Saturday, July 31, 2021

नाती : डॉ. सौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक

नाती...

ज्यांच्यामुळे..

     मनी आनंद लहरी,  सुखद क्षणांच्याही सरी,

     मनोविश्व माझे बहरी, नाती तीच !!

ज्यांच्यामुळे..

     मनी फुलतो वसंत,समाधानही अनंत,

     माझे क्षण शोभिवंत, नाती तीच !

ज्यांच्याकरिता..

    मन कल्पिते नवनवेशोधी भेट प्रयोजने,

    आठवांनी भरू पावे, नाती तीच !

ज्यांच्यामुळे..

       चढे कळस कतृत्वास, बहर नवे व्यक्तित्वास,

       वाढी लागे आत्मविश्वास, नाती तीच !

ज्यांच्यासंगे..

      आपल्या विचारांचा सन्मान,  आवडी निवडीचाही मान,

       व्यक्तिस्वातंत्र्याचे ही भान, नाती तीच !

ज्यांच्या सोबतीचा..

      मज वाटतो हव्यास,  मनी आठवांचा सुवास,

     मज हृदयामध्ये वास, नाती तीच !

माझ्यासाठी..

       अशी कित्येक भवती,  मनःचक्षू ही बघती,

       मना रुजतीवाढती, नाती तीच !


Saturday, July 24, 2021

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ

 


मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात. 

कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच. 

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं  दीपपूजन.

आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा  केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते.

ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजल्या जाते.

प्रथम भगवान नरसिंहचं  का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी आणि कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका

या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा-अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या  कलेने दोन्ही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो, अशी ही जरा देवी. 

जरेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध - बृहस्पती.. 

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्त्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 

प्रथम रक्षक देवता, नंतर जन्माबालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करून हा लेख प्रपंच थांबवतो...... 


जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।


 - इदं न मम , स्रोत अज्ञात 

Saturday, July 17, 2021

चंगळवाद ? आपण सूर्य निवडू या



तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?  आत्ता काल-परवापर्यंत "पैसा, समाधान, शांती" हे शब्द ऐकू यायचे. हल्ली थेट विकेट पडते -

"मला फक्त मज्जा करायचीये". विषय संपला. 

 "मज्जा केलीच पाहीजे" ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत. इथे "मज्जा" ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती "निकड" झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; 

ती समाजातल्या "मॉडर्न" शहाण्यांनी  आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.

 तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. 

म्हणजे पहा -

"बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी..."

"पार्टी नाही? शी..."

"फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी... पथेटिक..."

"वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर..." "डेटवर चाललायस ? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad..." "वीकेन्ड घरच्यां बरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी..."

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले. तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे सापडावेत, यासाठी पाश्चिमात्य कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून "आजचं बघा" हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. 

मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं. सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या. "अनलिमिटेड बुफे" च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे "त्यात काय एवढं?" असं झालं. जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन "लिनन"च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.

 एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं "big fat पंजाबी वेडिंग" झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले "इवेन्ट्स" झाले.

 मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं अमेरिकन उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा. तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या "प्रेमाचं" मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल. कमवा; आणि उडवा.

 आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय का आपल्या ?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेट धार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे.

 "आम्ही कित्ती आनंदात आहोत", "आमचं कित्ती मस्त चालू आहे", "आम्ही कित्ती एंजॉय करतोय", हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो. ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो. 

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती "cool" आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं. त्यात श्वास कोंडला जातो. तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं. मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने सो पथेटिक म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; 

त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे प्रयत्न सुरू होतात.

 गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात. त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं.

जागे होऊया रे.

जागे होऊया.

स्वत्व नको विकूया आपण. दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत, स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत. उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंत चमकतो. आपण सूर्य निवडू या.

आपण सूर्य निवडू या.

👍😁🌹👏🌴🌈


 ( लेखक - अज्ञात )

Saturday, July 10, 2021

कॅलिग्राफी लेटरिंग : श्री. अनिरुद्ध कुलकर्णी



कॅलिग्राफी  ही लेखनाशी संबंधित एक व्हिज्युअल आर्ट आहे. यात पेन, शाई ब्रश किंवा इतर लेखन उपकरणाद्वारे अक्षरांचे डिझाइन आणि लेटरिंग करण्यात येते !   


श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या  कॅलिग्राफी कलाविष्कारातील काही प्रस्तुतीकरण पुढील प्रमाणे ! 


















Saturday, July 3, 2021

फेकला तटाहून घोडा : श्री. पुष्कर देशपांडे



तो खड्डा...रस्त्याच्या मधोमध...पाण्याने भरलेला... सरासरी ताशी पंचावन्न किलोमीटरच्या वेगाने जवळ येत होता! अंतर= वेग x वेळ या ईयत्ता पाचवीच्या बुकात शिकलेल्या समीकरणात संभवनीय सर्व संख्या टाकून वेगाचे कमीत कमी नुकसानदायक उत्तर काढायचा मी प्रकाशातीत वेगाने प्रयत्न करत होतो. उरलेले अंतर लक्षात घेता दोनंच शक्यता शिल्लक होत्या..एक..जर त्या पाण्याखाली छटाकभर खोलीचा खड्डा असेल तर थोडेसे पाणी सभोवतालच्या परिसरावर (आणि अर्थात स्वतःवर) उडवून मी हनुमानचालीसाचे आभार मानत मार्गस्थ होईन... नाहीतर प्रचंड खोलीच्या त्याच खड्डयातून मी आरपार बहुदा जपानमधे निघेन..माझ्या जपानी बाईक सोबत!

बाईक! प्रचंड अवघड वाहन आहे हे चालवायला..इतके, की चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांमधे बाईक चालवणे याचाही समावेश करण्यात यावा. कित्येक अवधाने सांभाळावी लागतात एकाच वेळी. "लँडिंग गियर्स", अर्थात पाय वर घेतल्यावर तोल सांभाळण्यापासून जी सुरुवात होते, त्यानंतर रस्त्यावरची माणसे चुकवणे, इतर गाड्या चुकवणे, गुरंढोरं चुकवणे, बेमालूम आणि बेदरकारपणे सिग्नल चुकवणे, खड्डे चुकवणे, रस्त्यावरील स्पीडब्रेकर नामक तुच्छ वस्तू चुकवणे, पोलीसमामा हुकवणे, त्याचबरोबर चालत्या गाडीवर रस्त्याकड़े 'काकदृष्टी' ने बघत मोबाईल वर बोलणे अथवा चालत्या गाडीवर १८०° वळून 'घुबडदृष्टी' ने मागे बसलेल्या माणसाशी बोलणे अश्या कित्येक कामांची अवधाने सांभाळावी लागतात...आणि हो, हे सर्व करायचे ते शिरस्त्राण घालून आणि पाय खाली टेकवायची गुस्ताखी न करता! पण बाईकस्वाराला कारवाल्याप्रमाणे गाडीच्या दोन चाकांमधून खड्डा अलगदपणे पार करून काही न झाल्याचे 'I'm the Boss' वाले एक्सप्रेशन पण देता येत नाही आणि गाडी 'ऑटोपायलट' वर टाकून चुकून एखादी झपकी मारणेही दुरापास्त. 

स्पर्शरेषा (Tangent) ज्याप्रमाणे वर्तुळाला एकाच बिंदूने स्पर्श करते त्याप्रमाणे आमच्या या बाईकच्या चाकांचा रस्त्याशी नेहमी २ बिंदुंचा संबंध (अर्थात स्पर्शरेषेसारखे, रस्ते मात्र 'सरळमार्गी' नसतात तो भाग निराळा!), त्यामुळे दिसली फट की घोड़े दामट आणि मार 'कट' हे बाईक बिरादरीचे ब्रीदवाक्य..त्यात तड़जोड़ नाही. फक्त दोन बिंदू टेकवायची जागा हवी. त्यामुळेच बाईक चालवणे ही एक विद्या नाहीतर दुसरे काय?

ही विद्या आम्हाला वाडवडलांनी लहानपणीच दिली आहे. ज्याप्रमाणे अफ़झलखानाने विडा उचलला होता त्याच नीडरपणे आम्ही लहानपणी वडिलांच्या 'घोड्याची' किल्ली उचलून मोहिमेवर जात असू...कमालीचा योगायोग असा, की त्या 'घोड्याचे' नावही (बजाज) "चेतक" होते! त्यानंतरही जास्त 'हॉर्सपॉवर' चे अनेक घोड़े चालवलेत (दामटलेत!), आणि कित्येकदा घोड्यासकट धारातीर्थीही पडलोय...शेवटी देशपांडेच मी!

तर अशी ही घोडा-वजा-बाईक आमची अत्यंत पाईक. टाच मारली की बिनबोभाट सुरू होते आणि मग शेजारच्या वाण्याच्या दुकानातून दूध आणण्यापासून ते बिऱ्हाडं हलवण्यापर्यंत सगळ्या कामांत साथ देते ही बाईक. माणसाला आयुष्यात पुन्हा पुन्हा पडून परत स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकायचं असेल आणि गेलेला तोल परत मिळवायला शिकायचं असेल तर बाईक सारखा सुंदर पर्याय नाही!

...पंचवन्नवरुन एव्हाना मी माझा वेग हनुमानचालीसा म्हणता म्हणता चाळीस वर आणला होता. सर्व समीकरणे बाजूला सारुन जे होईल ते बघून घेऊ म्हणत मी त्या खड्डयाच्या तटावरुन घोडा फेकला...आणि... साचलेल्या पाण्याचे फवारे दोन्ही बाजूस उडवून शेजारनं जाणाऱ्या  बाईच्या शिव्या खाऊन तिला 'दाग अच्छे हैं' म्हणत पुढे मार्गस्थ झालो!

~ श्री. पुष्कर देशपांडे