Thursday, March 23, 2023

संत जनाबाईंची मानसहोळी

 



संत जनाबाईंची मानसहोळी


कराया साजरा |

होलिकेचा सण |

मनाचे स्थान |

निवडिले ||


ऐसे ते स्थान |

साधने सारवले |

भक्तीने शिंपिले |

केले सिद्ध ||


त्या स्थानी खळगा |

समर्पणाचा केला |

त्यात उभा ठेला |

अहंकार एरंड ||


रचलीया तेथे |

लाकडे वासनांची |

इंद्रीय गोवऱ्याची |

रास भली ||


गुरुकृपा तैल |

रामनाम घृत |

अर्पिले तयात |

ऐसे केले ||


रेखिली भोवती |

सत्कर्म रांगोळी |

भवरंगाचे मेळी |

शोभिवंत ||


वैराग्य अग्नीसी |

तयाते स्थापिले |

यज्ञरूप आले |

झाली कृपा ||


दिधली तयाते |

विषय पक्वान्नाहुती |

आणिक पुर्णाहूती |

षड्रिपु श्रीफळ ||


झाले सर्व हुत |

वैराग्य अग्नीत |

जाणावया तेथ |

नुरले काही ||


वाळ्या म्हणे जनी |

व्हावी ऐसी होळी |

जेणे मुक्तीची दिवाळी |

अखंडित ||🙏

Saturday, March 18, 2023

प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस


 राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज भारताच्या युवा , मुख्य कार्यकारी अध्यक्ष (CEO) पदांवरील अधिकाऱ्यांत त्यांची गणना होते आणि भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रात  त्या पहिल्या महिला CEO आहेत !! 
 

वयाच्या २२व्या वर्षी त्यांना जेव्हा  कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही आणि आपल्या  सातव्या नोकरीच्या मुलाखतीत त्या अपयशी झाल्या तेव्हा  आत्महत्या करू बघणाऱ्या  राधिका याना मित्रांनी येऊन वाचवले !! 

गुप्ता यांनी २००५ मध्ये मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या  पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून AQR कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये  कार्यरत होत्या. २०१७ मध्ये एडलवाईस असेट  मॅनेजमेंटमध्ये  सीईओ म्हणून काम करण्याआधी , गुप्ता यांनी एडलवाईस मल्टी स्ट्रॅटेजी फंड मॅनेजमेंट मध्ये धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी, गुंतवणूक, विक्री आणि वितरणावर देखरेख करण्यासाठी काम केले आहे. 

२०२२ मध्ये  मर्सिडीजचे भारत प्रमुख श्री. संतोष अय्यर यांनी विधान केले होते  की, भारतात लक्झरी कारची विक्री शक्य नाही कारण येथे लोक पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यांनी थेट म्युच्युअल फंडांच्या SIP सारख्या योजनांना लक्ष्य केले, "जर लोकांनी त्यांची एसआयपी गुंतवणूक लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर हा व्यवसाय खूप सुधारू शकतो," असे श्री. अय्यर म्हणाले होते. त्यावर राधिका यांनी व्हिडिओ पोस्ट करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते आणि गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केले होते ! 

"Limitless: The Power of Unlocking Your True Potential" हे त्यांनी, आपल्या जीवन प्रवासावर  लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक, एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेले आहे.      

अशा या निडर, प्रेरणादायी आणि यशस्वी  महिलेस आमचा सलाम  आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा !!