Friday, December 4, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ४१,४२,४३ डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग ४१: आम्ही सर्व भारतीय एक आहोत

             कामानिमित्त लुधियानाला जायचे ठरते म्हटल्यावर अमृतसर आणि वाघा सीमेला भेट द्यायलाच हवी, असे जवळपास प्रत्येकानेच सांगितले. अमृता प्रीतमच्या पंजाबजध्ये फिरायचे, या भावनेने मीही हरखले. भारताच्या सीमेवर पाऊल ठेवायला मिळणार या विचाराने ऊर दाटून आला. जालियनवाला बागेतील माती कपाळी लावायची, हे ठरवताना इतिहासाच्या आठवणीने मी गदगदले.

            या सगळ्यात  वाघाभेटीचे महत्त्व जास्तच. तेथील सूर्यास्ताच्या वेळी होणारा ध्वज उतरवण्याचा कार्यक्रम म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. त्यामुळे वाघा सीमेवर मोठी जत्राच भरलेली. भारताच्या विविध प्रांतांमधून आलेले आणि कित्येक परदेशी पर्यटकही तिथे जमा झालेले. सुरक्षेसाठी प्रवासी गाड्या खूप आधी थांबवल्या जातात. (“दिल्ली-लाहोर” ही सीमापार जाणारी गाडी मात्र याला अपवाद. कारण ती सीमा ओलांडून जाण्यासाठीच सुरू झालेली आहे.) प्रवासी गाड्यांच्या थांब्यापासूनच खाद्यपदार्थांच्या गाड्या दिसायला लागल्या. चौपाटीची आठवण करून देणार्‍या. त्यानंतर दिसल्या भारतीय लष्कराच्या इमारती आणि दिसू लागला हवेत उंच लहरणारा तिरंगा! त्याचवेळी राष्ट्रभक्तीपर गीतेही ऐकू येऊ लागली. आमच्या मनात एरवी फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारीलाच उचंबळून येणारी राष्ट्रप्रेमाची भावना या गाण्यांमुळे जागी व्हायला लागली. त्या गाण्यांच्या तालावर चालतच समारंभस्थळी पोहोचले. रस्त्याच्या एका कडेला उंच पायर्‍यापायर्‍यांचे स्टेडियम बांधलेले आणि समारंभ पाहण्यासाठी तिथेही जनसमुदाय. हा रस्ता वाघा सीमेच्या बंद दारापर्यंत जात होता. बंद दारापलीकडे पाकिस्तानचा रस्ता सुरू होतो. त्यांच्याकडचे पर्यटकही दिसले.

            आपल्या जवानांची “परेड” साठीची तयारी जोरात चाललेली होती. तेव्हाच आजूबाजूच्या गर्दीतून काही माहितगारांची या समारंभाबद्दलची टिप्पणी ऐकू आली. प्रथमच आलेल्या माझ्यासारख्यांचे आजूबाजूच्या प्रत्येकाकडूनच काही ना काही माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू. काहींचे हातातील कॅमेरे, दुर्बिणी फिरवणे सुरू, तर अजून काहीजण सगळ्यांत पुढे. रस्त्याच्या कडेला मोठमोठ्या स्टँडवर कॅमेरे लावून सज्ज झालेले होते. वातावरण अगदी भारून टाकणारे. अभिमानाने, आनंदाने, हुरहुरीने गळा दाटून येतोय, असे वाटायला लागले. प्रत्यक्ष समारंभ सुरू होण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपलेली. हातात माईक घेऊन एक भारतीय जवान गर्दीच्या दिशेने आला. लष्करी कमावलेल्या आवाजात नारा दिला, “वंदे मातरम्!” बुडणार्‍या सूर्याच्या साक्षीने, सीमेवर तिरंग्यासमोरचे “वंदे मातरम्” हे नेहमीच्या “ वंदे मातरम्” पेक्षा जास्त रोमांचकारी. आजूबाजूच्या पसरलेल्या विविध प्रांत, विविधधर्मी बहुभाषिक भारतीयांचा मिळून एकच आवाज झाला आणि मातृभूमीचा उद्घोष एकमुखाने बाहेर पडला.

            कोणत्याही प्रांताचे, भाषेचे प्रतिनिधित्व न करता, स्वत:ची मातृभाषा न बोलता एकमेकांशी इंग्रजीत संभाषण करून, भोवतालच्या गर्दीशी फटकून वागणारे माणसांचे काही समूहही या गर्दीत होते. “ वंदे मातरम्” च्या जयघोषात एक झालेल्या आजूबाजूच्या सार्‍या भारतीयांपेक्षा वेगळे दिसण्याचा त्यांचा प्रयत्न. असे जोरात ओरडणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे. अशा “अनकल्चर्ड” चालीरीतींमध्ये आपण कसे भाग घेत नाहीत, हे दाखवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू होता.

            जेव्हा भोवतालचा भारतीय समुदाय बेभान होऊन भारतमातेचे  नामस्मरण करीत होता, तेव्हा आपण ओरडत नाही, हे दाखवण्यासाठी “त्या” समूहाचे प्रतिनिधी एकमेकांशी जोरजोरात बोलत होते किंवा चेहरे फिरवून ओरडणारा चेहरा आमचा नाही, हे सिद्ध करू पाहत होते. याच वेळी सीमेपलीकडे पाकिस्तानी नागरिकांचाही “पाकिस्तान जिंदाबाद” चा जल्लोष चाललेला! त्यांच्यापेक्षा आपला आवाज जास्त हवा. अशी स्फुरण चढवणारी भूमिका आपले जवान घेतात आणि त्या प्रोत्साहनामुळे “वंदे मातरम्” चा आवाज टिपेला पोहोचला.

            प्रत्यक्ष झेंडा खाली उतरवत असताना कोणीही कोणतीही घोषणा देऊ नये, हे सांगायला जवान कधीच  विसरत नाहीत. नंतर भारत-पाकिस्तान सीमेचे दार उघडते. दोन्ही देशांचे जवान एकमेकांना भेटून हस्तांदोलन करतात. समारंभपूर्वक दोन्हीकडचे ध्वज सावकाश खाली उतरवतात. सन्मानपूर्वक ते ठेवले जातात. हा सगळा थरार अनुभवून काहींच्या शरीरावर रोमांच उभे राहिले, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू! मघाच्या गर्दीपासूनचे “वेगळे” समूह स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत तसेच नुसते उभे.

            समारंभ संपल्याची घोषणा झाली. ऐटदार गणवेशातील जवानांबरोबर फोटो काढून घेण्याची अहमहमिका सुरू झाली. माणसांचा लोंढा परत फिरायला लागला. “चौपाटी” वरचे पदार्थ संपायला लागले. कागदांमध्ये, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये वडे, शेंगा हातोहात खपत होते. खाऊन झाल्यानंतर कागद, पिशव्या, शेंगांची साले इतस्तत: फेकली गेली. ओरडणार्‍या “अनकल्चर्ड” लोकांपासून वेगळेपण राखलेल्या समूहातील माणसेही शेंगा-वड्यांवर ताव मारत होती. मात्र आता “ती” माणसेही कागद, प्लॅस्टिकच्या  पिशव्या, शेंगांची टरफले इकडे तिकडे जमिनीवर फेकत होती. “वंदे मातरम्” म्हणताना न जमलेले “आम्ही सारे भारतीय एक आहोत“ हे ब्रीद ही माणसे वडे खाताना मात्र कचरा फेकून सिद्ध करीत होती.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ४२: उँचे लोग

 

मोठ्या लोकांचे संदेश आणि स्वाक्षरी घेण्याची रीत बहुतेक आता कालबाह्य झाली आहे. आमच्या लहानपणी ती थोडीफार अस्तित्वात होती. आम्ही अगदी पु.लं. चा “सखाराम गटणे” नव्हतो. तरीही...

मला आठवतंय, सुनील गावसकरची सही घेण्यासाठी तो उतरलेल्या हॉटेलच्या बाहेर आम्ही तासन्तास ताटकळत होतो. बा.भ.बोरकरांच्या काव्यवाचनाला लगबगीने जाऊन, तिथल्या बरसणार्‍या “सरीवर सरी”त चिंब भिजून त्यांची स्वाक्षरी घेऊन परतलो होतो.

लहानपणाबरोबरच ते सह्या गोळा करण्याचं वेड मागं पडलं. मोठे झालो तसतसे खूप “मोठ्ठे” लोक माहीत व्हायला लागले. आजूबाजूचे अनेकजण वेगवेगळ्या मोठ्या लोकांना ओळखत असायचे.

नुसती तोंडओळखच असलेला माझा एक मित्र एकदा म्हणाला की, तो गौरी देशपांडेंना ओळखतो. तेव्हा त्याच्याशी मैत्री वाढवावी की काय असं वाटलं होतं. डॉ.किशोर भिंगारे विश्राम बेडेकरांना चांगलं ओळखतात आणि व्यंकटेश माडगूळकर त्यांच्या घरी राहायला येतात, हे ऐकल्यावर त्यांचा हेवा वाटला होता. माझी मैत्रीण उर्मिला, विंबल्डनच्या कोर्टवर स्टेफीची मॅच बघते आणि तिथे खेचलेल्या फोटोत स्टेफीबरोबर दिसते हे मला स्वप्नवतच वाटलं होतं. अलीकडे “केबीसी”मुळे अमिताभ घराघरांत पोहोचल्यावर (तो आमच्या मनामनात कधीपासून होताच.) आमची बागेश्री लंडनला जाते, तिथे मादाम तुसाँच्या संग्रहालयात स्वत:च्याच पुतळ्याच्या अनावरणाला आलेल्या अमिताभ बच्चन या “जंटलमन”ला भेटते, त्याच्याशी बोलून त्याच्याबरोबर फोटो काढते, या योगाचं आश्‍चर्यच वाटलं होतं. तिच्या बाकीच्या लंडन ट्रिपच्या फोटोंपेक्षा आम्ही तिचे फक्त अमिताभबरोबरचेच फोटो बघितले होते.

मोठ्या लोकांबद्दल एवढं कुतूहल असूनही माझी मोठ्या लोकांशी फारशी ओळख नाही. ओळख कशी करून घ्यायची? त्यांचा महत्त्वाचा वेळ विनाकारण घ्यायचा का? ते नीट बोलतील का? आपल्या मनातल्या प्रतिमासदृश ते “ऊँचे लोग” असतील का? अशा विविध शंका माझ्या मनात फेर धरून असतात.

एवढ्या शंकांचे अडसर असूनही माझी एका मोठ्या माणसाशी खूप छान ओळख झाली आणि वाढली. तो मोठ्ठा माणूस म्हणजे डॉ.अनिल अवचट. त्याच्या चांगुलपणामुळे मी त्याच्या मोठ्या गोतावळ्यात गुंफली गेले, त्याला “ए बाबा” अशी हाक मारू लागले. तरी अजूनही “त्याचा वेळ कशाला घ्या” या सबबीखाली मी त्याचा मोठेपणाच्या झुलीतला बागुलबुवा करते आणि त्याला कमीच भेटते. बाबा मात्र त्याच्या अंगभूत “मोठेपणामुळे” माझा नाठाळपणा सहन करतो आणि बहुधा याचमुळे त्याची, माझी ओळख नव्हे, तर स्नेहाचं नातं जास्तच घट्ट होतंय.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ४३:वाचणार्‍या सख्या

माझी ताई श्रीरामपूरसारख्या छोट्या शहरात राहते. दर सुटीत आम्ही तेथे जातो. तिथल्या सुटीतल्या अनेक कार्यक्रमांमध्ये, तिच्या “सखी वाचन मंडळाला” भेट हा माझा ठरलेला कार्यक्रम असतो. या सगळ्या सख्या पन्नाशीच्या पुढेमागे रेंगाळणार्‍या, बहुतेक सगळ्याच नोकरी आणि संसार सांभाळणार्‍या “हाऊसवाईफ”. काही सासुबाई, आजीबाई झालेल्या; काही होऊ घातलेल्या. त्या दर बुधवारी संध्याकाळी एकत्र जमतात. एकत्रित बसून काही ना काही वाचतात. गेल्या आठवड्यात प्रत्येकीनं काय वाचलं याची चर्चा करतात. पुढल्या आठवड्यात काय वाचायचं हेही सविस्तर ठरवतात.

सख्यांचे वाढदिवस पुस्तक भेटीनं साजरे होतातच. शिवाय मुला-मुलींच्या लग्नांची केळवणंसुद्धा पुस्तकांच्या मदतीनं पार पडतात.

कोजागिरी, एकतीस डिसेंबर यांसारख्या विशेष दिवशीही सख्या भेटतात. ठिकाण वेगवेगळं असूं शकतं. सार्वजनिक वाचनालयाचं आवार ते कुणाच्या घराचा हॉल किंवा गच्ची. खाण्याचा बेतही मूडनुसार बदलतो. आपापले चाळीशीचे चष्मे सांभाळत या सगळ्या विविध खेळही खेळतात. (आजच्या भाषेतले पार्टी गेम्स) त्यातसुद्धा एखाद-दुसरा पुस्तकांशी किंवा साहित्याशी निगडित असा खेळ असतोच. परभाषेतल्या साहित्याबद्दलही सख्या जागरूक असतात. इंग्रजी आणि अन्य भाषांमधली कितीतरी विख्यात पुस्तके त्यांनी भाषांतरित, रुपांतरित पद्धतीनं वाचलेली असतात. पर्ल बकपासून कारंतांपर्यंतच्या साहित्याशी त्यांचा थोडाफार तरी परिचय असतोच. नवीन काहीही वाचून पाहायची त्यांची तयारी असते. थोडक्यात सख्या “वाचनसंस्कार” जाणीवपूर्वक सांभाळतात, जोपासतात.

सुटीतली माझी या सगळ्यांशी भेट म्हणजे पर्वणीच! त्या सगळ्या अन्नपूर्णा माझ्यातल्या माहेरवाशीणीला लाडावतात आणि वाचणार्‍या सख्या माझ्यातल्या वाचकाला एक समृद्ध अनुभव देतात.

  
ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

2 comments:

  1. नेहमीप्रमाणेच छान.
    अस्मिता फडके

    ReplyDelete