Saturday, June 19, 2021

लसीकरण मोहीम... पिकनिक ! : सौ. अपर्णा कुलकर्णी


कोरोना - लॉकडाऊन - Stay home, stay safe - यामुळे घरातली सिनियर सिटीझन मंडळी व लहान मुलं अगदीच वैतागून गेली होती. नंतर अनलॉक - न्यू नॉर्मल पर्व सुरू झाल्यावर लहान मुलं बाहेर पडून थोडा वेळ का होईना खेळू लागली, मित्र मैत्रिणींना भेटू लागली. पण घरातली ज्येष्ठ मंडळी मात्र पूर्णवेळ घरी राहणे, बाहेर पडले तरी पूर्णवेळ तोंडावर मास्क बांधून राहणे, कुठल्याही गर्दीच्या वेळी व गर्दीच्या ठिकाणी न जाऊ शकणे - या मुळे अगदीच कंटाळली होती.

...आणि एके दिवशी बातमी आली की कोरोनावर लस सापडली.. मग बातमी आली की सर्वप्रथम फ्रंट लाईन योद्ध्यांना लस देण्यात येणार.. त्यानंतर लसीकरण मोहिमेचा पुढचा टप्पा जाहीर झाला की ज्यात सर्व सिनियर सिटीझन व 45 वर्षे वयावरील कोमॉरबीडीटी असलेल्या मंडळीना ही लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले.
सर्व ज्येष्ठ मंडळींना ही खुशखबर मिळाल्यावर सगळ्यांना उत्साह वाटू लागला. लसीकरणाच्या र्निमित्ताने बाहेर फिरायला तरी मिळणार , ही कल्पनाच त्यांच्यासाठी सुखावह होती. शाळेत पिकनिकची नोटीस आल्यावर विद्यार्थी जसे खुष होतात ना , अगदी तशीच अवस्था!! फक्त त्यात रोल रिव्हर्सल झालेले होते!
शाळेच्या पिकनिक संबंधी पालकांच्या चौकश्या सुरू होतात- पिकनिक कुठे, कधी, कशी नेणार आहेत, किती पैसे ,कधी भरायचे वगैरे वगैरे..! आणि मुलं ही पिकनिकच्या कल्पनेने खुष होत राहतात, प्लॅन्स बनवत राहतात, काय खाऊ बरोबर न्यायचा - कोणकोणते खेळ खेळायचे, कुठला ड्रेस घालायचा इ. इ. ...!!
☺️
आता ज्येष्ठांसाठी लसीकरण मोहीम जाहीर झाल्यानंतर त्यांची मुलं की जी आता त्या ज्येष्ठांचे पालक झालेले असतात- लसीकरण केंद्रांची माहिती घेणे, तिथली व्यवस्था कशी आहे याची माहिती घेणे, लसीकरणाच्या रजिस्ट्रेशन बद्दलची माहिती घेणे सुरू करतात . रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आपला नंबर लागेपर्यंत व लसीकरण झाल्यानंतर अर्धा तास तिथे थांबून घरी परतेपर्यंत 3-4 तास सहज लागणार आहेत,ही माहिती ही त्यांना मिळते. घरातल्या ज्येष्ठांना ही माहिती मिळाल्यावर ते ही या 3-4 तासांचे प्लॅन्स बनवू लागतात. दंडावर इंजक्शन देणे /घेणे सोयीचे होईल असे कोणते कपडे घालायचे हे ठरवू लागतात ,तिथे 3-4 तास थांबायचे तर मग वॉशरूम्स ची सोय काय व कशी या ही चौकश्या सुरू करतात...एकंदरीत काय तर लॉक डाऊन दरम्यान आलेली मरगळ जाऊन एकदम उत्साह, लगबग, उत्सुकता सुरू होते...!!
☺️
आमच्या कडेही हीच परिस्थिती..!
☺️

रजिस्ट्रेशन करावे म्हणून लसीकरणाच्या साईट वरून हर प्रयत्न करून पाहिले पण पिनकोड, त्या एरियात असलेली लसीकरण केंद्रे व उपलब्ध स्लॉट ,आमची वेळ यांचे समीकरण जुळता जुळेना! अखेर काल मुहुर्त हुडकला व 'लसीकरणाच्या पिकनिक' ला जायचेच, असे ठरवले. किमान 3- 4 तास लागणारच असे मनाशी ठरवून ,इंजक्शन घ्यायला सोयीचे होतील असे कपडे घालून, जेवण करून मग दुपारी दीड पावणेदोन च्या सुमारास घरातून निघालो..अर्थात पुढच्या 3- 4तासांची बेगमी करूनच! बरोबर मधेच तोंडात टाकायला म्हणून बदाम, बिस्किटे, द्राक्षे असा खाऊ ही डब्यात भरून घेतला.पाण्याच्या दोन बाटल्या ही घेतल्या. आधार कार्डाचा आधार आवश्यक असल्याने ते ही सोबत होतेच. इतका वेळ मोबाईल ची बॅटरी टिकेल - न टिकेल ,म्हणून सोबत पॉवर बँक ही घेतली.. आणि आईसह निघालो. लसीकरण केंद्राचा पत्ता शोधून तिथंवर पोहोचेपर्यंतच्या रस्त्यावर आई ओळखीची दुकाने, नव्याने सुरू झालेली दुकाने, इतक्या दिवसांनंतर दिसणारी रस्त्यावरची वाहनांची रहदारी, मास्क बांधून का होईना पण फिरताना दिसणारी माणसे पाहात होती. आईचं वय 84-85 असल्याने तिला फार चालायला लागू नये म्हणून लसीकरण केंद्रावर तिला व्हील चेअर घेतली.सातव्या मजल्यावर जाऊन रजिस्ट्रेशन केले आणि लगेचच तिचा नंबर लागला व पाच मिनिटांत तिचे लसीकरण झाले. पुढचा अर्धा तास तिला वेटिंग लाऊंज मध्ये थांबायला सांगितले.दर पाच सात मिनिटांनी ,'आजी ठीक आहात ना, काही त्रास होत नाही ना ' अशी चौकशी ही होत होती.त्या दरम्यान माझे ही लसीकरण पूर्ण झाले व मला ही वेटिंग लाऊंज मध्ये अर्धा तास थांबायला सांगितले. ज्या आईने मला लहान असताना ट्रिपल- पोलिओ ची लस द्यायला नेले होते तिला आज मी ही कोरोना ची लस द्यायला घेऊन आले होते, या गोष्टीची दोघींनाही मजा वाटत होती. फक्त तेंव्हा मी इंजक्शन दिल्यानंतर रडत होते तर आत्ता आम्ही गप्पा मारत होतो आणि या क्षणांना फोटोमध्ये बंदिस्त करण्यासाठी लसीकरण केंद्राने तयार करून दिलेल्या सेल्फी पॉईंट कडे जाण्यासाठी उत्सुक होतो!!
☺️
लसीकरण झाल्यानंतरचा हा वेटिंग करण्याचा अर्धा तास अगदी हॅपनिंग होता बरं!! .. बरोबर हाss एवढा खाऊ, पाणी, पॉवर बँक असा सगळा जामानिमा नेला होता पण तो पिशवीतून बाहेरही काढला नाही! सभोवताली इतकी माणसं पाहून खूप छान वाटत होतं.. काही त्रास होत नाही ना अशी काळजी युक्त चौकशी सुरू होतीच 5- 5 मिनिटांनी, सेंटर ने तयार करून दिलेल्या सेल्फी पॉईंट कडे जाऊन फोटो काढून घ्यायची घाई ही होती, कारण तिथे क्यू होता.. लसीकरण झालेले सगळेच लसवन्त व लसवंती फोटो काढून घेण्यास उत्सुक होते..!!
😜😀
अखेर एकदाचा मनासारखा उत्तम फोटो काढून झाला. लसस्वी होऊन घरी परतल्यावर मोबाईलवर आलेल्या sms मधून लसीकरणाचे सर्टिफिकेट ही डाऊनलोड करून 'याचि देही याचि डोळा पाहिलं' आणि कसं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.. हा हँग ओव्हर आता पुढचे 4-5 आठवडे नक्कीच टिकेल..!
🤓😂
आता पुढची पिकनिक 4 आठवड्यानंतर..त्या तयारीचेही वेध सुरू होतील लवकरच..!!
😂😂

- सौ. अपर्णा कुलकर्णी

Saturday, June 12, 2021

Life : A Creation by Aayesha Limaye

 


LIFE

Life Is Journey,

 Enjoy It As It Comes,

The World Will Keep Talking,

As Old School As It Becomes  !

 

Dare To Do Something Different,

Dare To Be Yourself,

Dare To Touch The Sky,

And Keep Flying High !

 

 Follow Your Heart,

Keep Going Ahead,

There Will Be Ups And Downs,

 Make Sure Your Zeal Doesn’t Fade !

 

Count Your Blessings,

Focus On Good,

Choose Your Thoughts,

And Keep Up Your Mood !

 

Let The Storms Come,

Give It Your Best,

Enjoy This Roller Coaster Ride,

Live It To The Fullest !

                          --Aayesha Limaye

Saturday, May 15, 2021

ब्लू-बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता

 

ब्लू-बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता 

                            Blue Book: Financial Literacy, Awareness and Inclusion


आपले कुटुंब आपल्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाचे आणि प्रिय असते. ‘कुटूंब ही संकल्पनाच अशी आहे की जी  कर्त्या व्यक्तीस, कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असते जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्य, त्याचे भावी आयुष्य अधिक समृद्धरित्या जगू शकेल.

असे असूनसुद्धा कुटुंबाशीच निगडीत असणारी एक लहानशी आणि बहुतांश  कुटुंबप्रमुखांकडून नेहेमीच दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट म्हणजे,  आपल्या संपत्ती आणि मालमत्तेबाबत अचूक आणि अद्ययावत अशा नोंदी ठेवणे !!  कुटुंबाशी  निगडीत असणाऱ्या आर्थिक बाबींचे नोंदणीकरण क्वचितच योग्यरित्या केले जाते किंबहुना ही बाब अनावश्यक मानली जाते. आपल्या मालमत्तेचा, भविष्यातील कोणताही अनिश्चित क्षय रोखण्यासाठी, आपण कुटुंबासाठी केलेले आर्थिक नियोजन फलद्रुप होण्यासाठी, असे नोंदणीकरण आवश्यक असते. कुटुंबाच्या उत्पनाचा स्रोत असणाऱ्या व्यक्तीबाबत काही अकाली, दुर्दैवी घटना घडली तर आर्थिक बाबींबाबत असणाऱ्या अनागोंदींमुळे कुटुंबातील सदस्यांवर / उत्तराधिकारीवर अमाप मानसिक दडपण येऊ  शकते आणि कुटुंबप्रमुखाने  केलेले आर्थिक नियोजन कोलमडू शकते. असे अनेक प्रसंग आपण आजूबाजूस घडताना बघतो.    

म्हणूनच कुटुंबातील  प्रत्येक सदस्याने,  आर्थिकदृष्टया सजग, साक्षर व्हावे यासाठी आम्ही  ‘ब्लू-बुकनिर्मिले आहे. ब्लू बुक ही एक सोपी, सुलभ संकल्पना आहे जिचा वापर कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या सर्व आर्थिक बाबींचे  नोंदनीकरण करण्यासाठी करायचा आहे. असे केल्याने एखाद्या कुटुंबाची वास्तविक, आर्थिक परिस्थिती, घरातील सर्व सदस्यांना  स्पष्ट होण्यास मदत होते तसेच कुटूंबाशी संबंधित भविष्यातील कोणत्याही आर्थिक निर्णयासाठी मार्गदर्शक म्हणूनही ब्लू-बुक कार्य करते. ‘ब्लू किंवा निळा रंग हा स्थिरतेशी संबंधित आहे. हा रंग विश्वास, निष्ठा, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि सत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या आर्थिक संकल्पनेचे नामकरण आम्ही ‘ब्लू बुक असे केले आहे.

ब्लू-बुक वापरण्यामागील उद्देश्य कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिकबाबींबाबत साक्षर, जागरूक करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रवासात त्यांनाही समाविष्ट करून घेणे असा आहे.

तुमची  “ब्लू-बुक “ ची प्रत मिळविण्यासाठी ९०११८९६६८१ या क्रमांकावर संपर्क करावा !


Blue Book: Financial Literacy, Awareness and Inclusion

 

Your family is always most important to you. The notion of “family” (Kutumbam) is the dearest and of the utmost importance to every human. This inherent element in one’s life drives every one of us towards creating wealth for family. It is this zeal in you that pushes you every moment to work and earn so that every member of your family may lead life comfortably.

Yet, there remains a small and often forgotton but extremely important thing to be done, which is keeping accurate and updated records of your wealth. The documentation of the important records of your assets and wealth serves a major role in planning the future of your family.  It requires very little time to do this but it serves well to protect any unintended erosion of your assets.

This documentation is absolutely necessary.  Death is a reality of life.  It is inevitable but unpredictable.  Just imagine the emotional turmoil and upheaval one’s family may experience in case of an untimely and/or accidental demise of one’s loved one, especially of the head of the family, the primary source of income at that.  During these trying times improper and inadequate or even worse nonexistent records of your financial affairs can add immense burden on your immediate family members/successors.  Actual case studies show that even slight ignorance in keeping proper records and documentation results in erosion of the wealth.

Hence, every one of us needs to think of safer tomorrow TODAY, RIGHT NOW.  The ‘BLUE BOOK’ tool is the best solution to this area of concern. BLUE BOOK is a simple, handy utility that is to be used either in hard copy or soft copy format to record, inform and share the economical facts related to the family. It guides about all those information pieces that need to be recorded so as to view realistic, financial net worth of a family. It is a fact book for quick reference and acts as a guide, blue print to take any further financial decisions related to the family. ‘Blue’ is the color of the sky and sea. It is often associated with depth and stability. It symbolizes trust, loyalty, wisdom, confidence, intelligence, faith and truth. Hence, we named this financial fact book as ‘BLUE BOOK’. The goal behind using Blue Book is ‘Financial Literacy, Awareness and Inclusion’ of all your family members.

To Get Copy of Blue Book, Call @ 9011896681!

Saturday, May 8, 2021

ईच्छा तेथे .. शिक्षण ! : डॉ. रुपाली कुलकर्णी

 


ईच्छा तेथे .. शिक्षण ! 

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत.  आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे.  पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परीक्षां संबंधित बदल  आणि त्यायोगे उद्भवणाऱ्या मानसिक  ताणतणाव !  परंतु आता शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मार्गी लागल्या आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षाआधी  विद्यार्थ्यांच्या  हाती बऱ्यापैकी रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे.  शालेय किंवा महाविद्यालयीन  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अभ्यासक्रमा बाहेरची काही जोड कौश्याल्ये मिळविण्यासाठी  उद्युक्त केले जाते . परंतु       दैनंदिन शिक्षणाच्या धावपळीत त्यांना  अशा  गोष्टी शिकणे,  आत्मसात करणे यासाठी वेळ कमी पडत असतो. आता मात्र पुढे मिळणाऱ्या वेळाचे  जर चांगले नियोजन केले तर त्यातुन बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत, जसे  तांत्रिक  किंवा  वैयक्तिक  पातळीवर नवीन गुणकौशल्ये  आत्मसात  करणे किंवा आधीपासून असणाऱ्या कौशाल्यांना अजून वरच्या पातळीवर नेणे ! आजच्या या तांत्रिक युगात, ऑनलाईन शिक्षणासाठी  अनेक  वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स किंवा अँप्लिकेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर केल्यास  हे जमवणे शक्य आहे. परंतु कुठल्या ऑनलाइन गुरूजवळ कोणत्या प्रकारचे ज्ञानभांडार किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.  अशा ऑनलाईन संसाधनांविषयी जाणून घेऊयात.   

 

·         NPTEL:एनपीटीईएल  (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्व्हान्सड लर्निंग) हा भारतातील ज्ञानमहर्षी समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थांच्या  पुढाकाराने उभा राहिलेला उपक्रम आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मिळविणे शक्य होते. या   उपक्रमाच्या संकेतस्थळावर पाचशेहुन अधिक व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत जे संबंधित शिक्षण साहित्याबरोबर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ कोर्स डाऊनलोड करता येतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे नवीन संकप्लना अथवा विषय समजणे शक्य होते.  

      संकेतस्थळ : http://nptel.ac.in.

·       

       SWAYAM : स्वयंम (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) हा भारत सरकारचा उपक्रम असुन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातुन उभा राहिलेला आहे. या माध्यमातून २००० हुन अधिक विषयावर विनामुल्य कोर्सेस उपलब्ध आहेत. याद्वारे  अभियांत्रिकी, विज्ञान , गणित, भाषा, व्यवस्थापन,मानवता आदी अनेक विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे. विविध संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी ऍनिमेटेड व्हिडीओज,  डाऊनलोड करता येण्यासारखी   डिजिटल पुस्तके, शंका-निरसनासाठी स्वतंत्र पोर्टल ही स्वयंमची वैशिष्टये !  काही ठराविक कोर्सेससाठी किंवा पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते.      

संकेतस्थळ : http://swayam.gov.in  

·   MOOC: मुक  (Massive Open Online Courses -MOOCs) जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील उच्चस्तरीय ज्ञान मिळवून देण्यासाठी  MOOC साहाय्यभूत ठरते आहे. अनुभवी प्राध्यपकांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक साहित्य, व्याख्यानांचे व्हिडिओ, संदर्भ साहित्य येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी यातील आवडत्या माध्यमाचा वापर करून, आपापल्या गतीने आणि भाषेतुन  विषयांचे ज्ञान मिळवू शकतात.  

संकेतस्थळ : https://www.mooc.org/

·         व्यावसायिक ऑनलाईन माध्यमे: वरील माध्यमां व्यतिरिक्त अनेक  व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पर्यायही  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.  उदारणार्थ BYJU’s, UnAcademy, Udemy, Toppr, Vendantu  इ.  याद्वारे काही किमान शुल्क भरून वेगवेगळ्या विषयातील ज्ञान मिळविता येणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठीही  ही माध्यमे उपयुक्त ठरतात. सराव वर्ग, सराव परिक्षा, स्वतंत्र वेळेत तज्ज्ञांची उपलब्धता, परीक्षां संदर्भांत समुपदेशन इ. वैशिष्टयांमुळे तरुण पिढी या ऑनलाईन गुरूंकडे आकर्षित होताना दिसते आहे. 

अर्थात योग्य निवड करण्यासाठी आपल्याकडे असणारी डिजिटल  साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी,  स्वानुभवातून आणि स्वयं अध्ययनातून  सलगपणे शिकण्याची,  कोर्स पूर्ण करण्याची तयारी, शिक्षणाचे शुल्क, लागणारा  कालावधी आणि  निवडलेल्या अभ्यासक्रमाला व्यावसायिक क्षेत्रात असणारी मान्यता  या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वर्गाचा, शिक्षकांचा सल्ला घेता येईल. शेवटी या विशाल ज्ञानभांडारातून, वेचावे तितके कण कमीच आहेत !! परंतु 'ईच्छा तेथे मार्ग' असतोच !  ज्ञानार्जनाची कास धरून या ज्ञानसागरात मारलेली उडी, अपेक्षित तीरावर तुमची नाव नक्कीच पोहोचवू शकते !!


डॉ. रुपाली कुलकर्णी.

Saturday, May 1, 2021

महाराष्ट्र देशा ..

 


महाराष्ट्र देशा 🚩🚩..

 

संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी,

गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी,

स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी,

कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !!

 

शिव-शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा,

स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा,

ज्ञान-तुका-नामा सह आळवी ही नाथा,

वपु-पुलं-कानेटकरांच्या अतुल-अवीट कथा !!

 

आषाढी-कार्तिकी निघे, श्रद्धा-भक्तीची वारी,

देशभरातून ज्ञानार्थी येती, विद्येच्या माहेरी,

सनी-सचिनची कर्मभूमी ही, क्रिडेची पंढरी,

अभिनयातील उत्तम रत्ने, इथे हिच्याच उदरी !!

 

देशभक्तीची, पराक्रमाची बीजे या देशा,

बुद्धी,भक्तीची, संतवाणीची रत्ने या देशा, 

कला, क्रीडेची, विज्ञानाची खाणी या देशा,     

मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !! 🚩

मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !!! 🚩

 

 - डॉसौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक