Saturday, July 3, 2021

फेकला तटाहून घोडा : श्री. पुष्कर देशपांडे



तो खड्डा...रस्त्याच्या मधोमध...पाण्याने भरलेला... सरासरी ताशी पंचावन्न किलोमीटरच्या वेगाने जवळ येत होता! अंतर= वेग x वेळ या ईयत्ता पाचवीच्या बुकात शिकलेल्या समीकरणात संभवनीय सर्व संख्या टाकून वेगाचे कमीत कमी नुकसानदायक उत्तर काढायचा मी प्रकाशातीत वेगाने प्रयत्न करत होतो. उरलेले अंतर लक्षात घेता दोनंच शक्यता शिल्लक होत्या..एक..जर त्या पाण्याखाली छटाकभर खोलीचा खड्डा असेल तर थोडेसे पाणी सभोवतालच्या परिसरावर (आणि अर्थात स्वतःवर) उडवून मी हनुमानचालीसाचे आभार मानत मार्गस्थ होईन... नाहीतर प्रचंड खोलीच्या त्याच खड्डयातून मी आरपार बहुदा जपानमधे निघेन..माझ्या जपानी बाईक सोबत!

बाईक! प्रचंड अवघड वाहन आहे हे चालवायला..इतके, की चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांमधे बाईक चालवणे याचाही समावेश करण्यात यावा. कित्येक अवधाने सांभाळावी लागतात एकाच वेळी. "लँडिंग गियर्स", अर्थात पाय वर घेतल्यावर तोल सांभाळण्यापासून जी सुरुवात होते, त्यानंतर रस्त्यावरची माणसे चुकवणे, इतर गाड्या चुकवणे, गुरंढोरं चुकवणे, बेमालूम आणि बेदरकारपणे सिग्नल चुकवणे, खड्डे चुकवणे, रस्त्यावरील स्पीडब्रेकर नामक तुच्छ वस्तू चुकवणे, पोलीसमामा हुकवणे, त्याचबरोबर चालत्या गाडीवर रस्त्याकड़े 'काकदृष्टी' ने बघत मोबाईल वर बोलणे अथवा चालत्या गाडीवर १८०° वळून 'घुबडदृष्टी' ने मागे बसलेल्या माणसाशी बोलणे अश्या कित्येक कामांची अवधाने सांभाळावी लागतात...आणि हो, हे सर्व करायचे ते शिरस्त्राण घालून आणि पाय खाली टेकवायची गुस्ताखी न करता! पण बाईकस्वाराला कारवाल्याप्रमाणे गाडीच्या दोन चाकांमधून खड्डा अलगदपणे पार करून काही न झाल्याचे 'I'm the Boss' वाले एक्सप्रेशन पण देता येत नाही आणि गाडी 'ऑटोपायलट' वर टाकून चुकून एखादी झपकी मारणेही दुरापास्त. 

स्पर्शरेषा (Tangent) ज्याप्रमाणे वर्तुळाला एकाच बिंदूने स्पर्श करते त्याप्रमाणे आमच्या या बाईकच्या चाकांचा रस्त्याशी नेहमी २ बिंदुंचा संबंध (अर्थात स्पर्शरेषेसारखे, रस्ते मात्र 'सरळमार्गी' नसतात तो भाग निराळा!), त्यामुळे दिसली फट की घोड़े दामट आणि मार 'कट' हे बाईक बिरादरीचे ब्रीदवाक्य..त्यात तड़जोड़ नाही. फक्त दोन बिंदू टेकवायची जागा हवी. त्यामुळेच बाईक चालवणे ही एक विद्या नाहीतर दुसरे काय?

ही विद्या आम्हाला वाडवडलांनी लहानपणीच दिली आहे. ज्याप्रमाणे अफ़झलखानाने विडा उचलला होता त्याच नीडरपणे आम्ही लहानपणी वडिलांच्या 'घोड्याची' किल्ली उचलून मोहिमेवर जात असू...कमालीचा योगायोग असा, की त्या 'घोड्याचे' नावही (बजाज) "चेतक" होते! त्यानंतरही जास्त 'हॉर्सपॉवर' चे अनेक घोड़े चालवलेत (दामटलेत!), आणि कित्येकदा घोड्यासकट धारातीर्थीही पडलोय...शेवटी देशपांडेच मी!

तर अशी ही घोडा-वजा-बाईक आमची अत्यंत पाईक. टाच मारली की बिनबोभाट सुरू होते आणि मग शेजारच्या वाण्याच्या दुकानातून दूध आणण्यापासून ते बिऱ्हाडं हलवण्यापर्यंत सगळ्या कामांत साथ देते ही बाईक. माणसाला आयुष्यात पुन्हा पुन्हा पडून परत स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकायचं असेल आणि गेलेला तोल परत मिळवायला शिकायचं असेल तर बाईक सारखा सुंदर पर्याय नाही!

...पंचवन्नवरुन एव्हाना मी माझा वेग हनुमानचालीसा म्हणता म्हणता चाळीस वर आणला होता. सर्व समीकरणे बाजूला सारुन जे होईल ते बघून घेऊ म्हणत मी त्या खड्डयाच्या तटावरुन घोडा फेकला...आणि... साचलेल्या पाण्याचे फवारे दोन्ही बाजूस उडवून शेजारनं जाणाऱ्या  बाईच्या शिव्या खाऊन तिला 'दाग अच्छे हैं' म्हणत पुढे मार्गस्थ झालो!

~ श्री. पुष्कर देशपांडे

No comments:

Post a Comment