Saturday, August 14, 2021

आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप

 


आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप 

नाशिक  येथील मविप्र समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, तृतीय वर्षीय संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी, अल्परंभा सांस्कृतिक आणि शैक्षणिक फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली  "अर्थ साक्षरता दूत" हे  मोबाईल अप्लिकेशन विकसित केले आहे.  आपल्या देशातील अर्थ साक्षरतेचे प्रमाण केवळ २४% इतके अत्यल्प आहे. अनेक नागरिकांना आर्थिक क्षेत्रासंबंधित  मुलभूत ज्ञान अवगत नसते.   तेव्हा समाजामध्ये  आर्थिक साक्षरतेचा प्रसार  व्हावा आणि याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देश्याने  हे ॲप विकसित केले गेले आहे. आत्मनिर्भर भारत या देशाच्या ध्येयाशी सुसंगतता साधणारे हे ॲप, युजर्सना "आर्थिक स्वातंत्र्याच्या" दिशेने पाउल उचलण्यास प्रवृत्त करेल  असे आहे.

 या ॲपच्या माध्यमातुन  जनसामान्य, महिला वर्ग तसेच किशोरवयीन मुलांच्या   आर्थिक साक्षरते संबंधित, उपयुक्त विषय, लेखक्षेत्रातील ताज्या घडामोडी, व्हिडिओ यांच्या माध्यमातुन  विविध आर्थिक विषयाचे ज्ञान मिळविता येते. तसेच आपली अर्थ साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नमंजुषेचाही उपयोग करून घेता येते. समाजातील विशेष करून मुख्य आर्थिक प्रवाहापासून दुर असलेल्या व्यक्तींसाठी, अर्थसाक्षरता दूत  म्हणून काम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठीही हे ॲप उपयुक्त आहेयाद्वारे विविध उपयुक्त सरकारी योजनांची माहिती, असे  स्वयंसेवक जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतात तसेच आपण केलेल्या कामाची नोंदणीही याॲपमध्ये करू शकतात. ॲपमध्ये अर्थ साक्षरतेसंबंधित   इंग्रजी तसेच मराठी भाषेतील लेखही उपलब्ध आहेत.

आपले सामाजिक दायित्व ओळखून या विद्यार्थ्यांनी ॲप विकसित केले असून ते लवकरच गुगल प्लेस्टोर वर 'अर्थ साक्षरता दूत' या नावाने उपलब्ध होईल. अल्पारंभ फाउंडेशनतर्फे डॉ. रूपाली कुलकर्णी तसेच महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. सतीश देवणे आणि प्राध्यापक डॉ. वैशाली तिडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यशराज निकम, श्रीकांत डेरे, यश तळेले, हितेश पाटील आणि मीनल मैन या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला. देशाच्या ७५व्या  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन  ॲपविषयी महाविद्यालयीन मुलांना त्यासंबधीत  माहिती देण्यात येणार आहे. हे ॲप समाजातील आर्थिक साक्षरता सुधारण्यास नक्कीच मदत करेल, असा आशावाद सर्वानी व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment