लेखांक ७: सुरेश देखणे
सदा मित्रांच्या घोळक्यात असणारा, आपल्या मधाळ बोलण्याने समवयस्कांबरोबर त्यांच्या आईवडिलांवरच नव्हे तर इतर संबंधितांवरही छाप पाडणारा, सिध्यांशी सीधा अन् बेरक्याशी दादागिरी करू शकणारा, अभ्यासात साधारण पण गाणे व संगीताची जाण असणारा सुरेश जेव्हा माऊथ ऑर्गनवर अथवा ओठावर एखादे भावगीत घेऊन उभा असे तेव्हा तर भगिनीवर्गांचीही मोठी पंचाईत होत असे. त्याच्याशी चार शब्द बोलण्यासाठी त्यांचा जीव आसुसलेला असे. त्यासाठी त्याचा विरोध नसायचाच. तो सार्यांशी बोले. विशेषत: हातात एखादी कथा, कादंबरी वा कविता असेल तर समोरच्या व्यक्तीला तर हरवायला होई. आपली सुरेशशी सलगी आहे याचा त्याच्या मित्राला वा मैत्रिणीला अभिमान असे. त्याचे रूपडेही आकर्षक होते. कमावलेले शरीर, उजवीकडून भांग पाडण्याची रीत, धारदार नाकाने व भावुक डोळ्यांनी सजलेला चेहरा अन् मध्यमवर्गीय पण नीटनेटके कपडे या लवाजम्यानिशी तो जेव्हा बाहेर पडे तो दिमाख सम्राटाचाच असे. त्यात अनेक जणांचा हमखास बळी जात असे. त्याहीपुढे त्याच्या मुखातून जेव्हा अगत्य, आपुलकी अन् निष्ठा वेगवेगळे शब्दरूप घेऊन बाहेर पडत तेव्हा तर त्याचे देखणेपण काही औरच असे. देवाने त्याला कुळच मुळी देखण्यांचे दिले होते. आणि ते आडनाव त्याच्यापुरते तरी समर्पक होते.
या गुण वैशिष्ठ्यांकडे काहीसे निर्विकारपणे पाहणार्या माझ्या संपर्कात सुरेश आला तो अगदी वेगळ्या स्वरूपात. मलेरिया निर्मूलन योजनेत तो निरीक्षक म्हणून आमच्या भागात आला होता. आम्ही शिक्षणानिमित्त नासिक-जळगाव फिरत असता सुटीत घरी गावीच होतो. तो घरी पोहोचल्यावर ग्रामीण आईवडील, दारिद्र्याच्या जागोजाग खुणा असणारे घर, येणार्याजाणारांची यथातथाच व्यवस्था असणारी स्थिती याला तो नाक मुरडेल असे वाटले होते पण तसे न घडता तो त्यात सहज मिसळून गेला. आंघोळीला नदीचे पाणी, जेवायला बाजरीची भाकरी अन् झोपायला तरट व गोधडी यावरसुद्धा त्याला छान वाटे. शहरात वाढलेला असूनही त्याने हा बदल सहज पचवला होता. आईवडिलांशीही तो मोठ्या आस्थेने बोलत असे. त्याचे शब्द ऐकून तेही प्रोत्साहित होत. आईला आधार द्यायला व वडिलांच्या चेहर्यावर स्मित फुलवायला त्याचा उपयोग होईल या स्वार्थाने त्यावेळी आम्ही त्याच्या भोवती फिरत असू. ते करता करता सुरेश आम्हा सार्यांचाच मित्र केव्हा झाला हे कळलेच नाही. तेव्हापासून गेली 50 वर्षे सुरेश आमच्यात वावरतो आहे. अन् हितगुज करीत सार्यांनाच जवळ घेऊन उभा आहे.
माझ्या शिक्षण काळात त्याची जेव्हा गाठ पडे तेव्हा परतीच्या प्रवासात तो मला बहुदा घेऊन जाई. सायकलवर डबलसीट आमचा प्रवास असे. बोटा ते संगमनेर अंतर असे कितीतरी वेळा आम्ही पार केले आहे. नोकरीच्या गावी आम्ही त्याच्या सोबतच फिरत असू. ते करताना काम आणि गप्पा यात दिवस केव्हा संपायचा ते लक्षात येत नसे. सायंकाळी रेडिओवरची भावगीते वा माऊथऑर्गन आम्हाला परीराज्यात घेऊन जाई. आठवणीतली माणसे आणि गावे उभी राहत अन् आमच्या एकांतावर आपले अधिराज्य चालवीत. दिवस कसे संपत हे कळत नसे. परत निघताना पुन्हा भेटण्याच्या इराद्यानेच आम्ही गावकूस ओलांडीत असू. इतरांच्या सुखदु:खाशी इतका आत्मीयतेने समरस होणारा सुरेश आपल्या विषयी फारसे कधी बोलत नसे. आजही विचारल्यावर तो त्रोटकपणे बोलतो. कदाचित आपले धाकलेपण वा व्यथा त्याने आपल्यासाठीच ठेवल्या असाव्यात. संभाषणातले अनेक तुकडे जोडून आम्हाला जे कळे त्यावरच आम्ही समाधान मानत असू. एस.एस.सी. च्या पुढे शिकणे हे त्यालाही हवेच असेल पण परिस्थितीचा रेटा मोठा होता. धाकट्या बहिणींचे विवाह व भावांचे शिक्षण यासाठी शिक्षणावर पाणी सोडून त्याने नोकरी पत्करली होती. एवढेच नव्हे तर स्वत:च्या लग्नाच्या बाबतीतही त्याला व्यावहारिक भूमिका घ्यावी लागली होती. देखणेपण आणि छंद यावर लुब्ध असणार्या कितीतरी मैत्रिणी त्याच्या अवतीभवती होत्या पण त्याच्या समोर वास्तव इतके प्रखरपणे उभे होते, की त्याला आपली निवड करायला दैवाने संधी ठेवलीच नव्हती. पण सुरवातीपासून झालेले संस्कार, जपलेली मूल्ये आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या बळावर सुरेश या परीक्षेतही उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला. त्याने इतके आत्मसंयमन केले की आम्हीही चकित झालो. शेवटी तो नियोजित पद्धतीने विवाह करून आपल्या जबाबदारीला सामोरा गेला आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला. पुलाखालून अनेकवेळा पाणी वाहून जातानाही त्याच्या ओठावरचे गाणे अभंग राहिले.
रेल्वेत नोकरीला असताना त्याच्या रामवाडी (डोंबिवली) तील खोलीवर आम्ही जेव्हां जमत असू, तेव्हा गप्पांच्या मैफिली जमत. कोजागिरीच्या जागरणात गाण्याच्या अन् भावगीताच्या सुरांनी सारा आसमंत भरून जाई. मित्रांची टोळकी येत ती केवळ त्याच्या भोवती रूंजी घालायला. इतर वेळी केवळ आपला असणारा सुरेश जेव्हा सारे वाटून घेत तेव्हा कधी असूया तर कधी निराशेने मन भरून येई. आपले ते आपलेच रहावे असे स्वार्थीपणाने वाटे. त्यावेळी प्रसिद्ध भावगीताच्या ओळी ही खंत खूप समर्पकपणे व्यक्त करीत.
“विसरशील खास मला दृष्टीआड होता वचने ही गोड गोड देशी जरी आता” ही स्थिती जणू आपलीच आहे असे मनाला वाटत राही. त्यातून बाहेर पडायला मलाही खूप वर्षे लागली. कितीही लोभ जडला तरी माणूस सदा सर्वदा आपले राहत नाही हे सत्य पचवायला मला फार जड गेले. आजही सुरेश मला भेटतो तेव्हा त्याच्याकडे पाहताना मला हरवायला अन् हरखायला होते हे खरे पण तसे बोलून आलेला क्षण घालवण्याचा प्रमाद न करता मी त्याचे स्वर, शब्द आणि साथ यांचे आकंठ प्राशन करीत असतो.
आज सुरेश पूर्वीइतका पारदर्शक दिसत नाही. परिस्थितीच्या अनेक फटकार्यांनी त्याला स्थानबद्ध केले असले तरी तो आपली प्रतिष्ठा व स्थान टिकवून आहे. सार्यांसाठी शक्य ते सारे करून त्याची वाटचाल सुरू आहे. पण माझ्या नजरेतला सुरेश आताच्या सुरेशशी ओळख दाखवायलाही चाचरत, ठेचकाळत आहे. मला कशाचे भय वाटते ?
“डोळ्यांमधले आसू पुसती, ओठावरचे गाणे”
या बाबूजींच्या स्वर्गीय आवाजातील ओळीच्या आशयाने तर मला भिववले नसेल ? काही असेा. प्रेयसीच्या डोळ्यातील आर्तता दर्शवणारे आमचे वर्तन सुरेशला कदाचित असेच आव्हान वाटले असेल आणि कर्तव्याच्या दिशेकडे त्याने आपला चेहरा वळवून वाटचाल सुरू केली असेल. पण आमचा सल कायम आहे.
खरेच का आमची चीजवस्तू आज हरवली आहे ? की आयुष्याचे इतके दिवस ओघळून गेल्यामुळे आमच्या दृष्टीकोनातच फरक पडला आहे ?
असेल ! कदाचित दोन्ही तर्क खरे असतील वा तसे काहीच नसेल आणि भासच असतील पण धांदरफळच्या प्रवरेच्या काठच्या वाळूवर, घारगावच्या घाटावर, संगमनेरच्या देशपांडे वाड्याच्या कट्ट्यावर आणि डोंबिवलीतील रामनगरच्या त्याच्या खोलीवर जे क्षण सहवासाने पुनीत झाले आणि गेली 50 वर्षे स्नेहबंध त्या धारेवर भिजत राहिला ते आपलेपण सच्चे आहे हाच आज विरंगुळ्याचा विषय आहे.
आज पत्नीविरहाने सुरेश व्याकुळ आहे. तथापि त्याचा पीळ कायम आहे. माऊथऑर्गन, पुस्तक, कॅमेरा आणि मित्र यात तो रमण्याचा प्रयत्न करतो. त्यांत कधी यश तर कधी अपयश, पण जीवन तर असेच आहे. पुढे पुढे जाणारे....
लेखांक ८: अशोक वैद्य
मी 1964 साली आर.सी.एफ. मध्ये नुकताच रूजू झालो होतो. त्या अगोदर जळगाव कॉलेजच्या प्रयोग शाळेत काम करून मी इकडे आलो होतो. सारे साथी सवंगडी नवीन होते. ते कॉलेज आणि हा खत कारखाना नवीन होता. आमचे प्रचालकाचे काम जरी पांढरपेशा पद्धतीचे समजले जाई तरी द्रव, वायू, रसायने, मोठी यंत्रे, भट्ट्या, पाईप लाइन्स...... कॉम्प्रेसर्स, आदिंनी युक्त सयंत्रे व उत्पादन हा नवीन विषय होता. अगदी गिरणीकामगारांचे जीवन नाही तरी दिवसाच्या तिन्ही पाळ्यात काम करावे लागे. स्वयंचलित यंत्रे असली तरी त्यातील स्वयंचलनाने दगा दिल्यावर सारे हाताने करावे लागे. कारखान्यात कष्टाचे व बुद्धीचेही काम असे. शिवाय युनियन व व्यवस्थापन असे दोन तट असत. आजही आहेत.
आमच्या सेक्शनमध्येच असलेल्या अशोकचा आमचा परिचय झाला तो अशा कामात त्याला नॅशनल रेयॉन मधला अनुभव होता म्हणून, शिवाय बुलढाण्याच्या भारत विद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे सामाजिक कामे व नाटकाची आवड होती. त्यांची पत्नीही नाटकात उत्तम भूमिका करून त्याला साथ देत असे. जोडी देखणी व हरहुन्नरी होती. कार्यशील व अगत्यशील तर ते होतेच, पण खुल्या मनाचे होते. मोकळेपण असल्यामुळे आम्ही 15-20 जण त्यांच्या भोवती जमा झालो व भारत विद्यालयाचे प्राचार्य व सामाजिक कार्य करून नवक्रांतीच्या शोधात कार्यरत असणार्या भैय्यासाहेब आगाशे यांच्या विचाराने आम्ही 1967 साली चेंबूर, मुंबई येथे यूथ कौन्सिल या युवा संस्थेची स्थापना केली. ती संस्था आज अशोक वैद्य निवृत्त झाल्यावरही सुरू आहे व सामाजिक कार्यात योगदान देत आहे.
अशोकचा कामाचा झपाटा मोठा होता. कितीही मोठे आव्हान असले तरी धडक द्यायला तो भीत नसे. स्वत: फारसा शिकलेला नसला तरी विविध क्षेत्रातील जाणकार माणसांची त्याची ओळख होती. त्यांच्याशी तो बरोबरीने बोलत असे. त्यामुळे आमच्या वर्तुळात त्याचे स्थान अद्वितीय होते. शाळांचे प्रमुख, समाज कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री या सार्यांशी चर्चा करताना त्याच्या मनावर कोणताही दबाव नसे. परदेशी पाहुणे व त्यांच्याशी चर्चा पाहून मला त्याचा मोठेपणा पटे. त्यामुळे पाहता पाहता 10 वर्षात त्याने आम्हा सर्वांच्या पाठिंब्यावर यूथ कौन्सिल या संस्थेला नाव मिळवून दिले. त्या संस्थेतर्फे होणारी शिबीरे, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, विद्यार्थी मेळावे, नेत्रदान, रक्तदान, नाटक, नागरी संरक्षण आदि कार्यक्रम नित्यनेमाने होऊ लागले.
उमदा स्वभाव व जबाबदारी घेण्याची सदैव तयारी तसेच पदरमोड करून सेवा करण्याची हौस यामुळे त्यांच्याकडे माणसांचा ओघ कायम असे. कधी ती माणसे मदतीचा हात घेऊन येत तर कधी अशोकच्या मर्जीसाठी तिष्ठत बसत. त्यातून निर्माण होणारे वैयक्तिक गरजेचे विषय त्याचे महत्त्व अधिक वाढवीत. ह्या प्रक्रियेमधूनच अशोकच्या मनात “आपल्याला पर्याय नाही” या विचाराने आपले स्थान पक्के केले.
अशोक मुळातच नाटकवेडा ह्यामुळे थोडा नाटकीपणा त्यालाही येत असे. मोठमोठ्या हुद्यावर काम करणार्या माणसांच्या गरजाही विविध असत. त्यावर फुंकर घालण्याचे काम अशोक सहज करीत असे व त्यामुळे कधी तत्त्वत: त्याचे म्हणणे मान्य नसले तरी त्याची उपयुक्ततता मोठी असल्यामुळे माणसे त्याच्याशी थोडी नरमाईने वागत. त्याचा फायदा अशोकला अनेक वेळा होत असे. शिवाय अनेक जणांशी उघड बोलण्याच्या अशोकच्या मनात आपली “अच्छा आदमी” ही प्रतिमा जपण्याचा अनेकांना सोस असे. त्यामुळे अशोकची अनेक कामे होत. शिवाय या सार्या प्रक्रियेत अशोकचा मतलब असलाच तर तो आपली प्रतिमा बनवण्याचा होता. इतर कोणताही स्वार्थ नव्हता.
कामे एकापाठोपाठ अंगावर कोसळत असली तरी अशोकचे काही बिघडत नसे, तथापि एकच काम सातत्याने लावून धरणे, हिशेब करणे विश्लेषणात्मक भूमिकेतून अभ्यास करणे यात त्याला गोडी नसे. त्यामुळे पाठिंब्याशिवाय त्याचा कोणताही प्रकल्प पुरा होत नसे. त्याचा लोकशाही मार्गावर विश्वास होता पण लोकशाहीतही प्रतिष्ठेची व्यक्ति म्हणून जगण्याची त्याची हौस व जिद्द होती. अशोक हरहुन्नरी असला तरी त्याला सोगा धरण्यासाठी सतत कुणीतरी लागे. कामाचा मूळ मुद्दा त्याचा असे. इतर तपशील सवंगड्यांनी पहावेत अशी त्याची अपेक्षा असे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अशोक चांगल्या घरचा असला तरी संस्काराच्या बाबतीत त्याची आबाळ झालेली होती. त्यामुळे घरगुती चवीच्या बाबी त्याला फालतू वाटत. घरात स्नेह, आदर, आपुलकी, परस्पर सामंजस्य आवश्यक आहे हे एकीकडे पटवून घेत तो त्या भावनांच्या खरेपणाबद्दल नेहमीच शंका व्यक्त करी. कदाचित त्याचे अनुभव तसे असतील. खरे पाहता जग असेच असते. ते व्यवहार पाहते. प्रेम जागवते. फुलवते आणि शेवटी वास्तवाच्या निखार्यावर होरपळून घेत असते. पण ते सारे शब्दात व वादात आणायचे नसते. बरेचसे समजून घ्यायचे व खूपसे सोसायचे असते हे अशोकच्या गावीही नसते. तुमच्याबद्दल शंका घेणे व सत्य माहित करून घेण्याच्या आपल्या मोहिमेत यश मिळवताना तुम्हाला बेजार करणे हा जणु आपला अधिकारच आहे असे त्याला वाटे.
अशोकच्या ह्या प्रकारच्या वागण्याबद्दल नापसंती व्यक्त केली तरी त्याचे वागणे बदलत नसे. कोणत्याही संबंधांचे मूळ शोधायला गेले तर बर्याचवेळा अप्रिय अनुभवावे लागते. हे माहित असूनही त्याची चीर-फाड थांबत नसे. तुम्ही एनकेन प्रकारे उपकृत असाल तर अशोक तुम्हाला सततच्या चर्चेनं हैराण करील ह्या वास्तवाने आम्ही अगदी जवळचे त्याच्याकडून फक्त संस्थेच्या कामांची अपेक्षा करीत असूं कारण इतर जणांचा वैताग आमच्या नित्य परिचयाचा असे. इतरांना मदत करण्याची ती क्रांती करण्यासाठी त्यात व्यक्ति केवळ साधन होय असे त्याचे आग्रही मत होते. उलट आम्ही व्यक्ति, तिचे प्रशिक्षण, विकास, उद्यमशीलता यावर विश्वास ठेवून त्याच्यावर होणारे संस्कार व प्रभाव यातूनच त्याचा दृष्टीकोन तयार होतो या मताचे होतो. अशोकची मते आम्हाला दाहक वाटत, त्याच्या लेखी श्रद्धा, चांगुलपणा, सरळ दृष्टीकोन हा भाबडेपणाचा भाग ठरे. या वैशिष्ठ्यामुळे अशोक इतरांना बर्याच वेळा तापदायक ठरे.
आज अशोक निवृत्त झाला आहे. तथापि कंपनीची हरित चेंबूर योजना व यूथ कौन्सिलतर्फे केले जाणारे कार्य यात महत्त्वाचा वाटा उचलून त्याने आपला काळ सार्थकी लावला आहे. आपल्या स्वभावातील वेगळेपणामुळे तो दीर्घकाळ लोकांच्या स्मृतीत राहिल हे खरे. वृक्षारोपणाच्या निमित्ताने जीवनलाभ झालेल्या झाडांना, त्यांच्या वरील फुलाफळांना व त्यांच्या सोबतीला येणार्या पक्षांनाही त्याची अनुपस्थिती जाणवेल असे मानायला जागा आहे.