Tuesday, June 30, 2020

उजाळा अल्पारंभाचा ....

हा उजाळा आहे 'अल्पारंभा' च्या जन्माचा  !    

१९९५ मध्ये  'आर्थिक गुंतवणुक आणि सल्ला' या क्षेत्रात SWS चा प्रवास सुरु झाला.  कार्य सुरु केल्यानंतर जसे जसे ग्राहक जोडले जाऊ लागले, तस तसे त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सामाजिक संस्था, भरीव समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती यांचाही परिचय होत गेला. आणि अगदी पहिल्या वर्षापासूनच  ‘।।अल्पारंभ: क्षेमकर: ।।‘ या आमच्या ब्रीदवाक्याला साजेसा असाच,  विविध सामाजिक कार्यामध्येही  SWS चा सहभाग सुरु झाला. त्यानंतर आजतागायत, आपल्याप्रती असणाऱ्या सामाजिक दायित्वाचा विसर टीम SWS ला कधीही पडलेला नाही. सत्कार्याला वाहून घेतलेल्या व्यक्ती, संस्था त्याचबरोबर टीम  SWS मधील सर्वच सदस्यांचा याकडे असणारा कलही तितकाच महत्वपूर्ण होता. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमांत आमचा सहभाग  नेहेमीच एकदिलाने, एकजुटीने चालू राहिला.

सुरुवातीला संस्थेमार्फत नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाऊ लागले. नंतर विविध सेवाभावी संस्थासाठी निधी संकलनाचे कार्य हाती घेतले गेले. यामध्ये प्रामुख्याने वनबंधू परिषदेचा  एकल विद्यालय प्रकल्प, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB , पिंपळगाव बहुलास्थित गतिमंद मुलींचे वसतीगृह 'घरकुल'  या संस्थांचा समावेश आहे. विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प , पिंपळद येथे उजाड आणि ओसाड जागेवर संस्थेतर्फे वृक्षारोपण केले गेले आहे.  श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय, या कर्णबधीर मुलांच्या शाळेचा जेव्हा परिचय झाला तेव्हा तेथील गरजू, दिव्यांग मुलांच्या कर्णयंत्रांसाठी रु. १५ लाख इतका निधी उभारण्यात आलेला असून निधी संकलनाचे कार्य अजूनही सुरु आहे. 'आर्थिक साक्षरता' हाही संस्थेच्या सामाजिक उपक्रमांमधील अजून एक विषय. समाजाचे आणि प्रामुख्याने महिलांचे आर्थिक साक्षरतेद्वारे सबलीकरण करणेसाठी 'ब्लु बूक' ह्या  अनोख्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार संस्थेमार्फत करण्यात आलेला आहे. 'मुक्तांगण' या आपल्या प्रकाशन-संस्थेमार्फत, आदिवासी बहुल भागातील मुलांसाठी अनके उत्तम साहित्यकृतींचे प्रकाशन झालेले आहे. तेथे मराठी साहित्याचे प्रसारकार्य संस्थेमार्फत झालेले आहे. वाचनाची आवड बालवयापासूनच मुलांमध्ये रुजावी यासाठी 'वयम वाचक कट्टा' सारखे उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मेमरी क्लब' , 'सॅटर डे क्लब', 'मुव्ही  क्लब', अनेक उपयुक्त विषयांच्या कार्यशाळा यांचेही नियमित आयोजन सुरु असते. गेल्या सहा वर्षांपासून, ;तबला चिल्ला' या अखंड नाद-संकीर्तानाच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक दिग्ग्ज कलाकारांचे तबला-वादन प्रस्तृत झाले असून नवोदित कलाकारांनाही अशा सांगीतिक उपक्रमांमार्फत नवीन व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे.                                    

 हे आणि इतर असेच उपक्रम समाजातील सर्वच स्तर, वयोगट, समाजोपयोगी-विषय याना अनुसरून टीम SWS द्वारे यशस्वीरीत्या हाताळले गेले. संस्थेचे पंचविसाव्या वर्षात पदार्पण होताना मात्र, या सर्व  सामाजिक उपक्रमांना अधिक विस्तृत, व्यापक व्यासपीठ लाभावे म्हणून 'अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन’' चा उदय झालेला आहे. अनुभवी, विचार संपन्न आणि उत्तम अभिरुची लाभलेल्या तुमच्यासारख्या अनेक सुहुदांच्या साथीने या अल्पारंभाचा भव्य वटवृक्ष व्हावा आणि त्याच्या छायेत गरजूंना आनंद, समाधान लाभावा  हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरु केलेली आहे. तुमच्या सदिच्छा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाच्या प्रतीक्षेत आहोतच ! पुढे या प्रवासातील काही ठळक आठवणींना उजाळा दिलेला आहे.

नासिक येथील श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र उपलब्ध व्हावे यासाठी  टीम SWS तर्फे, समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने   रु. १५ लाख इतका निधी उभारण्यात आला आहे. त्याचा धनादेश स्वीकारतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली घारपुरे. अल्पारंभाच्या माध्यमातून या संस्थेच्या अनेक होतकरू, हुशार  विद्यार्थ्यांना भविष्यातही अशा स्वरूपाची मदत उपलब्ध व्हावी म्हणून संस्था प्रयत्नशील आहे.         

 


* पिंपळगाव बहुला, नासिकस्थित  घरकुल परिवार संस्था मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुली / स्त्रियांसाठी (खासकरुन ज्यांच्या पालकांना या सुविधा उपलब्ध करुन देण्यात अक्षम आहेत) त्यांना सुरक्षित घर उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापना केली गेली आहे. सौ. विद्याताई फडके यांच्या मार्गदर्शनाखाली, या विशेष मुलींच्या  पुनर्वसनासाठी संस्था काम करते. SWS तर्फे, घरकुल येथील मुलींच्या सहाय्य्यतेसाठी निधी उभारण्यात येतो. दिवाळी, गणेशोत्सव काळात या मुलीने तयार केलेल्या वस्तूंच्या  विक्रीसाठीही SWS तर्फे सहाय्य्य करण्यात येते. आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारतांना सौ. विद्याताई फडके.

     


२०१७ मध्ये, "नाशिक रेनेथॉन" साठी SWS ने प्रायोजिकता दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून उभा  राहिलेला  निधी NAB अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स, घरकुल परिवार संस्था , नासिक तसेच श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालय यांच्या आर्थिक सहाय्य्यतेसाठी वापरण्यात आला. या प्रत्येक संस्थेस जवळपास रु. ५०,००० इतका निधी मदत म्हणून देण्यात आला.  






* जनकल्याण सेवा समितीसाठी, SWS चा नेहेमीच मदतीचा हात असतो . नासिकच्या आसपासच्या विविध तालुक्यातील आश्रम शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप, मुक्तांगण द्वारे प्रकाशित केली जाणाऱ्या  मराठी साहित्याचे  वाटप शिवाय त्यांच्या दहावीतील मुलांच्या परिक्षापूर्व अभ्यासवर्गास मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमार्फत SWS  आणि  जनकल्याण सेवा समितीचे  नाते नेहेमीच दृढ होत गेले आहे.  




* नासिक येथील जनकल्याण रक्तपेढी बरोबरही SWS चे असेच सामाजिक ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत. संस्थेतर्फे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच प्लेटलेट्स डोनरही संस्थेच्या माध्यमातून रक्तपेढी बरोबर   जोडले गेलेले आहे. जनकल्याण रक्तपेढी द्वारे, अनेकदा या  सत्कार्यासाठी संस्थेचा सत्कार करण्यात आलेला आहे.       

* SWS मार्फत अनेकदा वृक्षारोपणाचे उपक्रम  राबविण्यात येतात.  नासिक मधील अनेक संस्थामध्ये तसेच  विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प , पिंपळद , तालुका त्रिंबकेश्वर , जिल्हा नासिक, येथे उजाड, ओसाड जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आलेले असून, केंद्राजवळील संपूर्ण टेकडी आज हिरवीगार दिसते आहे.  तसेच तेथील मुलांना बालवयातच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी, वयम वाचक कट्टा” हा उपक्रम सुरु करण्यात तेथे सुरु आला आहे. मुले त्यात आनंदाने सहभागी होतांना दिसतात.      


* वनबंधू परिषद संचलित 'एकल विद्यालय' या प्रकल्पासाठी SWS मार्फत निधी संकलनाचे कार्य केले जाते. ग्रामीण व आदिवासीं भागातील बंधू भंगिनींना  अधिक चांगल्या पद्धतीने  शिक्षण, आरोग्य सेवा देण्यासाठीसंपूर्ण भारतात 34 अध्यायांचे विस्तृत जाळे वनबंधू परिषदेने उभे केलेले आहे.  

* SWS फायनान्शिअल सोलूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीपथातील प्रमुख मार्गदर्शक असणाऱ्या शिक्षक वर्गासाठी तसेच त्यांच्या मार्गदर्शनासाठी घडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुभव लेखन स्पर्धा आयोजित  केली जाते . विद्यार्थ्यांच्या शालेय वाटचाली दरम्यान, त्यांना बरेचदा असे काही शिक्षक लाभतात, ज्यांच्या विशेष, वेगळ्या आणि अनोख्या प्रयोगाद्वारे अथवा मार्गदर्शनामुळे, मुलांचा शिक्षण किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारत्मक होतो. अशा सरधोपट मार्गापेक्षा वेगळ्या असणाऱ्या मार्गदर्शनामुळे, विद्यार्थी अधिक सक्षमपणे आपली पुढील वाटचाल करू शकतो. अशा अनुभवांचे संकलन, प्रचार आणि प्रसार इतर अनेक शिक्षकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकतात, म्हणून हा स्पर्धा प्रपंच.


* महाराष्ट्रात , विविध १३ शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांच्या  आर्थिक शिक्षणासाठी "आर्थिक साक्षरता क्लब" ची स्थापना करण्यात आलेली आहे. या क्लबच्या माध्यमातून   विद्यार्थ्यांना  वेगवेगळ्या आर्थिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते.  येणाऱ्या 'अर्थभान' देण्यासाठी  हा संस्थेचा अनोखा उपक्रम !  

    

* आदिताल तबला अकादमी आणि SWS च्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये 'तबला चिल्ला..अखंड नादसंकीर्तन’  ही संकल्पना  सुरू झाली नाशिकमधील तबला चिल्ला ही साधना म्हणजे राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील साधकांसाठीही एक तालपर्वणीच असते.थिरकवाँ खाँसाहेबांच्या स्मृतिनिमित्त जरी हा कार्यक्रम हाेत असला तरी संपूर्ण भारतातील तबल्याचा एक ‘फ्लेवर’ या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळताे.

* नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात संगीताचा प्रसार आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’ या संस्थेस वर्ष  २०२० मध्ये यंदा ५० वर्षे पूर्ण झाली   तसेच नाशिकमधील संगीत आणि सामाजिक संस्थांना नेहमीच मदत करणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या एस.डब्ल्यू.एस. फायनान्शीयल सोल्युशन प्रा. लि. या संस्थेलाही या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या दोन्ही संस्थांच्या वतीने नाशिककरांसाठी वर्षभर (दर तीन महिन्यांनी तीन दिवस याप्रमाणे)   ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवाचे पहिले पुष्प फेब्रुवारी, दुसरे पुष्प मे  महिन्यात, तिसरे पुष्प सप्टेंबर आणि समारोपाचे पुष्प डिसेंबर २०१९ मध्ये संपन्न झाले. यातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:


* आर्थिक साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करणेसाठी SWS तर्फ़े वेबसाईट, ब्लॉग, वयम  मासिक, दैनिक देशदूत तसेच गवाक्ष बुलेटिन यांमार्फत, विविध  आर्थिक विषयांवर    लिखाण होत असते. गुंतवणूकदार आणि भावी पिढीचे आर्थिक-बाबींवर प्रबोधन यांमार्फत साधले जाते. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हाही लेखनामागील हेतू असतो.   


* समाजातील सर्व वयोगटांसाठी उपयुक्त उपक्रम राबवितांना SWS तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मेमरी क्लब' हा स्मरणशक्तीस चालना देणारा उपक्रम, 'स्मार्टफोन वापर' कार्यशाळा आदी उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. बालदोस्तांसाठी विविध उपक्रम SWS मार्फत नियमितपणे घेतले जातात. यात 'मुक्तरंग' हे हस्तकला शिबीर, 'वयम वाचक कट्टा' हा वाचनाची आवड रुजविण्यासाठी उपक्रम तसेच 'बायोस्कोप' हा बालचित्रपटांचा खजिना उलगडणारा उप्रक्रम यांचा समावेश असतो. 

तुमच्यासारख्या अनेक सुहुदांच्या साथीने या अल्पारंभाचा भव्य वटवृक्ष व्हावा आणि त्याच्या छायेत गरजूंना आनंद, समाधान लाभावा  हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल सुरु केलेली आहे. तुमच्या सदिच्छा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाच्या प्रतीक्षेत आहोतच !