Saturday, February 27, 2021
Saturday, February 20, 2021
Saturday, February 13, 2021
Saturday, February 6, 2021
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख-- श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख
1967 साली चेंबूरच्या युथ कौन्सिलची स्थापना केल्यावर अनेक युवा व समाजसेवेची कामे जोरात सुरू झाली. भैय्यासाहेब आगाशे या बहुपेडी व्यक्तीमत्त्वाच्या प्रेरणेने व अशोक वैद्य यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या युवासंस्थेने चांगलेच बाळसे धरले. वैद्यकीय सेवा, समाज सेवा, श्रमदान, युवा शिबिरे यांच्या बरोबर रंगभूमीची सेवा करण्यासाठी प्रत्येक सभासद झटू लागला. संस्थेला कार्यकारिणी होती परंतु सर्वच जण आधी कार्यकर्ते होते. त्यामुळे आधी सेवाकार्य व नंतर प्रशासकीय व हिशेब अशी सर्वांची मनोधारणा झाली. त्यातच आर.सी.एफ. कारखान्यात नवीन प्रशिक्षणार्थी घेण्यात आले. त्यांची ये-जा सुरू झाली. दरम्यान मी व अशोकने नागरी संरक्षणाचेही शिक्षण घेऊन वसाहतीत, शाळांमध्ये, ट्रेनिंग सेंटरमध्ये नागरी शिक्षणाचे वर्ग सुरू केले. त्यावेळी एक माणिक हाताशी लागले व ते म्हणजेच सुभाष आनंदराव हांडे देशमुख.
हांडे देशमुख हे तसे भारदस्त नांव. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळचे वतनदार. घरची मंडळी सुशिक्षित व जमीनदार, प्रतिष्ठित. परंतु मोठे कुटुंब, बेतास बेत असा शेतीचा कारभार. म्हणून सुभाष एस.एस.सी नंतर अप्रेन्टिस म्हणून आर.सी.एफ. मध्ये लागला व नागरी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात ओळखीचा झाला.
मध्यम शरीरयष्टी, धारदार नाक, तेजस्वी डोळे व गोरा गव्हाळी वर्ण यामुळे तो इतरांचे लक्ष चटकन वेधून घेई. बोलणे आर्जवी, मधाळ. खरे म्हणजे 96 कुळी मराठा तरूण हिकमती, धडाडीचा व येईल त्या प्रसंगी बेधडक बोलणारा व वागणारा असेल अशी माझी धारणा होती. प्रत्यक्षात सुभाषमध्ये हे सारे होते पण सुप्त होते. त्या बोलण्या वागण्यात आर्जव ऋजुता होती, धडाडी होती पण बेफिकीरी नव्हती. डोळयात तेज होते पण भांडखोरपणा नव्हता. त्याच्याकडे पाहिल्यावर हा “लंबी रेस का घोडा” आहे असा विचार मनात आला. त्यामुळेच की काय या नम्र व सचोटीच्या तरूणाने आमच्या सार्यांचेच मन जिंकले व तो युवा परिवारात सामील झाला.
1971 चे बांगला देश युद्ध, 1972 चा महाराष्ट्रातील दुष्काळ, त्यानंतर आंध्र प्रदेशात आलेले वादळ या प्रसंगी सुभाषने आमच्या बरोबर काम केले सर्वांची वाहवा मिळवली.
कालांतराने आर.सी.एफ. तर्फे सुरू झालेल्या गृह योजनेत सहभागी होऊन तो नवी मुंबईत नेरूळ येथे रहावयास गेला. संघटक वृत्ती रक्तातच असल्यामुळे सुभाषने तिथे ही आपल्या कौशल्याची चमक दाखवून यूथ कौन्सिलचे विस्तारीत काम सुरू केले. कार्यकर्त्यांची गुंफण केली, युवा शिबीरे, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धा, रक्तदान शिबीरे, आपत्कालीन सेवा असे भरगच्च कार्यक्रम हाती घेत संघटनेला बळकटी आणली. या सर्व कामात त्याला आर.सी.एफ. व सेंट झेवियर्स शाळेचे प्रमुख श्री. बुरली यांची मदत झाली. नव्या मुंबईतील लोकनेते, सिडको व महापालिकेचे सहकार्य, मिळविण्यातही सुभाष यशस्वी झाला.
नेरूळ संस्थेचे काम नेत्रदीपक होत असल्यामुळे सिडकोने 1000 चौ.मी. ची जागा ह्या संस्थेला रोप वाटिकेसाठी दिली व अनेक नागरिकांना आपल्या वृक्षप्रेमाची व लागवडीची संधी मिळाली.
वरील सेवाकार्यामुळे सुभाष बहुचर्चित झाला. संस्था, कंपनी व राज्यपातळीवर तो आदर्श कामगार ठरला. मानपत्रे, मानसन्मान यांचा धनी झाला. आंतरराष्ट्रीय युवा आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत त्याला एक महिना इग्लंडमध्ये रहायला व शिकायला मिळाले. हे सर्व घडत असताना सुभाष सदैव नम्र राहिला. आपलेपणा, अगत्य, कामांचा उरक तसाच राहिला. जोडलेले संबंध वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचेच राहिले.
सुभाषचा विवाह हा एक योगायोगच. सुदैवाने त्याला सुशील, गृहकृत्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ पत्नी लाभली. त्यामुळे एकेकाळी अडचणीत असलेला व एकटा वाटणारा सुभाष आज सुसंस्कृत, सुशिक्षीत व समाधानी कुटुंबप्रमुख बनला आहे. पत्नीचा सहभाग ही कुटुंबासाठी किती महत्त्वपूर्ण बाब असते हे सुभाषच्या कुटुंबाकडे लक्षपूर्वक पाहिले की चटकन कळते.
इतरांसाठी सतत धडपडणे व त्यांची अडलेली कामे मार्गी लावणे हा सुभाषचा स्वभावच बनला आहे. चांगले झाले तर सहकार्यांना श्रेय देण्याचा व काही बिघडले तर दोष स्वत:कडे घेऊन आत्मसंशोधन करण्याची त्याची मनोधारणा त्याला एका वेगळया उंचीवर घेऊन जाते. मराठीत एक नाटक होते. “देव दीनाघरी धावला.” मोठे मार्मिक शीर्षक आहे हे ! सुभाष गेली 40 वर्षे असाच दीनाघरी (गरजूकडे) धावत असतो. इतर सारे बाजूला ठेवून तो वेळ काढू शकतो. त्याच्या अशा सदोदित बाहेर राहण्याचा परिणाम मुलांवर व इतरांवर झाला नाही म्हणजेच कुणीतरी त्या साठी झटले असा होतो. अशा भक्कम पाठिंब्यामुळे सुभाषची जीवन नौका संसार सागरावर विहरत आहे. माझ्या सारख्या स्नेह्याला या दृश्यामुळे खूप समाधान मिळते.
पूर्वीपासून वृत्त लिखाणाची व संकलनाची आवड असलेला सुभाष याही क्षेत्रात काही तरी अविस्मरणीय करील अशी आशा करायला खूप मोठी जागा आहे.
-
राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्य...
-
भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व - लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर. ११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रसं...
-
महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण ...