Saturday, May 8, 2021

ईच्छा तेथे .. शिक्षण ! : डॉ. रुपाली कुलकर्णी

 


ईच्छा तेथे .. शिक्षण ! 

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत.  आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे.  पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.  ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परीक्षां संबंधित बदल  आणि त्यायोगे उद्भवणाऱ्या मानसिक  ताणतणाव !  परंतु आता शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा मार्गी लागल्या आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षाआधी  विद्यार्थ्यांच्या  हाती बऱ्यापैकी रिकामा वेळ उपलब्ध होणार आहे.  शालेय किंवा महाविद्यालयीन  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अभ्यासक्रमा बाहेरची काही जोड कौश्याल्ये मिळविण्यासाठी  उद्युक्त केले जाते . परंतु       दैनंदिन शिक्षणाच्या धावपळीत त्यांना  अशा  गोष्टी शिकणे,  आत्मसात करणे यासाठी वेळ कमी पडत असतो. आता मात्र पुढे मिळणाऱ्या वेळाचे  जर चांगले नियोजन केले तर त्यातुन बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत, जसे  तांत्रिक  किंवा  वैयक्तिक  पातळीवर नवीन गुणकौशल्ये  आत्मसात  करणे किंवा आधीपासून असणाऱ्या कौशाल्यांना अजून वरच्या पातळीवर नेणे ! आजच्या या तांत्रिक युगात, ऑनलाईन शिक्षणासाठी  अनेक  वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म्स किंवा अँप्लिकेशन्स उपलब्ध आहेत आणि त्यांचा सुयोग्य वापर केल्यास  हे जमवणे शक्य आहे. परंतु कुठल्या ऑनलाइन गुरूजवळ कोणत्या प्रकारचे ज्ञानभांडार किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.  अशा ऑनलाईन संसाधनांविषयी जाणून घेऊयात.   

 

·         NPTEL:एनपीटीईएल  (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्व्हान्सड लर्निंग) हा भारतातील ज्ञानमहर्षी समजल्या जाणाऱ्या आयआयटी संस्थांच्या  पुढाकाराने उभा राहिलेला उपक्रम आहे ज्याद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण मिळविणे शक्य होते. या   उपक्रमाच्या संकेतस्थळावर पाचशेहुन अधिक व्हिडीओ कोर्सेस उपलब्ध आहेत जे संबंधित शिक्षण साहित्याबरोबर विनामुल्य उपलब्ध आहेत. हे सर्व व्हिडिओ कोर्स डाऊनलोड करता येतात जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेप्रमाणे नवीन संकप्लना अथवा विषय समजणे शक्य होते.  

      संकेतस्थळ : http://nptel.ac.in.

·       

       SWAYAM : स्वयंम (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) हा भारत सरकारचा उपक्रम असुन मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्यातुन उभा राहिलेला आहे. या माध्यमातून २००० हुन अधिक विषयावर विनामुल्य कोर्सेस उपलब्ध आहेत. याद्वारे  अभियांत्रिकी, विज्ञान , गणित, भाषा, व्यवस्थापन,मानवता आदी अनेक विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ माध्यमातून शिक्षण उपलब्ध आहे. विविध संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी ऍनिमेटेड व्हिडीओज,  डाऊनलोड करता येण्यासारखी   डिजिटल पुस्तके, शंका-निरसनासाठी स्वतंत्र पोर्टल ही स्वयंमची वैशिष्टये !  काही ठराविक कोर्सेससाठी किंवा पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते.      

संकेतस्थळ : http://swayam.gov.in  

·   MOOC: मुक  (Massive Open Online Courses -MOOCs) जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयातील उच्चस्तरीय ज्ञान मिळवून देण्यासाठी  MOOC साहाय्यभूत ठरते आहे. अनुभवी प्राध्यपकांनी प्रमाणित केलेला अभ्यासक्रम तसेच शैक्षणिक साहित्य, व्याख्यानांचे व्हिडिओ, संदर्भ साहित्य येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी यातील आवडत्या माध्यमाचा वापर करून, आपापल्या गतीने आणि भाषेतुन  विषयांचे ज्ञान मिळवू शकतात.  

संकेतस्थळ : https://www.mooc.org/

·         व्यावसायिक ऑनलाईन माध्यमे: वरील माध्यमां व्यतिरिक्त अनेक  व्यावसायिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पर्यायही  विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.  उदारणार्थ BYJU’s, UnAcademy, Udemy, Toppr, Vendantu  इ.  याद्वारे काही किमान शुल्क भरून वेगवेगळ्या विषयातील ज्ञान मिळविता येणे शक्य झाले आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठीही  ही माध्यमे उपयुक्त ठरतात. सराव वर्ग, सराव परिक्षा, स्वतंत्र वेळेत तज्ज्ञांची उपलब्धता, परीक्षां संदर्भांत समुपदेशन इ. वैशिष्टयांमुळे तरुण पिढी या ऑनलाईन गुरूंकडे आकर्षित होताना दिसते आहे. 

अर्थात योग्य निवड करण्यासाठी आपल्याकडे असणारी डिजिटल  साधने, इंटरनेट कनेक्टिव्हिटी,  स्वानुभवातून आणि स्वयं अध्ययनातून  सलगपणे शिकण्याची,  कोर्स पूर्ण करण्याची तयारी, शिक्षणाचे शुल्क, लागणारा  कालावधी आणि  निवडलेल्या अभ्यासक्रमाला व्यावसायिक क्षेत्रात असणारी मान्यता  या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वर्गाचा, शिक्षकांचा सल्ला घेता येईल. शेवटी या विशाल ज्ञानभांडारातून, वेचावे तितके कण कमीच आहेत !! परंतु 'ईच्छा तेथे मार्ग' असतोच !  ज्ञानार्जनाची कास धरून या ज्ञानसागरात मारलेली उडी, अपेक्षित तीरावर तुमची नाव नक्कीच पोहोचवू शकते !!


डॉ. रुपाली कुलकर्णी.

Saturday, May 1, 2021

महाराष्ट्र देशा ..

 


महाराष्ट्र देशा 🚩🚩..

 

संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी,

गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी,

स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी,

कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !!

 

शिव-शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा,

स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा,

ज्ञान-तुका-नामा सह आळवी ही नाथा,

वपु-पुलं-कानेटकरांच्या अतुल-अवीट कथा !!

 

आषाढी-कार्तिकी निघे, श्रद्धा-भक्तीची वारी,

देशभरातून ज्ञानार्थी येती, विद्येच्या माहेरी,

सनी-सचिनची कर्मभूमी ही, क्रिडेची पंढरी,

अभिनयातील उत्तम रत्ने, इथे हिच्याच उदरी !!

 

देशभक्तीची, पराक्रमाची बीजे या देशा,

बुद्धी,भक्तीची, संतवाणीची रत्ने या देशा, 

कला, क्रीडेची, विज्ञानाची खाणी या देशा,     

मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !! 🚩

मुजरा आमुचा स्विकारावा, श्री महाराष्ट्र देशा !!! 🚩

 

 - डॉसौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक

Saturday, April 24, 2021

गीतरामायण : प्रतिमा कुलकर्णी


माझ्या आयुष्यात ‘गीतरामायण’ आलं खूप उशिरा. कविश्रेष्ठ गदिमा  यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची ती जादू.. खरं तर यातल्या ५६ गाण्यांपैकी प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल. भावनांचं ‘रोलर कोस्टर’ ठरणारी ही गाणी, आणि अनेक ‘दृश्य’काव्याने भरलेले संपूर्ण गीतरामायण! यातले प्रसंग चितारण्याची गदिमांची पद्धत मोठी खुबीदार आहे आणि ते स्वरबद्ध करणारा सुधीर फडके यांचा दैवी आवाज. गीतरामायण ऐकत असताना हा राम आपल्या काळजात कधी खोल खोल झिरपत जातो आपल्याला कळतही नाही..

राम, कृष्ण हे लोक आपल्या आयुष्यात कधी आले हे कुणाला आठवत असेल का? बहुतेक नाही. कळायला लागण्याच्या वयापासून ते आपल्या आयुष्याचा भाग असतात. त्यांच्या दैवी ‘स्टेटस’बद्दल मला माहिती नाही, पण ते माझे ‘हिरो’ आहेत हे नक्की. कृष्णाची मी लहानपणापासूनच चाहती होते. यशोदेचा कान्हा, राधेचा कृष्ण, गोपींचा कन्हैया, पार्थाचा सारथी, द्रौपदीचा सखा.. बंसीधर, गोवर्धनधारी कृष्ण सगळ्यांचाच लाडका असतो.

रामाशी मात्र माझी तेवढी ओळख नव्हती. मर्यादापुरुषोत्तम, वडिलांच्या वचनपूर्तीसाठी सिंहासनाचा त्याग करणारा, चौदा र्वष वनवास भोगणारा राजपुत्र एवढी माहिती असली तरी तो राम माझ्या मनात शिरला नव्हता. पण ‘गीतरामायण’ ऐकलं आणि त्या रामाने माझ्या काळजाचा ठाव घेतला. ‘गीतरामायण’ ज्या काळात रेडिओवर गाजलं होतं त्या काळात मी रेडिओ ऐकण्याच्या वयाची नव्हते. त्यामुळे ते माझ्या आयुष्यात आलं खूप उशिरा. नाही म्हणायला काही गाणी माहीत होती- त्यातलं एक म्हणजे ‘पराधीन आहे जगती..’

मला ते अजिबात पटलं नव्हतं. ‘असा कसा पराधीन असेल माणूस..’ ही माझी त्या वयातली प्रतिक्रिया. मागच्या लेखात मोठं होण्याबद्दल लिहिताना मला ही गोष्ट आठवली. मी काही ते गाणं कधी फारसं आवडीने ऐकलं नव्हतं. पुढे एक दिवस पुण्याला अलुरकरांच्या दुकानात चक्कर टाकली तेव्हा गीतरामायणाच्या कॅसेट्सचा सेट दिसला आणि अगदी सहज म्हणून तो घेतला. त्या वेळी अनेक वर्षांनंतर ‘पराधीन आहे जगती..’ ऐकलं तेव्हा कारण नसताना डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. सहज गप्पांमध्ये ती गोष्ट एका मित्राला सांगितली, आणि म्हटलं, ‘‘कमाल आहे नं- ते गाणं मला आधी फार ‘बोअर’ वाटत होतं!’’ तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे, कारण त्या वेळी तुझ्या आयुष्यात इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या नव्हत्या!’’ कदाचित गेल्या लेखात मोठं होण्याबद्दल जे लिहिलं त्या विचाराची ठिणगी तिथेच पडली असेल.

आता जितक्या म्हणून यंत्रांवर संगीत ऐकता येतं, तितक्या सगळ्या रूपात माझ्याकडे गीतरामायण आहे! कधीही आणि कुठेही मनात आलं की ऐकता यावं म्हणून!

गीतरामायणाला दोन आरंभबिंदू आहेत. सुधीर फडकेंच्या आवाजातल्या निवेदनात अयोध्येच्या राजसभेत आलेल्या लव-कुश यांचं वर्णन करून झाल्यावर ऐकू येतात ते बासरीचे हळुवार, पण आर्त स्वर आणि त्यानंतर ‘श्रीराम! श्रीराम!’ हे स्वरबद्ध शब्द. कुणाचंही मन भक्तिभावाने भरून टाकतील असे हे स्वर. मग त्याला श्रीराम म्हणजे काय, कोण हे काहीही माहीत नसेल तरी तसंच वाटेल. ती जादू सुधीर फडकेंच्या स्वराची, त्यातल्या भावाची. अनेक कडव्यांमधून त्या दोन बाळांचं वर्णन आल्यावर येतो तो त्या गाण्यामधला उच्च बिंदू- ‘सोडून आसन उठले राघव..’ आणि आपण तो सोहळा प्रत्यक्ष पाहतो आहोत असा भास होतो.

संपूर्ण गीतरामायण अशा अनेक ‘दृश्य’काव्याने भरलेले आहे. प्रसंग चितारण्याची गदिमांची पद्धत मोठी खुबीदार आहे. महर्षी विश्वामित्र दशरथाकडे रामाला त्यांच्या बरोबर पाठवण्याची मागणी करतात, त्यात ते म्हणतात- ‘येतो तर येऊ दे अनुज मागुता..’ जणू असं वाटतं की एकीकडे विश्वामित्र आणि दशरथ बोलत असताना दुसरीकडे लक्ष्मण रामापाशी हट्ट करतोय- ‘‘दादा मलापण यायचंय!’’ विश्वामित्र राजाकडे मागणी जरी करत असले तरी ती मागणी एका महर्षीची आहे. त्यातले शब्द, गाण्याची चाल आणि बाबूजींचा आवाज या सगळ्यामध्ये एक अधिकार, एक आब आहे. ते याचना करत नाहीत. आपला तरुण मुलगा राक्षसांशी लढण्यासाठी जाणार हे ऐकल्यावर कौसल्या काळजीत पडली आहे असं सूचित होतं – तिला बरंच समजावून झाल्यावर विश्वामित्र असंही म्हणायला कमी करत नाहीत- ‘उभय वंश धन्य रणी पुत्र रंगता..!’

दुसरा आरंभबिंदू आहे लव-कुश कथा सांगायला सुरुवात करतात तो. ‘सरयू तीरावरी अयोध्या..’ मला संगीतातलं तंत्र कळत नाही, पण शब्दांतून आणि सुरांतूनही तिथे एक ‘गोष्ट’ सुरू होते आणि आपण ती ऐकायला सरसावून बसतो. रामायणातल्या अनेक प्रसंगांचे जे वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणे गदिमांची दृश्य, त्यांचे शब्द ती ती रूपं धारण करतात. ‘जोड झणी कार्मुका, सोड रे सायका, मार ही त्राटिका, रामचंद्रा!’ या गाण्यात एक जबरदस्त फोर्स आहे, अटॅक आहे. शब्दांची निवडही अशी आहे की सतत आघात जाणवत राहावेत. गदिमा-बाबूजी अनेक पात्र होतात-रामच नव्हे तर लक्ष्मण, भारत, सीता, अगदी कुंभकर्णदेखील! कुंभकर्णाच्या तोंडून गदिमा रावणाला चार शब्द सुनवायलाही कमी करत नाहीत!

खरं म्हणजे त्यातल्या ५६ गाण्यांपैकी प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल. एक-एक गाणं एक-एक रत्न आहे. तरीही सलग येणारी तीन गाणी अशी आहेत, की ती एखाद्या नाटकासारखी किंवा एकांकिकेसारखी वाटतात.

वनवासी रामाला भेटायला धाकटा भाऊ भरत येतो, श्रीरामांना अयोध्येला परत जाण्याची विनवणी करतो, राम नकार देतात आणि मग भरत त्यांच्या पादुका मागतो. ही तीन गाणी म्हणजे भावनांचं ‘रोलर कोस्टर’ आहे.

दूरवरून भरत आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या सैन्याची चाहूल लागते. लक्ष्मणाला कुणीतरी शत्रू चाल करून येतोय असं वाटून तो बघायला जातो ते ताल वृक्षावर. जाण्याआधी लक्ष्मण रामाला सांगतोय- ‘आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा- चापबाण घ्या करी सावधान राघवा!’ एखाद्या कॅमेरामनने चित्रण करावं त्या पद्धतीने आधी खूप लांबून दिसणारं दृश्य हळूहळू जवळ येत जावं त्याप्रमाणे आपल्या समोर साकार व्हायला लागतं.

खूप मोठा धुरळा उडतोय, वाद्यांचे हादरवून टाकणारे आवाज येतायत, त्या आवाजाने जंगलात कल्लोळ उडालाय, पशू-पक्षी घाबरून सैरावैरा धावतायत.. रथात उभा राहून कुणी तरी येतोय एवढंच दिसतंय. मग रथ जरा पुढे येतो- तसा लक्ष्मण म्हणतो- ‘सावळी तुम्हा परी दीर्घ बाहु आकृती..’ थोडय़ा वेळात त्याच्या लक्षात येतं की तो भरत आहे. तो शत्रू म्हणून लढायलाच आलाय असा समज झालेला लक्ष्मणही युद्धासाठी त्वेषाने सज्ज होतो- इतका की तो म्हणतो- ‘कैकेयीस पाहू दे छिन्न पुत्र देह तो!’ किंवा ‘क्षम्य ना रणांगणी पोरकेही पोर ते!’ भरत आल्यावर, रामाशी बोलल्यावर मात्र रंग पालटतो आणि एक शांत, शहाणा सूर लागतो- ‘दैवजात दु:खे भरता- दोष ना कुणाचा..’

भरताला रामाचं म्हणणं मान्य करावंच लागतं, पण त्या दु:खावेगात तो म्हणतो : ‘सांगता तेव्हा न आले, चरण जर का मागुती, त्या क्षणी ह्य़ा तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती-’ आणि मग परत एकदा आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं करत गदिमा म्हणतात- ‘ही प्रतिज्ञा ही कपाळी पावलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!’

राम वनवासाला गेल्यावर सुमंत जेव्हा दशरथाला भेटतो, तेव्हा दशरथ विचारतो, ‘‘माझा राम काय रे म्हणाला जाताना?’’ हे वाक्य गद्य स्वरूपात फडकेंच्या निवेदनात येतं-  कुणाही नटाने अभ्यास म्हणून ऐकलंच पाहिजे असा वाचिक अभिनयाचा धडा आहे ते वाक्य!

सगळ्यांना माहीत असलेली ही रामकहाणी – पण ती ऐकताना राम आपल्या काळजात खोल-खोल झिरपत जातो आणि हा कौसल्येचा राम गदिमा-सुधीर फडकेंच्या मार्गे आपला राम कधी होऊन जातो ते कळतच नाही.


- प्रतिमा कुलकर्णी, 

साभार, लोकसत्ता , चतुरंग