Saturday, December 19, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ५ आणि ६: जया : फकिरा आणि सय्यदनूर : श्री. बलबीर अधिकारी

 


लेखांक ५  जया

   उन्हाळ्याची सुटी होती. नाशिकरोडच्या शाळेत शिकणारा मी परीक्षा संपवून घरी परतलो होतो. घरची वडिलांची बटाईने घेतलेल्या शेतातली काहीबाही कामे चालू होती. आमचे काम करणे नदीवर पोहणे जोरात सुरू होते.

   आमच्या गावी राहणार्या रामूकाकांची नातवंडे मुंबईहून गावी हवा पालटायला येत. त्यांच्याभोवती पोरे जमत. पोहणे, विटीदांडू, लगोर्या पत्ते यांच्या नादात दिवस उडून जात. मुंबईच्या पोरांना आपली फुशारकी दाखवण्याचा मोह आम्हा सार्यांनाच होई. त्यांनाही टाईमपास हवाच असे. बरोबरच खेळणार्या पोरांना पाठांतर शिकवण्याची जबाबदारी रामूकाकांच्या मेहुण्यांनी घेतली होती. ते श्लोक, स्तोत्रे, कविता यांचे पाठांतर करून घेत. रामूकाकांच्या मुली माहेरवाशिणी लेकुरवाळ्या होत्या. त्यांना मुलांनी पाठांतर करावे, असे फार वाटे. कारण तो संस्कार आहे असे ते सर्व समजत. आमचे इतर गावकरी दोस्त पळून जात; पण मी चिकटून बसे. मोरोपंतांच्या आर्या मला भुरळ घालीत. मुंबईची पोरेही कंटाळत; पण आजोबा आई यांचा दबाव त्यांना तासभर उठू देत नसे. या सर्व परिवारात रामूकाकांचे शालक आपला परिवार घेऊन त्यांच्यात सामील होत. त्यांची मुलगी जया. धाकटी येसूही होती; पण आमचा अधिक संबंध जयाशीच आला. ती आमच्यापेक्षा मोठी असावी. तिला सावत्र आई होती. तिच्या घरची परिस्थिती यथातथाच होती; परंतु ती शाळेत जात होती त्यातच आपल्या भावी आयुष्याबद्दल आडाखे बांधत होती. जर कुठे लग्न जमले तर शाळा सोडण्यास तिची काही हरकत नव्हती. आमचा सदोदित वावर या पाहुणे मंडळीत होत असल्यामुळे आपलेपणाचा अनुबंध निर्माण होणे साहजिकच होते. एके दिवशी दुपारी आम्ही समोरच असलेल्या आमच्या घरी जेवणानंतर गप्पा हाणीत बसलो होतो. आई काकू यांचा घरोबा असल्यामुळे सार्यांची वर्दळ तेथे असेच. त्यावेळी जया एकटीच आमच्या घरी आली. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर जया थोडी धीट होऊन बोलू लागली.

   घरात वडिलांचा आधार असला तरी तो जेमतेम होता. तुटपुंज्या पगारात त्यांचे विशेष काही होत नव्हते. ज्या मंडळींबरोबर ती गावी आली होती त्यांच्यातही तिचे स्थान दुय्यम होते. सार्या बहिणीच असल्यामुळे वडिलांखेरीज इतर जबाबदारी उचलणारे कोणी नव्हते. मुंबईवाल्यांचा आधार कमकुवत बिनभरवशाचा होता. जयाच्या या स्थितीचे कुवतीप्रमाणे आम्ही परीक्षण केले; परंतु आम्हाला कुठे वाव आहे असे दिसत नव्हते. कारण आम्ही तर फाटकेच होतो.

   नंतरच्या दिवाळीत मी नेहमीप्रमाणे घरी आलो होतो. तेव्हा कळले की रामूकाकांकडे जयाही दिवाळीसाठी आली आहे. आनंद वाटला. दिवसभर शेतातली कामे करून सायंकाळी आम्ही भाऊ वा कधी मी मित्र पंडित जयाशी गप्पा मारीत असू. भाऊबीजेच्या दिवशी मी पंडितने जयाला सरप्राईज द्यायचे म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो तिला म्हटले, 'जया आम्ही आलोय.' आमच्याकडे हसून पाहात ती म्हणाली, 'बसा, मी आत्याकडून फराळ काढून घेते.''

   'आधी फराळ नको, तू इकडे ये.'

   ती आमच्याकडे येऊन पाहू लागली. काकूही तेवढ्यात आतून आल्या. जयाने आम्हाला ओवाळावे, अशी आम्ही तिला विनंती केली. अंगभर मोहरून गेलेल्या जयाने आत्याच्या परवानगीची वाट पाहता ओवाळणीचे ताट आणले. नीरांजन पेटवून तिने आम्हाला ओवाळले. एकही भाऊ नाही म्हणणार्या जयाला त्या दिवशी दोन भाऊ मिळाले. त्या दिवशीचा रोजगार म्हणून मिळालेले आठ आणे मी ओवाळणी दिली; पण त्याकडे लक्ष देता जया आमच्याकडे ज्या कौतुकाने पाहात होती ती नजर चाळीस वर्षांनंतरही मला विसरता आलेली नाही. जयाच्या रूपाने जणू आमची ताई, छे! ताईचे स्वप्नच आमच्यासमोर साक्षात उभे होते.

   नंतर जयाकडे नियमितपणे जाणे सुरू झाले. संबंधाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले होते. इतर जणांनाही त्यात काही वावगे वाटत नव्हते. तिची सावत्रआई होती. ती अनुभवी व्यवहारी होती. केवळ शेजारच्या तेही चार दिवसांपूर्वीच ओळख झालेल्या दोन पोरांनी तिच्या सावत्र का होईना पण मुलीशी असा सलगीचा पवित्रा घेणे तिला धोक्याचे वाटत होते. रामूकाकांच्या मुलीदेखील काहीबाही शंकांनी उसकटत असतील; पण तोंडावर कोणी काही म्हणत नव्हते. शिवाय आमच्या वागण्यालाही ठिगळ नव्हते. सारे साफ सरळ होते. त्यामुळे आमचे येणे-जाणे, गप्पा, खेळ सारे सुरू होते. तशी आमची वये धोकादायक असली तरी आम्ही विषारी नव्हतो; पण जी चर्चा असे त्यावरून मानलेल्या बहीणभावाच्या नात्याला विशेष भवितव्य आहे, असे वाटण्याइतकी शंका यायची. आज तर मनाने त्यावर शिक्काच मारला आहे.

   एकदा त्यांच्याकडे वैशाख पौर्णिमेची पूजा होती. एव्हाना मुंबईची मुले आता चांगलीच वयात आली होती. कॉलेजात जात होती. धीट होती; पण तरीही गावचा अंधार, कुत्री भुताटकी आदींना टरकत होती. आम्ही सारे सामान जमविण्यास मदत करत होतो. जया तिची एक भाची कुमुद यांचा आमच्यावर नवीन (?) नात्यामुळे लोभ जडला होता. त्या दोघी आम्हाला इकडे तिकडे जाऊ देत नसत. पूजा झाल्यावर जेवणे होऊन सायंकाळचा प्रसाद वाटून होईस्तोवर घरातले पिण्याचे पाणी संपले. काशीकाकूंनी जयाला हक्काने (?) पाणी आणायला पिटाळले; पण अंधार होता. जयाने अडचण सांगितली. आमच्याकडे उत्तर तयार होते.

   'कुणाला बरोबर घे' :  मी.

   'कोण येणार? सारे गप्पा मारताहेत.': जया.

   'तू कुमुदला घे. मी पंडितला घेतो.'

   शेवटी दोन हंडे पाणी आणण्यासाठी आम्ही चौघे नदीवर गेलो. गप्पा चालू होत्या. मुलींची कशी अडचण होते हे त्या दोघी रंगवून सांगत होत्या. भोवती अंधार, खाली पात्रातली गार वाळू समोर प्रवरेचे पात्र होते. मी पंडितला म्हटले, 'पंड्या आपण ताईला थोडी मदत करू. हंडे मोठे आहेत. आपल्याला सांगायला मुंबईवाले लाजले असतील; पण आपण रामाच्या देवळाच्या चढापर्यंत हंडे घेऊन जाऊ नंतर त्यांच्या डोक्यावर देऊ.'

   घरी पोचल्यावर 'कामाच्या पोरी' म्हणून कौतुक करणारे मुंबईकर अडचण ओळखणार्या भावांकडे मायेने पाहणारी जया कुमुद यांची नजर यात आमचा दिवस सार्थकी लागला.

   पुढे जयाचे लग्न ठरले. मी पंडित काही विशेष करू शकलो नाही; पण आम्ही तिच्या वडिलांना आश्वासन दिले की आम्ही तीन दिवस कोणतेही काम करू. पडेल ते आमचे कष्ट देऊ. त्यांना त्यावेळी पटले नाही; पण प्रत्यक्ष लग्नात वधूचे भाऊ जसे खपतात त्यांना जसे ऐकावे लागे (त्यावेळी वरपक्ष स्वत:ला दीडशहाणा समजत असे) ते सर्व केले. सर्वांनी शाबासकी दिली; पण आम्हाला जयाची शाबासकी हवी होती. ती सासरी जाण्याच्या कल्पनेने भारली होती. माहेरला कंटाळली होती. तिने आम्हाला पाहून स्मित केले सासरच्या दिशेने चालू लागली. कदाचित सासुरवाडीच्या बंधनामुळे ती मितभाषी झाली असावी.

   जयाचा नवरा जळगावी राहात असे. भावाला नोकरी लागल्यामुळे आम्हीही जळगावी गेलो. तथापि तिच्या मनावर असलेल्या अनाहूत दबावामुळे ती पूर्वीसारखी बोलत नसे. मी भाऊ मधून मधून तिला भेटायचो; पण ते तिला फारसे रूचत नसल्याचे जाणवे.

   मी पंडित असेच एकदा शिवाजी पार्कला मुंबईकर कंपनीकडे भेटलो. त्यावेळी जया तिथे होती. थोडी त्रस्त वाटत होती. तुटक बोलत होती. सारी नाती तिच्यालेखी कुचकामाची वाटत होती. थोड्या वेळाने आम्ही चौपाटीवर तिला घेऊन गेलो. ती आली; पण काहीतरी ठरवूनच आली असावी, असे आज वाटते. थातूरमातूर बोलणे झाल्यावर तिने सांगितले - इथून पुढे मला कोणाची गरज नाही. कुणी माझ्याकडे येऊ नका? आणि जया परत फिरली. आपल्या बोलण्याने कोणाचे किती नुकसान झाले याचा हिशोब तिने केला नाही. पंडितला काय वाटले त्याने स्वत:ला कसे सावरले हे माहीत नाही; पण मला मात्र फार मोठा धक्का बसला. माणसातली नाती हळूवार झाल्यावरही इतकी क्षणभंगुर तकलादू असतात ह्याची जाणीव तेव्हा प्रथम झाली. आजही राखी भाऊबीजेच्या दिवशी जया मला हमखास आठवते आणि समोर उभ्या असलेल्या पत्नीच्या मुलीच्या वा सुनेच्या नजरेत त्या दिवशी मी तिला शोधत राहतो.

 

vvv


लेखांक   ६: फकिरा आणि सय्यदनूर 

   

1955 चा काळ होता. मी नुकतीच मराठी सातवी (व्ह.फा.)पास झालो होतो. घरी खाणे-पिणे पुरेसे होते. तरी बरीच अडचण होती. पुढे शिकायला वडील नाही म्हणत होते तरी आईने आग्रहाने पोरांना पुढं शिकू द्या, नाव काढतील हा धोशा लावला होता. माझा वडील भाऊ आधीच नाशिकच्या अनाथ विद्यार्थीगृहात दाखल झाला होता. तेवढे गुण माझ्यात नव्हते तरी शिकण्याचा माझा योग होता. चाळीसगावहून बदलून आलेल्या नुकतेच लग्न झालेल्या मामाकडे माझी वर्णी लागली होती. वडील (सर्वात) भावाने रेल्वेच्या फैलात काम करावे माझी खानावळ मामाकडे भरावी अशी योजना आईने करून पुस्तकांची ट्रंक डोक्यावर देऊन मला गावच्या सडकेवर एस.टी.साठी पाठवले होते. आणि नासिकरोडच्या पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये आमची स्वारी दाखल झाली होती.

   मामा बिगारी भाऊ रोजंदारी करणारा. राहायला स्टेशनच्या जवळची झोपडपट्टी. उठण्याबसण्यासाठी अभ्यासासाठी स्टेशनचा फलाट. या योजनेतच शेजारी राहणारा फकिरा डिस्टिलरी क्वार्टरमध्ये राहणारा सय्यद यांची जानपछान झाली एक नवे पर्व सुरू झाले. ते दोघेही अनेक बहिणींचे एकेकटे भाऊ होते. तसे लाडकेच होते. पण म्हणूनच अभ्यास करता बाकीचे उद्योग करण्यातच त्यांचा वेळ अधिक जात असे. शाळेतले शिक्षक चांगल्या वळणाचे होते. पण घरची माणसे अशिक्षित अडाणी होती. त्यांना पुस्तके शिक्षण यांच्याशी फारसे घेणे-देणे नव्हते. फकिरा सय्यदच्या घरी ही असाच आनंद होता. फकिराचा बाप रेल्वेत कोयला भरीत असे अन सय्यदचा बाप वखारीत लाकडे फोडीत असे. कधी मधी तो बॉयलरचे कामही करी पण या सर्व पार्श्वभूमीमुळे त्यांच्या घरातही आमच्या शिकण्याची किंमत यथातथाच होती. थोडक्यात, आम्ही घरच्यांना थोडे ओझ्यासारखेच होतो.

   भावाची नोकरी सुटल्यावर दोन वर्षात मी उघड्यावर पडलो. मामाची सहानुभूती असे पण आजी आणि मामी सदा भांडत माझा दुस्वास करीत. घरी परत जाण्याची वाट ही दिसेनाशी होत असल्यामुळे माझा धीर खचे पण आमचे सर धीर देत. फकिराची आई कधी ज्वारीची भाकरी खाऊ घाले. फीमध्ये सूट होती पुस्तकांची तयारी मी मे महिन्यात रोजंदारी करून आई, वडील भाऊ यांच्या मदतीने करीत असे. शेवटी त्याच ठिकाणी राहून मॅट्रिक पास करायची ठरल्यावर आहे ते गोड मानायचे फकिरा सय्यदला अभ्यासात मदत करायची या करारावर मी तेथेच राहायचे ठरले.

   फकिरा नवसाचा पोरगा होता. त्याच्या पायात चांदीचा भिकेचा वाळा होता. नावात फकीर होता. पण त्याला अभ्यासात गती नव्हती. कसेबसे तो शिके. थोडा तोतरा बोलायचा पण दोस्तीला सच्चा होता. घरचा एकटा मुलगा त्यामुळे थोडी अधिक माया त्याच्या वाट्याला येत असे. मी त्याच्याबरोबर पुस्तक घेऊन बसे याचा परिणाम होत असे. भूक तर सतत खायला उठे. त्याची आई कधी काही-बाही देऊन भूक भागवी. मला तोही मोठा आधार वाटे. प्रकृतीने तसा तो किरकोळ होता पण झोपडपट्टीतली बेधडक वृत्ती त्याच्यात चांगली होती. त्यामानाने मी कच्चा होतो. बामनांच्या पोरात खेळल्याने बुजत होतो. उठता-बसता अश्लील शब्द असे येत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्या दृष्टीने पिछाडीचा खेळाडू होतो. स्टेशनवाडीतली पोरे जेव्हा अंगावर येत तेव्हा फकिरा फिसकारलेल्या मांजरासारखा आपली नखे काढत असे. त्याच्याबरोबर मीही आपल्या शर्टाच्या बाह्या अन पायजम्याच्या नाड्या सावरत त्या पोरांवर चालून जाई.आमचे हात बरे चालत पण तोंडपट्ट्याला मात्र धार नसे. पण मोहल्ल्यातला म्हणून गृहपाठ निबंध यादृष्टीने उपयोगी म्हणून मला ते सांभाळून घेत.

   सय्यद वेगळ्या धाटणीचा होता. गोरापान मोठे केस राखणारा, देखणा असा सय्यद. अंगावर सदा हिरवा शर्ट. बिटको विद्यालयात तो शिकत असे. एकदा सिनेमाची पोस्टरे पाहताना थोडी दंगामस्ती झाली म्हणून चिडलेल्या सय्यदने आमच्याशी तह करून आमची दोस्ती स्वीकारली. ती पुढे चार वर्षे चांगली टिकली. आम्ही दोघे त्याच्या घरी जात असू. एकदा त्यांच्या घरी असेच गेलो असता बरीच माणसे दिसली. आत जाऊन पाहिले तर आत एक पीराचा दर्गा होता. सय्यद डोक्याला पांढरा रूमाल बांधून, डोळे बंद करून, उदबत्त्याच्या धुरात बसला होता. सारी माणसे आपले प्रश् घेऊन अवतीभोवती बसली होती. त्यांच्या अंगात सात पीर येणार होते. आम्हीही कुतुहलाने थोडे आदराने सय्यदकडे पाहत होतो. तेव्हांपासून सय्यद मोठा होत होता अन बाकी सारे लहान.

   अभ्यासात खेळात त्याचे फारसे लक्ष नव्हते. त्याची शाळाही साधारण होती. आमची शाळा बामनाची म्हटली तरी तिला एक दिशा होती. पोरांचे धड करायची जिद्द होती. त्यात माझ्यासारखे फकिरासारखी पोरे चरकातून जात होती. पण सय्यद बराच कोरा होता, त्याला पुस्तक वाचण्याचाही कंटाळा येई. परीक्षा देणे ही फालतू गोष्ट आहे असा त्या दोघांचाही निष्कर्ष होता.

   त्यांची अनास्था घरची बिकट परिस्थिती मला बेचैन करीत असे. गरीबीतून डोके वर काढण्याचे साधन म्हणून शिकणे महत्त्वाचे होते. ज्ञानाचा दिवा लावल्याखेरीज गरिबी लाचारीचा अंधार दूर होणे अवघड होते. पण हे सारे त्यांना कुठेच भावत नव्हते आणि मला पाहवत नव्हते.

   असाच एक गुरूवार होता. सय्यदच्या घरी आज पीर येणार होते. सारे जण जमले होते. सय्यद थोड्या वेळाने घुमू लागला. प्रश् सुरू झाले आणि संपतही आले. मला राहवेना. मैत्रीच्या धाग्याने मी पूर्ण भारलो होतो. मी बाबांना विचारले,

   बाबा, एक सवाल है।

   कहो

   ये हमारे दोस्त निकम्मे है। आप का मासूम भी है, घरमें हालत खराब है, ये घर के इकलौते बेटे है फिर भी ध्यान नही देते ये कब सुधरेंगे और कब इन्हे समझ आयेगी ?

   तुम परेशान क्यों होते हो।

   वे हमारे दोस्त है, उनके घरका दुख हमसे देखा नही जाता

   थोडा वेळ शांतता पसरली. सारी माणसे एक दुसर्याकडे पाहू लागली. बाबांनी सांगितले-

   हर इन्सान का रास्ता तय रहता है। तुम अपने रास्ते चलते रहना। उन्हे एहसास जब होगा तभी कुछ बात बनेगी।

   मै क्या करूं?

   अपने रास्ते पर चलो

   और ये? मी जवळजवळ ओरडलोच.

   जिंदगीभर कोई किसीका साथ नही देता इसलिए उन्हे अपने हालपर छोड दो।

   मी फार व्यथित झालो. यांना आपण देव समजतो तेही माणसाच्या नशिबाचा रस्ता बदलू शकत नाहीत हा विचार मला फार त्रासदायक देवावरचा विश्वास डळमळीत करणारा वाटला. त्याचबरोबर मानवी दु: त्याच्या पदरी सतत बांधलेले राहणार याचीही जाणीव झाली. त्यानंतर यथावकाश मी पदवीधर झालो पण फकिरा सय्यद मॅट्रिक सीमेवरच रेंगाळले. तेही नोकरीला लागले पण किरकोळ. आर्थिक गरजाही पूर्ण करू शकणार्या.

   दोन चार वर्षांपूर्वी फकिरा पुन्हा भेटला. मला फार बरे वाटले. मी त्याच्यात पूर्वीचा फकीरा शोधत होतो. पण ऊन, वारा, पाऊस यांच्या तडाख्याने तो बराच बदलला होता.आता तो आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करीत होता पण मनाने उभारी कधी धरली नव्हती. ते कधी होणार नाही हे मला 30 वर्षांपूर्वीच समजले होते आणि आपण त्यात काही करू शकणार नाही ही अटकळही मला होती. सय्यद मात्र कधी दिसला नाही. त्याचा नूर कधी कळला नाही. त्याचे जिच्यावर प्रेम होते त्या नर्गीसशी त्याचा निकाह लागला नाही. लागला असता तरी तो सुखी झाला असताच असेही म्हणवत नाही. त्यांच्यात माझ्यात आज मोठी दरी आहे. ती पार करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. कदाचित ते करण्याची गरजही नसावी.

No comments:

Post a Comment