Thursday, March 23, 2023

संत जनाबाईंची मानसहोळी

 



संत जनाबाईंची मानसहोळी


कराया साजरा |

होलिकेचा सण |

मनाचे स्थान |

निवडिले ||


ऐसे ते स्थान |

साधने सारवले |

भक्तीने शिंपिले |

केले सिद्ध ||


त्या स्थानी खळगा |

समर्पणाचा केला |

त्यात उभा ठेला |

अहंकार एरंड ||


रचलीया तेथे |

लाकडे वासनांची |

इंद्रीय गोवऱ्याची |

रास भली ||


गुरुकृपा तैल |

रामनाम घृत |

अर्पिले तयात |

ऐसे केले ||


रेखिली भोवती |

सत्कर्म रांगोळी |

भवरंगाचे मेळी |

शोभिवंत ||


वैराग्य अग्नीसी |

तयाते स्थापिले |

यज्ञरूप आले |

झाली कृपा ||


दिधली तयाते |

विषय पक्वान्नाहुती |

आणिक पुर्णाहूती |

षड्रिपु श्रीफळ ||


झाले सर्व हुत |

वैराग्य अग्नीत |

जाणावया तेथ |

नुरले काही ||


वाळ्या म्हणे जनी |

व्हावी ऐसी होळी |

जेणे मुक्तीची दिवाळी |

अखंडित ||🙏

Saturday, March 18, 2023

प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस


 राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज भारताच्या युवा , मुख्य कार्यकारी अध्यक्ष (CEO) पदांवरील अधिकाऱ्यांत त्यांची गणना होते आणि भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रात  त्या पहिल्या महिला CEO आहेत !! 
 

वयाच्या २२व्या वर्षी त्यांना जेव्हा  कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही आणि आपल्या  सातव्या नोकरीच्या मुलाखतीत त्या अपयशी झाल्या तेव्हा  आत्महत्या करू बघणाऱ्या  राधिका याना मित्रांनी येऊन वाचवले !! 

गुप्ता यांनी २००५ मध्ये मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या  पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून AQR कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये  कार्यरत होत्या. २०१७ मध्ये एडलवाईस असेट  मॅनेजमेंटमध्ये  सीईओ म्हणून काम करण्याआधी , गुप्ता यांनी एडलवाईस मल्टी स्ट्रॅटेजी फंड मॅनेजमेंट मध्ये धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी, गुंतवणूक, विक्री आणि वितरणावर देखरेख करण्यासाठी काम केले आहे. 

२०२२ मध्ये  मर्सिडीजचे भारत प्रमुख श्री. संतोष अय्यर यांनी विधान केले होते  की, भारतात लक्झरी कारची विक्री शक्य नाही कारण येथे लोक पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यांनी थेट म्युच्युअल फंडांच्या SIP सारख्या योजनांना लक्ष्य केले, "जर लोकांनी त्यांची एसआयपी गुंतवणूक लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर हा व्यवसाय खूप सुधारू शकतो," असे श्री. अय्यर म्हणाले होते. त्यावर राधिका यांनी व्हिडिओ पोस्ट करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते आणि गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केले होते ! 

"Limitless: The Power of Unlocking Your True Potential" हे त्यांनी, आपल्या जीवन प्रवासावर  लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक, एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेले आहे.      

अशा या निडर, प्रेरणादायी आणि यशस्वी  महिलेस आमचा सलाम  आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा !!



Saturday, February 25, 2023

मराठी भाषा गौरव दिन




मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून '१ मे' दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला. १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 

'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.


Saturday, January 28, 2023

ई-कचरा ! चिंताजनक बाब

 

महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण  चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अ ई-कचर्‍याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्‍या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे. 

ई-कचरा म्हणजे काय ?

निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई-कचरा होय. यामध्ये वापरण्यास अयोग्य असलेले संगणकाचे भाग, मोबाईल आणि त्यांचे सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गाड्यांचे सुटे इलेक्ट्रॉनिक भाग, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल यांचा समावेश होतो. हा कचरा घनकचर्‍याप्रमाणेच आपल्या घरातूनदेखील निर्माण होतो आणि सर्वप्रमाणपणे त्याची विभागणी न होता आपल्या रोजच्या घरगुती कचर्‍यामधूनच तो थेट कचराकुंडीत जातो. हा कचरा टिकाऊ स्वरुपाचा असल्याने त्याचे पर्यावरणात विघटन होत नाही. दरवर्षी जगभरात साधारण 70 दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो. वैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे  प्रदूषण होते आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतोय.

भारतातील ‘ई-कचर्‍या’चे उत्पादन

ई-कचरा उत्पादनामध्ये संपूर्ण जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. यामधील सुमारे 70 टक्के ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून, 12 टक्के दूरसंचार क्षेत्रातून, आठ टक्के वैद्यकीय उपकरणांमधून आणि सात टक्के इतर उपकरणांमधून निर्माण होतो. सरकारी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या एकत्रितपणे 75 टक्क्यांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार करतात, तर घरगुती स्तरावर केवळ 19 टक्के ई-कचर्‍याचे उत्पादन होते. ई-कचरा निर्मितीमध्ये भारतात मुंबई शहर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ नवी दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक लागतो. राज्यनिहाय महाराष्ट्र आघाडीवर असून तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश त्यामागे आहेत. या इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये सर्वात जास्त शिसे आढळते. ज्याचे प्रमाण 43 टक्के आहे आणि यामुळे 72 टक्क्यांपेक्षा जास्त जड धातू तयार होतात.

महाराष्ट्र आणि ‘ई-कचरा’

’महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या आकडेवारीनुसार 2019-20 या सालात राज्यात 10 लाख टन ई-कचरा निर्माण झाला. त्यापैकी केवळ 975.25 टन कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित 11 हजार, 015.49 कचर्‍याचे नोंदणीकृत धारकांकडून (फॉर्मल सेक्टर) उन्मूलन करण्यात आले. राज्यात ई-कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या केवळ नऊ नोंदणीकृत कंपन्या असून त्यांची पुनर्प्रक्रियेची एकूण क्षमता 11 हजार, 794 टन आहे. असे असतानादेखील केवळ 975 मेट्रिक टन कचर्‍यावरच पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजेच राज्यात निर्माण झालेल्या एकूण इलेक्ट्रॉनिक कचर्‍यापैकी (ई-कचरा) केवळ एक टक्का कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. ई-कचर्‍याचे उन्मूलन करणार्‍या 90 कंपन्या असून त्यांची उन्मूलनाची क्षमता 74 हजार, 006 मेट्रिक टन आहे. अशा परिस्थितीत 2019-20 मध्ये केवळ 11 हजार, 015 मेट्रिक टन ई-कचर्‍याचे उन्मूलन करण्यात आले आहे. 

सद्य परिस्थिती 

आता टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर डंप केला, तर त्यासाठी दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट ॲन्ड हॅंडलिंग) कायदा-२००० लागू झाला आहे.

या कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही नागरिक त्याचेर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणाऱ्या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे. या कायद्याअंतर्गत ई-कचरा एकत्र करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना या कायद्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत.

भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे एक प्रमुख केंद्र क्षेत्र बंगलोरमध्ये आहे. या शहरात सुमारे १७०० आयटी कंपन्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ६००० ते ८००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा बाहेर पडतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे देशामध्ये निर्माण होणारा हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना अनुमती नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही.

सरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा एकत्र करण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. देशामध्ये ६०० पेक्षा जास्त ई-कचरा संग्रहण केंद्रेही आहेत. पण ज्या प्रमाणात ई-कचऱ्याची निर्मिती होत आहे, त्यामानाने ही संख्या कमी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ६०० केंद्रांवर प्रत्येक वर्षी जवळजवळ सुमारे ३००० टन ई-कचराच रिसायकल केला जातो. एका अहवालानुसार, येत्या १० वर्षामध्ये भारत, चीन आणि अन्य विकसनशील देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वेगाने वाढ होईल आणि पर्यायाने त्यातून निघणाऱ्या ई-कचऱ्याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

देशात ई-कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीतील कंपन्यांनी जर त्यांच्या पुनर्प्रक्रियेच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात पुनर्प्रक्रिया केल्यास त्यांच्या दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. 2016च्या नियमावलीनुसार अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या कचरा गोळा करणार्‍यांना अधिकृत किंवा औपचारिक दर्जा देणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना परवाना देणे या गोष्टी करणे आवश्यक होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये या गोष्टी झालेल्या नाहीत. ई-कचर्‍यावरील पुनर्प्रक्रिया वाढविण्यासाठी नोंदणीकृत धारकांच्या (फॉर्मल सेक्टर) कक्षेत अनौपचारिक धारक (इन्फॉर्मल सेक्टर - कचरावेचक इ.) आणण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करुन ई-कचर्‍याचे संकलन आणि त्यावर होणार्‍या पुनर्प्रक्रियेच्या क्षमतेमध्ये वाढ करणे काळजी गरज बनली आहे.

-संकलित माहिती  : आभार विकीपिडीया  !

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशनने , ई-यंत्रण: ई-कचरा संकलन मोहीम : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२३ मध्ये सहभाग नोंदविला !! या सामाजिक तसेच पर्यावरणपूरक मोहिमेचे उद्दिष्ट्य हे "नागरिकामध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता आणणे, ती वाढविणे आणि त्याच्या संरक्षणार्थ इलेक्ट्रॉनिक वेस्टचे योग्य पद्धतीने निर्मूलन करण्याची शिस्त बाणविणे" असा होता. जवळपास १०० किलो तांत्रिक कचरा यावेळी पूर्णम इकोव्हिजन पुणे , या संस्थेकडे जमा करण्यात आला. या सर्व ई-कचऱ्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने पुनरुत्पादन, पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल.