काळात खड्डे न पडणारे, वारंवार दुरूस्ती न लागणारे, नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा तीन वर्षे जास्त टिकणारे बनतात. एवढंच नाही तर त्याचा खर्च सुद्धा प्रति चौरस किमी 35 हजारांनी कमी होतो. इंधन बनवताना जे प्लास्टिकचे पार्टिकल्स राहतात ते या रस्त्यात वापरता येतात. खडी आणि डांबर यांचे मिश्रण करताना डांबराच्या आठ टक्के प्लास्टिकचा चुरा वापरला जातो. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे प्रमाण ठरवलेले आहे. आणि हे सगळं कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात पुण्यात असे 23 हून जास्त रस्ते रूद्रा कंपनीने मनपाच्या सहाय्याने तयार केले आहेत. अलका टॉकिजजवळच्या चौकाजवळ भागवत रस्ता हा 2018 साली बनवलेला, पहिला प्लास्टिकमिश्रीत रस्ता. जो आजही उत्तम आहे. एवढंच नाही तर कल्याण डोंबिवली मनपा, मुंबई मनपाअंतर्गतही त्यांनी काही रस्ते बनवलेले आहेत. 

या सगळ्यात केशव सीता ट्रस्टचे उल्लेखनीय काम आहे, ते हे इंधन बनवण्यासाठी थेट लोकांकडून प्लास्टिक गोळा करण्याचे. सध्या पुण्यातील 15 हजार कुटुंबांकडून मल्टि लेयर प्लास्टिक (चिप्सचे, बिस्किटे, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटं), दुधाच्या पिशव्या, शाम्पू बाटल्या, जुनी खेळणी, प्लास्टिकची फुलं अश्या अनेक गोष्टी त्या- त्या सोसायटीत जाऊन गोळा केल्या जातात. हे गोळा करताना अन्नपदार्थांच्या पिशव्या आणि कंटेनर्स स्वच्छ धुवून, वाळवून कश्या जमा करायच्या याची माहिती स्वयंसेवक लोकांना देतात. 15 दिवसांतून एकदा थेट तुमच्या सोसायटीत केशव सीता ट्रस्टची गाडी येते आणि हे सगळं प्लास्टिक मोफत घेऊन जाते. यामुळे रस्तोरस्ती प्लास्टिकचे ढीग जमा होण्याचे प्रमाण काही अंशाने कमी झालंय, आणि प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाण्यापासूनही काही अंशी वाचतंय. मुळात लोकांमध्ये पुनर्वापराची जाणीव रूजतीये आणि त्यापासून पुन्हा कमी प्रदूषण करणारे इंधन बनून स्वच्छ पर्यावरणाला काहीसा हातभारही लागतोय.

तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हांलाही तुमच्या सोसायटीत जर प्लास्टिक गोळा करायला ही गाडी बोलवायची असेल तर संपर्क साधा- रूद्रा एन्व्हायर्नमेट सोल्युशन्स लिमिटेड, एरंडवणे, पुणे-  02025448900/ 9373053235 (रविवारी सुट्टी)

.. स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

- स्रोत: कायप्पा : 

No comments:

Post a Comment